polygon mapping | महापालिकेने 3267 मिळकतींचे केले पॉलिगॉन मॅपिंग!  | मिळकतींच्या सुरक्षिततेसाठी मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे पाऊल 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

महापालिकेने 3267 मिळकतींचे केले पॉलिगॉन मॅपिंग!

| मिळकतींच्या सुरक्षिततेसाठी मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे पाऊल

पुणे | शहरात महापालिकेच्या हजारो मिळकती आहेत. मात्र मिळकतीची सुरक्षा होत नसल्याकारणाने कुणीही याचा वापर करत असे. याकडे महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने गंभीरपणे लक्ष दिले आहे. मिळकतीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विभागाने मिळकतीचे पॉलीगॉन मॅपिंग सुरु केले आहे. आज अखेर एकूण 3267 मिळकतीचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. अशी माहिती मालमत्ता व व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली.
महापालिकेच्या विविध विभागाच्या ताब्यात एकूण 3912 मिळकती आहेत. यामध्ये दुकाने, हॉल, भाडेतत्त्वावर दिलेल्या मोकळ्या जागा, समाविष्ट गावातील मिळकती, सदनिका, क्रीडासंकुले, उद्याने, रुग्णालये, सांस्कृतिक भवन, भाजी मंड्या, शाळेच्या इमारती, पाणीपुरवठा केंद्र, अमेनिटी स्पेस, चाळ विभागाकडील इमारती, समाज मंदिरे, मनपा वाहनतळे यांचा समावेश आहे. या सर्वांची सुरक्षा महत्वाची आहे. कारण महापालिकेच्या जागा परस्पर भाड्याने देण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे महापालिका याबाबत दक्ष झाली आहे. त्यामुळे महापालिकेने या मिळकतीच्या सुरक्षेवर लक्ष दिले आहे.
महापालिकेने ताब्यात आलेल्या मिळकतीचे पॉलीगोन मॅपिंग सुरु केले आहे. यामध्ये संबंधित मिळकतीचे क्षेत्रफळ, त्याचा अक्षांश आणि रेखांश याची माहिती नोंदवली जाते. तसेच जागेचे नाव, परिसर, सर्वे नंबर याची नोंद ठेवली जाते. ही माहिती सॉफ्टवेअर मध्ये स्टोअर राहते. यामुळे आगामी काळात महापालिकेच्या जागांवर अतिक्रमण होणार नाही. प्रशासनाने अशा 3267 मिळकतीचे मॅपिंग पूर्ण केले आहे. उर्वरित मिळकतीचे मॅपिंग लवकरच पूर्ण केले जाणार आहे. असे मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.