PMRDA Election : Prashant Jagtap : शहर पातळीवरील काही नेतेमंडळीनी आघाडीत बिघाडी होण्याचीच भूमिका घेतली  : राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली खंत 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

शहर पातळीवरील काही नेतेमंडळीनी आघाडीत बिघाडी होण्याचीच भूमिका घेतली

: राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली खंत

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) नियोजन समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचे आठही उमेदवार विजयी झाले आहेत. त्याबद्दल, दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते, सर्व विजयी उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांचे नगरसेवक व कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल निश्चितच आमचा उत्साह दुणावणारा आहे. मात्र, शहर पातळीवरील काही नेतेमंडळीनी आघाडीत बिघाडी होण्याचीच भूमिका घेतल्याने अखेर निवडणुकीला सामोरे जावे लागले. अशी खंत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संख्याबळानुसार नियोजन समितीच्या एकूण २२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात व शिवसेनेचा एक असे आघाडीचे आठही उमेदवार विजयी झाले आहेत. आमचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख व माजी मंत्री आदरणीय सचिनभाऊ अहिर, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील गटनेते, शहरप्रमुख आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी झालेली ही ‘पीएमआरडीए’ नियोजन समितीची निवडणूक महत्त्वपूर्ण होती. त्यामुळे, राज्यात एकत्रित सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जावे, अशी भावना पक्षाचे वरिष्ठ नेते, नगरसेवक व कार्यकर्त्यांची होती. काँग्रेसचे संख्याबळ पाहता एकही उमेदवार विजयी होणार नसल्याचे निश्चित होते. त्यामुळे, काँग्रेसने उमेदवार उभा करू नये, अर्ज माघारी घ्यावा, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह आम्हीही आग्रही विनंती करीत होतो. मात्र, शहर पातळीवरील काही नेतेमंडळीनी आघाडीत बिघाडी होण्याचीच भूमिका घेतल्याने अखेर निवडणुकीला सामोरे जावे लागले. बुधवार, दि. १० नोव्हेंबर रोजी झालेल्या या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, यात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचे सर्व आठ उमेदवार विजयी झाले आहेत.

आगामी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल निश्चित आमचा उत्साह दुणावणारा आहे. तसेच, हा निकाल आगामी निवडणुकीतील विजयाची नांदी आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन या निवडणुकीच्या निकालात दिसून आले असून, आगामी काळातही ते दिसून येईल, यात काही शंका नाही. मात्र, कार्यकर्ते, नगरसेवक यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून स्वत:चेच मत त्यांच्यावर लादणाऱ्या काँग्रेसच्या काही नेत्यांमुळे काँग्रेस या आघाडीचा भाग होऊ शकली नाही, याची निश्चितच खंत वाटते. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचा विजयी जल्लोष सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसला आत्मचिंतन करावे लागत आहे, याचेही आम्हाला निश्चितच एक मित्रपक्ष म्हणून वाईट वाटते. परंतु, या निकालाने राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार शहर पातळीवरील नेत्यांनी, नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी जी एकी दाखवून दिली, ती निश्चितच यापुढेही यशस्वी, विजयी वाटचालीची ठरेल, यात काही शंका नाही.

 

Ganesh Bidkar : Election : महाविकास आघाडीतील पक्ष विचाराने कधी एकत्र येऊ शकत नाहीत  : सभागृह नेते गणेश बिडकर

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

महाविकास आघाडीतील पक्ष विचाराने कधी एकत्र येऊ शकत नाहीत

: सभागृह नेते गणेश बिडकर यांनी लगावला टोला

पुणे : पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची (भाजप) मते फुटतील हा महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षाने केलेला दावा खोटा ठरला आहे. या निवडणुकीच्या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच शिवसेना या तीनही पक्षाचा मुखवटा गळाला आहे, अशी प्रतिक्रिया महनगरपालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली. एकसंघ पद्धतीने भाजप या निवडणुकीला सामोरे गेल्याने हा विजय निश्चित होता, असे बिडकर यांनी स्पष्ट केले. तर केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले हे तीनही पक्ष आहेत, ते विचाराने कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, हे यानिमित्ताने समोर आले, अशी टीका देखील सभागृह नेते बिडकर यांनी केली.

१४ जागांवर भाजप विजयी

पुणे महानगर नियोजन समिती (पीएमआरडी) सदस्यपदाच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी झाली. या निवडणुकीत भाजपने उभे केलेले सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. २२ पैकी १४ जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयानंतर सभागृह नेते बिडकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. योग्य पद्धतीने केलेले नियोजन यामुळे या निवडणुकीत भाजपची सर्व मते ‘इनकॅश’ झाली. त्यामुळे भाजपची मते फुटतील हा विरोधी पक्षाने केलेला दावा फोल ठरला आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील बिघाडी पुणेकरांच्या लक्षात आली. महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या एका पक्षाच्या उमेदवाराला तर आवश्यक असलेला मतांचा कोटा देखील पूर्ण करता आला नाही. भाजपची मते फोडण्याच्या वल्गना ते करत राहिले. मात्र त्यांच्या पदरी केवळ निराशाच पडली. केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले हे तीनही पक्ष आहेत, ते विचाराने कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, हे यानिमित्ताने समोर आले, अशी टीका देखील सभागृह नेते बिडकर यांनी केली.