Standing Committee : २ हजार कोटी पेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावांना स्थायीची मान्यता!  : ‘हम वादे नही इरादे लेकर आये है’

Categories
Breaking News PMC Political पुणे

२ हजार कोटी पेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावांना स्थायी समितीची मान्यता!

: पुणेकरांना दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा सत्ताधारी भाजपचा दावा

पुणे : महापालिका निवडणूक जवळ आली आहे. १४ मार्च नंतर भाजपची सत्ता नसेल. निवडणुकीत कोण बाजी मारणार हे गुलदस्त्यात आहे. मात्र दुसरीकडे भाजपने हातात असलेल्या सत्तेचा शेवटच्या क्षणी उपयोग केला आहे. शुक्रवाच्या स्थायी समितीत सुमारे २ हजार कोटी पेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावांना एकाच दिवशी मान्यता देण्याचा विक्रम समितीने केला आहे. त्यासाठी पहिल्यांदाच स्थायी समिती सायंकाळी ६ वाजण्याच्या नंतर ही सुरु ठेवली होती. दरम्यान या निमित्ताने पुणेकरांना दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा दावा सत्ताधारी भाजपने केला आहे.

: काय मंजूर झाले आजच्या स्थायी समितीत?

 

राष्ट्रीय नदी संवर्धन योजना

राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण प्रकल्पासाठी (जायका) मागविण्यात आलेल्या निविदांपैकी पात्र ठेकेदार एनव्हायरो कंट्रोलज्-टोशिबा वॉटर सोल्यूशन जेव्ही यांच्याकडून कॅपेक्स साठी सुमारे एक हजार पंचाण्णव कोटी एक्कावन्न लाख रुपये, सुमारे एकोणनव्वद लाख सत्तावीस हजार युरो, ओपेक्‍ससाठी सुमारे तीनशे कोटी २१ लाख रुपये आणि प्रोव्हिजनल रक्कम सोळा कोटी ५३ लाख रुपये असे कराराप्रमाणे काम करून घेण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या प्रकल्पाद्वारे शहरात निर्माण होणारया शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या निविदांसाठी केंद्र सरकार आणि अर्थसहाय्य करणारी जपान इंटरनॅशनल को ऑपरेटिव्ह एजन्सी (जायका) यांनी निविदा प्रक्रियेला मान्यता दिली होती. या प्रकल्पात ११ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारणे, सुमारे ११३ किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या विकसित करणे, जीआयएस, एआयएस, स्काडा यंत्रणा उभारणे, कम्युनिटी टॉयलेट ब्लॉक उभारणे अशा १३ पॅकेजेसच्या कामांचा समावेश आहे. प्रकल्प पूर्तीनंतर त्याचे पंधरा वर्षे संचलन करणे, देखभाल दुरुस्तीचज जबाबदारी संबंधित कंपनीवर राहणार आहे. सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया करणारे पुणे देशातील पहिले शहर ठरणार आहे.

रासने पुढे म्हणाले, पुणे शहरात आजमितीस ७४४ दशलक्ष लिटर्स प्रतिदिन मैलापाणी तयार होते. त्या अनुषंगाने ५६७ दशलक्ष लिटर्स प्रतिदिन क्षमतेची १० मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. संपूर्ण मैलापाणी शुद्धीकरणासाठी महापालिकेकडून ९९० कोटी २६ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. केंद्र सरकारने १४ जानेवारी २०१६ रोजी त्याला मान्यता दिली असून, ८५ टक्के अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित रक्कम पुणे महापालिकेला खर्च करावी लागणार आहे. मलवाहिन्या विकसित करण्याबरोबर ३९६ दशलक्ष लिटस प्रतिदिन क्षमतेची ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहेत.


राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्ती

राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पासाठी दैनंदिन देखरेख करण्यासाठी शाह टेक्निकल कंपनीची चार वर्षांसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या प्रकल्पाचे आवश्यक असणारा तज्ज्ञ अभियंता वर्ग उपलब्ध होणार आहे. या निविदेमुळे प्रकल्पाचे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होणार आहे. शाह कंपनीची १३ लाख ६२ हजार रुपयांची निविदा मान्य करण्यात आली.


पुणे नदी पुनरुज्जीवल प्रकल्प

संगमवाडी ते बंडगार्डन

पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीचा विकास करण्यासाठी संगमवाडी पूल ते बंडगार्डन पुलाच्या दरम्यानचे काम करण्यासाठी बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या सुमारे २६५ कोटी १४ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, तांत्रिक छाननी समितीने सुमारे ३६३ कोटी ८८ लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रकाला मान्यता दिली होती. बी. जी. शिर्के कंपनीने त्या पेक्षा १३.४० टक्के कमी दराने निविदा सादर केली होती. प्रशासनाला कंपनीबरोबर करारनामा करण्यास मान्यता देण्यात आली. माती खोदार्इ, मुरुम खोदार्इ, कठीण दगडामधील खोदार्इ, वाहतूक करणे, ओपन फाउंडेशन, पदपथ निर्मिती, सायकल ट्रॅक तयार करणे, एमब्यांकमेंट बांधणे, गॅबियन वॉल बांधणे, नदीकिनारी बेचेंस बसविणे, झाडे लावणे, विद्युत व्यवस्था अशाप्रकारच्या कामांचा समावेश आहे. पावसाळ्याच्या कालावधीसह तीस महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

 

बंडगार्डन ते मुंढवा

पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीचा विकास करण्यासाठी बंडगार्डन पूल ते मुंढवा नदीच्या दोन्ही बाजूने काम करण्यासाठी कुमार इंफ्राप्रोजेक्ट यांच्या सुमारे ६०४ कोटी ७५ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, तांत्रिक छाननी समितीने सुमारे ७१९ कोटी ०३ लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रकाला मान्यता दिली होती. प्रशासनाला कंपनीबरोबर करारनामा करण्यास मान्यता देण्यात आली. माती खोदार्इ, मुरुम खोदार्इ, कठीण दगडामधील खोदार्इ, वाहतूक करणे, ओपन फाउंडेशन, पदपथ निर्मिती, सायकल ट्रॅक तयार करणे, एमब्यांकमेंट बांधणे, गॅबियन वॉल बांधणे, नदीकिनारी बेचेंस बसविणे, झाडे लावणे, विद्युत व्यवस्था अशाप्रकारच्या कामांचा समावेश आहे. पावसाळ्याच्या कालावधीसह छत्तीस महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.


विविध डी. पी. रस्त्यांना मान्यता

खराडी भागातील आठ डी. पी. रस्ते डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यात खासगी सहभागातून (पीपीपी) डी. पी. रस्ते विकसित करण्यासाठी सुमारे १०८ कोटी १६ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, शहरातील विकास आराखड्यातील रस्ते ताब्यात आलेल्या जागेनुसार आणि उपलब्ध तरतुदीनुसार दरवर्षी टप्प्यानेटप्प्याने विकसित केले जातात. रस्ते विकसनाचा खर्च, तुलनेने कमी उपलब्ध तरतूद आणि जागा ताब्यात घेताना जागा मालकांची रोख मोबइल्याची मागणी अशा कारणांमुळे डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्यात मर्यादा येतात. अशा परिस्थितीत रस्ते विकसन खासगी सहभागातून करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाअंतर्गत रस्त्याच्या जागा एफएसआय किंवा ठेकेदारास क्रेडिट नोट स्वरूपात देण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. सदर क्रेडिट नोट पुणे महापालिकेकडे असलेल्या बांधकाम परवानगी शुल्काच्या अंतर्गत वापरता येते. तसेच ती क्रेडिट नोट हस्तांतरणीय आहे. या वर्षी एकूण ११ रस्ते आणि दोन पुलांची कामे पीपीपीमध्ये करण्यात येत आहेत. पीपीपी अंतर्गत क्रेडिट नोट मोबदल्यामध्ये रस्ते आणि पूल विकसित करण्याची बाब गेल्या वर्षी मुख्य सभेने मान्य केली आहे. पीपीपी प्रस्तावामुळे महापालिकेस थेट गुंतवणूक न करता क्रेडिट नोटच्या मोबदल्यात रस्ते आणि पुलांची कामे विकसित करण्यात येत आहेत. भूसंपादनासाठी एफएसआय, टीडीआर अणि रिझर्व्हेशन क्रेडिट बॉंड या पर्यायांचा वापर करण्यात येतो.

मुंढवा, खराडी नदीवर पुलाला मान्यता

मुंढवा, खराडी येथील मुळा-मुठा नदीवर २४ मीटर लांबीचा पुल डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यात खासगी सहभागातून (पीपीपी) विकसित करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

हडपसर येथे डी. पी. रस्ता

हडपसर येथील पंतप्रधान आवास योजना प्रकल्पासाठी १२ मीटर डी. पी. रस्ता विकसित करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली. या रस्त्यासाठी ८४ लाख ७४ हजार रुपयांची निविदा मंजूर केल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.


पाच वर्षांपूर्वी आम्ही म्हणत होतो की, ‘हम वादे नही इरादे लेकर आये है’ या उक्तीला आम्ही जागलो आहोत. पुण्याच्या आधुनिक भवितव्याची पायाभरणी करणारे २४ बाय ७ पाणीपुरवठा प्रकल्प, नदीपुनरूज्जीवन, जायका, पीपीपी रस्ते आणि उड्डाणपूल या प्रकल्पांच्या कामाला गती देणारे निर्णय आज झाले. पुण्याचा चेहरामोहरा बदलून टाकणारे हे प्रकल्प पुण्याला जगातील सर्वौत्तम शहरांच्या पंगतीत नेऊन ठेवणार आहेत. पुण्याच्या विकासाचा एक नवा टप्पा यामुळे सुरू झालेला आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने शहराच्या भवितव्याला आकार देण्याची कामगिरी बजावता येते आहे, याचे मोठे समाधान आहे.

– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या दोन्ही प्रकल्पांवर लागलेली अंतिम मोहोर हे पुणेकरांच्या स्वप्नपूर्तीवरही झालेले शिक्कामोर्तबच आहे. केवळ नद्यांच्या पुनरुज्जीवनावरच न थांबता नदीकाठसुधारही होत आहे, ही बाब तितकीच महत्त्वाची आहे. नद्यांचे आरोग्य मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांच्या माध्यमातून सुधारतानाच नदीकाठ विकसित होणे हे शहराच्या वैभवात मोठी भर घालणारे ठरेल. हे दोन्ही प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत.

मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

Mohan Joshi : बापट,  मोहोळ,  जावडेकर यांना अकार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्कार द्यावा : असं का म्हणाले मोहन जोशी?

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

 बापट,  मोहोळ,  जावडेकर यांना अकार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्कार द्यावा

: नदी सुधार योजना ही स्टंटबाजी

-: माजी आमदार मोहन जोशी

पुणे – महापालिका निवडणुका जवळ आल्याने भारतीय जनता पक्षाला मुळा-मुठा नदी सुधारणेबाबत जाग आली असून त्यासाठीच्या कामाची निव्वळ स्टंटबाजी केली जात आहे, वास्तविक या प्रकल्पाला लागलेल्या विलंबाबद्दल माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विद्यमान खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ यांना अकार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्कार द्यायला हवा, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

मुळा-मुठा नदी सुधारणेच्या कामाला जपानमधील जायका कंपनी आणि केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने कामास लवकरच सुरुवात होईल अशी घोषणा भाजपच्या महापौरांनी केली आहे. हा निव्वळ देखावा आहे. सात वर्षांपूर्वीच केंद्राने मंजुरी दिली होती. भाजपने तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा सत्कार खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते केला होता. नदी सुधारणा कामांशी संबंधित पर्यावरण खात्याचे मंत्रीपद प्रकाश जावडेकर यांच्याकडे होते. मात्र, सत्कार समारंभ झाले. पण, गेली सात वर्षे या प्रकल्पाला माजी खासदार शिरोळे, माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, विद्यमान खासदार गिरीश बापट, महापालिकेतील भाजपचे पदाधिकारी मार्गी लावू शकलेले नाहीत. ३१ जानेवारी २०२१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रकल्पाचा निधी परत जातोय की काय? अशी परिस्थिती उदभवली होती याची कबुलीच खासदार बापट यांनी दिलेली आहे. सात वर्षे हे निष्क्रीय राहिले आणि आता निवडणूक आली म्हणून धडपड करुन प्रकल्प मंजुरीचे पत्र आणले आहे. एव्हाना हा प्रकल्प पूर्ण व्हायला हवा होता. ती निष्क्रियता लपवून ठेवायची आणि प्रकल्पाचे काम मार्गी लावत असल्याचा गाजावाजा करत स्वतःची पाठ थोपटून घ्यावयाची असा प्रकार खासदार बापट आणि भाजपची नेते मंडळी करीत आहेत, केवळ नदी सुधारणा प्रकल्पच नव्हे तर स्मार्ट सिटी सारख्या अन्य अनेक प्रकल्पांना पूर्णत्त्वास नेण्यात भाजपच्या या लोकप्रतिनिधींना अपयश आल्याने त्यांना पुणेकरांनी अकार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्कार द्यायला हवा, अशी टीका मोहन जोशी यांनी पत्रकात केली आहे.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या ढिसाळ कारभारामुळे प्रकल्पाचा खर्च सुमारे ५५०कोटी रुपयांनी वाढलेला आहे. प्रकल्पासाठी होणाऱ्या सुमारे १४७३कोटी खर्चापैकी ८४२ कोटी केंद्र सरकार देणार आहे. उर्वरित ५५०कोटी खर्चाचा भुर्दंड पुणेकरांच्या माथी बसणार आहे. याला जबाबदार असलेल्या भाजपला, पुणेकरांसमोर जाब द्यावा लागेल, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

Mula Mutha River Devlopment : JICA : नदी सुधार योजनेचा मार्ग मोकळा : टेंडर ला जायका आणि केंद्राची मंजूरी 

Categories
Breaking News PMC देश/विदेश पुणे

नदी सुधार योजनेचा मार्ग मोकळा : टेंडर ला जायका आणि केंद्राची मंजूरी

: महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : जायका कंपनीच्या (JICA) सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या बहुचर्चित मुळा – मुठा नदी सुधार योजनेच्या (Mula Mutha Riverfront Development Project) निविदांना (Tender) मान्यता देण्यास जायका कंपनीने तसेच केंद्राने (Central Government) हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे लवकरच नदी सुधार योजनेच्या (Pune River Rijuvenation Project) निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे (PMC Standing Committee) मान्यतेस Pune Municipal Corporation (PMC) येऊन लवकरच कामांचा शुभारंभ होईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी दिली.

केंद्र सरकारने राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (National River Conservation Directorate), जपानी इंटरनॅशनल को – ऑपरेशन एजन्सी Japan International Co-operation Agency (Jica) व पुणे महानगरपालिकेसोबत Pune Municipal Corporation (PMC) करार केला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पाच्या 990.26 कोटीच्या निधीला मान्यता दिली आहे. यामध्ये केंद्राचा 85 टक्के म्हणजे 841.72 कोटी, महापालिकेचा 15 टक्के म्हणजे 148.54 कोटी रुपयांचा हिस्सा असणार आहे.

या प्रकल्पामध्ये 3 पॅकेजेस मुख्य मलवाहिन्या टाकणे व 6 पॅकेजेसमध्ये 11 मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (PMC Sewage Treatment Plant) उभारणे याचां समावेश असणार आहे. पॅकेज एक अंतर्गत करण्यात येणारे मलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्याच्या पॅकेज चारच्या निविदा (Tender) या जास्त दर असल्यामुळे रद्द करण्यात आल्या होत्या.

जल प्रदूषणामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्या मुठा आणि मुळा नद्या पुन्हा जिवंत होणार आहेत. या नद्यांच्या संवर्धनासाठी जपान मधील जायका कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या महापालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेस जायका कंपनीने मान्यता दिली आहे.

सुमारे १५०० कोटीचा खर्च असलेल्या या प्रकल्पात शहराच्या नदीकाठावर ११ सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारले जाणार असून त्या द्वारे शहरात निर्माण होणारे सांडपाणी १०० टक्के शुद्ध करून नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे, नदी प्रदूषण पूर्ण रोखण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. दरम्यान, २०१५ मध्ये केंद्रशासनाने या प्रकल्पास मान्यता दिली होती.

 

मात्र,सल्लागार नेमणे तसेच या प्रकलपासाठी काढण्यात आलेल्या पहिल्या निविदा जवळपास दुप्पट दराने आल्याने हा प्रकल्प वादग्रस्त ठरला होता. त्यानंतर नव्याने सर्व प्रक्रिया करण्यात आल्याने हा प्रकल्प सुमारे ६ वर्षे रखडला होता. मात्र, अखेर तो मार्गी लागला असून समितीच्या मान्यता मिळाल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

महापालिकेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. जायकाची मान्यता मिळाल्याने आता नदीसुधार आणि नदीकाठ विकसन प्रकल्प एकच वेळी सुरू होणार असून शहराला गतवैभव प्राप्त होणार आहे. या प्रकल्प मान्यतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व अधिकारी, पदाधिकारी, राज्य, केंद्रशासनाच्या सर्व विभागाचे महापौर म्हणून मी आभार मानतो. या प्रकल्पाच्या मान्यतेसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला त्यामुळेच हा प्रकल्प मार्गी लागला आहे.

 मुरलीधर मोहोळ ( महापौर)

River Devlopment : Ganesh Bidkar : नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच! : सभागृह नेते गणेश बिडकर यांचा दावा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच!

: सभागृह नेते गणेश बिडकर यांचा दावा

पुणे : शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांच्या सुधारणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. यामध्ये ‘नदीचे केवळ सुशोभिकरण नव्हे तर नदीची सुधारणाच’ केली जाणार आहे. या नद्यांचे पर्यावरण जपणे, नदीत एकही थेंब दूषित पाणी न जाऊ देणे, तसेच नदीबरोबर नागरिकांचे नाते दृढ करण्यासाठी सुविधा विकसित करणे, नदीपात्र हा शहराच्या सौंदर्याचा भाग बनविणे, ही उद्दीष्टे ठेवण्यात आलेली आहेत, असे महानगर पालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी स्पष्ट केले.

गेली ५० वर्षे महापालिका ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी या नद्यांची वाताहत उघड्या डोळ्यांनी पाहिली नाही तर त्यासाठी हातभार देखील लावला. हजारो ट्रक राडारोडा या नदीपात्रात टाकून पात्र उथळ आणि अरूंद केले गेले. नदीपात्रात दूषित पाणी जाणार नाही, यासाठी काहीही विचार न करता ओढ्या नाल्यांचे आणि ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात जाण्यापासून वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही, अशा शब्दात सभागृह नेते बिडकर यांनी नदी सुधारणा प्रकल्पावर टीका करणाऱ्या मंडळींचा समाचार घेतला. या योजनेवर टीका करणाऱ्या व्यक्तीच्याच अनेक बगलबच्च्यांनी नदीपात्रात भराव घालून इमारती उभ्या करण्याचा चंग बांधला होता. नदीची ही अवस्था पाहून डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकार मधील केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी तर ‘ही नदी नव्हे तर हे गटार आहे’, अशी उव्दिग्न प्रतिक्रिया दिली होता. मात्र त्यानंतर देखील यामध्ये काहीही सुधारणा झाली नाही.

केंद्रात आणि पाठोपाठ २०१४ मध्ये राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुळा-मुठा सुधारणेसाठी ठोस पावले उचलण्यास सुरूवात झाली. ‘नमामि गंगे’ प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नद्यांची निवड झाली. या प्रकल्पासाठी निवड झालेल्या नद्यांमध्ये गंगे व्यतिरिक्तच्या मुळा-मुठा या एकमेव नद्या आहेत. नदीमध्ये एकही थेंब दूषित पाणी जाऊ नये यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज होती. यासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी अर्थात जायका ने एक हजार कोटी रुपयांचे अत्यंत कमी व्याजाचे कर्ज मंजूर केले आहे. या कर्जाची हमी केंद्र सरकारने घेतलेली आहे. केंद्रात आणि राज्यात सरकार असतांना देखील काँग्रेस, राष्ट्रवादीने अशी हमी घेतलेली नव्हती आणि यासाठी प्रयत्नही केलेला नव्हता, असे बिडकर यांनी सांगितले.

जायका अंतर्गत ११ नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अर्थात एसटीपी उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचेही काम प्रगतिपथावर आहे. नदीसुधार प्रकल्पाचे एकूण ११ टप्पे केले असून त्यातील प्राधान्याच्या टप्प्याच्या कामाच्या निविदाही निघालेल्या आहेत. हा प्रकल्प जगदविख्यात रचनाकार व साबरमती रिव्हरफ्रंटचे शिल्पकार पद्मश्री बिमल पटेल यांच्या मार्गदर्शन आणि देखरेखी खाली राबविला जात आहे. पुण्याच्या दिमाखात भर घालणारा हा प्रकल्प पुण्याचे पर्यावरण समृद्ध करणारा असेल आणि पुण्याच्या विकासाला गती देणाराही ठरेल, असा विश्वास सभागृह नेते बिडकर यांनी व्यक्त केला.

 

‘राजकीय विद्वानांकडून’ केवळ पुणेकरांची दिशाभूलच

या प्रकल्पाचे स्वरूप माहिती करून न घेता काही राजकीय विद्वान यावर भाष्य करत आहेत. त्यांच्या माहितीसाठी सांगितले पाहिजे की, नदी सुधार प्रकल्पाचा एकूण कालावधी हा दहा वर्षांचा आहे. यातील पहिली पाच वर्षे अभ्यास करण्यासाठीचीच होती. प्रदीर्घ अभ्यासानंतर याचा सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिकेसमोर सादर करण्यात आला. हा अहवाल जनतेच्या अवलोकनार्थ महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. दरम्यानच्या काळात नदी सुधारसाठीची स्वतंत्र एसपीव्ही देखील उभारण्यात आली. करोनाचे संकट असताना देखील प्रकल्पाचे काम पुढे जातच राहिले आहे.

 

पंधरा फिल्म प्रसिद्ध करणार

हा प्रकल्प तांत्रिक स्वरूपाचा आहे. अत्यंत सोप्या भाषेत या प्रकल्पाची माहिती देण्याचीही गरज आहे. ही गरज ओळखून आम्ही पंधरा फिल्म्सच्या माध्यमातून ही माहिती पुणेकरांसमोर मांडणार आहोत. या मालिकेतील रोज एक फिल्म आम्ही पुढील पंधरा दिवस प्रसिद्ध (रिलीज) करणार आहोत. यातून जिज्ञासूंचे समाधान होईल, सामान्य पुणेकरांना नेमकी माहिती मिळेल आणि वेड पांघरून पेडगावला निघालेल्यांनाही बोध होइल, असा टोला सभागृह नेते गणेश बिडकर यांनी लगावला.

River Devlopment : Girish Bapat : नदी सुधार योजनेचा निधी केंद्राला परत जाणार नाही  : खासदार गिरीश बापट यांची स्पष्टोक्ती

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

नदी सुधार योजनेचा निधी केंद्राला परत जाणार नाही

: खासदार गिरीश बापट यांची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली : पुण्यातील मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाला विलंब झाला असला, तरी तो लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी मिळणारा कोणताही निधी परत केंद्राला जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केली आहे.

खासदार बापट यांची या प्रश्नीे जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याबरोबर आज बैठक झाली. त्यात अधिकारी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. शेखावत यांनी या प्रकल्पाची एक महिन्यात वर्क ऑर्डर काढण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे बापट यांनी सांगितले.

पुणेकरांसाठी महत्त्वाचा असलेला हा जायका प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत पुढील महिन्यात संपत आहे. प्रकल्प ३१ जानेवारी २०२२ पर्यंत महापालिकेने पूर्ण करायला पाहिजे. परंतु महापालिका अद्यापही निविदा प्रक्रियेत अडकली आहे. त्यामुळे नियोजित तारखेस हा प्रकल्प पूर्ण होणे शक्य नाही. हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी खासदार गिरीश बापट सुरवातीपासून प्रयत्नशील आहेत. त्यांनी यापूर्वी देखील शेखावत यांची वारंवार भेट घेऊन चर्चा केली होती. आजही शेखावत आणि बापट यांच्यात अधिकाऱ्यांसह बैठक झाली.

खासदार बापट यांच्यासह पर्यावरण सचिव आर. पी. गुप्ता, राष्ट्रीय नदीसुधार संचालनालयाचे संचालक आर. आर. मिश्रा, जायकाचे प्रमुख साइतो मित्सुनोरी आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते. खासदार गिरीश बापट यांनी याबाबत सांगितले की पुणेकरांसाठी हा प्रकल्प महत्वाचा असून या प्रकल्पासाठी आवश्येक असलेल्या जागा तातडीने ताब्यात घेऊन या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करा अशी आग्रहाची विनंती केली. त्यावर या प्रकल्पासाठी आवश्य्क जमीन सात दिवसांत ताब्यात घ्या. तसेच या प्रकल्पाची वर्क ऑर्डर एक महिन्यात काढा, असे शेखावत यांनी संबंधितांना सांगितले आहे. तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत संपत असली, तरी त्यास मुदतवाढ मिळेल. त्यामुळे या प्रकल्पाचा निधी केंद्राकडून परत घेतला जाणार नाही, अशी ग्वाही शेखावत यांनी दिली आहे.

महापालिकेला या प्रकल्पासाठी जायकाकडून मिळणाऱ्या ८५० कोटी रूपयांच्या निधीवर पाणी सोडावे लागते की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचे मानले जात होते. परंतु शेखावत आणि बापट यांच्या आजच्या बैठकीमुळे कुठलाही निधी परत न जाता, हा प्रकल्प पूर्ण होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महिनाभरात या प्रकल्पाच्या कामाला सुरवात होईल, हेही या बैठकीमुळे स्पष्ट झाले आहे. आता महापालिका प्रशासनास वेगाने सर्व सरकारी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

पुणे महापालिका, केंद्र सरकार आणि जायका यांच्यात त्रिपक्षीय करार फेब्रुवारी २०१५ मध्ये करण्यात आला होता. त्यानुसार पुणे शहरात अकरा ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि सांडपाणी वितरण व्यवस्था उभी करण्यासाठी नियोजित ९९० कोटी रुपये खर्चापैकी ८५ टक्के अनुदान म्हणजेच ८४१ कोटी रुपये पुणे महापालिकाला मिळणार आहेत. शहरातील शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संवर्धन मंत्रालय (एनआरसीडी) आणि जपान सरकारच्या मदतीने महापालिकेने जायका प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पातंर्गत शहरात अकरा ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे करण्यात येणार आहेत. पण प्रकल्पासाठी आवश्य्क 11 पैकी पाच जागा महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. त्यात महापालिकेची निविदा प्रक्रिया देखील रखडली आहे.

PMC : River Devlopment : नदी सुधार साठी महापालिका ७०० कोटी खर्च करणार

Categories
PMC पुणे

नदी सुधार साठी महापालिका ७०० कोटी खर्च करणार

: महापालिका मुख्य सभेचा निर्णय

पुणे : शहरातून वाहत जाणाऱ्या ४४ किलोमीटर मुळा-मुठा नदीच्या सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल ४ हजार ७२७ कोटाचा प्रकल्प राबविण्यासाठी मुख्यसभेत रात्री उशिरा अंतिम मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाच्या ११ टप्प्यांपैकी तीनटप्पे प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार असून, यातील एक टप्पा महापालिका ७०० कोटी रुपये खर्च करू स्वतः करणार आहे. उर्वरित टप्पे पीपीपी मधून करण्यास मुख्यसभेने मान्यता दिली.

: एकमताने प्रस्ताव मंजूर

पुणे महापालिकेने मुळा – मुठा नदी सुधार करण्यासाठी ४ हजार ७२७ कोटीचा आराखडा तयार केला आहे. यावर शहरातील सामजिक व पर्यावरण संस्थांनी आक्षेप घेतला होता. मात्र, आज भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना यासह इतर पक्षांनी पाठिंबा देत एकमताने प्रस्ताव मंजूर केला. या प्रकल्पास २०१८ मध्ये मान्यता दिली होती, तेव्हा २ हजार ६५० कोटीचा खर्च होता. पण प्रकल्पास उशिर झाल्याने ही खर्च दीडपट वाढला आहे. हा प्रस्ताव आज मंजुरीला आल्यानंतर त्यात या प्रकल्पाच्या ११ पैकी तीन टप्पे हे प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार येतील. यापैकी एका टप्प्यासाठी येणारा ७०० कोटीचा खर्च महापालिका करेल. निधीतून करण्याचा व उर्वरित खर्च पीपीपी तत्वावर करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.मुख्यसभेत या विषयावर चर्चा होताना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रकल्पास पाठिंबा दिला. पण प्रशासनाने ४ हजार ७२७ निधीसाठी पुढील पाच वर्षे अंदाजपत्रकात ७२ ब नुसार तरतूद केली करण्यास मान्यता देण्यात आली. पण यावर चिंता व्यक्त केली, अशा प्रकारे ७२ ब चा वापर केला तर भविष्यात इतर प्रकल्पांसाठी तरतूद करता येणार नाही. याच कामासाठी सर्व पैसे वापरले जातील, त्यामुळे हा प्रकार बंद करा अशी टीका केली . यावर सभागृह नेते गणेश बीडकर यांनी ७२ बची चिंता करू नका आपल्या क्षमतेच्या तीन पट अधिक ११ हजार कोटीची तरतूद याच कलमाखाली केली होती असे सांगत याचे समर्थन केले.

कोण काय म्हणाले ?

“मुळा मुठा विकसीत करताना पर्यावरण पूरक झाला पाहिजे व वेळेत प्रकल्प पूर्ण करा. “
– दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या
——
या प्रकल्पावर एकमत झाले आहे ही सभागृहाची खासियत आहे. हा प्रकल्प ११ पॅकेज मध्ये करणार आहोत. त्यामुळे लगेच पैसे लागणार नाहीत. आपल्याला ४४ किलेमरचा नदीकाठ लाभला आहे हे आपले भाग्य आहे. आता प्रशासनाने ही विश्वास सत्यात आणावा.
– गणेश बिडकर , सभागृहनेते
——
७२ ब मुळे महापालिकेचे दायित्व वाढणार आहे. मोठया प्रकल्पाच्या नादात अत्यावश्यक कामांसाठी पालिकेकडे पैसे शिल्लक राहणार नाहीत.”- डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक”प्रस्ताव मान्य करताना नेमके कोणते तीन पॅकेज प्रायोगिक तत्त्वावर करणार हे स्पष्ट नाही. पुणे, पिंपरी, कॅन्टोन्मेंट यांचा शेअर काय असेल याची स्पष्टता नाही. पालिकेला आर्थिक संकटात न लोटता एकच टप्पा करावा.
– अविनाश बागवे, नगरसेवक
—-
नदी सुधारच्यी निमित्ताने आणखी एक एसपीव्ही कंपनी स्थापन करत आहोत. पर्यावरण अहवालात आपण बांधकाम होणार नाही असे म्हणतोय तर दुसरीकडे 18 हजार चौरस मीटरचे बांधकाम करणार आहोत. ही गंभीर त्रुटी आहे.
– विशाल तांबे, नगरसेवक
——-
मी महापौर असताना या प्रकल्पला सुरुवात झाली. विलंब झाल्याने खर्च वाढला आहे.पण आज प्रस्ताव मान्य होत असल्याने आनंद झाला”
– दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक
——-
हा प्रकल्प करताना अगदी खडकवासला पासून चा विचार करावा. हा प्रकल्प पूर्ण करताना तो पुणेकरांच्या पसंतीस उतरला पाहिजे याची काळजी घ्यावी.- प्रशांत जगताप, नगरसेवक”हा प्रकल्प करताना नागरिकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. आदर्श प्रकल्प झाला पाहिजे.
– पृथ्वीराज सुतार, गटनेता, शिवसेना
—–

:सुभाष जगताप यांचा सभात्याग

आयुक्तांबद्दल आक्षेपार्ह शब्दामुळे गोंधळसुभाष जगताप यांनी या प्रकल्पासाठी स्थापना केलेल्या एसपीव्हीवर अधिकारी चुकीचे काम करतात. असे सांगताना पूर्वीचे आयुक्त  यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरला. या आयुक्त विक्रम कुमार यांनी नाराजी व्यक्त करत जागेवर उभे राहिले. यानंतर भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेत आयएएस अधिकाऱ्यास असे कसे म्हणू शकता असा प्रश्न केला. यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला. सभापती सुनीता वाडेकर यांनी हे वाक्य कामकाजातून काढून टाकण्यास सांगितले, तसेच जगताप यांना तुम्ही माफी मागा आणि भाषण बंद करा असा आदेश दिला. तरीही जगताप बोलणे बंद करा असे वाडेकर वारंवार सांगत त्याचवेळी जगताप यांनी शब्द मागे घेतो व मला बोलू द्यावे अशी विनंती केली, पण वाडेकर यांनी ती अमान्य केली. जगताप हे आक्रमणपणे सभापतींच्या आसनापुढे आले. त्यांना इतर नगरसेवक समजावून सांगून शांत करत होते, पण आक्रमकपणा कमी झाला नाही. त्यांचा हा आवेश बघून भाजप नगरसेवकांनी जगताप यांनी जाहीर माफी मागावी व यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी केल्याने गोंधळ वाढला. अखेर याचा निषेध करत जगताप सभागृहाबाहेर निघून गेले