Office Discipline | PMC Pune | पुणे महापालिकेच्या प्रांगणात भोंडला, दांडिया चा खेळ रंगला!  | कार्यालयीन शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित 

Categories
Breaking News cultural PMC social पुणे
Spread the love

पुणे महापालिकेच्या प्रांगणात भोंडला, दांडिया चा खेळ रंगला!

| कार्यालयीन शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित

पुणे | भारतीय परंपरेतील दरवर्षी उत्साहाने साजरा केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवाची नुकतीच सांगता झाली. महिला शक्तीचे प्रतीक म्हणून हा उत्सव देशभरात साजरा केला जातो. पुणे महापालिकेत नवरात्रीचे निमित्त साधत महिला कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी उत्साहात महापालिकेच्या प्रांगणात दांडियाचा ठेका धरत, फुगड्या घालत आणि भोंडला खेळत उत्सव साजरा केला. मात्र कार्यालयीन वेळेत नागरिकांची कामे सोडून अशा पद्धतीने महापालिकेच्या प्रांगणात उत्सव साजरा करण्याने कार्यालयीन शिस्तीचा भंग मानला जात आहे. अतिरिक्त आयुक्तांनी नुकतेच कार्यालयीन शिस्तीबाबत परिपत्रक जारी केले होते. शिवाय त्यावर अंमलबजावणी देखील सुरु केली आहे. असे असतानाही अशा शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई होणार का? का महिलांचा उत्सव म्हणून त्यांना यातून सूट दिली जाणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नवरात्रीचे निमित्त साधत शुक्रवारी पुणे महापालिका भवनातील हिरवळीवर विविध विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी भोंडला, दांडियाचा ठेका धरला. मिळकतकर विभाग, आरोग्य विभाग, लेखा विभाग सहित सर्वच विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला. मात्र कार्यालयीन वेळेत आपले काम सोडून अशा पद्धतीने उत्सव साजरा केल्याने आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसापूर्वी महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी एक परिपत्रक जारी केले होते. खास करून कार्यालयीन शिस्तीबाबत आणि नियमांचे पालन करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले होते. कारण कार्यालयीन वेळा न पाळणे, दुपारी जेवण झाल्यानंतर विस्तारित इमारतीत फेऱ्या मारणे, सायंकाळी चहाला जाणे, यामुळे कामकाजावर परिणाम होत होता. याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी गंभीरपणे पाऊल उचलत नियमाचे पालन करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यावर अंमलबजावणी देखील सुरु केली होती. त्यानुसार कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेमो देखील देण्यात आले आहेत. ही कारवाई अजून कडक केली जाणार, असे प्रशासनाच्या वतीने सांगितले जात होते.
त्याचप्रमाणे कामकाजावर परिणाम होतो म्हणून तत्कालीन अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी महापालिका भवनात महिला दिन साजरा करण्याबाबत महिला कर्मचाऱ्यांना परवानगी नाकारली होती. कारण त्याच्या आदल्या वर्षी खूप गोंधळ घालण्यात आला होता. मात्र तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांची बदली झाल्यानंतर पुन्हा हे उत्सव साजरे होऊ लागले.
मात्र कार्यालयीन शिस्तीचे काय? पुढील दोन दिवस सुट्टी म्हणून शुक्रवारी महापालिकेत कामासाठी आलेल्या नागरिकांच्या कामाचे काय झाले? असे प्रश्न शिवाय शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई होणार का? का महिलांचा उत्सव म्हणून त्यांना यातून सूट दिली जाणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.