PMC Pune Employees | Pay Matrix | पुणे महापालिकेच्या प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध पदांचे वाढणार वेतन!

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Pune Employees | Pay Matrix | पुणे महापालिकेच्या प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध पदांचे वाढणार वेतन!

| वरिष्ठ लिपिक ला आता उपअधीक्षक चा दर्जा आणि अधिक्षकप्रमाणे मिळणार वेतन

| पिंपरी चिंचवड महापालिका प्रमाणे मिळणार पे मॅट्रिक्स

PMC Pune Employees | Pay Matrix |  पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशासन अधिकारी, अधिक्षक या पदावर पदोन्नती (PMC Employees Promotion) देण्यात आली आहे. त्यानंतर आता पुणे महापालिकेने प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह 5 पदांना अजून एक सुखद धक्का दिला आहे. प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह 5 पदांच्या पे मॅट्रिक्स (Pay Matrix) मध्ये वाढ होणार आहे अर्थातच  या लोकांचे वेतन वाढणार आहे. प्रशासन अधिकारी पदास S 16 पे मॅट्रिक्स तर अधिक्षक पदास S 15 पे मॅट्रिक्स लागू केले जाणार आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ लिपिक ला आता उपअधीक्षक चा दर्जा मिळणार असून आणि अधिक्षकप्रमाणे वेतन म्हणजेच S 14 पे मॅट्रिक्स मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी राज्य सरकारकडे मंजूरीसाठी पाठवला आहे. दरम्यान याबाबतची मागणी पुणे महापालिका मागासवर्गीय कामगार संघटनेचे अध्यक्ष रुपेश सोनवणे (Rupesh Sonawane) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)
महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिका सेवाप्रवेश (सेवा व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मान्यताप्राप्त सेवाप्रवेश नियमानुसार प्रशासकीय सेवा लेखनिकी संवर्गातील पदोन्नतीची शिडी व मंजूर पदे ही खालीलप्रमाणे आहे.

उप आयुक्त (मंजूर पदे-१८)

सहाय्यक आयुक्त (मंजूर पदे-२२)

प्रशासन अधिकारी (मंजूर पदे-७९)

अधिक्षक (मंजूर पदे-८०)उप अधिक्षक (मंजूर पदे-२१४)

वरिष्ठ लिपिक (मंजूर पदे-४८६)

लिपिक टंकलेखक (मंजूर पदे-१४३२)
या पदोन्नती  शिडीचे अवलोकन केले असता, प्रशासकीय सेवेत गतिमानता आणणेसाठी व प्रकरणातील विलंब टाळणेसाठी पदोन्नती शिडीमधील काही पदे वरच्या पदामध्ये वर्ग करून पदोन्नती शिडी कमी करणे आवश्यक आहे. तसेच सदयस्थितीत लिपिक टंकलेखक या पदावर नियुक्ती झाल्यानंतर ३० ते ३५ वर्षसेवा करुन केवळ उपअधिक्षक किंवा अधिक्षक या पदावर सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे सेवकांना वर्ग-३ च्या पदावर नियुक्ती व वर्ग-३ च्या पदावर सेवानिवृत्ती स्विकारावी लागत आहे. परिणामी एवढया प्रदिर्घ सेवेनंतर देखील सेवकांना वर्ग-२ च्या पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध होत नाही. (PMC Pune News)

विविध प्रशासकीय विभागात “लिपिक” या गट-क मधील सर्वात निम्न पदावर नियुक्ती झाल्याअंती
प्रशासकीय विभागनिहाय वरिष्ठ पदावर पदोन्नतीसाठीच्या साखळीचे स्तर भिन्न भिन्न असल्यामुळे नियुक्तीनंतर वरिष्ठ पदावरील अधिकारी म्हणून पदोन्नती मिळण्यामध्ये समानता राहत नाही. यास्तव शासकीय कार्यालयातील लिपिक संवर्गास पदोन्नतीचे समान टप्पे निर्माण करावेत, याअनुषंगाने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाने दिनांक २३ मे २०२२ च्या शासन परिपत्रकानुसार लेखनिकी संवर्गातील पदोन्नती शिडी कमी करणेविषयी प्रस्ताव पाठविणेबाबत कळविण्यात आलेले आहे. सदर शासन परिपत्रकात खालीलप्रमाणे बाब नमूद केलेली आहे. (Pune Municipal Corporation Employees)

“संवर्ग व्यवस्थापनाच्या दृष्टीने तसेच पदोन्नतीच्या उचित संधी मिळण्याच्या दृष्टीने संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांची कामकाजाची, मनुष्यबळाची आणि प्रशासकीय संरचनेची गरज विचारात घेऊन स्वतंत्रपणे अभ्यासाअंती व सामान्य प्रशासन विभागाशी विचार विनिमय करून गट क मधील संवर्ग संख्या/पदोन्नतीचे स्तर कमी करण्याबाबत विचार करणे उचित होईल, असे शासनाने गठीत केलेल्या समितीचे मत आहे.” त्यानुसार गट-क (म्हणजेच वर्ग-३) मधील काही पदे वरच्या संवर्गात समाविष्ट करणे शक्य आहे.

पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचेकडील लेखनिकी संवर्गातील पदोन्नती शिडी स्तर खालीलप्रमाणे :-पुणे महापालिका   (अ दर्जा)

प्रशासन अधिकारी   – S 15
अधिक्षक.    -S 14
उप अधिक्षक. – S 13
वरिष्ठ लिपिक – S 10
लिपिक टंकलेखक – S 6

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (‘ब’ दर्जा)

प्रशासन अधिकारी – S 16
कार्यालयीन अधिक्षक – S 15
मुख्य लिपिक – S 14
लिपिक टंकलेखक – S 6

वरील तक्त्याचे अवलोकन केले असता, पुणे महानगरपालिकेची लेखनिकी संवर्गातील पदोन्नती शिडी स्तर हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या लेखनिकी संवर्गातील पदोन्नती शिडीप्रमाणे करणे शक्य आहे.
1.  पुणे महानगरपालिकेकडील “वरिष्ठ लिपिक” (४८६ पदे) हे पद “उप अधिक्षक” (२१४ पदे) या पदामध्ये
विलीन करुन त्याचे पदनाम “मुख्य लिपिक” (७०० पदे) (पे मेट्रीक्स S-14) करणे उचित होईल.
2.  “अधिक्षक” या पदाचे पदनाम “कार्यालयीन अधिक्षक” करुन पे मेट्रीक्स S-15 लागू करणे उचित होईल.
3. “प्रशासन अधिकारी या पदास पे मेट्रीक्स S-16 लागू करणे उचित होईल.
त्यानुसार पुणे महानगरपालिका सेवाप्रवेश (सेवा व सेवांचे वर्गीकरण) नियमामध्ये उपरोक्त प्रमाणे बदल करून मिळावे. अशी मागणी पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे. महापालिकेच्या या भूमिकेने मात्र कर्मचारी वर्ग भलताच खुश झाला आहे.
पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने याबाबत प्रशासनाकडे मागणी केली. शिवाय वारंवार पाठपुरावा केला. त्याला आता महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो मंजूरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. विशषेत: आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांचे आम्ही विशेष आभार मानतो.
रुपेश सोनावणे, अध्यक्ष, पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना.
——-