GST | PMC | GST लागू नसलेल्या कामाचीही GST लावून बिले काढण्याचे प्रकार  | लेखापरीक्षणात आढळून आली बाब 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

GST लागू नसलेल्या कामाचीही GST लावून बिले काढण्याचे प्रकार

| लेखापरीक्षणात आढळून आली बाब

पुणे |  मनपा प्रशासनातील विविध खात्यांमार्फत विकास कामांची /निविदा कामांची देयके अर्थात बिले अदा करण्यासाठी अंतर्गत अर्थान्वीक्षक विभागाकडे सादर केली जातात. अशा देयकांचे लेखापरीक्षण करताना ज्या कामांना वस्तू व सेवा कर (GST) देय नाही अशा कामांच्या देयकांमध्ये सुद्धा सदर कराची रक्कम अदा करण्याचे दर्शवून देयके सादर केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत लेखा विभागाने गंभीर दखल घेतली आहे. आगामी काळात असे प्रकार झाल्यास याबाबत खात्यांना जबाबदार धरले जाणार आहे.
याबाबत लेखा व वित्त अधिकारी यांनी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार अशा पद्धतीने बिले सादर करणे ही बाब प्रशासकीय दृष्ट्या उचित नसल्याने पूर्वगणनपत्रक तयार करतानच संबंधित कामास वस्तू व सेवा कर लागू आहे अगर कसे ? याबाबत मनपाचे कर सल्लागार यांचा लिखित अभिप्राय घेऊन त्यानुसार पुगप/निविदा प्रकरणे सादर करणेबाबत सर्व खात्यांना कळविण्यात आले आहे. मुख्य लेखापरीक्षक यांनीही वस्तू व सेवा कराबाबत काही खात्यांकडून पूर्तता होत नसल्याचे निदर्शनास आणले आहे.

जीएसटी कौन्सिलची अधिसूचना क्र. १२/२०१७ दि. २८/६/२०१७ अन्वये ज्या कामांमध्ये (प्युअर सर्व्हिस) मध्ये लेबर किंवा मशिनच्या सहाय्याने स्वछतेचे/ / साफ़सफ़ाईचे/ राडारोडा उचलणेचे काम करून घेतले जाते अशा कामांना जीएसटीमध्ये सुट आहे (जीएसटी देय नाही) तसेच जीएसटी कौन्सिलचे अधिसूचना क्र. २/२०१८ दि. २८/६/२०१७ अन्वये ज्या कामांमध्ये वस्तू पुरवठा व सेवा ( संमिश्र सेवा ) अशा कामामध्ये वस्तू पुरवठा किंमत ही एकूण करार मूल्याच्या २५% पेक्षा कमी आहे अशा कामांना जीएसटी मधून सूट आहे (जीएसटी) देय नाही. ही बाब आपल्या विभागातील सर्व संबंधित सेवक/ अधिकारी यांना अवगत करावी व निविदा कामांची बिले  तयार करताना त्यानुसार दक्षता घेण्यात यावी.
याप्रमाणे  दक्षता न घेता देयके सादर केल्यास व वस्तू व सेवा कर लागू नसलेल्या कामांना कराची रक्कम अदा केली गेल्यास अथवा कराबाबत त्रुटीयुत्तः देयके सादर केल्याने देयके अदा करण्यास विलंब झाल्यास व तक्रारी प्राप्त झाल्यास याबाबतची संपूर्ण जबाबदारी व दायित्व संबंधित खात्याचे राहील. असा इशारा देण्यात आला आहे.