Canal Advisory Committee : यंदा उन्हाळ्यात पाणी कपात नाही  : पुणे शहराला मिळणार मुबलक पाणी 

Categories
Breaking News PMC पुणे

यंदा उन्हाळ्यात पाणी कपात नाही

: पुणे शहराला मिळणार मुबलक पाणी

पुणे : शहरामध्ये उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यात(Water supply) कोणतीही कपात करण्यात येणार नाही. शिवाय, जिल्ह्यातील सिंचनासाठी दोन उन्हाळी आवर्तने देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, खडकवासला प्रकल्पात सध्या उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या. उन्हाळी पिकांसाठी आवर्तन आणि शहरातील पाण्यासंदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवारी पार पडली.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार राहूल कूल, अशोक पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता विजय पाटील आदी या वेळी उपस्थित होते. खडकवासला प्रकल्पामधून इंदापूर, दौंड, बारामती आणि हवेली तालुक्यातील सिंचनासोबत काही गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू आहे. परंतु उन्हाळी हंगामासाठी प्रकल्पामधील पाणीसाठ्याच्या उपलब्धतेनुसार नियोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाच्या उन्हाळ्यात सिंचनासाठी दोन आवर्तने सोडण्यात येणार असून, त्यासाठी जलसंपदा विभागाने योग्य नियोजन करावे, अशा सूचना पवार यांनी दिल्या.भामा आसखेड धरणामधून जेवढे पाणी घेतले जात आहे, तेवढे पाणी खडकवासला प्रकल्पामधून कमी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत कामे प्रगतीपथावर आहेत. कामे होतील त्यानुसार खडकवासलामधून पाणी कमी करू, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

 

तर, यंदा धरणात पाणी कमी असल्यामुळे महापालिकेने पाणी काटकसरीने वापरावे, असा मुद्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत मांडला. आळंदीला दोनशे दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणी देण्याबाबत चर्चा झाली. मात्र, महापालिकेने स्वतंत्रपणे हे पाणी द्यावे, असा नियम नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र पाणीकोटा मंजूर करावा, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.

खडकवासला प्रकल्पातून शेतीला आवर्तने देताना शहराची पाण्याची गरज पूर्ण व्हावी, ही आमची भूमिका होती. त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले, याचे समाधान आहे. शहरात नवीन समाविष्ट २३ गावे आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुरेसे पाणी मिळणे आवश्यकच होते. पाणीगळती रोखण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. शिवाय २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरु असून, लवकरच पूर्ण करणार आहोत.

         – मुरलीधर मोहोळ, महापौर

Mhada : Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 सदनिकांची ऑनलाईन लॉटरी सोडत संपन्न

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 सदनिकांची ऑनलाईन लॉटरी सोडत संपन्न

सर्वांसाठी घरं हा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकार प्राधान्याने राबविणार;

म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई :- प्रत्येकाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे. पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ नवीन सदनिकांची सोडत त्याच धोरणाच्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल आहे. सर्वांसाठी घरं हा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकार प्राधान्याने राबविणार असून म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

पुणे येथील जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 नवीन सदनिकांची ऑनलाईन लॉटरी सोडतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई येथील देवगिरी शासकीय निवासस्थानातील कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील व्हीसीद्वारे उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी अधिकारी नितीन माने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सामान्य माणसाला घर आणि बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारनं अनेक मोठे निर्णय घेतले. त्याचे चांगले परिणाम आता दिसायला लागले आहेत. कोरोना संकटकाळात मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा महत्वाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यामुळे बांधकाम क्षेत्राला उर्जितावस्था मिळाली. राज्यातल्या सर्वांना हक्काचं घर मिळावे यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी घरं’ कार्यक्रमांतर्गत सर्वांना हक्काचं घरं देण्याचा प्रयत्न आहे. कारोनामुक्तीसाठी लसीकरण हेच मोठे सुरक्षा कवच आहे. त्यामुळं सर्वांनी लसीकरण करुन घ्यावं, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

या लॉटरीच्या निमित्ताने ज्यांना हक्काची घरे मिळणार आहेत, त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. इतरांनी निराश न होता, म्हाडाच्या पुढच्या सोडतीत भाग घेण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने यांनी केले.

MHADA : Pune : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्या ‘म्हाडा’च्या 4 हजार 222 घरांसाठी सोडत

Categories
Breaking News social पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्या ‘म्हाडा’च्या 4 हजार 222 घरांसाठी सोडत

पुणे : पुणे म्हाडाच्या वतीने तब्बल 4 हजार 222 घरांसाठी सोडत जाहीर केली असून, यासाठी तब्बल 65 हजार 180 लोकांनी अर्ज केले आहेत. यापैकी नक्की कोणाला घरांची लाॅटरी लागणार हे शुक्रवार (दि.7) रोजी स्पष्ट होणारा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या घरांच्या सोडतीचा जाहीर कार्यक्रम रद्द केला असून,  उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार मुंबईत मंत्रालयातून आपल्या कार्यालयातून ऑनलाईन पध्दतीनेच ही सोडत जाहीर करणार असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.

गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळेच शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळेच पुणे म्हाडाच्या साडेचार हजार घरांची लाॅटरी ऑनलाईन काढण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकटात समाजातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीने दीड वर्षांत हजारो घरांची तीन वेळा सोडत जाहीर करत नवीन विक्रम केला. म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी पुढाकार घेऊन खाजगी व मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून 20 टक्क्यांतील फ्लॅट उपलब्ध करून घेतले. यामुळे शहरातील नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पांमध्ये देखील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील लोकांना घरे मिळू लागली आहेत.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) पुणे अंतर्गत ८ वी ऑनलाईन सोडत असून, म्हाडाच्या विविध योजनतील २८२३ सदनिका व २०% सर्वसमावेशक योजनअंतर्गत १३९९ सदनिका असे एकूण ४२२२ नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदनीचा शुभारंभाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर सोडतीमधील ४२२२ सदनिकांसाठी आतापर्यंत 65 हजार 180  इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हाडा’च्या सोडतीकडे लोकांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत घराची लाॅटरी लागलेल्या लोकांना अधिकृत एसएमएस पाठवून माहिती देण्यात येणार आहे.

Pune : School Closed : Ajit Pawar : पुणे शहर आणि जिल्ह्यात १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद! : नववी आणि दहावीचे वर्ग सुरु राहतील 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे महाराष्ट्र

पुणे शहर आणि जिल्ह्यात १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद!

: नववी आणि दहावीचे वर्ग सुरु राहतील

: पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे जिल्ह्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात आता मास्क नसेल तर पाचशे रुपयांचा दंड होणार आहे. तसेच पालकमंत्र्यांनी शाळांसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय की, सध्या पुणे जिल्ह्यात 74 टक्के सेंकड डोस घेतलेला आहे. माझी पुणेकरांना विनंती आहे की टोकाचं पाऊल उचलायला लावू नका. आज काही निर्णय घेतोय. उर्वरित लोकांनी डोस घेतलाच पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पुढे त्यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर करत म्हटलंय की, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा आणि कोर्पोरेशनबाबत पहिली ते आठवी पर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून नववी-दहावीचे वर्ग चालू राहिल. मात्र, पहिली ते आठवीचे यांचं ऑनलाईन शाळा कामकाज सुरु राहिल. नववी-दहावीचे विद्यार्थी आले पाहिजेत कारण त्यांना लस द्यायची आहे. डी जी भार्गव यांनी देखील सांगितलं की, ही जर परिस्थिती 10 टक्के पॉझिटीव्हीटीची तर तुम्ही निर्णय घ्या. पुणे शहरामध्ये पॉझिटीव्हीटीचा दर 18 टक्क्यापर्यंत गेला आहे. या परिस्थितीतच काळजी करण्याचं कारण बनतं. म्हणूनच काळजीपोटी हे निर्णय घेण्यात येत आहे. पुढील तीस ते पंचेचाळीस दिवसांमध्ये रुग्णसंख्येचा स्फोट होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण सध्या 105 देशांत आणि भारतातील 23 राज्यांमध्ये तर महाराष्ट्रात 11 ठिकाणी सापडले आहेत.

अजित पवार यांनी पुणेकरांना इशारा देत म्हटलंय की, पुणेकरांनी लशीचा दुसरा डोस न घेतल्यास इथून पुढेही कठोर निर्णय घेऊ. इतर देशात एकदम पॉझिटीव्हीटीचा दर वाढलेला दिसून आला आहे. म्हणून आपण 30 जानेवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. चार टक्के लसीकरण काल पूर्ण केलंय मुलांचं. चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुण्यात आज 1 हजार 104 कोरोनाचे रुग्ण आहेत. सर्व नागरिकांनी थ्री फ्लायर डबल असा चांगला मास्क वापरावा.

पुण्यात असे असतील निर्बंध

  • मास्क नसेल तर 500 रुपये दंड
  • मास्क नसताना थुंकला तर 1000 रुपये दंड
  • लसीचे दोन डोस घेतलेले नसतील तर कुठेही प्रवेश मिळणार नाही. हॉटेल असो वा शासकीय कार्यालय असो, कुठेही प्रवेश मिळणार नाही.

Omicron Varient: Ajit Pawar : अजित पवार म्हणाले; येत्या दोन महिने खूप काळजी घ्यावी लागणार

Categories
Breaking News आरोग्य पुणे महाराष्ट्र

आगामी दोन महिन्यात खूप काळजी घ्यावी लागणार’

: उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे -राज्यात करोना बाधितांची संख्या वाढत आहे. मात्र, लोकांना याचे गांभीर्य नाही. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारी महिन्यात खूप काळजी घ्यावी लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आम्हालाही निर्बंध लावायला चांगले वाटत नाही. त्यामुळे सर्वांनीच नियमांचे पालन करावे, असे आवाहन पवार यांनी केले.

पवार यांनी सांगितले की, वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना बूस्टर डोस दिला पाहीजे, असाही निर्णय झाला आहे. 18 वर्षांपासून सर्वांनी दोन्ही डोस घेतले पाहिजे. जिल्ह्यात 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस झाला आहे. मात्र, दुसरा डोस घेण्यासाठी लोक पुढे येत नाहीत.

 

यात राजकारण न आणता काम केले पाहिजे. हे सर्व जनतेच्या सहभागाशिवाय होणार नाही. यावेळी पवार म्हणाले की, मी सभागृहात आल्यापासून ते जाईपर्यंत मास्क लावलेला असतो. बोलताना काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहे. आपणच नियम पाळत नसू तर लोकांना सांगायचा अधिकार नाही.

नवीन वर्षाचं स्वागत घरातच करा…


नवीन वर्षाचे स्वागत बाहेर न करता घरातच करा. आम्हालाही बंधन घालायला बर वाटत नाही. आत्ता कुठे परिस्थिती सुधारत होती. पण, परत नवी समस्या निर्माण झाली. काही राज्यांनी रात्रीचं लॉकडाऊन लावले आहे. काहींनी तर निवडणूक पुढे ढकल्या असल्याचे पवार यांनी सांगितले.

Pune Mhada : Ajit Pawar: म्हाडाच्या 4.5 हजार घरांसाठी 65 हजार अर्ज : अजित पवारांच्या हस्ते सोडत

Categories
Breaking News पुणे

म्हाडाच्या 4.5 हजार घरांसाठी 65 हजार अर्ज

: अजित पवारांच्या हस्ते  सोडत

पुणे : म्हाडाच्या  वतीने तब्बल 4 हजार 222 घरांसाठी सोडत जाहीर केली असून, यासाठी तब्बल 64 हजार 715 लोकांनी अर्ज केले आहेत. या लोकांना आता 7 जानेवारीपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या इमारत येथे हा सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.

कोरोनाच्या संकटात समाजातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीने दीड वर्षांत हजारो घरांची तीन वेळा सोडत जाहीर करत नवीन विक्रम केला. म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी पुढाकार घेऊन खाजगी व मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून 20 टक्क्यांतील फ्लॅट उपलब्ध करून घेतले. यामुळे शहरातील नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पांमध्ये देखील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील लोकांना घरे मिळू लागली आहेत.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) पुणे अंतर्गत ८ वी ऑनलाईन सोडत असून,  म्हाडाच्या विविध योजनतील २८२३ सदनिका व २०% सर्वसमावेशक योजनअंतर्गत १३९९ सदनिका असे एकूण ४२२२ नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदनिचा शुभारंभाचा कार्यक्रम  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर सोडतीमधील ४२२२ सदनिकांसाठी  आतापर्यंत 64 हजार 715  इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत.  ही सोडत यापूर्वी ठरल्या प्रमाणेच 7 जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे.

Rupali Patil : NCP : रुपाली पाटील यांचा अधिकृतपणे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश  : अजित पवार, जयंत पाटील यांची उपस्थिती 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

रुपाली पाटील यांचा अधिकृतपणे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश

: अजित पवार, जयंत पाटील यांची उपस्थिती

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडल्यानंतर रुपाली पाटील  (Rupali Patil Thombre) यांनी गुरुवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. पुण्यातील मनसेच्या धडाडीच्या महिला कार्यकर्त्या म्हणून रुपाली पाटील यांची ओळख होती. त्या मनसेच्या पुणे शहराच्या महिला सेनेच्या उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक राहिल्या आहेत.

पुणे महापालिकेच्या  (PMC) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पण मनसेच्या पुण्यातील नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण मनसे सोडत असल्याचं रुपाली पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. पण आपण कोणत्या पक्षात प्रवेश करु हे त्यांनी उघड केलं नव्हतं. पण आज त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Deepak Dalvi : Ajit Pawar : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावरील भ्याड शाई हल्ला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तीव्र निषेध

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावरील भ्याड शाई हल्ल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तीव्र निषेध

: संपूर्ण महाराष्ट्र दळवींच्या मागे खंबीरपणे उभा:मराठी भाषकांचा आवाज कदापी दबणार नाही

 : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई:- महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर बेळगाव येथे झालेला भ्याड शाई हल्ला अत्यंत निंदनीय असून त्याचा तीव्र निषेध करतो. दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला हा संपूर्ण मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वक, सुनियोजित केलेला हल्ला आहे. या संतापजनक घटनेमुळे मराठी भाषक चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही, उलट मराठीभाषक चळवळ आणखी जोमाने उसळी घेऊन पुढे जाईल. या घटनेमुळे मराठीभाषक एकदिलाने एकत्र येत लढा आणखी मजबूत करतील. एकीकरण समितीचे नेते दीपक दळवींसह मराठीभाषक चळवळीच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असे ठणकावून सांगत मराठीचा आवाज कदापी दबणार नाही, असा ठाम विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा निषेध केला, ते आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात, सीमाागातील मराठीभाषकांचा हक्क जपणे, त्यांच्या अस्मितेचे संरक्षण करणे, सीमाागातील मराठी बांधव सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने लढत आहेत, त्यांच्या पाठीशी राहणे, हे आमचे कर्तव्य आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या कोणत्याही मराठी सैनिकावर झालेला हल्ला खपवून घेतला जाणार नाही. मराठीभाषक चळवळीला धक्का देण्यासाठी हे भ्याड कृत्य सुनियोजित पध्दतीने करण्यात आले असावे. मात्र, अशा घटनांमुळे मराठीभाषक आंदोलनावर, चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. लढणं हे मराठी भाषकांच्या रक्तात आहे, त्यामुळे मराठी भाषकांना जेवढं दाबण्याचा प्रयत्न होईल, तेवढी मराठी भाषकांची चळवळ आणखी उसळी घेईल. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या मराठी सैनिकाच्यामागे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस, महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Vaccination : Ajit pawar : लसीकरण वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा : अजित पवार यांचे आवाहन 

Categories
Political आरोग्य पुणे महाराष्ट्र

लसीकरण वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

: अजित पवार यांचे आवाहन

पुणे – जिल्ह्यात कोविड लसीकरणाच्या १०० टक्के पहिल्या मात्रा देण्यात आल्या असून दुसरी मात्रादेखील पात्र नागरिकांनी घ्यावी यासाठी जनजागृती करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नागरिकांना लस घेण्याबाबत प्रोत्साहीत करण्यासाठी कमी लसीकरण झालेल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

विधान भवन येथे आयोजित पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. या विषाणूपासून संरक्षणासाठी नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत गेल्या आठवड्यात लशीची दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या वाढली असून त्यात सातत्य राहील असा प्रयत्न करावा. विशेषत: कमी लसीकरण झालेल्या तालुक्यांवर लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. महाराष्ट्रात ओमीक्रॉनचा बाधित १० रुग्ण असून त्यापैकी ७ पुणे जिल्ह्यात आहे. हे सर्व रुग्ण लक्षणे विरहीत अथवा कमी लक्षणे असणारे आहेत. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. मागील १० दिवसात ८ लक्ष लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी पहिली मात्रा ३३ टक्के तर ६७ टक्के दुसरी मात्रा देण्यात आली आहे. जिल्ह्याने लसीकरणात १ कोटी ३८ लाखाचा टप्पा पार केला असून जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या १९ हजार १७४ व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार त्याबाबत कार्यवाही सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते कोविड-१९ काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जोग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अशोक नांदापुरकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी धनंजय घाटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बैठकीस दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, संग्राम थोपटे, भिमराव तापकीर, राहूल कूल, माधुरी मिसाळ, संजय जगताप, सुनील शेळके, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे महानगर विकास प्राधिकारणाचे सुहास दिवसे, यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

Torana Fort : Ajit Pawar : तोरणा गडावर विद्युतीकरण : अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

Categories
cultural पुणे महाराष्ट्र

तोरणा गडावरील विद्युतीकरणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

 

 पुणे.: जिल्ह्यात उंच असलेल्या वेल्हे तालुक्यातील तोरणा गडावर महावितरणकडून करण्यात आलेल्या विद्युतीकरणाचे उदघाटन  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. वेल्हे, भोर व मुळशी तालुक्यातील वाड्यावस्त्यांच्या विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीमधून ६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री  पवार यांनी यावेळी जाहीर केले.

            कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष  रणजीत शिवतरे,  महावितरणचे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता  राजेंद्र पवार आदी उपस्थित  होते.

            वेल्हे तालुक्यामध्ये समुद्रसपाटीपासून तब्बल १४०३ मीटर उंचीवर असलेला तोरणा गड सह्याद्री पर्वतरांगेमधील महत्वाचा गड आहे. अतिदुर्गम व प्रचंड विस्तार असलेल्या तोरणा गडाचे विद्युतीकरण करण्यासाठी  जिल्हा नियोजन व विकास समितीकडून २७ लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. महावितरणकडून तोरणा गडाच्या विद्युतीकरणासाठी अत्यंत आव्हानात्मक व खडतर कामाला सुरवात करण्यात आली. यामध्ये उच्चदाबाच्या ११ केव्ही वाहिनीसाठी २७ वीजखांब तसेच लघुदाब वाहिनीसाठी २० खांब उभारण्यात आले. यासोबतच १८०० मीटर लांबीची भूमिगत वीजवाहिनी दऱ्याखोऱ्यातून टाकण्यात आली आहे. तसेच १०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र उभारून विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. घाटमार्गाने, डोंगरदऱ्यातून ही वीजयंत्रणा उभारण्यासाठी कर्मचाऱ्यांना खांद्यावर वीजखांब व इतर साहित्याची वाहतूक करावी लागली. या विद्युतीकरणामुळे तोरणा गडावर येणाऱ्या पर्यटक व शिवभक्तांची सोय झाली असून पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे.

            तोरणा गडाच्या विद्युतीकरणासाठी अतिदुर्गम परिसर व दऱ्याडोंगरात वीजयंत्रणा उभारण्यासाठी मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता  माणिक राठोड, उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटुळे आदींसह अभियंता व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

            कार्यक्रमाला जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य  प्रवीण शिंदे, वेल्हे पंचायत समितीचे सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, पंचायत समिती सदस्य संगिता जेधे, वेल्हेचे सरपंच  संदीप नगिने उपस्थित होते.