Shivneri | Shiv jayanti | गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे| छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले, आमदार प्रवीण दरेकर, अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अंकित गोयल, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी येऊन दर्शन घेणे रोमांचक अनुभव आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला. आज घराघरात शिवजयंती साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकीक कार्याची आठवण प्रत्येकाच्या मनात सतत रहाते. त्यांचा आदर्श समोर ठेवून आपण काम करतो. त्यांच्या विचारानुसार राज्य शासन सर्वसामान्य, गोरगरीब आदी सर्व घटकांसाठी काम करीत आहे.

* शिवनेरी हे जगाचे श्रद्धास्थान*
महाराजांचा आदर्श केवळ राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आवश्यक आहे. त्यामुळे महाराजांनी बाणेदारपणे औरंगजेबाला उत्तर दिले त्या आग्राच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होत आहे. राज्य शासन पर्यटन विभागामार्फत शिवनेरीच्या पायथ्याशी हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करीत आहे. शिवनेरी हे जगाचे श्रद्धास्थान आहे.

शक्ती आणि युक्तीच्या आधारे स्वराज्याची निर्मिती
शक्ती आणि युक्ती ही दोन शस्त्रे महाराजांच्या रणनितीचा भाग होती. त्यातून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, प्रजेचे कल्याण व्हावे यासाठी प्रयत्न केले. रयतेवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. रयतेच्या रक्षणासाठी, हितासाठी कधी त्यांनी तडजोड केली नाही. दूरदृष्टीने गडकोट बांधले. ते कुशल प्रशासक, संघटक होते. त्यांनी शेती, सिंचन, शिक्षण, भाषा, महसूली, शासन, प्रशासनाच्या अनेक योजना आखल्या. समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेतली. त्यांच्या पराक्रमापुढे परकियांच्या माना झुकल्या. पेशावर ते तंजावरपर्यंत छत्रपतींचा भगवा डौलाने फडकला, असा गौरवोद्गार श्री.शिंदे यांनी व्यक्त केला.

शिवनेरी परिसराचा विकास आराखडा वेळेत पूर्ण होईल
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले, परिसराचा विकास आराखडा वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होईल. गडकिल्ल्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. वढू, तुळापूरचाही चांगल्या प्रकारे विकास केला जाईल. शिवनेरी येथे शिवप्रभुंचे दर्शन घ्यायला कोणालाही अडथळा, बंदी नसेल शिवजन्मोत्सवाचे अधिक चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिवरायांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बृहद कार्यक्रम- उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवराय होते म्हणून आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत, मानाने जगतो. शासनाने सर्व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दरवर्षी ३ टक्के निधी गडकिल्ल्यांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. किल्ल्याच्या वेगळ्या निधीव्यतिरिक्त हा निधी असल्याने संवर्धनासाठी निधीची कमतरता नसेल. शिवजन्मस्थानाच्या दर्शनाबाबत योग्य नियोजन करण्यात येईल.

शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासंदर्भात बृहद असा कार्यक्रम सरकारने हाती घेतला असून १ वर्ष सातत्याने महाराजांचा विचार, स्मारके आणि महाराजांचे तेज जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सरकार करेल. रायगड येथे उत्खननात वेगवेगळ्या गोष्टी सापडत असून नवा इतिहास समोर येत आहेत. अशाच प्रकारचे काम शिवनेरी येथेही होईल. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या राजा वढू, तुळापूर साठी ३९७ कोटी रुपयांचा आराखडा केला असून तेथेही चांगल्या प्रकारे विकास केला जाईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही विचार व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.

यावेळी जुन्नर येथील छत्रपती संघर्ष मर्दानी खेळ आखाड्याच्या पथकाने मर्दानी खेळांचे चित्तथरारक सादरीकरण केले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शिवनेरी भूषण पुरस्कार ह.भ.प. नामदेव महाराज घोलप यांना मरणोत्तर त्यांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला. आयर्नमन म्हणून पुरस्कार मिळवलेल्या मंगेश चंद्रचूड कोल्हे तसेच खेळाडू संदेश नामदेव भोईर यांनाही शिवनेरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार मिलिंद मधुकर क्षीरसागर यांना देण्यात आला. यावेळी ‘शिवचरित्रातून काय शिकावे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विजय घोगरे यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य आशा बुचके, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र डुबल यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

पालकमंत्री यांच्याकडून शिवाजी महाराजांना वंदन
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सकाळी किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सवानिमित्त बालशिवाजी आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देऊन शिवरायांना वंदन केले.

Shiv Jayanti | शिवजयंती दिवशी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिकेत हजर राहणे अनिवार्य

Categories
Breaking News cultural PMC पुणे

शिवजयंती दिवशी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिकेत हजर राहणे अनिवार्य

| अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचे आदेश

पुणे |  श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत अंगीकृत करणेबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यगीताचे गायन करणे क्रमप्राप्त आहे. यास्तव सुट्टी असली तरी महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिका भवनात हजर राहणे अनिवार्य आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pmc Pune)
आदेशानुसार हा  कार्यक्रम रविवार १९/०२/२०२३ रोजी सकाळी ९:१५ वा. (नऊ वाजून पंधरा मिनिटे) मनपा भवन, हिरवळ येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर दिवशी शासकीय सुट्टी असली तरीही ह्या कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी व वेळी न चुकता हजर राहावयाचे आहे. तसेच सदर दिवशी पुणे शहरात दुपारी ४.००
वाजेपासून श्री भवानी माता मंदिरापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, एसएसपीएमएस, शिवाजीनगर, पुणे पर्यंत मिरवणूकीचे आयोजन करणेत आलेले असून सदर मिरवणूकीस सर्व अधिकारी व
कर्मचारी यांनी उपस्थित रहावे. तरी, सर्व संबंधितांची सदर कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे मनपा भवन, हिरवळ येथे उपस्थित रहावे. असे आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)

Shiv Jayanti | शिवजयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे किल्ले शिवनेरी येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

शिवजयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे किल्ले शिवनेरी येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३

पुणे | महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले, पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांसह पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती लाभणार आहे.

यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासोबतच महाराष्ट्रातील लोकसंस्कृती व महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. पर्यटन विभागामार्फत राज्यातील महत्वाच्या उपक्रमांचे पर्यटन वेळापत्रक बनविले असून त्याच उपक्रमांतर्गत यंदापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

या सोहळ्यानिमित्त जवळपास एक लाख शिवप्रेमी या उत्साहात सहभागी होतील असे नियोजन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे. किल्ले शिवनेरीवर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याबरोबरच किल्ल्याच्या पायथ्याजवळ जुन्नर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिवकालीन गाव’ हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून या वर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या निमित्ताने शिव वंदना, स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबीर, विविध स्पर्धांचे आयोजन, पर्यटक आणि मान्यवरांसाठी सहलीचे इत्यादींचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

महाराष्ट्र राज्याची अस्मिता आणि आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९३ वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राची ओळख जगभरात पोहोचली आहे. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेले गड-किल्ले जगभरातील पर्यटन प्रेमींचे मुख्य आकर्षण आहे. यात शिवनेरी, रायगड व सिंधुदुर्ग हे महत्वाचे किल्ले आहेत. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य ही भावना आणि आपले वैभव नव्यापिढी पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.

आपले आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीविषयी अभिमान व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री.पाटील यांनी केले आहे.

तीन दिवस चालणारे कार्यक्रम पुढील प्रमाणे –

दि. १८ फेब्रुवारी २०२३
सायं. ६:३० वा. हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३ उदघाटन
सायं. ७ ते रात्री १० वा. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ कार्यक्रम

दि. १९ फेब्रुवारी २०२३
स. ९ ते ११ वा. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा
दु. ३ ते ५ वा. शिववंदना
सायं. ६:१५ ते ७ वा. महाआरती कार्यक्रम
सायं. ७ ते रात्री १० वा. जाणता राजा या महानाट्याचा कार्यक्रम

दि.२० फेब्रुवारी २०२३
सायं.७ ते रात्री १० वा. जाणता राजा कार्यक्रम

तीनही दिवशी विविध बचतगटांची उत्पादने व खाद्यपदार्थांच्या ३०० स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

Raj Thackeray : शिवजयंती तिथीनुसार का साजरी करायची…  : राज ठाकरे यांनी दिले स्पष्टीकरण 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शिवजयंती तिथीनुसार का साजरी करायची…

: राज ठाकरे यांनी दिले स्पष्टीकरण

पुणे – जवळपास दोन वर्षांनंतर जाहीर सभा घेणारे राज ठाकरे यांनी आज मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या जाहीर सभेमध्ये विविध मुद्द्यांवरून तुफान राजकीय फटकेबाजी केली. यावेळी राज ठाकरे यांनी शिवजयंतीच्या मुद्द्यावर मनसेची भूमिकाही स्पष्ट केली. तसेच येत्या २१ मार्च रोजी शिवजयंती तिथीनुसार धुमधडाक्यात साजरी करा, असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले.

राज ठाकरे म्हणाले की, २१ मार्च रोजी शिवजयंती आहे. शिवरायांमुळे आपली ओळख आहे. आम्ही कोण? आम्ही मराठी भाषा बोलणारे लोक शिवछत्रपतींनी ज्या भागात राज्य केले त्या भागात राहतो. शिवजयंती कधी साजरी करावी, असा प्रश्न विचारला जातोय. शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार साजरी करायची असा प्रश्न विचारला जातोय. मी तर म्हणतो ३६५ दिवस शिवजयंती सारजी करा. शिवजयंती ही तिथीनुसार साजरी केली गेली पाहिजे. कारण शिवजयंती ही आपल्यासाठी एक सण आहे.

आपले सण हे तिथीनुसार साजरे केले जातात. गणेशोत्सवर हा तिथीनुसार होतो. गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवाची तारीख आणि यावर्षीच्या गणेशोत्सवाची तारीख ही वेगवेगळी येते. आपल्या राजाचा जन्मदिवस हा सण आहे. ती कुणाची जयंती नाही. त्यामुळे येत्या २१ मार्च रोजी धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

Shivneri : Dr Sachin Punekar : शिवजयंतीनिमित्त ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे किल्ले शिवनेरीवर अनावरण

Categories
cultural social पुणे

शिवजयंतीनिमित्त ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे किल्ले शिवनेरीवर अनावरण

 

पुणे: बायोस्फिअर्स; पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे, भारतीय डाक विभाग; आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय, जुन्नर-आंबेगाव (उपविभाग मंचर) यांच्या संयुक्त विद्यमाने  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे  उप-मुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवनेरीवर ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाची पहिली प्रत पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्राच्या श्रीमती दास यांनी उप-मुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  अजितदादा पवार यांना सुपूर्त केली. सदर सचित्र पोस्टकार्ड संचाचे प्रस्तावक आणि संकल्पना डॉ. सचिन पुणेकर यांची आहे. सदर विशेष आवरणाच्या प्रस्तावाला पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे, भारतीय डाक विभाग यांची अधिकृत मान्यता देखील मिळाली आहे.

सदर सचित्र पोस्ट कार्ड संचाच्या माध्यमातून जुन्नर तालुका आणि परिसरातील ऐतिहासिक, भौगोलिक, पर्यावरणीय आणि अध्यात्मिक वारसा अधोरेखित केला आहे. परिसरातील हा समृद्ध वारसा जनमानसात रुजावा, त्याचे जतन, संवर्धन व्हावे आणि शाश्वत पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी आणि परिणामी स्थानिक लोकांची या माध्यमातून आर्थिक उन्नती व्हावी या हेतूने हा जुन्नरचा समृद्ध वारसा डाक विभागाच्या माध्यमातातून व बायोस्फिअर्स संस्थेच्या पुढाकारातून सर्वदूर करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासन व शिवप्रेमींच्या एकत्रित प्रयत्नातून शिवरायांना एक अनोखे अभिवादन या निर्मितीच्या माध्यमातून केले आहे. या सचित्र पोस्टकार्डामुळे जनमानसात, अभ्यासकामध्ये, विशेषत: जगभरातील टपाल उत्पादने संग्राहकांमध्ये या शिवरायांच्या पवित्र जन्मभूमी व परिसरातील वारशाबाबत जनजागृती आणि कुतूहल निर्माण करण्याचे महत्वाचे काम होणार आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील अशा अनेक समृद्ध वारशांबाबत संवर्धन व संशोधनाकरिता या नूतन अभियानासारखी भविष्यात नक्कीच निर्मिती करता येवू शकेल. त्यासाठी हे सचित्र पोस्टकार्ड नक्कीच पथदर्शी ठरेल..!!!

सदर उपक्रमाला मराठा सेवा संघाचे विविध पदाधिकारी; डाक विभागाचे सन्माननीय अधिकारी  बी.पी. एरंडे; सुकदेव मोरे;  प्रमोद भोगडे आणि शिवभक्त – शिवप्रेमी  अविनाश शिश्री. शैलेंद्र पटेल,  अभिजित भसाळे आणि इतर अनेक शिवभक्तांचे मौलिक सहकार्य लाभले.

 

Shivjayanti: CM : शिवजयंती सोहळ्याच्या उपस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

Categories
Breaking News cultural महाराष्ट्र

 

शिवज्योतीसाठी दोनशे, जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांच्या उपस्थितीसाठी मान्यता

: शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींच्या जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

००००

Shivjayanti : Mayor : PMC : शिवजयंती मिरवणुकीला परवानगी द्यावी : महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Categories
Breaking News cultural PMC पुणे महाराष्ट्र

शिवजयंती मिरवणुकीला परवानगी द्यावी : महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

:  शिवजयंती उत्सव समिती, पोलीस अधिकारी, महापालिका अधिकाऱ्यांची बैठक

पुणे : कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यास सलग दोन वर्षे बंधने आल्याने यंदाचा शिवजयंती उत्सव(Shivjayanti) जल्लोषात साजरा व्हावा, असा सूर शिवप्रेमींकडून उमटला असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ(Mayor Murlidhar Mohol) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackrey) यांच्याकडे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी शिवजयंती साजरी करण्याच्या नियोजनाची बैठक घेतली. या बैठकीस पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे, प्रतिनिधी, महापालिका अधिकारी यांची उपस्थिती होती.

याबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशा पद्धतीने साजरी केली जावी? यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळातील निर्बंधांमुळे शिवजयंतीचा उत्सव साजरा करताना मर्यादा आल्या, अशा भावना शिवप्रेमींनी व्यक्त केल्या होत्या. शिवजयंती उत्सवासाठी आवश्यक अटी आणि शर्थी घालून देऊन राज्य सरकारने मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यशासनाच्या नियमावलीत मिरवणुकीच्या परवानगीचाही समावेश असावा, अशी भूमिका आहे’

शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा !

◆ मिरवणुकीच्या स्वागतासाठी महापालिकेचा स्वागत कक्ष असणार

◆ पुणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांना विद्युत रोषणाई करण्यात यावी.

◆ मिरवणुकीचे परवाने हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार

◆ पुणे शहरातील सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.

◆ शिवजंयती महोत्सवासाठी रथयात्रा आणि मिरवणूक यासाठी स्थानिक पोलीस विभागाने लवकरात लवकर बैठका घेऊन आवश्यक त्या परवानग्या द्याव्यात.

◆ शिवजयंतीबाबत काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीकरिता राज्य शासनाकडून नियमावली लवकरात लवकर जाहीर करावी.

◆ पुणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यासाठी येणार्याा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच फिरत्या शौचालयाची व्यवस्था करणे.

◆ मिरवणुका निघणाऱ्या मार्गांवरील खड्डे बुजविण्यात यावे, रस्त्यावरील राडारोडा उचलण्यात यावा, अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या कापण्यात याव्यात.