Indrayani Mata Parikrama Palkhi Sohala | इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यात पर्यावरणाचा जागर

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Indrayani Mata Parikrama Palkhi Sohala | इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यात पर्यावरणाचा जागर

| अजानवृक्षाचे रोपण, सुवर्णपिंपळ बीज प्रसाद वाटप आणि परकीय जैविक आक्रमणाविरोधात शपथ

 

Indrayani Mata Parikrama Palkhi Sohala | इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा अंतर्गत पायी दिंडी परिक्रमा इंद्रायणी तटावरील विविध गावात समाज प्रबोधन करत करत पुढे मार्गस्त होत आहे. याच परिक्रमेचा भाग म्हणून  २१ डिसेंबर रोजी श्रीक्षेत्र कुरवंडे इंद्रायणी नदी उगमस्थान येथे अनोख्या पद्धतीने पालखी सोहळ्याचे आयोजक, स्थानिक ग्रामस्थ आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेला वारकरी संप्रदाय यांनी पर्यावरणाचा जागर केला. याप्रसंगी हरित आणि अध्यात्मिक वारसावृक्ष अर्थात अजानवृक्षाचे रोपण कुरवंडे गावातील कोराआई देवी मंदिर परिसरात करण्यात आले. पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या अभियानात जनमानसात इंद्रायणी नदी, वारसावृक्षांबाबत काही अंशी जाण व आत्मीयता वाढावी आणि यामाध्यमातून त्यांचे जतन-संवर्धन व्हावे या उद्देशाने या अभियानचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती सचिन पुणेकर संस्थापक अध्यक्ष, बायोस्फिअर्स (Sachin Punekar Biosphiars) यांनी दिली.

वृक्षाचे रोप हे आळंदीतील मूळ वृक्षापासून तयार करण्यात आले आहे. आळंदी येथील सुप्रसिद्ध सुवर्ण पिंपळाचा बीज प्रसाद देखील उपस्थित वारकरी व गावकरी यांना रोपणासाठी वाटण्यात आला. तसेच आपल्या राष्ट्रावर होणाऱ्या आगंतुक जैविक आक्रमणाविरोधातील माबि हरित चळवळीच्या प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन देखील याप्रसंगी करण्यात आले. इंद्रायणी नदीमध्ये होणारे जैविक व रासायनिक प्रदूषण, उपद्रवी परदेशी वनस्पती आणि जलचरांचा होणारा प्रादुर्भाव, याबाबत उपस्थितांशी संवाद साधण्यात आला. इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या समस्त वारकऱ्यांनी कुरवंडे गावापासून ते नागफणी (डूक्स नोज) इंद्रायणी नदी उगमस्थान कुंड आणि फणेश्वर महादेव मंदिरापर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा, पादुका, इंद्रायणी जल कलश, तुळस व अजानवृक्षाचे रोपे पायी पालखीतून पूजनासाठी नेण्यात आली. इंद्रायणी कुंड आणि फणेश्वर महादेव शिवलिंगावर इंद्रायणी आणि भारतभरातून संकलित केलेल्या पवित्र जलाचा जलाभिषेक करण्यात आला. याठिकाणी इंद्रायणी मातेची आरती, अभंग-गीते आणि पसायदान याचे भक्तिभावाने सादरीकरण देखील करण्यात आले. पर्यावरण, ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसा असलेल्या या क्षेत्राविषयी उपस्थित जनमानसात तसेच समाज माध्यमाच्या लिंक वरून सर्वदूर जागर करण्यात आला. जेणेकरून या महत्वाच्या स्थळ-महात्म्य विषयी जनमानसात साक्षरता व सजगता यावी. तसेच राज्याच्या – देशाच्या शासन व प्रशासनाने हे क्षेत्र व तिथला अद्भुत वारसा टिकवण्याच्या दृष्टीकोनातून धोरणात्मक योजना आखावी.

याप्रसंगी श्रीक्षेत्र कुरवंडे गावाचे ह.भ.प. सुभाष महाराज पडवळ, उपक्रमाचे आयोजक ह. भ. प. गजानन महाराज लाहुडकर, ह.भ.प. सागर महाराज लाहुडकर, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, जेष्ठ पत्रकार अर्जुन मेदनकर, बायोस्फिअर्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, पर्यावरण अभ्यासक डॉ. सचिन अनिल पुणेकर, संत साहित्याचे अभ्यासक-लेखक दत्तात्रय महाराज गायकवाड, माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे, कुरवंडे गावाचे ग्रामस्थ निर्मला कडू, किसन मराठे, मनीषा कडू, वैशाली मातेरे, योगिता कचरे, पार्वतीबाई शिंदे, वैशाली बोरकर, बेबीबाई कडू, सुरेखा जांभूळकर, महादेव राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते.

Movement Against Biological Invasion | उपद्रवी फिरंगी तणांबाबत शासकीय धोरण ठरावे | मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) ची मागणी

Categories
Breaking News social आरोग्य

Movement Against Biological Invasion | उपद्रवी फिरंगी तणांबाबत शासकीय धोरण ठरावे | मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) ची मागणी

| लोकसहभागातून कॉसमॉस या उपद्रवी परदेशी तणाचे समूळ उच्चाटन जोमाने सुरु

Movement Against Biological Invasion |     दिवसेंदिवस आपल्या परिसरातील वनराई, हरित क्षेत्र उपद्रवी फिरंगी तणांमुळे झपाट्याने कमी होत आहे आणि याचा थेट परिणाम आता त्यावर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीवर व ओघाने मानवी जीवनावर सातत्याने होत आहे. त्यातच सद्य पर्यावरणीय आणीबाणीत भारत देशावर होणार्या परदेशी (आगंतुक) उपद्रवी जैविक घटकांच्या आक्रमणाची भर पडत आहे. हे फिरंगी घटक म्हणजे तण (विड), उपद्रवी मासे, कीटक व सूक्ष्मजीव. यातील सर्वात दखलपात्र व गंभीर घटक म्हणजे तण होय. लोकसहभागातून या परदेशी (आगंतुक) उपद्रवी जैविक घटकांचे आपल्या राष्ट्रातून समूळ उच्चाटन व्हावे. तसेच माबिच्या माध्यमातून तण मुक्त भारत म्हणजेच स्वच्छ भारत हा संदेश देखील जनमानसात रूढ करण्यात यावा या उद्देशाने आणि जागतिक परिसंस्था पुनरुज्जीवन दशकाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या कॉसमॉस सल्फ्यूरीयस् या उपद्रवी परदेशी (मेक्सिको) तणाचे आक्रमण व व्याप्ती रोखण्यासाठी सालाबादप्रमाणे या तणाच्या उच्चाटनासाठी सदर मोहीम आयोजित केली आहे. या तणाच्या उच्चाटनासाठी प्रातिनिधिक स्वरूपात पुणे शहरातील जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या तळजाई टेकडीवर सदर मोहीम शनिवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती.
सदर मोहीम मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि); बायोस्फिअर्स; मॉडर्न कॉलेज – गणेशखिंड; पि.आय.सी.टी.; उद्यान विभाग, पुणे महानगरपालिका; लाईफ ट्री नेचर फाऊंडेशन; अँड-वेंचर फाऊंडेशन, नेचर ट्रेल – वेताळ हिल ग्रुप; झाडे लावा झाडे जगवा अभियान, नऱ्हे; इतर सेवाभावी, शैक्षणिक व संशोधन आणि शासकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि १०० हून अधिक हरित कार्यकर्ते, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, टेकडीप्रेमी, निसर्गप्रेमी यांच्या सहभागाने फत्ते झाली. सदर उपक्रमाचे संयोजन आणि महत्वाची भूमिका डॉ. सचिन पुणेकर; प्रा. डॉ. प्राची क्षिरसागर, प्रा. अमोल इंगोले; प्रा. सुनील खोत; श्री. गणेश मानकर, श्री. दत्तात्रय गायकवाड; डॉ. नितीन आहेर; श्री. अभिजित भसाले; श्री. विवेक देशपांडे, श्री. संजय परोडकर; श्री. मुकुंद शिंदे; श्रीमती सायली सौदणकर, श्री. प्रकाश इंदुरीकर यांनी बजावली.
कॉसमॉस या उपद्रवी आगंतुक/परदेशी तणाचा शहरांमध्ये, रस्त्याच्या दुतर्फा, टेकड्यांवर, गवताळ कुरणांवर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले आहे, या वनस्पतीला पिवळ्या-केशरी फुलांचा सर्वत्र बहर आला आहे. ही वनस्पती मूळची मेक्सिको मधली आहे, ही सूर्यफुलाच्या कुळातील वनस्पती असून तिची फुलं चटकन लक्ष वेधून घेतात. कॉसमॉसचे फुलांचे सौंदर्य जनसामान्यांना, पर्यटकांना भुरळ घालत असते. कॉसमॉस या वनस्पतीचा वाढण्याचा वेग हा अधिक आहे. ही वनस्पती कमी पाण्यावर, अगदी ओसाड जमिनीतदेखील उत्तम तग धरू शकते. तसेच हीचा बीजप्रसार थोड्या कालावधीत सर्वदूर होतो. इतका की या वनस्पतीचाच मोठा पट्टा तयार होतो त्यामुळे भरपूर जागा या वनस्पतीने व्यापली जाते. या उपद्रवी परदेशी वनस्पतीमुळे स्थानिक गवताच्या व अन्य वनस्पतींच्या जाती-प्रजाती मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. या तणाची व्याप्ती मोठी असल्या कारणाने स्थानिक जैवसाखळीदेखील नष्ट होत आहे. अनेक कीटकांच्या जाती जसे की मधमाशी, भुंगे, फुलपाखरे आता मोठ्या प्रमाणात याचे परागकण गोळा करताना दिसतात. त्याचा देखील परिणाम स्थानिक वनस्पतींच्या परागीभवनावर होत आहे. आपल्या गुरांचे, वन्य तृणभक्षी प्राण्यांचे स्थानिक खाद्य वनस्पती या कॉसमॉस मुळे मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. गुरांना आणि मानवाला देखील या उपद्रवी वनस्पतीची एलर्जी होत आहे आणि आरोग्य विषयक प्रश्न निर्माण होत आहेत. या वनस्पतीला भरपूर फळे येतात. बीजधारणा मोठ्या प्रमाणात होते. या बिया वाऱ्याबरोबर किंवा इतर माध्यमातून मोठ्या प्रमाणात सर्वदूर पसरतात. टायरच्या नक्षीमध्ये देखील बिया अडकून बीज प्रसार सर्वदूर होतो, प्राण्यांच्या केसाला चिटकून किंवा इतर माध्यमातून देखील ही वनस्पती इतर ठिकाणी पसरते. काही अतिउत्साही लोक या फुल झाडाच्या बिया आपल्या घराकडे, बागेमध्ये लावण्यासाठी सोबत नेतात. अनेक जणांनी कॉसमॉस चे बीज मोठ्या प्रमाणावर सीड बॉल करून फेकल्या तसेच काही गिर्यारोह्कांकडून देखील दुर्गम भागामध्ये या आगंतुक तणांच्या बियांचा फैलाव अजाणतेपणे करण्यात आला. शिवाय या वनस्पतीवर कुठलेच नैसर्गिक नियंत्रण नसल्याने ही मोठ्याप्रमाणात फोफावत आहे. वरील सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता या वनस्पतीचा फैलाव रोखण्यासाठी ती उपटून टाकणे हा उपाय योग्य आहे. या उपद्रवी तणांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामपंचायती, सेवाभावी संस्था, शहरातील-गावातील नागरिक, शेतकरी, गाव पातळीवर किंवा शहर पातळीवर असलेल्या विविध समित्या, शासनाचे पर्यावरण किंवा वनसंवर्धन किंवा शेती व्यवस्थेबाबत असलेल विविध विभाग, आणि मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून या आगंतुक तणाला पूर्णतः नष्ट करणं गरजेचे आहे. अनेक सजग नागरिक, सेवाभावी संस्था माबिच्या मार्गदर्शनातून काही काळापासून सातत्याने विविध भागात कॉसमॉस व इतर आगंतूक तण हटविण्याची मोहीम राबवित आहेत. हे तण काढून टाकण्यासाठी एक मोठी लोकचळवळ उभी राहिली आहे. जसं सध्या वृक्षारोपणाची चळवळ आहे तशी उपद्रवी परदेशी तण काढण्याची चळवळ सुद्धा स्थिरावत आहे. मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) ही जैविक आक्रमणा-विरोधात सुरु केलेली अशीच एक हरीत चळवळ आहे. कॉसमॉस बरोबर धनुरा किंवा गाजर गवत या उपद्रवी परदेशी ताणाचे देखील उच्चाटन यावेळी करण्यात आले. या चळवळीच्या माध्यमातून “हटवा तण-वाचवा वन, हटवा तण-वाढवा वन, हटवा तण-वाढवा कृषीधन, हटवा तण-वाढवा गोधन” तसेच “तण मुक्त भारत – स्वच्छ भारत” हा जनजागृतीचा विचार आणि उपद्रवी आगंतुक तण हा एक प्रकारचा ‘ग्रीन गार्बेज’ म्हणजेच ‘हरित कचरा’ आहे हा नवोदित विचार देखील आम्ही अधोरेखित करून सर्वदूर नेत आहोत. या चळवळीत नागरीकांनी मोठ्या संखेत सहभागी व्हावं आणि अश्या पद्धतीच्या उच्चाटन मोहिमा आप-आपल्या जवळच्या ठिकाणी विविध परकीय उपद्रवी तणांविरोधात घ्याव्यात, तसेच उपद्रवी फिरंगी तणांबाबत शासकीय धोरण ठरावे असं आवाहन आम्ही करीत आहोत.

Vasundhara Day | वसुंधरा दिनानिमित्त साकारले अनोखे भरडधान्य-लक्ष्मी बीज चित्र | भरडधान्य संस्कृती जनमानसात रुजावी यासाठी विविध संस्थांचा प्रयत्न

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

वसुंधरा दिनानिमित्त साकारले अनोखे भरडधान्य-लक्ष्मी बीज चित्र

| भरडधान्य संस्कृती जनमानसात रुजावी यासाठी विविध संस्थांचा प्रयत्न

 

निसर्गसूत्र, बायोस्फिअर्स, शैलेश सराफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह, सेन्टर फॉर मिलेट रिसर्च आणि ट्रेनिंग (सी.एम.आर.टी.), वनस्पती शास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बायफ रिसर्च फाऊंडेशन, ऍग्रोझी ऑर्गेनिक आणि तळजाई माता देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २२ एप्रिल २०२३, जागतिक वसुंधरा दिन, अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधून आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या (इंटरनेशनल मिलेट ईयर) निमित्ताने तळजाई मंदिर प्रांगणात, पाचगाव-पर्वती टेकडीवर, पुणे येथे भरडधान्य-लक्ष्मी बीज-चित्र साकारण्यात आले.

सदर भरड-धान्यलक्ष्मी बीज चित्राचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त श्री. सुनील चव्हाण (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते झाले, याप्रसंगी, सी.एम.आर.टी. च्या समन्वयक डॉ. हेमलता कोतकर, निसर्गसूत्र आणि बायोस्फीअर्स संस्थेचे संस्थापक डॉ. सचिन अनिल पुणेकर, निसर्गसूत्र अभियानाचे संस्थापक, बायोआंत्रप्रेन्योर श्री. शैलेश सराफ, ऍग्रोझी ऑर्गेनिक चे श्री. महेश लोंढे, कलाकार श्री. मंगेश निपाणीकर, पाटबंधारे विभागाचे माजी सचिव श्री. अविनाश सुर्वे, स्थानिक नगरसेवक श्री. सुभाष जगताप, तळजाई देवस्थानाचे श्री. सुनील इथापे गुरुजी, श्री. संपतराव थोपटे, श्री. बापू धाडगे, श्री. प्रशांत थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. भरडधान्य-लक्ष्मी बीज चित्र किंवा बीज रांगोळी या संकल्पनेवर आधारित स्थानिक देशी भरडधान्य वापरून ही अनोखी कलाकृती साकारण्यात आली. सदर बीज-चित्र, बीज रांगोळी ही ९०० स्के. फु. इतक्या क्षेत्रफळाचे होती. कदाचित भारतातील हे पहिले अशा प्रकारचे रेखाटलेले भरडधान्य बीज-चित्र असणार आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक-देशी, आपल्या मातीतल्या भरडधान्याचा वापर केला गेला.

या बीज-चित्राच्या माध्यमातून जनमानसात भरडधान्य आणि बीज संस्कृती रुजावी, स्थानिक-देशी परंपरागत धान्य, वाणाचे संवर्धन, जतन व्हावे या उद्देशाने या अनोख्या बीज-चित्राची निर्मिती करण्यात आली आहे. भरडधान्य किंवा मिलेट हा पौष्टिक धान्याचा महत्वाचा गट आहे, त्याचे औषधी आणि पर्यावरणीय गुणधर्म लक्षात घेता हा जैविक ठेवा किंवा वारसा अक्षय्य रहावा या उद्देशाने ही चित्रकृती साकारली गेली आहे. भरडधान्याच्या माध्यमातून सदर बीज चित्रासाठी नाचणी, ज्वारी, बाजरी, भाडी-राळा, बर्टी, वरई यांचा वापर करण्यात आला. यापुढे ही भरड-धान्यलक्ष्मी बीज-चित्र संकल्पना इतर अनेक ठिकाणी राबवणार आहोत.

सदर बीज चित्रात लक्ष्मीच्या आठ पारंपारिक रूपांपैकी एक म्हणजे धान्यलक्ष्मी जी प्रतीकात्मकपणे स्पष्ट करते की धान्य ही संपत्ती आहे आणि ब्रम्हांडातील जीवंत झरा असणारी आपली सुंदर वसुंधरा या सर्वांचे एकात्मिक मिळून बीज चित्र-रांगोळी साकारण्यात आली आहे. सदर भरडधान्य-लक्ष्मी बीज चित्राची संकल्पना डॉ. सचिन अनिल पुणेकर यांची असून, या बीज-चित्राचे रेखाटन श्री. मंगेश निपाणीकर यांनी केले. या उपक्रमाचे प्रायोजकत्व शैलेश सराफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह यांचे होते. या अनोख्या उपक्रमास तळजाई देवस्थानचे अध्यक्ष श्री. आण्णा थोरात आणि बायफ चे श्री. संजय पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले. सदर उपक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री. गणपत साळुंके (चोर), श्री. अमित पुणेकर, श्री. अमित जगताप, श्री. सागर सोनावडेकर, श्री. राजाभाऊ इंदलकर, श्री. पराग शिळीमकर श्री. राजू मेहता, श्री. वैभव गुंड-निपाणीकर, श्रीमती अंकिता कुलकर्णी-निपाणीकर, श्री. अभिजित कांबळे आणि विशेषत: बाल-मावळे हिंदवी पुणेकर, स्वराज पुणेकर, आरुष खोंडके, स्वराज खोंडके, पायल गोसावी, तनिष ओसवाल या सर्वांचे मौलिक योगदान लाभले.

Shivneri : Dr Sachin Punekar : शिवजयंतीनिमित्त ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे किल्ले शिवनेरीवर अनावरण

Categories
cultural social पुणे

शिवजयंतीनिमित्त ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे किल्ले शिवनेरीवर अनावरण

 

पुणे: बायोस्फिअर्स; पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे, भारतीय डाक विभाग; आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय, जुन्नर-आंबेगाव (उपविभाग मंचर) यांच्या संयुक्त विद्यमाने  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे  उप-मुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवनेरीवर ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाची पहिली प्रत पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्राच्या श्रीमती दास यांनी उप-मुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  अजितदादा पवार यांना सुपूर्त केली. सदर सचित्र पोस्टकार्ड संचाचे प्रस्तावक आणि संकल्पना डॉ. सचिन पुणेकर यांची आहे. सदर विशेष आवरणाच्या प्रस्तावाला पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे, भारतीय डाक विभाग यांची अधिकृत मान्यता देखील मिळाली आहे.

सदर सचित्र पोस्ट कार्ड संचाच्या माध्यमातून जुन्नर तालुका आणि परिसरातील ऐतिहासिक, भौगोलिक, पर्यावरणीय आणि अध्यात्मिक वारसा अधोरेखित केला आहे. परिसरातील हा समृद्ध वारसा जनमानसात रुजावा, त्याचे जतन, संवर्धन व्हावे आणि शाश्वत पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी आणि परिणामी स्थानिक लोकांची या माध्यमातून आर्थिक उन्नती व्हावी या हेतूने हा जुन्नरचा समृद्ध वारसा डाक विभागाच्या माध्यमातातून व बायोस्फिअर्स संस्थेच्या पुढाकारातून सर्वदूर करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासन व शिवप्रेमींच्या एकत्रित प्रयत्नातून शिवरायांना एक अनोखे अभिवादन या निर्मितीच्या माध्यमातून केले आहे. या सचित्र पोस्टकार्डामुळे जनमानसात, अभ्यासकामध्ये, विशेषत: जगभरातील टपाल उत्पादने संग्राहकांमध्ये या शिवरायांच्या पवित्र जन्मभूमी व परिसरातील वारशाबाबत जनजागृती आणि कुतूहल निर्माण करण्याचे महत्वाचे काम होणार आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील अशा अनेक समृद्ध वारशांबाबत संवर्धन व संशोधनाकरिता या नूतन अभियानासारखी भविष्यात नक्कीच निर्मिती करता येवू शकेल. त्यासाठी हे सचित्र पोस्टकार्ड नक्कीच पथदर्शी ठरेल..!!!

सदर उपक्रमाला मराठा सेवा संघाचे विविध पदाधिकारी; डाक विभागाचे सन्माननीय अधिकारी  बी.पी. एरंडे; सुकदेव मोरे;  प्रमोद भोगडे आणि शिवभक्त – शिवप्रेमी  अविनाश शिश्री. शैलेंद्र पटेल,  अभिजित भसाळे आणि इतर अनेक शिवभक्तांचे मौलिक सहकार्य लाभले.

 

Ajan Tree : Sachin Punekar : श्री क्षेत्र आळंदीतील अजानवृक्षाचे श्री क्षेत्र अरण आणि स्वामी समर्थ नगरी अक्कलकोट येथे रोपण

Categories
cultural social महाराष्ट्र

श्री क्षेत्र आळंदीतील अजानवृक्षाचे श्री क्षेत्र अरण आणि स्वामी समर्थ नगरी अक्कलकोट येथे रोपण

मोक्षदा एकादशी आणि गीता जयंतीचे औचित्य साधून देववृक्षाचे संतांची नगरी सोलापूर जिल्ह्यात रोपण

 

सोलापूर : बायोस्फिअर्स; सत्संग फाउंडेशन, श्री संत शिरोमणी सावता माळी संजीवन समाधी मंदिर, अरण, सोलापूर; श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ डिसेंबर २०२१, मोक्षदा एकादशी आणि गीता जयंतीचे औचित्य साधून श्री क्षेत्र अरण (श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर) आणि स्वामी समर्थ नगरी अक्कलकोट (श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मंदिर परिसर) या ठिकाणी शांभवी-अजानवृक्षाचे विधिवत पूजन करून या पवित्र क्षेत्री मान्यवरांच्या उपस्थितीत रोपण करण्यात आले. अशी माहिती सचिन पुणेकर यांनी दिली.

अजानवृक्षाचे रोप हे आळंदीयेथील सिद्धबेट या पुरातन शिवपीठातील (ज्ञानदेवांची जन्मभूमी, लीलाभूमी, कर्मभूमी) मूळ अजानवृक्षापासून तयार करण्यात आले आहे, जणू त्याचीच प्रतिकृती, या कार्यक्रमाप्रसंगी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज ह.भ.प. दादामहाराज वसेकर; ह.भ.प.अंकुशमहाराज वसेकर; ह.भ.प. सत्यभामा वसेकर; श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष  महेश इंगळे, विलास कोरे; बायोस्फिअर्सचे संस्थापक अध्यक्ष, पर्यावरण अभ्यासक डॉ. सचिन अनिल पुणेकर; सत्संग फाउंडेशनचे आनंद  मुळे; राजेंद्र मांडवकर, स्थानिक ग्रामस्थ अनिल कोळी;  सुमित वाघमारे;  गणेश इंगळे;  राहुल देसाई;  वैभव जाधव; दोन्ही मंदिर समितीचे सदस्य, भाविक उपस्थित होते. तसेच या पर्यावरणीय व अध्यात्मिक दृष्टीकोनातून या अतंत्य महत्वाच्या वृक्षाच्या बाबतीत डॉ. सचिन पुणेकर लिखित सचित्र माहिती असलेल्या हरित पत्रिकेचे वाटप देखील उपस्थितांमध्ये करण्यात आले.

संत साहित्याचा अभ्यास केला असता श्री संत ज्ञानेश्वर माऊली व अजानवृक्ष यांचे दृढ नाते लक्षात येते. श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांनी देखील समाधिस्त होण्यापूर्वी जो दंड रोवला होता तो देखील याच सिद्धबेटातील अजानवृक्षाचा होता. यावरून माऊलींची संजीवन समाधी व अजानवृक्ष हे एक समीकरणच झाले आहे. गेली सात शतके हा ज्ञानवृक्ष जनसामान्यांना व अभ्यासकांना प्रेरित करीत आहे, आत्मशक्ती देत आहे. तसेच नाथ, दत्त आणि वारकरी संप्रदयात ह्या देव-वृक्षाला विशेष महत्व दिले आहे. गोरक्षवल्ली, योगवल्ली, योगिनी, शांभवी, अजानवृक्ष, निधी, पूर्णधन, अंजानवृक्ष अश्या अनेक नावांनी हा वृक्ष सुपरिचित आहे. हि सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता या देववृक्षाचे रोपण करण्यात आले.

बायोस्फिअर्स संस्थेच्या माध्यमातून ‘माऊली हरित अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानाचाच एक महत्वाचा पैलू म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर यांच्या संजीवन समाधीवर असलेला ज्ञानवृक्ष-अजानवृक्ष सर्वदूर (योग्य त्या ठिकाणी) पोहचवणे होय. एकुणातच काय या औषधी आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या ज्ञानवृक्षाच्या संवर्धनासाठी तसेच आपल्या संस्कृती, परंपरेमधल्या महत्वाच्या वृक्षाबाबत जनमानसात-भाविकांत काही अंशी जाण वाढावी. तसेच या ज्ञानवृक्षाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, जनमानसात योग्यती सकारात्मकता यावी या उद्देशाने अजानवृक्ष आता सर्वदूर करीत आहोत. आजपर्यंत या हरित चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील, भारतातील अनेक तीर्थक्षेत्रे, मंदिरे, अध्यात्मिक-केंद्रे, संजीवन समाधी, विद्यापीठे, शैक्षणिक, व संशोधन संस्था यांच्या आवारात याचे रोपण व संवर्धन करण्यात आले आहे.