Pune Corporation election : पुणे मनपाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! : प्रभाग रचना मंगळवारी प्रसिद्ध होणार 

Categories
Uncategorized

पुणे मनपाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले!

: प्रभाग रचना मंगळवारी प्रसिद्ध होणार

:अखेर  इच्छुकांना दिलासा

 

पुणे : पिंपरी मनपा प्रमाणे पुणे महापालिका (pune municipal corporation) निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पुणे महानगरपालिकेचा आगामी निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. 2 मार्च पर्यंत हा कार्यक्रम चालेल. यामुळे आता इच्छुकांना दिलासा मिळाला असून आता निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे.

: आयोगाने जाहीर केला कार्यक्रम

आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेसाठी प्राप्त हरकती 16 फेब्रुवारी रोजी आयोगाला सादर कराव्या लागणार आहेत. 26 फेब्रुवारी रोजी या हरकतीवर सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसी 2 मार्च 2022 रोजी निवडणूक आयोगाला पाठवावे लागणार आहे. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा कार्यक्रम महापालिकेला पाठविला आहे. याची सर्व जबाबदारी ही महापालिका आयुक्तांची (municipal commissioner) असेल.

: प्रभाग 13 हा दोन सदस्यीय असेल

आयोगाने महापालिकेचा आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार एकूण 58 प्रभाग असतील. त्यातील 57 प्रभाग 3 सदस्यीय तर 1 प्रभाग हा 2 सदस्यांचा असेल. प्रभाग 13 हा दोन सदस्यीय असेल. एकूण 173 नगरसेवक असतील. त्यापैकी 87 सदस्य महिला असतील. एकूण लोकसंख्या 35 लाख 56 हजार 824 एवढी गृहीत केली आहे.  3 सदस्यीय प्रभाग हे सरासरी 61679 एवढ्या लोकसंख्येचे असतील. तर जास्तीत जास्त लोकसंख्या ही 67847 तर कमीत कमी 55511 एवढी असेल.

: आयोगाने काय म्हटले आहे ?

पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता
महानगरपालिकेने बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभागांची लोकसंख्या, सदस्य संख्या दर्शविणारे सहपत्र-१ अंतिम करण्यात आले असून ते सोबत जोडले आहे. महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेस त्यानुसार मंजुरी देण्यात येत आहे.
२. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह टू अपील (सी) क्र.१९७५६/२०२१ मध्ये दि.१९ जानेवारी, २०२२ रोजी झालेल्या आदेशानुसार राज्याने नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाबाबत असलेली आकडेवारी संबंधित
मागासवर्ग आयोगास द्यावी. मागासवर्ग आयोगाने सदर आकडेवारी तपासून त्यानुसार योग्य त्या शिफारशी राज्यास तसेच राज्य निवडणूक आयोगास कराव्यात, असे आदेशित केले आहे. मात्र, सदर शिफारशी प्राप्त होण्यास अथवा त्यानुसार योग्य तो निर्णय घेण्यास काही कालावधी लागण्याची शक्यता असल्याने, निवडणुकांचे कामकाज विहीत कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रभागांच्या हद्दी निश्चित करण्याचा टप्पा तत्पूर्वी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी प्रथम निवडणूक प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्द करून त्यावरील हरकती व सूचना प्राप्त करून सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने दि.२८ डिसेंबर, २०२१ रोजी निर्गमित केलेल्या आदेशात योग्य ते बदल करण्यासाठी दि. २७ जानेवारी, २०२२ रोजी सुधारीत आदेश जारी केलेले आहेत.
३. वर नमूद केलेल्या सुधारीत आदेशानुसार महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारुप अधिसूचना प्रसिध्द करणे, हरकती व सूचना मागविणे, त्यावर सुनावणी देणे इत्यादीबाबत सोबतच्या सहपत्र-२ मध्ये दर्शविलेल्या टप्यानुसार कार्यवाही करावयाची आहे. सदर वेळापत्रकानुसार प्रत्येक टप्पा वेळेवर व योग्यरितीने पूर्ण करण्याची जबाबदारी महानगरपालिका आयुक्त यांची राहील. त्यानुसार त्यांनी योग्य ती सर्व उपाययोजना करावी.
४. राज्य निवडणूक आयोगाच्या दि. २८ डिसेंबर, २०२१ च्या आदेशात नमूद केल्यानुसार निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवरील माहिती महानगरपालिकेने वेळोवेळी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्येक टप्प्यावरील अहवाल राज्य निवडणूक आयोगास
सादर करावा.

PMC election : प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे 6 जानेवारीला होणार सादरीकरण!

Categories
Breaking News PMC पुणे

प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे 6 जानेवारीला होणार सादरीकरण

ओबिसी जागांवरील निवडणूक खुल्या गटातून होणार 

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना कशी असेल याची प्रतीक्षा आत्ता संपली आहे. पुण्याच्या प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे 6 जानेवारी रोजी सादरीकरण करण्याचा आदेशराज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे आता प्रभाग रचना जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

निवडणूक आयोगाच्या समक्रमांकाच्या दि. ३ नोव्हेंबर, २०२१ च्या पत्रान्वये प्रभाग रचनेचेकच्चे प्रारुप तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यास अनुसरुन आपण प्रभाग रचनेचे कच्चे प्रारुप तयार असल्याचे राज्य निवडणूक आयोगास कळविले. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सदर प्रस्तावांचे सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणानंतर सदर प्रस्तावामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या निकषानुसार काही दुरुस्त्या सुचविण्यात आल्या.

शासनाने दि. १५ डिसेंबर, २०२१ रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पध्दत) नियम, २०२१ अन्वये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार (त्रिसदस्यीय) आरक्षण कशा पध्दतीने निश्चित करावे हे विहित केले आहे

निर्णयास अनुसरुन जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाचे प्रमाण निश्चित करत नाही तोपर्यंत आगामी सार्वत्रिक / पोटनिवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करुन निवडणुका घेण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता कोणत्याही जागा देय होणार नाहीत.

उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन सर्व प्रभागांना सर्वसाधारण महिलांचे आरक्षण उपलब्ध होण्याच्यादृष्टीने सोडत काढण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल करणे आवश्यक असल्याने राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीकरिता सुधारीत आदेश दि. २८ डिसेंबर, २०२१ रोजी जारी केले आहे. सदर आदेशानुसार प्रारुप प्रभाग रचनेचा संपूर्ण प्रस्ताव तयार करुन खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार राज्य निवडणक आयोगास मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Ward Formation : PMC : प्रभाग रचनेत आयोगाच्या 24 सूचना  : महापालिकेने केले सादरीकरण 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

प्रभाग रचनेत आयोगाच्या 24 सूचना

: महापालिकेने केले सादरीकरण

पुणे : महापालिका प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करताना ऐनवेळी झालेल्या बदलांची चर्चा रंगलेली असताना आज (ता. १३) निवडणूक आयोगापुढे झालेल्या सादरीकरणात २४ बदल सुचविण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार हे बदल करावे लागणार आहेत.

पुणे महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यात होणे अपेक्षीत आहे. प्रभाग रचना जाहीर करण्यास उशीर झाल्यास किंवा इतर राजकीय पेच निर्माण झाल्यास ही निवडणूक काही आठवडे पुढे ढकलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. ही निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. त्यामध्ये त्यानुसार महापालिकेला प्रारूप प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. ३० नोव्हेंबर ही रचना पूर्ण होऊ शकली नसल्याने ६ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

आयोगाला अहवाल सादर करण्याच्या शेवटच्या दिवसात मोठे बदल करण्यात आले. त्यातच भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी थेट आयुक्तांच्या बंगल्यावर जाऊन त्यांच्या सोईनुसार प्रभाग रचना करावी यासाठी दबाव आणल्याची चर्चा आहे. तसेच सर्वच पक्षातील मातब्बर नगरसेवकांसाठी प्रभाग रचना अनुकूल झाल्याचीही चर्चा आहे. हा अहवाल निवडणूक आयोगाला सादर झाल्यानंतर आयोगाने आज याचे सादरीकरण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सादरीकरण केले.

शहरातील सर्व ५८ प्रभागांचे सादरीकरण केले. यामध्ये प्रभागांची सीमा, लोकसंख्या यासह इतर तांत्रिक माहिती देण्यात आली. हे सादरीकरण झाल्यानंतर प्रारूप रचनेत काही ठिकाणी बदल करणे आवश्‍यक आहे असे निरीक्षण आयोगाने नोंदविले. त्यानुसार २४ बदल करण्यास सांगितले आहे. दरम्यान, ही कार्यवाही झाल्यानंतर आयोगाकडून प्रारूप आराखडा हरकती सूचनासाठी खुला करण्याची प्रक्रिया केली जाईल.

OBC : State Election Commission : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (OBC) जागांवरील निवडणुकांना स्थगिती

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (OBC) जागांवरील निवडणुकांना स्थगिती

राज्य निवडणूक आयुक्त यांची माहिती

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांच्या अधीन राहूनच या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत; परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही  मदान यांनी सांगितले.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा

· भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद- 23 (एकूण जागा 105)

· भंडारा व गोंदियातील 15 पंचायत समित्या- 45 (एकूण जागा 210)

· राज्यातील 106 नगरपंचायती- 344 (एकूण जागा 1,802)

· महानगरपालिका पोटनिवडणुका- 1 (एकूण 4 जागा)

State election commission : प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्यास ६ डिसेंबर पर्यंत  मुदत वाढ : पुणे, पिंपरी, औरंगाबाद महापालिकांचा समावेश 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्यास ६ डिसेंबर पर्यंत  मुदत वाढ

: पुणे, पिंपरी, औरंगाबाद महापालिकांचा समावेश

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या (PMC Elections) निमित्ताने प्रभागांचा कच्चा आराखडा सादर करायची मुदत उद्या ( दि.३०) संपुष्टात येत आहे. मात्र आद्यप प्रभाग रचना व परिशिष्ठांचे कामच पूर्ण न झाल्याने आराखडा सादर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच हे आदेश जरी केले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार आगामी पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका (Local body elections) घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर नोव्हेंबर च्या पहिल्याच आठवड्यात 30 नोव्हेंबर पर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याचे आदेश सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. विशेष असे की हा निर्णय झाल्यानंतर लोकसंख्या वाढीनुसार नगरसेवकांची (corporator) संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने (Maharashtra government) घेतला. या सततच्या बदलणार्‍या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग रचना व अन्य तांत्रिक बाबींमध्ये विलंब होत गेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. यामुळेच मागील आठवड्यात पुण्यासह (Pune Corporation), पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Corporation) आणि औरंगाबाद (Aurangabad Corporation) या तीन महापालिकांनी  कच्चा प्रभाग आराखडा सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी असे पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार आयोगाने हा दिलासा दिला आहे.