Bhidewada Smarak | Chagan Bhujbal | भिडेवाडा स्मारक निर्मितीमध्ये जुन्या व आधुनिक काळाची सांगड घाला| छगन भुजबळ

Categories
Breaking News cultural PMC Political social पुणे

Bhidewada Smarak | Chagan Bhujbal | भिडेवाडा स्मारक निर्मितीमध्ये जुन्या व आधुनिक काळाची सांगड घाला| छगन भुजबळ

| क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न

 

Bhidewada Smarak | Chagan Bhujbal | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे करतानाच त्याच्या दृश्य स्वरूपाची सावित्रीबाईंच्या काळात जसे असेल अशा जुन्या काळाशी सांगड घाला, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. स्मारकासाठी आवश्यक निधी राज्य शासनाच्यावतीने देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. (Bhidewada Smarak | Chagan Bhujbal)

शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा आणि महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विस्ताराच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगर रचना विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहसंचालक राजेंद्र पवार, उपविभागीय अधिकारी अविनाश सूळ, महानगरपालिकेच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे, कार्यकारी अभियंता सुनील मोहिते आदी उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथे स्मारक उभारताना ती ‘सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा’ अशी वाटली पाहिजे. यासाठी स्पर्धात्मक स्वरूपात नामांकित वास्तुविशारदाकडून वेगवेगळे आराखडे तयार करुन घ्यावेत. आराखड्यात शाळेच्या परिसरात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, फर्निचर, क्रीडांगण, दृकश्राव्य साधने, जुन्यापद्धतीचे दर्शनी भाग आदी बाबींचा विचार व्हावा. जागेचा विचार करता शाळेच्या इमारतीत उद्वाहकाची व्यवस्था करावी.

या परिसरात वाहनतळाची इतरत्र व्यवस्था करण्याच्यादृष्टीने चाचपणी करावी. स्पर्धात्मक युगाचा विचार करता या शाळेतून महिला अधिकारी घडविण्याच्यादृष्टीने शाळेची रचना व आधुनिक अभ्यासक्रमाबाबत महानगरपालिकेने चाचपणी करावी. समितीने आराखडा अंतिम केल्यानंतर स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरु करावे. स्मारक पूर्ण झाल्यानंतर अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल, असे श्री. भुजबळ म्हणाले.

महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा यांना जोडणाऱ्या मार्गाचे आरक्षण नगर रचना विभागाने लवकरात लवकर पूर्ण करावे. आरक्षण निश्चितीनंतर पुणे महानगरपालिकेने भूसंपादनाची कार्यवाही सुरु करावी. यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करावी. नागरिकांच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा, असेही श्री. भुजबळ म्हणाले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. ढाकणे आणि संचालक श्री. पाटील यांनी कामाच्या अनुषंगाने बैठकीत माहिती दिली.

Chagan Bhujbal | NCP Pune | छगन भुजबळ यांच्या विरोधात पुणे राष्टवादीकडून निषेध आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Chagan Bhujbal | NCP Pune | छगन भुजबळ यांच्या विरोधात पुणे राष्टवादीकडून निषेध आंदोलन

Chagan Bhujbal | NCP Pune | शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपहार्य टिका- टिपण्णी करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ (Minister Chagan Bhujbal) यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शनिपार येथे निषेध आंदोलन केले. (Chagan Bhujbal | NCP Pune)
“छगन भुजबळ यांचा निषेध असो” , भुजबळाचा बैलाला घो.. , “बेईमान बेईमान ….छगन बेईमान”अशा घोषणांनी संपूर्ण शनिपार परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले की,”छगन भुजबळ नावाच्या व्यक्तीला कित्येक वेळा राजकीय अडचणीच्या काळात लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी मदतीचा हात दिला,त्यांचे पुनर्वसन केले, त्यांना मंत्री केले , त्यांच्या पुतण्याला खासदार केले, अशी मेहेरबानी दाखवली असताना देखील छगन भुजबळ यांनी वाचाळगिरी करत आपण किती चांगल्या स्वरूपाचे गद्दार आहोत, याचे प्रदर्शन काल बीड येथे झालेल्या जाहीर सभेत केले.  चार वर्षांपूर्वी जेव्हा छगन भुजबळ यांना जेलमध्ये असह्य वेदना होत होत्या, त्यावेळी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी पंतप्रधान मोदींना विनंती करत छगन भुजबळ यांचा जामीन करून घेतला होता. परंतु छगन भुजबळ यांनी या सर्व गोष्टी विसरून राजकारणातील विकृतीचे दर्शन दिले आहे. भविष्यकाळात जर पुन्हा छगन भुजबळ यांनी आदरणीय साहेबांबद्दल अशा प्रकारची बेताल वक्तव्य केली तर  पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचा योग्य समाचार घेणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप,अंकुश काकडे,मृणालिनी वाणी,गणेश नलावडे,,सुषमा सातपुते,दिपक जगताप,भूषण बधे ,सारिका पारेख,
अप्पा जाधव, पायल चव्हाण,राजेंद्र आलमखाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Politics | अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

Maharashtra Politics | अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Politics | विधानसभेचे सदस्य अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ (Oath For Minister) घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी राजभवनातील (Raj Bhavan) दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. (Maharashtra Politics)
            आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ (Minister Chagan Bhujbal), श्री. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील (Minister Dilip walse Patil), श्री. हसन मियालाल मुश्रीफ (Minister Hasan Mushrif), श्री. धनंजय पंडितराव मुंडे (Minister Dhananjay Munde), श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम (Dharmravbaba Aatram), आदिती सुनील तटकरे (Minister Aditi Tatkare), श्री. संजय बाबूराव बनसोडे (Sanjay Bansode), श्री. अनिल भाईदास पाटील (Anil Patil) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
            यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.
०००००

NCP Parisanvad Yatra : Sharad pawar : Kolhapur : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो सत्तांध भाजपला उखडून टाका : शरद पवार यांचा घणाघात

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो सत्तांध उखडून टाका

: शरद पवार यांचा घणाघात

कोल्हापूर : केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून आमची तोंडे बंद करू शकतो, असे कोणाला वाटत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (NCP Followers) या प्रवृत्तीचा योग्य प्रकारे समाचार घेत सत्तांध भाजपला उखडून टाका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (NCP supremo Sharad Pawar) यांनी  येथे केले. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हृदयात आहेत; मात्र शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव का घेता म्हणून विचारणाऱ्यांना महाराष्ट्र समजलाच नाही, अशा शब्दांत पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.येथील तपोवन मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या(NCP) परिवार संवाद यात्रेच्या विराट सांगता सभेत ते बोलत होते.

या सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. सभेला उपस्थित कार्यकर्त्यांत कमालीचा जोश होता. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे आदींसह मान्यवर नेते उपस्थित होते.

पवार म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरूंपासून आम्हीपण सत्ता बघितल्या. कोणत्याही देशाचे पंतप्रधान आले की ते मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आदी महत्त्वाच्या शहरांत येतात. मात्र अलीकडील काळात गुजरातचे दौरे वाढले आहेत. देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींने असा संकुचित विचार करणे देशाला घातक आहे. देवेंद्र फडणवीस हे सत्तासुंदरी कशी मिळेल याच चिंतेत आहेत. त्यांची अवस्था ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’, अशी झाल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

एका संघर्षाच्या काळातून आपण जात आहोत. आज आपल्यासमोर हा देश एकसंध ठेवण्याचे आव्हान आहे. २०१४ पर्यंत देशाची स्थिती वेगळी होती. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही एकत्रितपणे कष्ट घेतले. अनेक क्षेत्रामध्ये देशाची प्रगती व्हावी याची खबरदारी घेतली. मात्र २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपच्या हातात सत्ता आली. लोकांचा हा कौल आम्ही अंतःकरणापासून स्वीकारला. मात्र सत्ता आल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग सामान्य माणसामध्ये एकवाक्यता कशी राहील, हा देश एकसंध कसा राहील, लोकांचे दुखणे कसे कमे होईल, याची जबाबदारी राष्ट्रप्रमुखांची असते. पण आज चित्र वेगळे दिसत आहे.
मागच्या काही दिवसात आपण पाहिले तर दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात हल्ले झाले, जाळपोळ झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असले तरी दिल्लीचे गृहखाते त्यांच्या हातात नाही. दिल्लीची कायदा व सुव्यवस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हातात आहे. अशावेळी तेथील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची होती, पण त्यांनी ही काळजी घेतली नाही. दिल्लीत एखादी घटना घडली तरी त्याचा संदेश जगामध्ये जातो आणि या देशात अस्थिरता आहे, अशाप्रकारची भावना निर्माण होते. तुमच्या हातात सत्ता असून तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही.
दोन दिवसांपूर्वी मी कर्नाटकात होतो. त्यावेळी तेथील कार्यकर्त्यांनी सांगितले की, हुबळीसारख्या ठिकाणी जातीय दंगली झाल्या. आज कर्नाटकमध्ये अल्पसंख्याक समाजाविरोधात जाहीर फलक लावले गेले आहेत. अमुक एका गावात अल्पसंख्याकांच्या दुकानात कुणी जाऊ नये, त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊ नये, असे जाहीर फलक लावले जात आहेत. हा संदेश देणारे लोक सत्ताधारी भाजपचे आहेत. जिथे जिथे भाजपच्या हातात सत्ता आहे, तिथे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक प्रकारची आव्हानात्मक परिस्थिती आपल्यासमोर आहे.
मी कोल्हापूरच्या जनतेला धन्यवाद देऊ इच्छितो. देश अडचणीत जात असताना येथील जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने विजयी केले. मी अंतःकरणापासून तुमचे अभिनंदन करतो. राष्ट्रवादीच्या येथील सर्व नेत्यांनी उत्तम कामगिरी करुन आघाडीचा धर्म पाळला.

‘पिंजऱ्या’तील मास्तरसारखी अवस्था 


‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरांनी गावात तमाशाला विरोध केला. परंतु तेच नंतर कमळीच्या नादाला लागून तुणतुणे वाजवायला लागले. ज्या राज ठाकरे यांचे शरद पवार यांच्याशी चांगले संबंध होते. तेच आता भाजपचे गुणगान गात आमच्यावर टीका करत आहेत. त्यांची अवस्था ‘पिंजऱ्या’तील मास्तरसारखीच झाली आहे, अशा शब्दांत भुजबळ यांनी टीका केली.

Chagan Bhujbal Vs Chandrakant Patil : भुजबळ यांना जातीयवाद महागात पडेल! : चंद्रकांत पाटील यांनी दिला इशारा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भुजबळ यांना जातीयवाद महागात पडेल!

: चंद्रकांत पाटील यांनी दिला इशारा

पुणे : जोशी भविष्य सांगतात पण पाटील कधी भविष्य सांगू लागले, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. त्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, ते एका समाजाला हिणवणारे बोलत आहेत. त्यांनी सांभाळून बोलले पाहिजे. हा जातीयवाद आहे व तो खूप महागात पडेल.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा सत्कार करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी पुण्यात गुन्हे दाखल केले आहेत, त्याविषयी विचारले असता चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला नाही पण ज्या पायरीवर सोमय्या यांना ढकलण्यात आले त्या पायरीवर त्यांचा सत्कार करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर मात्र पोलीसांनी गुन्हा दाखल केला. हा सत्तेचा दुरुपयोग आहे. भाजपा यामुळे घाबरणार नाही.

Chhagan Bhujbal : भिडेवाड्याचा विकास करून मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार : छगन भुजबळ

Categories
Education पुणे महाराष्ट्र

भिडेवाड्याचा विकास करून मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार

– अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

पुणे: भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, मध्यप्रदेशचे आमदार सिद्धार्थ कुशवाह, माजी आमदार पंकज भुजबळ, दिप्ती चौधरी, कमल ढोले पाटील, महाज्योतीचे संचालक दिवाकर गमे, जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

भुजबळ  म्हणाले, राष्ट्रीय स्मारक फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेची भूमीसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन या कामास तात्काळ प्रारंभ करण्यात येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा वारसा जपण्याचे काम सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.

बघेल म्हणाले, महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले समाजसुधारणेचे कार्य महत्वपूर्ण आहे. समाजातील वंचित, मागास घटकासाठी त्यांनी कार्य केले. महिलांना समाजात सन्मान मिळावा, शेतकरी सुखी व्हावा याबाबतचा त्यांनी केलेले कार्य आजही तेवढेच महत्वपूर्ण ठरते. अशा महापुरुषांच्या नावाने सन्मान होणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. बघेल व अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ यांनी फुले वाड्यात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. महात्मा फुले समता पुरस्काराने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचा गौरव करण्यात आला.

: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा जागेचे भूमिपूजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे
भूमिपूजन केले. यावेळी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके,मध्यप्रदेशचे आमदार सिद्धार्थ कुशवाह, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, बापूसाहेब भुजबळ, मंजिरी धाडगे, नगरसेविका मनीषा लंडकत उपस्थित होते.