Kasba By Election | कसबा पोटनिवडणूक | कॉंग्रेस, राष्ट्रवादीची आज बैठक तर शिंदे गट, भाजपची उद्या बैठक

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

कसबा पोटनिवडणूक | कॉंग्रेस, राष्ट्रवादीची आज बैठक तर शिंदे गट, भाजपची उद्या बैठक

कसबा च्या जागेसाठी कॉंग्रेस च्या इच्छुकांनी मुलाखती दिल्यानंतर कॉंग्रेस ची आज मुंबईत बैठक होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने कसब्याच्या जागेवर दावा केल्यानंतर त्यासंदर्भात विरोधीपक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आज बारामती हॉस्टेलवर बैठक घेणार आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या बैठकांमध्ये काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे. यातच आता पुण्यात शुक्रवारी शिंदे गटाची बैठक होणार आहे. कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात शिंदे गटामध्ये खल होणार असल्याची माहिती आहे. शुक्रवारी शिंदे गट आणि भाजपमध्ये ही बैठक संपन्न होईल.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठकीला उपस्थितीत राहणार असल्याची माहिती आहे. शिंदे गट कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा जाहीर करणार असल्याचं स्पष्ट आहे.

आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या रिक्त झालेल्या जागेची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप एकाही पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही.

दरम्यान, महाविकास आघाडी ही निवडणूक लढविणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आघाडीत ही जागा कॉंग्रेसकडे असल्याचेही राष्ट्रवादी कबूल करते मात्र, या निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला (ठाकरे गट) काहीच प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे ठाकरे गट आणि राष्ट्रवादीनेही निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. मात्र, दोन्ही पक्षांकडून अधिकृतपणे अद्याप काहीच सांगण्यात येत नव्हते. मात्र, आता अजित पवार स्वत: बैठक घेणार असल्याने राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट होणार आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्‍ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर 26 फेब्रुवारीला पोट निवडणूक होणार आहे. तर अर्ज भरण्यासाठी दि. 7 फेब्रुवारी ही अंतीम मुदत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युती मध्ये ही जागा भाजपकडे तर आघाडीत कॉंग्रेसकडे होती. तर शिवसेनेचा उमेदवार बंडखोरी करत अपक्ष म्हणून उभा राहिला होता. त्यामुळे, निवडणूक जाहीर होताच कॉंग्रेसने या जागेवर दावा केला असून त्यांच्याकडून 16 जण इच्छूक आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही जागा कॉंग्रेसची असल्याने महाविकास आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे सांगितले होते.

कुणाल टिळक यांना दिल्लीतून फोन
दरम्यान, भाजपमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच सुरू असतानाच कुणाल टिळक यांना भाजपच्या दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयातून बोलत असून तुम्हाला कसबा मतदारसंघासाठी तिकिट जाहीर झाले आहे. तुम्ही ऑनलाईन ७६  हजार रूपये पाठवा असा फोन बुधवारी आला. मात्र, हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्याने कुणाल यांनी तत्काळ संबधितांना सुनावले. दरम्यान, याची कोणतीही तक्रार करण्यात आलेली नसली तरी, खरबदारीचा उपाय म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शहराध्यक्ष मुळीक यांना ही बाब टिळक यांच्याकडून कळविण्यात आली असून, या प्रकरणी राष्ट्रीय कार्यालयास माहिती देऊन अशा प्रकारे फसवणुकीचे फोन केले जात असल्याने खबरादारीच्या सूचना देण्याबाबत कळविण्यात आले आहे.

 

कसबा’साठी ‘वाडेश्‍वर कट्ट्या’वर सर्वपक्षीयांची चर्चा

आमदार मुक्‍ताताई टिळक यांच्या अकाली निधनानंतर कसबा विधानसभा मतदार संघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत अन्य पक्षांपेक्षा भाजपच्याच इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. येत्या दोन दिवसांत आपापल्या पक्षाकडून उमेदवाराची घोषणा होईल, अशी अपेक्षा सर्वच इच्छुकांनी बुधवारी “वाडेश्‍वर कट्ट्या’वर व्यक्त केली. याशिवाय आपणच कसे योग्य उमेदवार आहोत तसेच आपण मतदार संघासाठी काय करू शकतो, याविषयी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे, डॉ. सतीश देसाई, रवींद्र माळवदकर तसेच इच्छुक उमेदवार उपस्थित होते.