NCP Parisanvad Yatra : Sharad pawar : Kolhapur : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो सत्तांध भाजपला उखडून टाका : शरद पवार यांचा घणाघात

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र
Spread the love

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो सत्तांध उखडून टाका

: शरद पवार यांचा घणाघात

कोल्हापूर : केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून आमची तोंडे बंद करू शकतो, असे कोणाला वाटत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (NCP Followers) या प्रवृत्तीचा योग्य प्रकारे समाचार घेत सत्तांध भाजपला उखडून टाका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (NCP supremo Sharad Pawar) यांनी  येथे केले. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हृदयात आहेत; मात्र शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव का घेता म्हणून विचारणाऱ्यांना महाराष्ट्र समजलाच नाही, अशा शब्दांत पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.येथील तपोवन मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या(NCP) परिवार संवाद यात्रेच्या विराट सांगता सभेत ते बोलत होते.

या सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. सभेला उपस्थित कार्यकर्त्यांत कमालीचा जोश होता. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे आदींसह मान्यवर नेते उपस्थित होते.

पवार म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरूंपासून आम्हीपण सत्ता बघितल्या. कोणत्याही देशाचे पंतप्रधान आले की ते मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आदी महत्त्वाच्या शहरांत येतात. मात्र अलीकडील काळात गुजरातचे दौरे वाढले आहेत. देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींने असा संकुचित विचार करणे देशाला घातक आहे. देवेंद्र फडणवीस हे सत्तासुंदरी कशी मिळेल याच चिंतेत आहेत. त्यांची अवस्था ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’, अशी झाल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

एका संघर्षाच्या काळातून आपण जात आहोत. आज आपल्यासमोर हा देश एकसंध ठेवण्याचे आव्हान आहे. २०१४ पर्यंत देशाची स्थिती वेगळी होती. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही एकत्रितपणे कष्ट घेतले. अनेक क्षेत्रामध्ये देशाची प्रगती व्हावी याची खबरदारी घेतली. मात्र २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपच्या हातात सत्ता आली. लोकांचा हा कौल आम्ही अंतःकरणापासून स्वीकारला. मात्र सत्ता आल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग सामान्य माणसामध्ये एकवाक्यता कशी राहील, हा देश एकसंध कसा राहील, लोकांचे दुखणे कसे कमे होईल, याची जबाबदारी राष्ट्रप्रमुखांची असते. पण आज चित्र वेगळे दिसत आहे.
मागच्या काही दिवसात आपण पाहिले तर दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात हल्ले झाले, जाळपोळ झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असले तरी दिल्लीचे गृहखाते त्यांच्या हातात नाही. दिल्लीची कायदा व सुव्यवस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हातात आहे. अशावेळी तेथील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची होती, पण त्यांनी ही काळजी घेतली नाही. दिल्लीत एखादी घटना घडली तरी त्याचा संदेश जगामध्ये जातो आणि या देशात अस्थिरता आहे, अशाप्रकारची भावना निर्माण होते. तुमच्या हातात सत्ता असून तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही.
दोन दिवसांपूर्वी मी कर्नाटकात होतो. त्यावेळी तेथील कार्यकर्त्यांनी सांगितले की, हुबळीसारख्या ठिकाणी जातीय दंगली झाल्या. आज कर्नाटकमध्ये अल्पसंख्याक समाजाविरोधात जाहीर फलक लावले गेले आहेत. अमुक एका गावात अल्पसंख्याकांच्या दुकानात कुणी जाऊ नये, त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊ नये, असे जाहीर फलक लावले जात आहेत. हा संदेश देणारे लोक सत्ताधारी भाजपचे आहेत. जिथे जिथे भाजपच्या हातात सत्ता आहे, तिथे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक प्रकारची आव्हानात्मक परिस्थिती आपल्यासमोर आहे.
मी कोल्हापूरच्या जनतेला धन्यवाद देऊ इच्छितो. देश अडचणीत जात असताना येथील जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने विजयी केले. मी अंतःकरणापासून तुमचे अभिनंदन करतो. राष्ट्रवादीच्या येथील सर्व नेत्यांनी उत्तम कामगिरी करुन आघाडीचा धर्म पाळला.

‘पिंजऱ्या’तील मास्तरसारखी अवस्था 


‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरांनी गावात तमाशाला विरोध केला. परंतु तेच नंतर कमळीच्या नादाला लागून तुणतुणे वाजवायला लागले. ज्या राज ठाकरे यांचे शरद पवार यांच्याशी चांगले संबंध होते. तेच आता भाजपचे गुणगान गात आमच्यावर टीका करत आहेत. त्यांची अवस्था ‘पिंजऱ्या’तील मास्तरसारखीच झाली आहे, अशा शब्दांत भुजबळ यांनी टीका केली.

Leave a Reply