Diwali | PMC Pune | दिवाळीत मंडप, रनिंग मंडप अथवा कमानी उभारण्यास परवानग्या दिल्या जाणार नाहीत  | अतिक्रमण विभागाचे आदेश 

Categories
Breaking News PMC social पुणे

दिवाळीत मंडप, रनिंग मंडप अथवा कमानी उभारण्यास परवानग्या दिल्या जाणार नाहीत

| अतिक्रमण विभागाचे आदेश

पुणे |  दिवाळी सणाचे कालावधीत रस्ता, पदपथांलगतच्या खाजगी मिळकतीमधील दुकानदारांकडून मंडप, रनिंग मंडप अथवा कमानी उभारण्याकरिता मागणी होत असते. अशा परवानगीनुसार देण्यात आलेल्या मंडप, रनिंग मंडप अथवा कमानी उभारल्यामुळे रस्ता, पदपथांवर अनधिकृतपणे खड्डे घेतले जातात. तसेच रस्ता, पदपथांवरील मंडपामध्ये अनधिकृतपणे फटाके, दिवाळी फराळ व इतर विक्री साहित्य ठेवून नागरिकांच्या व वाहनांच्या रहदारीस अडथळे निर्माण केले जातात. त्यामुळे यावर्षांपासून रस्ता, पदपथांलगतच्या खाजगी मिळकतीमधील दुकानदारांना मंडप, रनिंग मंडप अथवा कमानी उभारण्यास कोणत्याही परवानग्या दिल्या जाऊ नयेत. असे आदेश अतिक्रमण विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
अतिक्रमण विभागाच्या आदेशानुसार ज्या व्यावसायिकांनी मागीलवर्षी अशा परवानग्या घेतल्या असतील त्यांना अथवा यावर्षी नविन व्यावसायिकांना वरीलकामी वाहतूक पोलीस विभागाकडून ना-हरकत दाखले देण्यात आलेले असले तरी अशा व्यावसायिकांना त्यांनी मागणी केलेल्या अर्जास लेखी पत्रान्वये परवानग्या न देणेबाबत स्पष्ट नकार कळविण्यात यावा. तसेच जे व्यावसायिक रस्ता, पदपथांवर अनधिकृतपणे दिवाळी सणानिमित्त फटाके, दिवाळी फराळ व इतर विक्री साहित्य ठेवून व्यवसाय करतील अथवा त्याकरिता मंडप, रनिंग मंडप अथवा कमानी व जाहिरात फलक उभारतील अशा सर्व व्यावसायिकांवर त्वरित कारवाया करून रस्ते, पदपथ नागरिकांच्या व वाहनांच्या रहदारीस अतिक्रमणमुक्त ठेवावेत. परंतु हंगामी व्यवसाय करणाऱ्या (फटाके विक्री वगळून) छोटे पथारी व्यावसायिकांना नियमानुसार पोलीस वाहतूक शाखेकडील ना-हरकत दाखला घेवून हंगामी परवानगीची मागणी केल्यास मागणी केलेल्या जागेची नागरिकांच्या व वाहनांच्या रहदारीस अडथळे निर्माण नाहीत याबाबतची खात्री करून नंतरच संबंधित महापालिका सहाय्यक आयुक्त यांचे स्वाक्षरीने अंतिम मान्यतेसाठी व नियमानुसार दैनंदिन परवाना शुल्क भरणेकरिता मुख्य अतिक्रमण विभागाकडे शिफारशी करण्यात याव्यात. अशा परवानग्या देताना रस्ता, पदपथांवर कोणतेही खड्डे घेतले जाणार नाहीत व मान्य जागेमध्येच फटाके विक्री वगळून इतर व्यवसाय केले जातील याबाबतचे हमीपत्र घेवूनच परवानग्या देण्यात याव्यात. असे आदेशात म्हटले आहे.

Department of Property and Management : PMC : महापालिकेने हडपसर मधील 36 गाळे घेतले ताब्यात 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेने हडपसर मधील 36 गाळे घेतले ताब्यात

: थकबाकी न भरल्याने महापालिकेची कारवाई

पुणे : महापालिकेच्या मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाने हडपसर बंटर स्कुल येथील 36 गाळे ताब्यात घेतले आहेत. संबंधित गाळा धारकांनी गेल्या कित्येक वर्षांपासून थकबाकी भरलेली नव्हती. त्यामुळे विभागाने ही कारवाई केली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिका प्रशासनाकडून शहरात अतिक्रमण कारवाई जोरदार पणे सुरु आहे. सोबतच आता मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाकडून देखील कारवाई करण्यात येत आहे. विभागाकडून नियमांचे पालन न करणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे. विभागाने महापालिका मिळकत वाटप नियमावली नुसार जागा आणि गाळे भाडे तत्वावर दिले आहेत. मात्र याचे नाममात्र भाडे असताना देखील संबंधित गाळे धारक महापालिकेचे शुल्क अदा करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे विभागाकडून या लोकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. तरीही या लोकांनी थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
हडपसर बंटर स्कुल परिसरातील 36 गाळे धारकांनी गेल्या कित्येक वर्षांपासून थकबाकी भरलेली नाही. 25 लाखाच्या आसपास ही थकबाकी होती. त्यामुळे मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने शुक्रवारी हे गाळे ताब्यात घेतले. अशी माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली.

shops : hotel : शहरात दुकाने ११ तर हॉटेल १२ वाजेपर्यंत सुरु राहणार 

Categories
PMC पुणे

शहरात दुकाने ११ तर हॉटेल १२ वाजेपर्यंत सुरु राहणार

: महापलिका आयुक्तांचे आदेश जारी

पुणे : शहरातील कोरोनाचा कहर कमी होताना दिसतो आहे. शहराप्रमाणे राज्यातही हे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच एक भाग म्हणून आता व्यापारी दुकाने आणि हॉटेल, फूड कोर्ट यांची वेळ वाढवण्यात आली आहे. पुणे शहरात आता दुकाने ११ वाजेपर्यंत तर हॉटेल १२ वाजेपर्यंत उघडी राहतील. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

:  निर्बंध शिथिल

शहरात कोरोनाचा कहर सुरु असल्याने महापलिका प्रशासनाने बऱ्याच गोष्टीवर निर्बंध लादले होते. त्याचा सर्वात जास्त फटका व्यापारी दुकाने आणि हॉटेलला बसला होता. व्यापाऱ्या कडून हे निर्बंध शिथिल करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. मात्र हे निर्बंध हटवण्यात आले नव्हते. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे निर्बंध हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता महापालिका आयुक्तांनी देखील याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता दुकाने ११ वाजेपर्यंत तर हॉटेल १२ वाजेपर्यंत उघडी राहतील. त्याचप्रमाणे अमुझमेंट पार्क, इंडस्ट्रीज देखील २२ पासून सुरु करण्यात येतील. यामुळे सर्वाना दिलासा मिळाला आहे.