Sanjay Raut : संजय राऊत यांची 5 मे ला पुण्यात तोफ धडाडणार!  : शिवसेनेची जाहिर मेळावा सभा 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

संजय राऊत यांची 5 मे ला पुण्यात तोफ धडाडणार! 

शिवसेनेची जाहिर मेळावा सभा

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेना आणि भाजप या पूर्वीच्या मित्रपक्षांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे फायर ब्रॅन्ड नेते अशी ख्याती असलेले नेते खासदार संजय राऊत यांची पुणे शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत ते काय बोलतात ? कोणावर आसूड ओढणार ? कोणाकोणाचा आवाज बंद करणार ? याबाबत शिवसैनिकांमध्ये उत्सुकता आहे.

पुण्यात शिवसेनेची जाहिर मेळावा सभा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार आहे. गुरूवारी 5 मे 2022 रोजी, सायं 5 वा  स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृह रस्ता, माळवाडी हडपसर येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी दिली आहे.

 गुरूवारी पुणे शहरात होणाऱ्या जाहीर मेळावा सभेची जय्यत तयारी सुरू आहे. या सभेला शिवसैनिकां सोबतच पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहणार आहेत.

Sanjay Raut Vs Raj Thackeray : संजय राऊत यांनी राज ठाकरेंना सुनावले.. म्हणाले ..! 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

संजय राऊत यांनी राज ठाकरेंना सुनावले.. म्हणाले ..!

महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तसंच १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रातील जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचंही म्हटलं. यावेळी राज ठाकरे यांनी आम्ही जातीपातून बाहेर पडत नाहीत, मग हिंदू कधी होणार असा सवालही केला. गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. दरम्यान त्यांच्या या टीकेवर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले –

“काही लोकांना ही गोष्ट हवी आहे, काही लोकांना कशाला राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे, शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. याआधी जात नव्हती का? होती, पण त्याआधी जातीचा अभिमान होता. मात्र, १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा यांनी दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला,” असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

“बाबासाहेब पुरंदरे यांचं सॉफ्ट टार्गेट आहे”

राज ठाकरे म्हणाले, “तो त्या जातीचा हा या जातीचा असं म्हणत फूट पाडत पाडत कधी मराठा आरक्षणाचं आमिष दाखवायचं. बाबासाहेब पुरंदरे यांचं सॉफ्ट टार्गेट आहे. आम्हाला इतिहास वाचायचा नाही. लिहिला कोणी, पुरंदरे, ब्राह्मण, अच्छा म्हणजे यांनी चुकीचा लिहिला असणार.”

“जातीतून बाहेर पडणार नाही, मग आम्ही हिंदू कधी होणार?”

“आम्ही इतिहास वाचतच नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की जातपात गाडून स्वराज्यासाठी एक व्हा त्या महाराष्ट्रात जातीपातीवरून भांडणं सुरू आहेत, वाद सुरू आहेत, राजकारण सुरू आहेत. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, मग आम्ही हिंदू कधी होणार?” असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

संजय राऊतांची प्रतिक्रिया –

“शरद पवारांनी जातीवाद परसरवला असं म्हणता…पण सल्लामसलत करण्यासाठी त्यांच्या चरणाशी तुम्हीदेखील जात होतात. कशासाठी इतक्या मोठ्या माणसांवर बोलायचं. तेवढ्यापुरच्या टाळ्या मिळतात पण त्यादेखील प्रायोजित आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.

“काल मेट्रोचं तसंच इतर काही प्रकल्पांचं उद्घाटन झालं, त्याच्यावर बोला. तुमच्या भोंग्याचं, यांच्या भोंग्याचं काय करायचं यासाठी सरकार समर्थ आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. शिवतीर्थावरचा भोंगा भाजपाचा होता अशी टीका यावेळी संजय राऊतांनी केली. तसंच अक्कलदाढ उशिरा येते हे काल महाराष्ट्राला दिसलं असा टोलाही लगावला.

“काल त्यांनी मराठीभाषा भवनचं स्वागत करायला हवं होतं. महाराष्ट्राच्या राजधानीत इतकं मोठं कार्य घडलं आहे. त्याच्याविषयी काही बोलले नाहीत. फक्त टीका केल्याने काय मिळतं?आहे ते देखील गमवून बसाल,” असा सल्ला संजय राऊतांनी दिला. भाजपा त्यांची मळमळ दुसऱ्याच्या भोंग्यातून बाहेर काढत असल्याचं स्पष्ट दिसत आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला.

Sanjay Raut : Belgaum Files : …आणि ‘बेळगाव फाईल्स’ काय कमी भयानक आहेत? 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

…आणि ‘बेळगाव फाईल्स’ काय कमी भयानक आहेत?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच एक नवं ट्विट केलं आहे. काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून सध्या वाद सुरु आहे. या चित्रपटावरून दोन वेगवेगळे गट पडले असून, अनेकांनी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर टीका केली आहे. तर अनेकांनी या चित्रपटाचं जोरदार कौतूक केलं आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी “बेळगाव फाईल्स…” या मथळ्यासह व्यंगचित्र शेअर केलं आहे.

 

संजय राऊत यांनी या व्यंगचित्रामध्ये बेळगाव फाईल्स काय कमी भयानक आहेत? असा सवाल देखील उपस्थित केला आहे. या व्यंगचित्रात त्यांनी भाषिक गळचेपी, लोकशाहीचा खून, मराठी तरूण असे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे काश्मीर फाईल्स यावर भाजप नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.दरम्यान, काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या वादावर अनेक राजकीय नेत्यांनी आपलं मत व्यक्त करताना हा चित्रपट म्हणजे उजव्या विचारसरणीचा प्रचार असल्याचं म्हटलं आहे. तर अनेक भाजप शासित राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. राज्यात देखील काश्मीर फाईल्स हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी केली होती. मात्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या विषयावर विधानसभेत बोलताना स्पष्ट केलं की, हा चित्रपट राज्यात करमुक्त करता येणार नाही.

Sanjay Raut Vs Raj Thackeray : आमचं राजकारण हे नकलांवर आधारित नाही! : संजय राऊत यांचा पलटवार 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

आमचं राजकारण हे नकलांवर आधारित नाही!

: संजय राऊत यांचा पलटवार

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची नक्कल केल्यानंतर आता संजय राऊत यांनी देखील पलटवार केला आहे. राऊत म्हणाले, आमचं राजकारण हे नकलांवर आधारित नाही. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, येथे डुप्लिकेट नकली काही नाहीये जे खरं असेल ते परखडपणे बोलणार. कर नाही त्याला डर कशाला ?
राऊत पुढे म्हणाले, आम्हाला ईडीने बोलावलं म्हणून आम्ही गप्प नाही बसलो, बोलत राहिलो आम्हाला कोणाची भीती नाहीये आणि यापुढेही बोलतच राहू.
पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी असा आरोप केला होता कि मुख्यमंत्री आजारी आहेत म्हणून पालिका निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्याला ही राऊत यांनी उत्तर दिले आहे. राऊत म्हणाले,  उद्धव ठाकरे हे आजारी असतानाही सक्रिय,काही माणसं आजारी नसतानाही सक्रिय नसतात.

Raj Thackeray : राज्यपाल आणि संजय राऊत यांची राज ठाकरे यांनी केली नक्कल 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राज्यपाल आणि संजय राऊत यांची राज ठाकरे यांनी केली नक्कल

पुणे – मनसेच्या वर्धापन दिनानिमित पुण्यात झालेल्या कार्यक्रमात मनसे सुप्रीमो राज ठाकरे  यांनी बऱ्याच काळातनंतर तुफान बॅटिंग केली. यावेळी राज ठाकरे  यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यपालांवर जोरदार निशाणा साधला. तुम्हाला शिवराय समजतात का? जर एखाद्या विषयातलं आपल्याला समजत नसेल तर त्यावर भाष्य कशाला करायचं, अशा शब्दात राज ठाकरे  यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा समाचार घेतला. शिवाय आपल्या ठाकरी शैलीत राज्यपाल आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची नक्कल केली.

राज्यपालांवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले. सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे. त्यात हे आपले राज्यपाल. एकदा मी त्यांना भेटायला गेलो तर वाटलं हे तर कुडमुडे ज्योतिषी आहेत की काय. त्यांनी शिवरायांबाबत एक विधान केलं. पण आपल्याला ज्या विषयातील माहिती नाही, त्या विषयावर बोलायचं कशाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण कधी रामदास स्वामींचे शिष्य असल्याचं सांगितलं नाही. ना रामदास स्वामींनी आपण शिवरायांचा गुरू असल्याचा दावा केलाय. पण रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जेवढं चांगलं लिहिलंय, तेवढं कुणीही लिहिलेलं नाही. निश्चयाचा महामेरू… हे सुभाषित आज पुन्हा वाचा, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.

यावेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अवमान करण्यावरूनही राज ठाकरेंनी राज्यपालांवर निशाणा साधला. इतक्या छोट्या वयात लग्न व्हायची, हे मला माहितच नव्हतं, असे राज्यपाल म्हणाले, पण त्याकाळात लहानपणी लग्न व्हायची. बालविवाह व्हायचे. पण तुमचे अजून झाले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Amravati violence : चंद्रकांत पाटील यांनी विचारले, शनिवारच्या घटनेत भाजपाचा हात असेल, तर त्यापूर्वीच्या तोडफोडीच्या घटनेत संजय राऊतांचा हात आहे का? 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शनिवारच्या घटनेत भाजपाचा हात असेल, तर त्यापूर्वीच्या तोडफोडीच्या घटनेत संजय राऊतांचा हात आहे का?

: भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे  : त्रिपुरामध्ये घटना घडली की नाही हा प्रश्न आहे. पण त्यासाठी अमरावती, नांदेड, मालेगाव मध्ये अशांतता पसरवणे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये जे घडलं ती, हिंदुंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. अब हिंदू मार नहीं खाएगा, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.‌ पुण्यात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. १९९३ च्या दंगलीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बोटचेपी भूमिका घेतली असती, तर मुंबईत हिंदू जिवंत राहिला नसता, असेही त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. शनिवारच्या घटनेत भाजपाचा हात असेल, तर त्यापूर्वीच्या तोडफोडीच्या घटनेत संजय राऊतांचा हात आहे का?” असा प्रश्न ही पाटील यांनी विचारला आहे.

: पोलिसांचे गुप्तहेर खातं करतं, तरी काय?

अमरावतीतील घटनेवर सविस्तर बोलताना चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, “त्रिपुरामध्ये घटना काय घडली, हे नीट कुणालाही माहिती नाही. त्यासंदर्भात एक व्हिडिओ बनवून व्हायरल केला जातो. त्यानंतर अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये अशांतता पसरवली जाते. १५-२० हजार संख्येने रस्त्यावर उतरून माजी मंत्री जगदीश गुप्तांसह अनेकांची कार्यालयाची तोडफोड करायची. याचा काय संबंध आहे? त्यामुळे शनिवारच्या घटनेत भाजपाचा हात असेल, तर त्यापूर्वीच्या तोडफोडीच्या घटनेत संजय राऊतांचा हात आहे का?”

ते पुढे म्हणाले की, “अमरावतीमध्ये शनिवारी जे घडलं, ती अब हिंदू मार नहीं खाएगा, अशी एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. यातून चिथावणी देण्याचा विषय येत नाही, तर खऱ्याला खरं म्हणणं ही आमची संस्कृती आहे. कारण जसे आम्ही रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आहोत, तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना वंदन करणारे कार्यकर्ते ही आहोत. हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९९३ च्या दंगलीत बोटचेपी भूमिका घेतली आसती, तर मुंबईतला हिंदू जिवंत राहिला नसता. त्याच बाळासाहेबांचे वारसदार अमरावती, नांदेड, मालेगाव मध्ये झालेल्या घटनेवर काहीही बोलणार नाहीत. अन् शनिवारच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेमध्ये भाजपाचा हात आहे, असं म्हणत असतील; तर ठिक आहे.”

भाजपा नेत्यांच्या धरपकडीवर बोलताना माननीय पाटील म्हणाले की, “अमरावती, नांदेड,मालेगाव मध्ये शुक्रवारी जे घडलं, त्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हात आहे, त्यांना आधी अटक करा. नांदेडमध्ये भाजपा जिल्हाध्यक्षांनी बंदची हाक दिली आहे. त्या बंदवर आक्षेप घेणाऱ्यांनी शुक्रवारच्या घटनेतील १०० जणांना अटक केली आहे का? हे आधी स्पष्ट करावे, १५-३० हजारचा जमाव रस्त्यावर उतरून अशांतता पसरवतो. तेव्हा पोलिसांचे गुप्तहेर खातं करतं, तरी काय?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Sanjay Raut : क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी संजय राऊत आक्रमक  : एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी संजय राऊत आक्रमक

: एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

मुंबई- मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी घटनेचा साक्षीदार प्रभाकर साईल याच्या खळबळजनक दाव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच आक्रमक झाले आहेत. एनसीबीच्या धाडसत्राचे धागेदोरे मुंबईतच नव्हे, तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच आर्यन खान प्रकरणी एक व्हिडिओ ट्विट केला होता. यात फरार किरण गोसावी, आर्यन खान आणि कथित सॅम डिसोजा दिसून येत आहेत. या व्हिडिओची सीबीआय चौकशीची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. यावर संजय राऊत यांनी भाजपावाल्यांनी जरुर याची सीबीआय चौकशी करावी. सीबीआय काय तुमच्या खिशात आहे का? तुम्हीही अनेक व्हिडिओ बाहेर आणले. पण आज तुमच्या काळजावर वार झाला म्हणून चौकशीची मागणी करताय का?, असा सवाल उपस्थित केला. तसंच मंत्री नवाब मलिक यांनी तर फक्त इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे. इंटरव्हलनंतरची खरी स्टोरी मी सांगणार आहे. येत्या काही दिवसांत असे १० व्हिडिओ मी देणार आहे. यात भाजपाचे लोक कुठे-कुठे बसलेत ते सगळं समोर आणणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

संजय राऊत आता कोणते व्हिडिओ समोर आणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एनसीबीच्या धाडसत्रात पैशाचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला आहे. “एनसीबीचं धाडसत्रं हे षडयंत्र आहे. पैशाचा खेळ आणि मनी लाँड्रिंग यात झालीय. त्यामुळे ईडीनं याची चौकशी करावी असं मी आता सांगणार आहे. मी ट्विट केलेल्या व्हिडिओत आत एनसीबीच्या कार्यालयात बसलेल्या त्या व्यक्ती कोण आहेत? आता हा खेळ सुरू झाला आहे. व्हिडिओत काळ्या कपड्यांमध्ये बसलेला व्यक्ती सॅम डिसोजा असून मनी लाँड्रिंग प्रकरणातील तो एक मोठा मोहरा आहे. अनेक मोठे अधिकारी, नेते यांचा पैसा परदेशात पाठवण्यात त्याचा हात आहे”, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

प्रभाकर साईल याच्या धाडसाचं कौतुक

एनसीबीच्या कारवाईच्या षडयंत्राबाबत मोठा धाडसानं खुलासा केलेल्या प्रभाकर साईल याच्या हिमतीची दाद द्यायला हवी, असंही संजय राऊत म्हणाले. “प्रभाकर साईल या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याचा केसालाही कुणी धक्का लावू शकणार नाही याचा विश्वास मी तुम्हाला देतो. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न नक्की होईल. पण त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईतच नव्हे थेट दिल्लीपर्यंत आहेत. या मुलानं मोठं धाडस केलं. त्यानं देशावर उपकार केले आहेत. त्याच्या धाडसाचं मी कौतुक करतो. हीच खरी देशभक्ती आहे. आता अनेक गोष्टी समोर येतील. नवाब मलिक यांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आता त्यापुढचा स्क्रिनप्ले मी सांगणार आहे”, असं संजय राऊत म्हणाले. देशभक्तीचा मुखवटा पांघरुन काय आणि कसे व्यवहार केले जात आहेत यांचा सगळा बुरखा फाडण्याची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले.