Maharashtra Navnirman Sena : भोंग्यावरून मनसेत दोन मतप्रवाह!

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भोंग्यावरून मनसेत दोन मतप्रवाह!

पुणे : मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवून अजानला विरोध केला जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसेच्या पुण्यातील एका मुस्लिम कार्यकर्त्याने पक्ष सोडला आहे. तर खुद्द शहर अध्यक्ष वसंत मोरे देखील नाराज आहेत. तर दुसरीकडे पदाधिकारी म्हंणतात कि राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा. यामुळे शहर मनसेत दोन मतप्रवाह झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी मशिदींमध्ये अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर थांबवावा, अशी मागणी राज्य सरकारला केली. तसेच प्रतिकार म्हणून हनुमान चालिसा लावा, असा आदेशही कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र त्याला विरोध होताना दिसत आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) धार्मिकवादामुळे आपण राजीनामा दिल्याचे शाखा अध्यक्ष माजीद शेख यांनी सोमवारी सांगितले. शेख म्हणाले की, राज ठाकरे राज्याच्या विकासाच्या गप्पा मारायचे, पण आता ते राजकारणासाठी जाती-धर्माचा आधार घेत आहेत.

वास्तविक पाहता भाषणात राज ठाकरे यांनीच जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडण्याचे आवाहन केले. मात्र त्याचवेळी आपण धर्माचं राजकारण करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे त्यांची जात आणि धर्मसंदर्भातील भूमिका एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवण्यासारखी असल्याचं अनेकांना वाटत आहे.

 

दरम्यान पुण्यातील मनसे नेते आणि शहर अध्यक्ष वसंत मोरे हे देखील राज ठाकरे यांच्या नव्या आदेशामुळे संभ्रमात असल्याचं दिसून येत आहे. ते म्हणाले की, माझ्या आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत होईल. तसेच मी माझ्या प्रभागात शांतता कशी राहील याचा प्रयत्न करणार. कोणीही वेगळा प्रयत्न करणार नाही. मात्र मलाच कळेना झाले आहे, मी काय भूमिका घ्यावी, असा संभ्रम वसंत मोरे यांनी बोलून दाखवला.

तर साईनाथ बाबर यांनी आपण नाराज नसल्याचे म्हटले आहे. तर मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी म्हटले आहे कि, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश अंतीम, होय आम्ही हिदूच ! वैयक्तिक भूमिकेला पक्षात स्थान नाही. यामुळे मनसेत आता दोन मतप्रवाह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

MNS Pune : Vasant More : Parks and Jogging Track : पुणे शहरातील मनपाची उद्याने, जॉगिंग ट्रॅक पूर्ण क्षमतेने चालू करा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुणे शहरातील मनपाची उद्याने, जॉगिंग ट्रॅक पूर्ण क्षमतेने चालू करा

: शहर मनसेची महापालिकेकडे मागणी

पुणे : शहरात कोरोनाचा (Corona) कहर असल्यामुळे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) उद्याने (Park’s and jogging track) बंद ठेवण्यात आली होती. सद्यस्थितीत देखील ही उद्याने आणि जॉगिंग ट्रॅक पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत. आता कोरोनाचा कहर कमी झाला आहे. त्यामुळे उद्याने आणि जॉगिंग ट्रॅक पूर्ण क्षमतेने सुरु करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS pune)  व महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली आहे.

: लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना होईल लाभ

शहर मनसेच्या पत्रानुसार गेल्या जवळपास दोन वर्षाच्या कालावधीत कोरोनाच्या जागतिक संकटामुळे पुणे शहरातील उद्याने व जॉगिग ट्रॅक बंद अथवा कमी कालावधीसाठी पुर्ण क्षमतेने सुरू नव्हते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे सद्यस्थितीत बरीच उद्याने व जॉगिंग ट्रॅक कोरोनाच्या निर्बंधामुळे  कमी कालावधीसाठी सुरू आहेत. परंतु आता शासनाने बऱ्यापैकी निर्बध सर्व स्तरांवर उठवण्यास सुरूवात केली आहे. किंबहुना शिथील केलेले आहेत. शहरातील उद्याने जॉगिंग ट्रॅक व लहान मुलांची किंडांगणे ही आरोग्याच्या दृष्टीने व विरंगुळयाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. शहरातील कोरोना रूग्ण संख्या व तीचा दर यामध्ये मोठया प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या वतीने आम्ही आपणास या निवेदनाद्वारे विनंती करू इच्छितो की, पुणे शहरातील उद्याने जॉगिंग ट्रॅक व उद्यानातील लहान मुलांची खेळणी यांच्या वेळा पुर्ववत (पुर्ण क्षमतेने) कराव्यात. जेणेकरून पुणे शहरातील नागरीकांना लहान मुलांना व ज्येष्ठ नागरीकांना या सुविधांचा पुरेपुर लाभ घेता येईल.

Kirit somaiya security : PMC : किरीट सोमय्यांच्या बंदोबस्ताचा फटका सामान्य पुणेकरांना

Categories
Breaking News PMC पुणे

किरीट सोमय्यांच्या बंदोबस्ताचा फटका सामान्य पुणेकरांना

 

: सोमय्यांच्या महापालिका प्रवेशामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ

: कामे रखडली; पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी भवन मध्ये येण्यापासून रोखले

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुणे महापालिका दौरा चांगलाच गाजला. भाजपने हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला होता. त्यामुळे सोमय्याच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यासाठी पोलीस आणि महापालिका सुरक्षा रक्षकांची कुमकच ठेवण्यात आली होती. मात्र या बंदोबस्ताचा फटका सामान्य पुणेकरांना बसला. सकाळपासूनच नागरिकांना महापालिकेत येण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे महत्वाची कामे असून देखील नागरिक ही कामे करू शकले नाहीत. याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

: जबाबदारी कोण स्वीकारणार?

गेल्या शनिवारी सोमय्या महापालिकेत आले होते. तेंव्हा त्यांना शिवसेने कडून धक्काबुकी सहन करावी लागली होती. त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यातच भाजपने हा प्रतिष्ठेचा  मुद्दा बनवत सोमय्या यांना पालिकेत आणण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यांच्या प्रवेशासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र या बंदोबस्ताचा फटका सामान्य पुणेकरांना बसला. सकाळपासूनच नागरिकांना महापालिकेत येण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे महत्वाची कामे असून देखील नागरिक ही कामे करू शकले नाहीत. याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

: वसंत मोरे यांना देखील उडी मारून आत यावे लागले

बंदोबस्ताचा फटका फक्त सामान्य नागरिकांनाच नाही तर नगरसेवकांना देखील बसला. मनसे शहर अध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांना देखील उडी मारुन आत यावे लागले. मोरे म्हणाले, मी १५ वर्ष झाले पुणे महानगरपालिकेत नगरसेवक आहे,
पण आज पहिल्यांदाच इतकी अघोषित संचारबंदी पाहिली सर्व दरवाजे बंद केलेत…
नागरिक महानगरपालिकेच्या दरवाज्यात आक्रोश करत होते आणि भाजपा चे सर्व नगरसेवक नेते सत्काराच्या कार्यक्रमात अडकले होते.
माझी पार्टी मीटिंग होती बाहेर जायचे तर खूप गरजेचे होते,
मग काय भिंतीवरून उडी मारून बाहेर आलोय आणि चौकशी केली तर समजले काय तर म्हणे
माजी खासदार किरीट सोमय्या यांचा भाजपा ने ते पडलेल्या पायरीवर सत्कार ठेवलाय…
पण सत्ताधारी लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी ते महापालिकेच्या दारात पडले होते बरं का बाकी समजून जा…

MNS : Vasant More : तुम्ही बसा देवळं फिरत; आम्ही पुण्याच्या हितासाठी आमच्या देवळात जाऊन आलो पण….. 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

तुम्ही बसा देवळं फिरत; आम्ही पुण्याच्या हितासाठी आमच्या देवळात जाऊन आलो पण…..

: मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरेंचा टोला

पुणे : प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुणे महापालिका निवडणुकीला वेग आला आहे. सर्व पक्ष आता हिरीरीने कामाला लागले आहेत. काही नेते पुण्याच्या हितासाठी देवदर्शन करत आहेत. यावरून मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी टोला लगावला आहे. मोरे आणि शहरातील मनसे नेत्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेटघेतली. त्याबाबत मोरे यांनी एक पोस्ट टाकली आहे. त्यात ते म्हणतात, तुम्ही बसा देवळं फिरत आम्ही पुण्याच्या हितासाठी आमच्या देवळात जाऊन आलो पण…!
शहर मनसे ने आज राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसे ने स्वबळवर निवडणूक लढणार आहे. तसे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार मनसे चे नेते देखील कामाला लागले आहेत.
पहा काय आहे पोस्ट…

Rupali Patil : Vasant More : शिवसेना की राष्ट्रवादी? कुठे जाणार रुपाली पाटील?  : मनसेला खिंडार वगैरे काही पडलेले नाही : वसंत मोरे 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शिवसेना की राष्ट्रवादी? कुठे जाणार रुपाली पाटील?

: मनसेला खिंडार वगैरे काही पडलेले नाही : वसंत मोरे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील-ठोंबरे  (Rupali Patil) यांनी आपला सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या राजीनाम्याचं वैयक्तिक कारण असल्याचं स्पष्ट केलं. तसेच, स्वत:मध्ये बदल व्हावा, यासाठीच आपण मनसेला रामराम केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे  यांना पाहून राजकारणात आले. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही. ती माझी वृत्ती नसल्याचे पाटील यांनी सांगितले. राजीनामा देण्याआधी माझ्या मनातील खदखद राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवली आहे. पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांकडून आपल्याला त्रास होत असल्याचे मला हा निर्णय घ्यावा लागला, अशी कबुली देखील रुपाली पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रुपाली पाटील यांच्या या विधानावर मनसेचे पुणे शहर अध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. रुपाली पाटील यांच्या जाण्यानं मनसेला खिंडार वगैरे  पडलेलं नाही. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटलांनी राजकीय आत्महत्या केली आहे. रुपाली पाटील- ठोंबरे यांचा राजीनामा द्यायचाच होता. हा सगळा त्यांचा प्री-प्लॅन आहे. तसेच रुपाली पाटील यांनी रिकामटेकडे कोण हे त्यांनी एकदा जाहीर करावं असं, आव्हानही वसंत मोरे यांनी दिले आहे.

रुपाली ठोंबरे यांनी मंगळवारी सायंकाळी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला. मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे पत्रात लिहिलं आहे. तसेच आपले आशीर्वाद आणि “श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल’ अशी भावना व्यक्त करत ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे.

दरम्यान, राजीनामा देण्याआधी रुपाली या युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची सह्याद्री अतिथिगृहात भेट घेऊन चर्चा केल्याने त्या शिवसेनेत जाणार, याची चर्चा रंगली आहे. सरदेसाई यांच्या आधी रुपाली पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटल्या आणि राष्ट्रवादीतील प्रवेशाचा मुहूर्तही ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रुपाली या आपल्या मनगटावर घड्याळ की शिवबंधन याकडे लक्ष लागले आहे.

Vasant More : Pedestrian Day : दुसऱ्या प्रभागात चमकोगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रभागाची दुरावस्था दूर करा : मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांचे महापौरांना खुले आव्हान

Categories
Breaking News PMC Political पुणे

दुसऱ्या प्रभागात चमकोगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रभागाची दुरावस्था दूर करा

: मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांचे महापौरांना खुले आव्हान

पुणे : आज ११ डिसेंबर हा पुणे शहराचा पादचारी दिन घोषित करून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शहरात विविध ठिकाणी घेतलेल्या कार्यक्रमांचा पंचनामा शहरातील पदपथांची दुरावस्था दाखवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने केला.  राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली व मनसे पर्यावरण शहर अध्यक्ष नितीन जगताप यांच्या माध्यमातून जनहित कक्षाचे शहर अध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांच्या उपस्थितीत पुणे शहराच्या आठही मतदारसंघामध्ये विभाग अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पदपथांवरील अतिक्रमणे आणि पादचाऱ्यांच्या हक्काची होत असलेली पायमल्ली याचा लेखाजोखा फेसबुक live च्या माध्यमातून प्रत्यक्षपणे मांडण्यात आला.

पादचाऱ्यांना रस्त्यांवर प्रथम प्राधान्य असायला हवे, पदपथ अतिक्रमणमुक्त असावेत, झेब्रा क्रॉसिंगचे रंग सुस्पष्ट असावेत, पादचाऱ्यांचे रस्ता ओलांडण्यासाठीचे सिंनल्स दुरुस्त असावेत, अपंगांसाठी आणि दृष्टीहीन लोकांसाठी पदपथ सुस्थितीत असावेत.  अशा मागणीचे फलक घेऊन  महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या प्रभागात मनसेने विरोधाभास दर्शवत मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी महापौर यांना खुले आव्हान दिले आहे. फक्त 1 दिवस पादचारी दिन साजरा करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक न करता पादचाऱ्यांचे हक्क अबाधित ठेवले आणि पदपथ अतिक्रमणमुक्त झाले तरच पादचारी दिन सार्थकी लागला असे म्हणता येईल.  दररोजच पादचारी दिन साजरा होईल असे प्रतिपादन मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी यावेळी केले. तुम्ही दुसऱ्या प्रभागात चमकोगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रभागाची दुरावस्था दूर करावी असे म्हणत वसंत मोरेंनी स्वतःच्या प्रभागातील सलग 3 किलोमीटरच्या उत्कृष्ट अशा पदपथावरून पायी फेरी मारली. यानिमित्ताने पुणे शहरात इतर सगळ्या विरोधी पक्षांपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच प्रखर विरोधी पक्ष असल्याचे अधोरेखित झाले आहे. आगामी काळात पुणे शहराच्या आणि जनतेच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगून वसंत मोरेंनी शासन प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी संपुर्ण शहरातील पदाधिकारी आजी माजी नगरसेवक विभाग अध्यक्ष शाखा अध्यक्ष महिला सेनेचे पदाधिकारी व मनसेच्या सर्व अंगीकृत संघटनांनी सहभाग घेतला होता.