Video | PMC Pune River Revival Project | पुणे मनपाकडून खुलासा करण्यासाठी अधिक्षक अभियंता यांचा व्हिडिओ प्रसारित

Categories
Breaking News PMC social पुणे

नदी पुनरुज्जीवनाच्या कामासाठी काढण्यात येणारे वृक्ष सुबाभूळ, कुबाभूळ प्रजातीची

| पुणे मनपाकडून खुलासा करण्यासाठी अधिक्षक अभियंता यांचा व्हिडिओ प्रसारित

PMC Pune River Revival Project |  पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (Mula Mutha River Revival Porject) हाती घेतला आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना नदी लगत असणारी ६ ते ७ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडली (Tree cutting) जाणार असल्याची सध्या चर्चा समाज माध्यमांमध्ये आहे. मात्र, नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याच्या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाच्या वतीने एक व्हिडिओ सुद्धा प्रसारित करण्यात आला आहे. (Pune Municipal corporation)

तीन हजार झाडे काढण्यात येणार 

पुणे महानगरपालिकेच्या अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांचा हा व्हिडिओ असून त्यामध्ये नदी सुधार प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. देशमुख यांचा व्हिडिओही महानगरपालिकेने प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये देशमुख यांनी सांगितले आहे की, ‘नदी सुधार प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार, अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात ती वस्तुस्थिती नाही. नदी सुधार प्रकल्पांतर्गत सुरुवातीला दहा किलोमीटरचा नदी काठ विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आवश्यक सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये तीन हजार झाडे काढण्यात येणार आहे. पण हे सर्व झाडे झुडूप या प्रकारात येतात,’ असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. ते पुढे म्हणाले, ‘या तीन हजार वृक्षांमध्ये ९६ टक्के झाडे ही सुबाभूळ, कुबाभूळ या प्रजातीमधील आहेत. या वृक्षांची अनियंत्रित वाढ होत असते. नदी सुधार प्रकल्पाच्या कामासाठी जेथे झाडे काढणे आवश्यक आहे, तेथेच ती काढली जाणार आहेत. त्यामध्येही सुबाभूळ आणि कुबाभूळ यांचे प्रमाण जास्त आहे. इतर झाडांची पुर्नरोपण करण्यात येणार आहे.’ (PMC Pune River Revival Project)

पक्ष्यांसाठी, वन्यप्राण्यासाठी फळे-फुले देणारी झाडे लावणार

‘नदी सुधार प्रकल्पासाठी स्थानिक प्रजातीची कोणतेही झाड काढले जाणार नाही,’ असे सांगतानाच देशमुख पुढे म्हणाले की, ‘उलट पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक प्रजातीची ६० ते ६५ हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. हे सर्व वृक्षारोपण करताना बंगलोर येथील बॉटनीमध्ये अभ्यास असणाऱ्या एका संस्थेची मदत घेतली जाणार आहे. तेथील तज्ज्ञांनी नदीकडेला कुठल्या पद्धतीची झाडे असली पाहिजेत, याचा तांत्रिक अभ्यास केला असून ती झाडे लावली जाणार आहेत. यामध्येही सावली देणारे झाडे, पक्ष्यांसाठी, वन्यप्राण्यासाठी फळे-फुले देणारी झाडे, नदीला पूरक अशी झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. नदी कडेला ही झाडे लावण्याचे नियोजन सुनियोजित पद्धतीने करणार आहोत. जेणेकरून ही झाडे टिकून राहतील.’ (PMC Pune River Revival Project)

Chipko Andolan | पुण्यातील चिपको आंदोलनात हजारों पुणेकरांचा सहभाग

Categories
Breaking News PMC Political social पुणे

पुण्यातील चिपको आंदोलनात हजारों पुणेकरांचा सहभाग

 बंड गार्डनजवळील मुळा-मुठा नदीच्या काठावरील 7,500 हून अधिक झाडे आणि संबंधित परिसंस्था तोडण्याच्या पुणे महापालिकेच्या योजनेला विरोध करण्यासाठी 5,000 हून अधिक लोक चिपको आंदोलनामध्ये सामील झाले. (Chipko Andolan in pune)
 जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज बागेपासून सायंकाळी ५ वाजता या पदयात्रेला सुरुवात झाली, लोकांनी तोडल्या जाणाऱ्या झाडांबद्दल आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी उत्कट घोषणाबाजी केली.   4,700 कोटींचा नदी विकास प्रकल्प जो पुणे महानगरपालिका राबवत आहे.  अनेक नागरी संस्था, तज्ञ आणि संबंधित नागरिकांचे संघटन असलेल्या ‘पुणे रिव्हर रिव्हायव्हल’ ग्रुपने या निषेधाचे नियोजन केले होते.
नागरिकांची मागणी
 आधी नद्या स्वच्छ करा
 नदीकाठची झाडे आणि जंगले वाचवा
 नदीची रुंदी कमी करू नका
 नैसर्गिकरित्या  नद्या वाहू द्या
 हवामान बदलाचा प्रभाव समाविष्ट करा
 आंदोलन जेएम रोडच्या खाली आणि नदीकाठच्या रस्त्यावर गेले, जिथे चिपको कारवाई करण्यात आली.  नदीकाठच्या नियोजित विनाशाला विरोध दर्शवण्यासाठी अनेक नागरिकांनी वृक्षांना प्रतीकात्मक मिठी मारली.  चालताना त्यांनी झाडे आणि नद्या वाचवण्याच्या जोरदार घोषणा दिल्या.  आंदोलनाचा एक भाग म्हणून नदीकाठच्या झाडांना मिठी मारून गरवारे पुलाजवळ पदयात्रा संपली.
 मोहिमेदरम्यान आर्किटेक्ट सारंग यादवाडकर म्हणाले, “रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पासाठी केलेला ईआयए फसवा आहे.  प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालात दावा करण्यात आला आहे की नदीकाठच्या सर्व अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे संरक्षण केले जाईल.  प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजुरीने पीएमसीला एक झाड तोडण्यास देखील बंदी घातली आहे.  परंतु काही दुर्मिळ आणि जुन्या झाडांसह हजारो झाडे 11 पैकी फक्त तीन भागांसाठी तोडली जात आहेत.
 समुचित एन्व्हायरो टेकच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रियदर्शनी कर्वे म्हणाल्या, “जर पीएमसी वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा विचार करत असेल, तर आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की पुनर्रोपित झाडे जगण्याचा दर खूपच कमी आहे.  याशिवाय, किनार्‍यावर एक संपूर्ण परिसंस्था नष्ट होत आहे आणि एकट्या झाडे लावणे कधीही विद्यमान परिसंस्थेची जागा घेणार नाही.  संपूर्ण प्रकल्प इकोसिस्टम विचारात घेत नाही.”
 जीवननदीच्या संस्थापक-संचालक शैलजा देशपांडे म्हणाल्या, “पुणेकरांना एकही झाड कापायचे नाही.  आम्हाला सर्व झाडे वाचवायची आहेत.  संबंधित नागरिक ही मागणी लवकरच महापालिकेकडे सादर करणार आहेत.  प्रकल्पांसाठी कोणतीही झाडे, मग ती नद्यांसाठी असोत की डोंगरासाठी, तोडली जाणार नाहीत.  या आमच्या नद्या आहेत आणि त्या जतन केल्या पाहिजेत.  अधिकारी कृत्रिम उद्यानांची सक्ती करू शकत नाहीत.  नदीचे नैसर्गिक क्षेत्र वाचवले जावे अशी आमची इच्छा आहे.  नागरिकांच्या मागण्या अधिकाऱ्यांना अधिकृत पत्राद्वारे देण्यात येतील.  ते समाविष्ट न केल्यास आंदोलन सुरूच राहणार आहे.  आम्ही इथे थांबणार नाही.”
 या आंदोलनाला पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघ, सजग नागरिक मंच, वसुंधरा स्वच्छता अभियान, जलबिरादरी, डेक्कन जिमखाना परीसर समिती, वॉरियर मॉम्स, फ्रायडे फॉर फ्युचर पुणे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर अनेक संस्थांनी पाठिंबा दिला होता.  चिपको आंदोलनात सामील झालेल्या राजकीय पक्षांमध्ये आम आदमी पार्टी, पुणे शहर;  पर्यावरण सेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना;  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शहरी सेल);  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस;  आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना.
 उपस्थित सर्व लोकांनी वाहतुकीचे नियम पाळले आणि वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.  तरुण आणि वृद्ध लोक जवळपास 1.5 किमी चालले.

River Revival Project | जुन्या व दुर्मिळ वृक्षांबाबत पुणे महापालिकेला करावा लागला खुलासा | नेमके काय आहे प्रकरण?

Categories
Breaking News PMC social पुणे

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये जुनी व दुर्मिळ वृक्षांचा समावेश नाही

| समाज माध्यमांवर फिरत आहे चुकीची आकडेवारी, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मनपाचे आवाहन

पुणे महानगरपालिकेने मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत संगमब्रिज ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा याठिकाणी कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना नदी लगत असणारी ६ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडली जाणार असल्याची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. तसेच या वृक्षांमध्ये जुनी व दुर्मिळ झाडे सामाविष्ट आहेत, अशी माहितीही समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात येत आहे. प्रत्यक्षात या माहितीमध्ये कोणतेही तथ्य नाही. उलट, नदी काठच्या बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी ३ हजार १४२ वृक्ष न काढता त्यांचे जतन केले जाणार आहे. तर, नदी पुनरुज्जीवनाचे काम करताना जी वृक्ष काढणे अत्यावश्यक आहे, त्यांच्या बदल्यात ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्ष लावले जाणार आहेत. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहणाऱ्या नदीच्या दोन्ही काठांवर हरीतपटा निर्माण होण्यास मदत होणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवत असताना बाधित होणाऱ्या वृक्षांबाबत यापूर्वीही पुणे महानगरपालिकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी जी वृक्ष काढली जाणार आहेत, त्यामध्ये जुनी व दुर्मिळ वृक्षांचा अजिबात समावेश नाही. तर, मुळा मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरीबाभूळ, विलायती चिंच अशा झाडांचे प्रमाण हे जास्त आहे. संगमवाडी ते बंडगार्डन या टप्प्याचे काम करीत असताना बाधित होणाऱ्या एकूण वृक्षांपैकी १ हजार ५३८ झाडे संपूर्ण काढणे प्रस्तावित आहे. त्यापैकी बाभूळ ४४१, सुबाभूळ ८०४ आणि विलायती बाभूळ/विलायती किकर ४८९ अशी सुमारे १ हजार ५३४ झाडे ही सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरी बाभूळ, विलायती चिंच या प्रजातीमधील आहेत. हे प्रमाण एकूण काढावयाच्या वृक्षांच्या तुलनेत जवळपास ९९ टक्के आहे. तर, याशिवाय खैर २, निलगिरी २ अशी चार वृक्ष काढण्यात येणार आहेत.

तर, बंडगार्डन ते मुंढवा या टप्प्याचे काम करीत असताना १ हजार ५७२ वृक्ष संपूर्ण काढणे प्रस्तावित आहेत. यामध्येही १ हजार २५३ वृक्ष सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरी बाभूळ, विलायती चिंच प्रजातीमधील असून अशा झाडांचे प्रमाण हे एकूण काढावयाच्या झाडांच्या ७९ टक्के आहे. या टप्प्यात बाभूळ ४२०, रेन ट्री ६६, निलगिरी ४, सुबाभूळ ४१६, आंबा ४३, अशोक १, नारळ ४३, विलायती बाभूळ/विलायती किकर/विलायती चिंच ५७९ अशी एकूण १ हजार ५७२ वृक्ष संपूर्ण काढणे प्रस्तावित आहे.

परिसंस्था सुधारण्यास होणार मदत

बाधित होणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक प्रजातीच्या ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्षांचे रोपण व मोठ्या प्रमाणात नदीच्या दोन्ही काठ्यांवर झुडपांची लागवड करण्यात येणार आहे. याद्वारे नदीकाठच्या परिसंस्था सुधारण्यासाठी मदत होणार आहे. हे करीत असताना लावण्यात येणारे गवत व वृक्षांचे प्रकार स्थानिक असून सहजगत्या उपलब्ध होऊ शकणारे असेच असतील, यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. बाधित वृक्षांच्या बदल्यात महानगरपालिका जी वृक्ष लावणार आहेत, ती वृक्ष नैसर्गिकदृष्ट्या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी उपयोगी ठरणारी असतील हे वृक्ष हवामान बदल, पूर परिस्थिती आणि संभाव्य दुष्काळी परिस्थिती तसेच इतर सुक्ष्म बदलांना तोंड देण्यास सक्षम असतील, यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. ही वृक्ष नदीकाठाच्या संरक्षणासाठी, नदीकाठाची होणारी झीज टाळण्यासाठी, जैव विविधता वाढीसाठी, पक्ष्यांची घरटी, निवासस्थाने निर्माण करण्यासाठी, जवळचे जलाशय व नदीमध्ये जलचरांच्या वाढीसाठी याचाच अर्थ एकंदरीत नैसर्गिक नदीचे पुनरुज्जीवनासाठी उपयोगी ठरणारी आहेत. याशिवाय, ही वृक्ष लावताना ती स्थानिक प्रजातीची, तज्ज्ञांनी सुचवलेली व नदीकाठ परिसंस्थेला सुसंगत असलेली योग्य उंचीची चांगल्या प्रतीची वृक्ष लावली जातील. या वृक्षांमध्ये आंबा, जांभूळ, करंज, अर्जुन, मुचकुंद, गुलार, कैलासपती, निम, काडंब आदी वृक्षांचा समावेश आहे. या वृक्षांचे पुढील पाच ते सात वर्ष संगोपन करण्यात येणार आहे.

वृक्षांना लावलेल्या फलकांबाबत गैरसमज

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या वृक्षांबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. हे सर्वेक्षण करताना वृक्षांना एक फलक लावून त्यावर नंबर टाकण्यात आला होता. केवळ वृक्षांची संख्या मोजता यावी, यासाठी सर्वेक्षणाचा भाग म्हणून हे फलक लावण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र समाज माध्यमांवर या फलकांबाबत सुद्धा गैरसमज निर्माण करून देण्याचे काम सुरू आहे. हा फलक ज्या ज्या वृक्षावर आहेत, ते सर्व वृक्ष तोडले जाणार आहेत, अशा स्वरुपाचा संदेश समाज माध्यमातून दिले जात आहेत. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नसून हे फलक केवळ सर्वेक्षणाचा भाग आहे.
मुळात, पुणे महानगरपालिका नेहमीच पुणे शहराचा विकास करीत असताना पर्यावरण संवर्धनाला सुद्धा तेवढेच महत्त्व देत असते. पर्यावरण संवर्धन आणि विकास याचा समतोल साधण्याचा प्रयत्न पुणे महानगरपालिकेने केला आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम करीत असताना सुद्धा पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही, याची काळजी पुणे महानगरपालिका घेत आहे. त्यामुळेच नदीच्या काठापासून जवळ असणाऱ्या जुन्या व दुर्मिळ वृक्षांना वाचवण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रयत्नशील आहेच. तसेच बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी जास्तीतजास्त वृक्षांचे पुर्नरोपण करण्यावर भर दिला जातोय. मात्र, नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी पुणे महानगर पालिकेकडून ६ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडली जाणार आहेत, अशा प्रकारचे संदेश समाज माध्यमांवर टाकून चुकीची माहिती प्रसारीत करण्याचा प्रयत्न काहीजणांकडून केला जातोय. या माहितीमध्ये तथ्य नसून अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये.

| कार्यकारी अभियंता (प्रकल्प)
पुणे महानगरपालिका

JICA | मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून वर्षाला 4 कोटीची वीज निर्माण होणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रकल्पाला भेट

Categories
Uncategorized

 मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून वर्षाला 4 कोटीची वीज निर्माण होणार!

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रकल्पाला भेट

पुणे | राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे महानगरपालिकेतर्फे जायका प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या डॉ. नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या कामास भेट देऊन पाहणी केली.
यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सांडपाणी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता जगदीश खानोरे आदी उपस्थित होते.
प्रकल्पाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावे व सांडपाणी शुद्धीकरणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. प्रक्रीया केलेल्या पाण्याच्या पुनरुपयोगाबाबत आतापासून नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री श्री.पाटील यांनी दिल्या.
या प्रकल्पाची क्षमता १२७ द.ल. लिटर प्रतिदिन असून प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षाला ४ कोटी रुपयांची वीज निर्माण होणार आहे. ही वीज महापालिका उपयोगात आणणार असल्याने वीज खर्चात बचत होणार आहे. शहरात विविध ठिकाणी असे प्रकल्प उभारण्यात येत असून २०२५ अखेरपर्यंत नदीत प्रक्रीया केलेले पाणीच सोडण्यात येईल. प्रकल्पातून तयार होणाऱ्या पाण्याचा उद्योगासाठीदेखील वापर करता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
| मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामास भेट
पालकमंत्री श्री.पाटील यांनी बंडगार्डन येथील मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामाचीदेखील यावेळी पाहणी केली. नदीच्या दोन्ही बाजूस स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यात यावी. नदी किनाऱ्यावर नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्याचा आनंद मिळेल अशा पद्धतीने कामे करण्यात यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम एकूण ११ भागात विभागण्यात आले असून त्यापैकी संगमवाडी ते बंडगार्डन पूल आणि बंडगार्डन पूल ते मुंढवा या कामासाठी मार्च २०२२ मध्ये आदेश देण्यात आले असून ही कामे सुरू करण्यात आली आहेत. कामाचा प्रथमत: ३०० मीटरचा भाग पूर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.