Maratha Aarakshan | मराठवाड्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहिम

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Maratha Aarakshan | मराठवाड्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहिम

|  मराठा आरक्षणाबाबत कार्यवाहीच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

Maratha Aarakshan | मुंबई | मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड करण्यास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. या कामाच्या संनियत्रणासाठी मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी यांची देखील यावेळी नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा आता राज्यभर वाढविण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाला इम्पॅरीकल डेटासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर कार्यवाही करून महिन्याभरात ती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुख्य सचिव मनोज सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची बैठक घेतली. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्या समवेत काल राज्य शासनाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेतील मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी आज विभागात कुणबी नोंदी तपासणीच्या कामाचा आढावा घेतला.

*जिल्हाधिकाऱ्यांनी स्वताहून कुणबी नोंदी तपासण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घ्यावी*

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्य शासन गांभीर्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करीत आहे. त्यासाठी आता मराठवाड्यासह राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वताहून कुणबी नोंदी तपासण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घ्यावी. त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आणि त्यांच्या नियंत्रणाखाली कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून द्यावी. त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ, साधनसामुग्री देखील तातडीने देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी याबाबत संनियंत्रण करतील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

*कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान करावी*

निवृत्त न्यायाधीश शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा संपूर्ण राज्यभर वाढविण्यात आली असून ज्या पद्धतीने मराठवाड्यात नोंदी तपासण्यात आल्या तशीच कार्यपद्धती राज्यभर राबवावी असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मराठवाड्यात शिंदे समितीने शिफारस केलेल्या पुराव्यांच्या आधारे कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान करावी त्याचबरोबर प्रांत अधिकारी, तहसीलदार व जातपडताळणी समित्यांमधील अधिकारी, कर्मचारी यांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

*मराठा आरक्षणासंदर्भात प्रशासनाचे दोन पातळीवर काम*

मराठा आरक्षणासंदर्भात प्रशासन दोन पातळीवर काम करीत असून राज्यभर कुणबी नोंदी तपासण्याची कार्यवाही सुरू करतानाच दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाला इम्पॅरीकल डेटा जमा करण्यासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावी, असेही त्यांनी सांगितले. इम्पॅरीकल डेटा गोळा करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था, गोखले इन्स्टीट्यूट ऑफ पॉलिस्टीक्स अण्ड इकॉनॉमिक्स आणि इंडियन इन्स्टीट्युट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज यासंस्थांची मदत घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

*महिला उद्योजकांना कर्ज वाटपासाठी विशेष योजना तयार करा*

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणारे कर्ज तातडीने उपलब्ध होईल यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याचे निर्देश देतानाच कर्ज वितरणामध्ये वाढ झाली पाहिजे, महिला उद्योजकांना कर्ज वाटपासाठी विशेष योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यासंदर्भात बँकांची बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अधिक सक्षम त्याचा लाभ मराठा समाजातील नागरिकांना द्यावा.

*भाडेतत्वावर जागा घेऊन तातडीने वसतीगृहे सुरू करा*

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी विभागाने भाडेतत्वावर जागा घेऊन तातडीने वसतीगृहे सुरू करण्याचे निर्देश देऊन त्याबाबतचा दर आठवड्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.जेथे वसतिगृह उपलब्ध होत नाहीत अशा महानगर असलेल्या मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रति वर्ष प्रति विद्यार्थी ६० हजार रुपये निर्वाह भत्ता, विभागीय ठिकाण, विभागीय मुख्यालय व क वर्ग महापालिका असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रति वर्ष ५१ हजार रुपये निर्वाहभत्ता देण्यात येणार असून अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणी ४३ हजार रुपये निर्वाहभत्ता तर तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपये निर्वाह भत्ता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार आहे.

*राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची कार्यशाळा*

विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची तातडीने कार्यशाळा घेऊन शिंदे समितीच्या कामकाजाच्या संदर्भात व कोणती अभिलेखे तपासायची याबाबत मार्गदर्शन करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यातील कुणबी नोंदीचे अभिलेखांचे डिजिटायजेशन आणि प्रमाणीकरण करावे. मोडी, उर्दू लिपीतील अभिलेखांचे भाषांतर करून ते संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
००००

Mahavikas Aghadi | Maratha Samaj | मराठा समाजाच्या समर्थनार्थ महविकास आघाडीचे धरणे आंदोलन

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Mahavikas Aghadi | Maratha Samaj | मराठा समाजाच्या समर्थनार्थ महविकास आघाडीचे  धरणे आंदोलन

Mahavikas Aghadi | Maratha Samaj | अंतरावली सराटी, जालना (Jalana) या ठिकाणी मराठा समाजाच्या शांतीपूर्वक चाललेल्या आंदोलनावर राज्य सरकारकडून अमानुषपणे लाठीचार्ज (Lathichge) करण्यात आला. या लाठीचार्जमध्ये अनेक निरागस नागरिक जखमी झाले असून हा फक्त आंदोलनकर्त्यांवर नाही तर प्रत्यक्ष लोकशाहीवर झालेला हल्ला होता. याच अनुषंगाने या घटनेचा निषेध करण्यासाठी आज कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) निषेध व्यक्त करण्यात आला. मराठा समाजाच्या पाठीशी महाविकास आघाडी ठामपणे उभी असून भविष्यात असा कोणताही लोकशाहीवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम सरकारला देण्यात आला. (Mahavikas Aghadi | Maratha Samaj)
महाविकास आघाडीच्या निवेदनानुसार गेल्या कित्येक वर्षांपासून लाखोंच्या संख्येने निघणारे मराठा मोर्चे जगाला आदर्श घालून देणारे आणि नवा आदर्श स्थापित करणारे आहेत. जालना जिल्ह्यातील आंदोलनही शांतीपूर्वक आणि लोकशाहीचा आदर राखत सुरू असताना झालेला हल्ला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला काळिमा फासणारा होता.
सरकारचे लोकशाहीविरोशी धोरण आणि आबालवृद्धांवर करण्यात आलेला हा हल्ला स्वातंत्र्यपूर्व काळातील जालियनवाला बाग हल्ल्याची आठवण करून देणारा होता, ज्याला विरोध करणे हे जागरूक नागरिक या नात्याने आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.
या वेळी ज्येष्ठ नेते अंकुश अण्णा काकडे,अरविंद शिंदे, चंद्रकांत मोकाटे, अभय छाजेड, गजानन थरकुडे, पृथ्वीराज सुतार ,स्वप्नील दुधाने, गिरीश गुरनानी, योगेश मोकाटे ,राम थरकुडे, संगीता ताई तिवारी, मृनाली वाणी, आदी महाविकास आघाडी पदाधिकारी नेते उपस्थित होते.

Maratha Arakshan | Jalana Andolan | मराठा आरक्षण आंदोलना दरम्यानच्या लाठीमाराची : उच्चस्तरीय चौकशी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Maratha Arakshan | Jalana Andolan | मराठा आरक्षण आंदोलना दरम्यानच्या लाठीमाराची : उच्चस्तरीय चौकशी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

| मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका; नागरिकांनी शांतता राखावी- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Maratha Arakshan | Jalana Andolan Lathimar |  मराठा आरक्षणासाठी (Maratha Arakshan) जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात असल्याचे सांगत मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका राज्य सरकारची आहे. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले आहे. ( Maratha Arakshan | Jalana Andolan Lathimar)
यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या घटनेची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे. मी या आंदोलनाच्या नेत्यांशी देखील संवाद साधला होता. त्यांच्या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर कार्यवाही सुरू असल्याचे सांगतानाच त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील केली होती. मात्र आंदोलनावर ते ठाम राहिल्याने त्यांची प्रकृती खालावत होती. आज जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक त्यांना भेटायला गेले होते. त्यांची प्रकृती पाहून त्यांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी विनंती देखील त्यांनी केली होती.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका राज्य शासनाची आहे. या समाजाला न्याय देण्याची भावना आणि भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
००००

आपण मराठा आंदोलकांसोबत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्ट भूमिका

| राज्यात परिस्थिती बिघडणार नाही, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन
 “मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीने लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे  प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देत आहे.  राज्यातील मराठा आंदोलनाने लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श आणि गौरवशाली परंपरा कायम ठेऊन, कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानेच हे आंदोलन पुढे जाईल, याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल. राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आंदोलकांच्या सोबत आहे. असा विश्वास देतो. अंबड येथील घटनेतील दोषी पोलिसांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.” अशी स्पष्ट भूमिका मांडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण मराठा आंदोलकांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.
 राज्यात परिस्थिती बिघडणार नाही,
 शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलक आणि राज्यातील नागरिकांना केले आहे.
*******