PMC Pune Recruitment Update | पुणे महापालिकेत दुसऱ्या टप्प्यातील भरती देखील लवकरच! | महापालिका प्रशासनाने सुरु केली पूर्वतयारी

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

पुणे महापालिकेत दुसऱ्या टप्प्यातील भरती देखील लवकरच!

| महापालिका प्रशासनाने सुरु केली पूर्वतयारी

पुणे : महापालिकेत पदभरती करण्यावर राज्य सरकार कडून निर्बंध लागू करण्यात आले होते. वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने 2 जून 2015 पासून हे निर्बंध लागू केले होते.  त्यामुळे महापालिकेतील विभिन्न विभागातील भरती प्रक्रिया रखडली होती. त्याचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर जाणवत होता. मात्र सरकारने आता हे निर्बंध हटवले आहेत. नुकतेच सरकारने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे महापालिकेत पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाने भरती प्रक्रिया सुरु केली होती. पहिल्या टप्प्यातील भरतीची परीक्षा लवकरच होणार आहे. सोबतच प्रशासनाने आता दुसऱ्या टप्प्यातील भरतीची देखील पूर्व तयारी सुरु केली आहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागाकडून रिक्त पदांची माहिती मागवली आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासन यांनी महानगरपालिका आस्थापनेवरील विविध पदे सरळसेवेने भरण्यास मान्यता दिलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेने पदभरती करणेसाठी संवर्गनिहाय बिंदुनामावली नोंदवह्या तपासून घेणे गरजेचे आहे . तसेच पुणे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांना कुठल्या पदांची आवश्यकता आहे त्याची माहिती घेऊन सरळसेवेने भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या विवध विभागांनी महाराष्ट्र शासन यांनी मान्यता दिलेल्या आकृतीबंधानुसार आपले विभागासाठी संवर्गनिहाय सरळसेवेने भरती करावयाच्या पदांबाबत पुढीलप्रमाणे विहित नमुन्यात माहिती asthapanainfo@gmail.com या इमेलवर सॉफ्ट कॉपी (Excel File Font – Arial ms Unicode font Size – 12 मध्ये ) तसेच उप आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडे हार्ड कॉपीमध्ये या कार्यालयीन परिपत्रकाच्या दिनांकापासून त्वरित सादर करावी. आदेशात पुढे म्हटले आहे कि, आकृतीबंधानुसार सरळ सेवेने भरावयाच्या पदांची नावे, आकृतीबंधानुसार पदांची संख्या, आकृतीबंधानुसार कार्यरत पदसंख्या, रिक्त पदसंख्या आणि रिक्त पदाबाबत प्राधान्य, अशी माहिती सादर करावे, असे देखील सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.

राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. पूर्वतयारी म्हणून दुसऱ्या टप्प्यात भरती करण्यासाठी आम्ही विविध खात्याकडून रिक्त पदांची माहिती मागवली आहे.

सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पुणे मनपा.