Additional Commissioner | PMC Pune | महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी कुणाची वर्णी लागणार? 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी कुणाची वर्णी लागणार?

| महापालिका राज्य सरकारकडे पाठवणार प्रस्ताव

पुणे | महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. या पदावर महापालिकेचा अधिकारी पदोन्नतीच्या माध्यमातून येणार आहे. यासाठी 5 ते 6 नावे चर्चेत आहेत. यामध्ये नगर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, पीएमआरडीए कडे प्रतिनियुक्ती वर गेलेले विवेक खरवडकर आणि विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांचा समावेश आहे. यामधून कुणीतरी एक निवडला जाणार आहे, जो निर्णय राज्य सरकार घेणार आहे. मात्र प्रशासकीय सूत्रानुसार मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर आणि कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांच्यात रस्सीखेच बघायला मिळणार आहे. दरम्यान अतिरिक्त आयुक्त पदासाठी इच्छुक नावाची यादी महापालिका लवकरच राज्य सरकारला पाठवणार आहे.
राज्य सरकारने महापालिकेत एक अतिरिक्त आयुक्त पद हे महापालिका अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवले आहे. त्याबाबतचा निर्णय देखील घेण्यात आला होता. त्यानुसार पहिले अतिरिक्त आयुक्त होण्याचा मान सुरेश जगताप यांना मिळाला होता. त्यानंतर ज्ञानेश्वर मोळक, विलास कानडे यांना संधी मिळाली होती. कानडे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. त्यानुसार महापालिका अधिनियम, सेवानियमावली आणि सेवा ज्येष्ठतेनुसार हे पद नियुक्त केले जाणार आहे. यासाठी बरेच जण पात्र ठरत आहेत. त्यानुसार राज्य सरकारला महापालिकेकडून 5 लोकांच्या नावांची यादी पाठवायची आहे. सामान्य प्रशासन विभागाची ही यादी अंतिम देखील झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून हा प्रस्ताव आयुक्ताकडे पाठवला जाईल. त्यानंतर तो सरकारला पाठवला जाईल.
सामान्य प्रशासन विभागाने तयार केलेल्या यादीनुसार यामध्ये नगर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, पीएमआरडीए कडे प्रतिनियुक्ती वर गेलेले विवेक खरवडकर यांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. यावर महापालिका आयुक्तच निर्णय घेणार आहेत.
खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नगर अभियंता या पदासाठी पहिल्यापासूनच इच्छुक नाहीत. त्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार उल्का कळसकर पात्र होतात. एक महिला अधिकारी अतिरिक्त आयुक्त झाली तर पुण्यासाठी ते महत्वाचे मानले जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याखालोखाल दौंडकर, बोनाला आणि खरवडकर यांची नावे येतात. त्यामुळे कळसकर या पदासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
मात्र दुसरीकडे महापालिका अधिनियम कलम 45 मधील तरतुदीनुसार काही नावे यातून अपात्र होऊ शकतात. त्यामुळे इथे शिवाजी दौंडकर यांचीही वर्णी लागू शकते. तसेच तांत्रिक विभागाकडून विद्युत विभागाचे श्रीनिवास कंदूल देखील जोरदार फिल्डिंग लावून आहेत.
तर इकडे महापालिका आयुक्तांच्या मनात दुसरेच काहीतरी घोळते आहे. महापालिका आयुक्तांना असे वाटते कि काही काळासाठी या पदावर महापालिकेचा अधिकारी देण्यापेक्षा सरकारचाच अधिकारी द्यावा. मात्र नियमानुसार तसे करता येत नाही. तरीही आयुक्तांची ही मनीषा कशी फलद्रुप होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काहीही असले तरी याचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे. त्यामुळे सरकार दरबारी जो जास्त ‘वजन’ लावणार आहे. त्याची वर्णी लागणार, हे मात्र नक्की आहे. तसा प्रयत्न कोण करणार, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.