Information and Technology Department | अखेर राहुल जगताप यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान विभागाचा पदभार  | आता वेतन आयोग संबंधित सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लागण्याची शक्यता

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

अखेर राहुल जगताप यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान विभागाचा पदभार

| आता वेतन आयोग संबंधित सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लागण्याची शक्यता

पुणे | गेल्या काही दिवसापासून महापालिकेचा माहिती आणि तंत्रज्ञान विभाग चांगलाच टीकेचा धनी झाला होता. कारण विभागाशी संबंधित कामे अपूर्ण राहत होती. खासकरून वेतन आयोग आणि फरकाच्या रकमेबाबत विभागाची खूप आलोचना झाली होती. चर्चा अशी होती कि राहुल जगताप यांचा पदभार काढल्याने कामकाजात फरक पडला आहे. अखेर महापालिका आयुक्तांना याकडे लक्ष द्यावे लागले. महापालिका आयुक्तांनी उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडील पदभार संपुष्टात आणून विभागाचे कामकाज राहुल जगताप यांच्याकडे सोपवले आहे.
राज्य सरकारकडून प्रतिनियुक्ती वर आलेल्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा पदभार सोपवण्यात आला होता. मात्र यामुळे वर्षानुवर्षे याच पदावर कामकाज करणारे सिस्टीम मॅनेजर राहुल जगताप हे नाराज असल्याचे मानले जात होते. त्यामुळे विभागाच्या कामकाजावर परिणाम झालेला दिसून आला. कारण सर्व तांत्रिक कामाबाबत प्रतिभा पाटील या जगताप यांच्यावर अवलंबून होत्या. तरीही कामकाजात गती येत नव्हती. महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगातील फरकाच्या रकमेबाबत खूप वेळ लागत असल्याने हा विभाग चांगलाच प्रकाशात आला होता. कारण गेल्या चार महिन्यापासून फरकाची रक्कम मिळालेली नव्हती. याला विभागातील अंतर्गत राजकारण कारणीभूत मानले जात होते. अखेर यात महापालिका आयुक्तांना गंभीरपणे लक्ष द्यावे लागले. महापालिका आयुक्तांनी आयुक्तांनी उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडील पदभार संपुष्टात आणून विभागाचे कामकाज राहुल जगताप यांच्याकडे सोपवले आहे. यामुळे आता विभागाच्या कामकाजात गती येईल, असे मानले जात आहे. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन आयोग संबंधित सर्व प्रश्न सुटतील आणि त्यांना वेळेवर रक्कम मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.