Sharad Pawar Vs Chandrkanat Patil : पवारसाहेब मन मोठे करा… पुण्याच्या विकासात आता तरी आडवे येऊ नका!

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पवारसाहेब मन मोठे करा… पुण्याच्या विकासात आता तरी आडवे येऊ नका

:  चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना टोला

पुणे : मुळा-मुठा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पुण्याच्या विकासात पाय आडवा घालण्याचे काम केलेले आहे. खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला स्थगिती देत राज्य सरकारनेही पुण्याच्या विकासाबाबतची उदासिनता कृतीतून दाखवून दिलेली आहे. असा आरोप भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच पवारसाहेब मन मोठे करा… पुण्याच्या विकासात आता तरी आडवे येऊ नका. असा टोलाही शरद पवार यांना लगावला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवेला हिरवा कंदिल दाखविला. केवळ पाच वर्षांत भूमीपूजन ते उद्घाटन हा वेग भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्षमतेचे उदाहरणच होते. शहरांच्या विकासाचे प्रकल्प भाजपा प्रभावीपणाने आणि वेळेत पूर्ण करतो, हा विश्वास पुणेकरांच्या मनात निर्माण करणारी ही घटना होती. नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचे भूमीपूजन करून तोही वेळेत पूर्ण होणार, हे लक्षात आल्यानंतर त्याला अपशकून करण्याचे सूतोवाच गेल्याच आठवड्यात खासदार शरद पवार यांनी केले होते. काल झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय गुणात्मक नसून राजकीय आहे.
पाटील म्हणाले,  नदी पुनरूज्जीवन प्रकल्प किती संवेदनशील आहे, याची भारतीय जनता पार्टीस पूर्ण कल्पना आहे. हा प्रकल्प भाजपाच्या कल्पनाभरारीतून आलेला नाही तर पूर्ण अभ्यासांती होतो आहे. हा नदी सुशोभीकरणाचा प्रकल्प असल्याची आवई उठवून त्याला विरोध करण्याचा पवार यांचा प्रयत्न त्यांना शोभणारा नाही. नद्या आणि पाणी या संदर्भात शिखर संस्था असलेल्या सीडब्लूपीआरएसने जलसंपदा खात्याच्या शिफारसीनुसार या प्रकल्पाच्या हायड्रॉलॉजी आणि हायड्रॉलिक्स अभ्यासास डिसेंबर २०१७ मध्ये मान्यता दिलेली आहे. जवळपास पाच वर्षांच्या पूर्वाभ्यासानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाच वर्षांच्या कालावधीत जलसंपदा खाते, सीडब्लूपीआरएस, लोकप्रतिनिधी, विविध पर्यावरणविषयक संस्थांचे प्रतिनिधी, माध्यमकर्मी, या प्रकल्पाशी निगडित असलेल्या नागरिकांशी संवाद केला गेला आहे. राष्ट्रीय हरित लवादात या प्रकल्पासंदर्भात आलेल्या सर्व रास्त मुद्द्यांचे निराकरण झाल्यावरच या प्रकल्पाच्या निविदा निघाल्या.
नदीत सांडपाण्याचा व दूषित पाण्याचा एक थेंबही जाणार नाही, यासाठी ११ मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महापालिकेकडे असलेले मर्यादित आर्थिक स्रोत लक्षात घेउन मोदी सरकारने जायकाकडून ९९० कोटींचे कर्ज घेऊन त्यातील ८४१ कोटी रुपये अनुदानस्वरूपात महापालिकेला देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
माननीय शरद पवार पुण्याचा विकास तुम्ही करू शकता, असा भ्रम तुम्ही गेली पन्नास वर्षे पुणेकरांच्यात जोपासलात. परंतु तुमच्या दुर्देवाने पुण्यात, राज्यात आणि केंद्रात भाजपा सरकार आल्यावर पुणेकरांना विकास वेगाने होऊ शकतो आणि वेळेत होभ शकतो, याचे प्रत्यंतर आले. २०१२ च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या पक्षाने प्रकाशित केलेल्या जाहिरनाम्यात ‘नदीसुधार योजना राबवविणार,’ असे आश्वासन दिलेले होते. त्या कारकिर्दीत तुमच्या पक्षाची निर्विवाद सत्ता होती. परंतु त्या पाच वर्षांत आपल्याकडून त्याबाबत कोणतेही पाऊल पुढे पडले नाही. त्यानंतर २०१७च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पुन्हा नदीसुधार योजनेअंतर्गत काय काम करणार, याचा उल्लेख केलेला आहे.
पाटील पुढे म्हणाले,  पवारसाहेब, पुण्याच्या नदीची झालेली ओंगळवाणी अवस्था आम्हाला पाहवत नव्हती; म्हणूनच या नदीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आम्ही कंबर कसली. केंद्र सरकार आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मदतीचा हात पुढे केला. त्याचाच परिणाम म्हणून पुण्यात भारतीय जनता पार्टीला गेल्या पाच वर्षांत या प्रकल्पाचा सर्वांगाने अभ्यास करता आला. आणि त्यानंतच या प्रकल्पाचे भूमीपूजन झाले आहे. पुण्याचा विकास आपल्या सहभागाशिवाय कसा होऊ शकतो, या अहंकारापोटी आपण नदी पुनरूज्जीवन प्रकल्प रेंगाळण्याचा निर्णय घेतला असेल तर ते आपणास शोभा देणारे नाही. पुण्याच्या पर्यावरणात, आरोग्यात, सौंदर्यात आणि अर्थकारणात भर घालणारा हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मन मोठे करा.

Mula Mutha River Devlopment : JICA : नदी सुधार योजनेचा मार्ग मोकळा : टेंडर ला जायका आणि केंद्राची मंजूरी 

Categories
Breaking News PMC देश/विदेश पुणे

नदी सुधार योजनेचा मार्ग मोकळा : टेंडर ला जायका आणि केंद्राची मंजूरी

: महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : जायका कंपनीच्या (JICA) सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या बहुचर्चित मुळा – मुठा नदी सुधार योजनेच्या (Mula Mutha Riverfront Development Project) निविदांना (Tender) मान्यता देण्यास जायका कंपनीने तसेच केंद्राने (Central Government) हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे लवकरच नदी सुधार योजनेच्या (Pune River Rijuvenation Project) निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे (PMC Standing Committee) मान्यतेस Pune Municipal Corporation (PMC) येऊन लवकरच कामांचा शुभारंभ होईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी दिली.

केंद्र सरकारने राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (National River Conservation Directorate), जपानी इंटरनॅशनल को – ऑपरेशन एजन्सी Japan International Co-operation Agency (Jica) व पुणे महानगरपालिकेसोबत Pune Municipal Corporation (PMC) करार केला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पाच्या 990.26 कोटीच्या निधीला मान्यता दिली आहे. यामध्ये केंद्राचा 85 टक्के म्हणजे 841.72 कोटी, महापालिकेचा 15 टक्के म्हणजे 148.54 कोटी रुपयांचा हिस्सा असणार आहे.

या प्रकल्पामध्ये 3 पॅकेजेस मुख्य मलवाहिन्या टाकणे व 6 पॅकेजेसमध्ये 11 मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (PMC Sewage Treatment Plant) उभारणे याचां समावेश असणार आहे. पॅकेज एक अंतर्गत करण्यात येणारे मलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्याच्या पॅकेज चारच्या निविदा (Tender) या जास्त दर असल्यामुळे रद्द करण्यात आल्या होत्या.

जल प्रदूषणामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्या मुठा आणि मुळा नद्या पुन्हा जिवंत होणार आहेत. या नद्यांच्या संवर्धनासाठी जपान मधील जायका कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या महापालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेस जायका कंपनीने मान्यता दिली आहे.

सुमारे १५०० कोटीचा खर्च असलेल्या या प्रकल्पात शहराच्या नदीकाठावर ११ सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारले जाणार असून त्या द्वारे शहरात निर्माण होणारे सांडपाणी १०० टक्के शुद्ध करून नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे, नदी प्रदूषण पूर्ण रोखण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. दरम्यान, २०१५ मध्ये केंद्रशासनाने या प्रकल्पास मान्यता दिली होती.

 

मात्र,सल्लागार नेमणे तसेच या प्रकलपासाठी काढण्यात आलेल्या पहिल्या निविदा जवळपास दुप्पट दराने आल्याने हा प्रकल्प वादग्रस्त ठरला होता. त्यानंतर नव्याने सर्व प्रक्रिया करण्यात आल्याने हा प्रकल्प सुमारे ६ वर्षे रखडला होता. मात्र, अखेर तो मार्गी लागला असून समितीच्या मान्यता मिळाल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

महापालिकेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. जायकाची मान्यता मिळाल्याने आता नदीसुधार आणि नदीकाठ विकसन प्रकल्प एकच वेळी सुरू होणार असून शहराला गतवैभव प्राप्त होणार आहे. या प्रकल्प मान्यतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व अधिकारी, पदाधिकारी, राज्य, केंद्रशासनाच्या सर्व विभागाचे महापौर म्हणून मी आभार मानतो. या प्रकल्पाच्या मान्यतेसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला त्यामुळेच हा प्रकल्प मार्गी लागला आहे.

 मुरलीधर मोहोळ ( महापौर)

River Devlopment : Ganesh Bidkar : नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच! : सभागृह नेते गणेश बिडकर यांचा दावा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच!

: सभागृह नेते गणेश बिडकर यांचा दावा

पुणे : शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांच्या सुधारणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. यामध्ये ‘नदीचे केवळ सुशोभिकरण नव्हे तर नदीची सुधारणाच’ केली जाणार आहे. या नद्यांचे पर्यावरण जपणे, नदीत एकही थेंब दूषित पाणी न जाऊ देणे, तसेच नदीबरोबर नागरिकांचे नाते दृढ करण्यासाठी सुविधा विकसित करणे, नदीपात्र हा शहराच्या सौंदर्याचा भाग बनविणे, ही उद्दीष्टे ठेवण्यात आलेली आहेत, असे महानगर पालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी स्पष्ट केले.

गेली ५० वर्षे महापालिका ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी या नद्यांची वाताहत उघड्या डोळ्यांनी पाहिली नाही तर त्यासाठी हातभार देखील लावला. हजारो ट्रक राडारोडा या नदीपात्रात टाकून पात्र उथळ आणि अरूंद केले गेले. नदीपात्रात दूषित पाणी जाणार नाही, यासाठी काहीही विचार न करता ओढ्या नाल्यांचे आणि ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात जाण्यापासून वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही, अशा शब्दात सभागृह नेते बिडकर यांनी नदी सुधारणा प्रकल्पावर टीका करणाऱ्या मंडळींचा समाचार घेतला. या योजनेवर टीका करणाऱ्या व्यक्तीच्याच अनेक बगलबच्च्यांनी नदीपात्रात भराव घालून इमारती उभ्या करण्याचा चंग बांधला होता. नदीची ही अवस्था पाहून डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकार मधील केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी तर ‘ही नदी नव्हे तर हे गटार आहे’, अशी उव्दिग्न प्रतिक्रिया दिली होता. मात्र त्यानंतर देखील यामध्ये काहीही सुधारणा झाली नाही.

केंद्रात आणि पाठोपाठ २०१४ मध्ये राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुळा-मुठा सुधारणेसाठी ठोस पावले उचलण्यास सुरूवात झाली. ‘नमामि गंगे’ प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नद्यांची निवड झाली. या प्रकल्पासाठी निवड झालेल्या नद्यांमध्ये गंगे व्यतिरिक्तच्या मुळा-मुठा या एकमेव नद्या आहेत. नदीमध्ये एकही थेंब दूषित पाणी जाऊ नये यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज होती. यासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी अर्थात जायका ने एक हजार कोटी रुपयांचे अत्यंत कमी व्याजाचे कर्ज मंजूर केले आहे. या कर्जाची हमी केंद्र सरकारने घेतलेली आहे. केंद्रात आणि राज्यात सरकार असतांना देखील काँग्रेस, राष्ट्रवादीने अशी हमी घेतलेली नव्हती आणि यासाठी प्रयत्नही केलेला नव्हता, असे बिडकर यांनी सांगितले.

जायका अंतर्गत ११ नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अर्थात एसटीपी उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचेही काम प्रगतिपथावर आहे. नदीसुधार प्रकल्पाचे एकूण ११ टप्पे केले असून त्यातील प्राधान्याच्या टप्प्याच्या कामाच्या निविदाही निघालेल्या आहेत. हा प्रकल्प जगदविख्यात रचनाकार व साबरमती रिव्हरफ्रंटचे शिल्पकार पद्मश्री बिमल पटेल यांच्या मार्गदर्शन आणि देखरेखी खाली राबविला जात आहे. पुण्याच्या दिमाखात भर घालणारा हा प्रकल्प पुण्याचे पर्यावरण समृद्ध करणारा असेल आणि पुण्याच्या विकासाला गती देणाराही ठरेल, असा विश्वास सभागृह नेते बिडकर यांनी व्यक्त केला.

 

‘राजकीय विद्वानांकडून’ केवळ पुणेकरांची दिशाभूलच

या प्रकल्पाचे स्वरूप माहिती करून न घेता काही राजकीय विद्वान यावर भाष्य करत आहेत. त्यांच्या माहितीसाठी सांगितले पाहिजे की, नदी सुधार प्रकल्पाचा एकूण कालावधी हा दहा वर्षांचा आहे. यातील पहिली पाच वर्षे अभ्यास करण्यासाठीचीच होती. प्रदीर्घ अभ्यासानंतर याचा सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिकेसमोर सादर करण्यात आला. हा अहवाल जनतेच्या अवलोकनार्थ महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. दरम्यानच्या काळात नदी सुधारसाठीची स्वतंत्र एसपीव्ही देखील उभारण्यात आली. करोनाचे संकट असताना देखील प्रकल्पाचे काम पुढे जातच राहिले आहे.

 

पंधरा फिल्म प्रसिद्ध करणार

हा प्रकल्प तांत्रिक स्वरूपाचा आहे. अत्यंत सोप्या भाषेत या प्रकल्पाची माहिती देण्याचीही गरज आहे. ही गरज ओळखून आम्ही पंधरा फिल्म्सच्या माध्यमातून ही माहिती पुणेकरांसमोर मांडणार आहोत. या मालिकेतील रोज एक फिल्म आम्ही पुढील पंधरा दिवस प्रसिद्ध (रिलीज) करणार आहोत. यातून जिज्ञासूंचे समाधान होईल, सामान्य पुणेकरांना नेमकी माहिती मिळेल आणि वेड पांघरून पेडगावला निघालेल्यांनाही बोध होइल, असा टोला सभागृह नेते गणेश बिडकर यांनी लगावला.