NCP Parisanvad Yatra : Sharad pawar : Kolhapur : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो सत्तांध भाजपला उखडून टाका : शरद पवार यांचा घणाघात

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो सत्तांध उखडून टाका

: शरद पवार यांचा घणाघात

कोल्हापूर : केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून आमची तोंडे बंद करू शकतो, असे कोणाला वाटत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (NCP Followers) या प्रवृत्तीचा योग्य प्रकारे समाचार घेत सत्तांध भाजपला उखडून टाका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (NCP supremo Sharad Pawar) यांनी  येथे केले. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हृदयात आहेत; मात्र शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव का घेता म्हणून विचारणाऱ्यांना महाराष्ट्र समजलाच नाही, अशा शब्दांत पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.येथील तपोवन मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या(NCP) परिवार संवाद यात्रेच्या विराट सांगता सभेत ते बोलत होते.

या सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. सभेला उपस्थित कार्यकर्त्यांत कमालीचा जोश होता. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे आदींसह मान्यवर नेते उपस्थित होते.

पवार म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरूंपासून आम्हीपण सत्ता बघितल्या. कोणत्याही देशाचे पंतप्रधान आले की ते मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आदी महत्त्वाच्या शहरांत येतात. मात्र अलीकडील काळात गुजरातचे दौरे वाढले आहेत. देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींने असा संकुचित विचार करणे देशाला घातक आहे. देवेंद्र फडणवीस हे सत्तासुंदरी कशी मिळेल याच चिंतेत आहेत. त्यांची अवस्था ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’, अशी झाल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

एका संघर्षाच्या काळातून आपण जात आहोत. आज आपल्यासमोर हा देश एकसंध ठेवण्याचे आव्हान आहे. २०१४ पर्यंत देशाची स्थिती वेगळी होती. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही एकत्रितपणे कष्ट घेतले. अनेक क्षेत्रामध्ये देशाची प्रगती व्हावी याची खबरदारी घेतली. मात्र २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपच्या हातात सत्ता आली. लोकांचा हा कौल आम्ही अंतःकरणापासून स्वीकारला. मात्र सत्ता आल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग सामान्य माणसामध्ये एकवाक्यता कशी राहील, हा देश एकसंध कसा राहील, लोकांचे दुखणे कसे कमे होईल, याची जबाबदारी राष्ट्रप्रमुखांची असते. पण आज चित्र वेगळे दिसत आहे.
मागच्या काही दिवसात आपण पाहिले तर दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात हल्ले झाले, जाळपोळ झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असले तरी दिल्लीचे गृहखाते त्यांच्या हातात नाही. दिल्लीची कायदा व सुव्यवस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हातात आहे. अशावेळी तेथील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची होती, पण त्यांनी ही काळजी घेतली नाही. दिल्लीत एखादी घटना घडली तरी त्याचा संदेश जगामध्ये जातो आणि या देशात अस्थिरता आहे, अशाप्रकारची भावना निर्माण होते. तुमच्या हातात सत्ता असून तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही.
दोन दिवसांपूर्वी मी कर्नाटकात होतो. त्यावेळी तेथील कार्यकर्त्यांनी सांगितले की, हुबळीसारख्या ठिकाणी जातीय दंगली झाल्या. आज कर्नाटकमध्ये अल्पसंख्याक समाजाविरोधात जाहीर फलक लावले गेले आहेत. अमुक एका गावात अल्पसंख्याकांच्या दुकानात कुणी जाऊ नये, त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊ नये, असे जाहीर फलक लावले जात आहेत. हा संदेश देणारे लोक सत्ताधारी भाजपचे आहेत. जिथे जिथे भाजपच्या हातात सत्ता आहे, तिथे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक प्रकारची आव्हानात्मक परिस्थिती आपल्यासमोर आहे.
मी कोल्हापूरच्या जनतेला धन्यवाद देऊ इच्छितो. देश अडचणीत जात असताना येथील जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने विजयी केले. मी अंतःकरणापासून तुमचे अभिनंदन करतो. राष्ट्रवादीच्या येथील सर्व नेत्यांनी उत्तम कामगिरी करुन आघाडीचा धर्म पाळला.

‘पिंजऱ्या’तील मास्तरसारखी अवस्था 


‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरांनी गावात तमाशाला विरोध केला. परंतु तेच नंतर कमळीच्या नादाला लागून तुणतुणे वाजवायला लागले. ज्या राज ठाकरे यांचे शरद पवार यांच्याशी चांगले संबंध होते. तेच आता भाजपचे गुणगान गात आमच्यावर टीका करत आहेत. त्यांची अवस्था ‘पिंजऱ्या’तील मास्तरसारखीच झाली आहे, अशा शब्दांत भुजबळ यांनी टीका केली.

N D Patil : शेतकरी-कष्टकऱ्यांचे  नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन

Categories
Breaking News social महाराष्ट्र

शेतकरी-कष्टकऱ्यांचे  नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन

कोल्हापूर  : शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे सोमवारी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांची प्रकृती रविवारी अत्यंत गंभीर बनली होती. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यांची प्रकृती उपचारास फारसा प्रतिसाद देत नव्हती. अखेर उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती म्हणून प्रा. एन. डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. पण तिथे गेल्यावर त्यांना लागोपाठ दोनवेळा ब्रेन स्ट्रोक आल्याने बोलणे बंद झाले. डॉक्टर त्यांच्या उपचारावर बारकाईने लक्ष ठेवून होते. प्रा. एन. डी. पाटील यांची प्रकृती ढासळत होती. गेल्या चार दिवसांपासून पासून त्यांची शुद्ध हरपली होती. त्यांची प्रकृती उपचारास फारसा प्रतिसाद देत नव्हती. अखेर उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.

एन. डी. पाटील यांनी गेल्या 70 वर्षांहून अधिक काळ शेतकरी, कष्टकरी जनतेच्या प्रश्नी आवाज उठवण्याचे काम केले आहे. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून  राज्यावर शोककळा पसरली आहे. प्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च  केलं. 15 जुलै 1929 रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता.

नारायण ज्ञानदेव पाटील असे त्यांचे पूर्ण नाव असून 15 जुलै 1929 ला सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले होते.

राजकीय कारकिर्द : 
1948 : शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
1957 : मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
1960-66,1970-76,1976-82 अशी 18 वर्षं महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
1969- 1978, 1985 – 2010 : शे.का.प.चे सरचिटणीस
1978-1980 : सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
1985-1990 : महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
1999-2002 : निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य आणि सीमा चळवळीचे प्रमुख नेते

एन. डी. पाटील यांना मिळालेले सन्मान /पुरस्कार
भाई माधवराव बागल पुरस्कार : 1994
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड : डी. लीट. पदवी, 1999
राष्ट्रीय बियाणे महामंडळ (अध्यक्षपद ) भारत सरकार : 1998 – 2000
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ : डी.लीट.पदवी, 2000
विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद : 2001
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : डी. लीट. पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

अध्यापन कार्य :
१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य : 
शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५
शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

प्रसिद्ध झालेले लेखन

समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२
कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२
शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३
वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६
महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७
शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०
शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )
नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने)