Stamp Duty | म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

Categories
Breaking News PMC Political पुणे

Stamp Duty | म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

| भाजपचे माजी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

Stamp Duty | महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) वसाहतींच्या पुनर्वसनासाठी ज्या वर्षी सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडी रेकनर (Ready Reckoner) नुसार स्टॅम्प ड्युटी (Stamp Duty) आकरावी आणि आतापर्यंतचा दंड माफ करावा या मागणीला आज राज्य मंत्रिमंडळामध्ये मान्यता देण्यात आली.
अशा प्रकारची अभय योजना जाहीर करावी अशी मागणी भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) आणि माझी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून सरकारने ही मागणी आज मान्य केली. त्यासाठी उभयतांनी जुलै महिन्यात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)  यांची भेट घेतली होती.
या निर्णयाचा पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) क्षेत्रातील विविध वसाहतीत म्हाडाच्या ४० हजारांहून अधिक जुन्या सदनिकाधारकांना फायदा होणार आहे. या सदनिका जीर्ण झाल्या असून मोडकळीस आल्या आहेत. राज्य सरकारने या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी तीन एफएसआय जाहीर केला आहे. पुनर्विकास करताना अधिहस्तांतरण करणे आवश्यक आहे. महसूल विभागाकडून पूर्वी स्टॅम्प ड्युटी आकारली जात नव्हती. त्यावेळी काही रहिवाशांनी सदनिका हस्तांतरित केल्या. आता जुन्या स्टॅम्प ड्युटीसह दंडाची वसूल आकारली जात होती. या वसाहतीतील नागरिकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना वाढीव स्टॅम्प ड्युटी आणि दंडाची रक्कम भरता येणे शक्य नव्हते. अधी हस्तांतरण झाले नसल्याने वसाहतीचा पुनर्विकास रखडला होता. विशेषता सर्वे क्रमांक 191 येरवडा येथे 22 हेक्टर जागेवर म्हाडाच्या मोठ्या वसाहतीतील सदनिका धारकांना या निर्णयाचा फायदा होईल, आम्ही सरकारचे अभिनंदन करतो, असे मुळीक आणि धेंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Pune MHADA Lottery | म्हाडातर्फे ५ हजार ८६३ सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात | २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Pune MHADA Lottery | म्हाडातर्फे ५ हजार ८६३ सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

| २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार

Pune MHADA Lottery | महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाच्या  (म्हाडा) (MHADA) पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर व सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५ हजार ८६३ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला असून २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. (Pune MHADA Lottery)
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते मंगळवारी (दि.५) म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात हा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री. जयस्वाल यांनी सांगितले की नूतन एकात्मिक गृहनिर्माण लॉटरी व्यवस्थापन संगणकीय प्रणालीद्वारे पुणे मंडळ सदनिका विक्री करिता सोडतीची प्रक्रिया राबवली जात असून सोडत काढल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्काळ ऑनलाईन प्रथम सूचना पत्र, स्वीकृती पत्र व तात्पुरते देकार पत्र पाठवण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील म्हणाले, म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर व सांगली शहरातील ५ हजार ८६३ सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ सप्टेंबर असून घरांची सोडत १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तसेच ज्या आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत आहे त्याचे प्रमाणपत्र असे पुरावे ऑनलाईन सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अर्जाची छाननी देखील ऑनलाईन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय मंडळातर्फे नागरिकांकरीता खुला राहणार आहे. नोंदणी केलेल्या अर्जदारांना २७ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. ऑनलाईन अनामत रक्कमेची स्वीकृती २८ सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे. २९ सप्टेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस, एनइएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे.
सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीवरील अर्जदारांना ऑनलाईन दावे, हरकती १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
सोडतीत पुणे जिल्ह्यासाठी ५ हजार ४२५ सदनिका, सोलापूर जिल्ह्यासाठी ६९ सदनिका, सांगली जिल्ह्यासाठी ३२ सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील  ३३७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ४३१ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २ हजार ५८४ सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत २ हजार ४४५ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली आहे.
——-
News Title | Pune MHADA Lottery | MHADA has started online application registration for 5 thousand 863 flats| Applications can be registered till 26 September

MHADA | म्हाडानेच घ्यावे हवाई दल आणि पर्यावरण ‘ना हरकत’ प्रमाणपत्र!

Categories
Breaking News PMC पुणे

म्हाडानेच घ्यावे हवाई दल आणि पर्यावरण ‘ना हरकत’ प्रमाणपत्र!

| येरवडा, गाळेधारक पदाधिकाऱ्यांची आणि  डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

येरवड्यातील नागपूर चाळ येथील म्हाडाच्या इमारतींची पुनर्विकास प्रक्रिया जलद होण्यासाठी आवश्यक असलेले हवाई दल आणि पर्यावरण खात्याचे ‘ना हरकत’ पत्र गृहरचनासंस्थे ऐवजी म्हाडाने स्वतः मिळवावे, अशी आग्रही मागणी आज म्हाडाच्या गाळेधारकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. जीर्ण आणि धोकादायक इमारतीत आणखी किती वर्ष राहायचे, असा उद्विग्न सवालही यावेळी गाळेधारकांनी उपस्थित केला.
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली गाळेधारकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन बैठकीत चर्चा केली. यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल माने, समता नगर गाळेधारक महासंघाचे शिवाजी ठोंबरे, संयुक्त महासंघाचे देवी दिघे, राजकुमार जाधव, भाजपचे मंगेश गोळे आदी उपस्थित होते.

हवाई दल, पुणे महानगरपालिका, म्हाडा आणि राज्य शासन यांच्यात समन्वय नसल्यामुळे आणि वारंवार धोरण बदलत असल्यामुळे म्हाडाच्या 127 जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. हवाई दलाने नागपूर चाळ सर्वे नंबर 191 अ परिसरात 2016 साली बांधकामावर निर्बंध लादले आहेत. परंतु हे निर्बंध नेमके काय आहेत, यात अद्याप स्पष्टता नाही.
इमारतींच्या पुनर्विकासाठी हवाई दलाचे आणि पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र पुणे महानगरपालिका प्रत्येक सोसायटीकडे  स्वतंत्र मागते. ते देणे व्यवहारी नाही. त्यामुळे हे पत्र देण्याची जबाबदारी म्हाडाने घ्यावी, असा मुद्दा माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पालकमंत्र्यांकडे मांडला.

म्हाडाच्या जुन्या इमारतीतील गाळेधारक अद्यापही भाडेकरूच आहेत. त्यामुळे गाळेधारकांना म्हाडाने मालकी हक्क करून द्यावा, अशी मागणी बैठकीत झाल्यानंतर पालकमंत्र्यांनीही तशी सूचना म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिली.

समता नगर गाळेधारक महासंघाचे शिवाजी ठोंबरे म्हणाले, म्हाडाच्या इमारती जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. त्यामध्ये गाळेधारक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. सरकार बदलले की धोरण बदलते हे थांबले पाहिजे. सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास विषय मार्गी लागेल.
—————––————

म्हाडाच्या अल्प, मध्यम, आणि उच्च उत्पन्न गटातील गाळे धारकांना इमारतींच्या पुनर्विकासात समान न्याय मिळावा. पुनर्विकासासाठी म्हाडाने संपूर्ण परिसराचा एकत्रित आराखडा तयार करून नियोजन केल्यास हवाई दल आणि पर्यावरण विभागाच्या एकाच ना हरकत पत्रात काम होईल

 

डॉ. सिद्धार्थ धेंडे ( माजी उपमहापौर)
——————

म्हाडाच्या जुन्या इमारतीतील गाळेधारक हे भाडेकरू ऐवजी जमिनीचे मालक कसे होतील, याबाबत कार्यवाही करायच्या सूचना म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच बांधकाम बाबतच्या निर्बंधाबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी हवाई दलाला विचारणा केली आहे.

– चंद्रकांत पाटील (पालकमंत्री)
——–————

MHADA | पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या ३१२० सदनिकांची सोडत

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

‘म्हाडा’ने घरांच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

| पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या ३१२० सदनिकांची सोडत

प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. त्यानुसार ‘म्हाडा’ने घरांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे मंडळातर्फे म्हाडा गृहनिर्माण योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेतील ३ हजार १२० सदनिकांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने – पाटील, ओव्हरसाइट समिती अध्यक्ष एम. एम. पोतदार, उपायुक्त दीपक नलावडे, समिती सदस्य धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की अन्न, वस्त्र याबरोबरच निवारा आवश्यक आहे. रोजगारासाठी शहरी भागात नागरिक येतात. त्यांना माफक आणि परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देताना किमान सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी म्हाडाने आपल्या प्रकल्पांना गती द्यावी. तसेच बांधकामाची गुणवत्ता राहील याची दक्षता घ्यावी. अधिकाधिक घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाने नियोजन करीत लवकरात लवकर घरांच्या सोडती काढाव्यात.

पुणे मंडळामार्फत काढण्यात येत असलेल्या ६ हजार ५८ सदनिकांसाठी ५८ हजार ४६७ अर्जदारांनी अर्जाची अनामत रक्कम भरून सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यातील २ हजार ९३८ सदनिका या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या. ३ हजार १२० सदनिकांसाठी ५५ हजार ८४५ अर्ज प्राप्त झाले.

एकूण सदनिका – ६०५८
एकूण प्राप्त अर्ज – ५८४६७
म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना सदनिका- २९३८

२० टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजना – २४८३
प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) – ६३७
एकूण सदनिका – ३१२०
एकूण प्राप्त अर्ज – ५५८४५
0000

MHADA | Pune | पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये म्हाडाच्या घरांसाठी आजपासून करू शकता अर्ज

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र लाइफस्टाइल

पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये म्हाडाच्या घरांसाठी आजपासून करू शकता अर्ज

| 5 हजार 915 सदनिकांची लॉटरी

म्हाडाने (MHADA Pune) विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील 5 हजार 915 सदनिकांची सोडत (Lottery) जाहीर केली आहे. त्यानुसार नागरिकांना गुरुवार दि.5 जानेवारी 2023 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर घरांची सोडत दि.17 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली. (Pune MHADA Lottery)

म्हाडा पुणे विभागातर्फे अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी या घरांची सोडत होणार आहे. यासाठी नागरिकांना म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. नोंदणी प्रक्रिया गुरुवारपासून सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर 4 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या विविध योजनेतील 2 हजार 594 सदनिका , 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2 हजार 990 सदनिका व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 396 सदनिका असे एकूण 5 हजार 915 सदनिकांसाठी सोडत होणार आहे. तर यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत 2 हजार 925 घरे उपलब्ध आहेत, अशी माहिती माने पाटील यांनी दिली.

सोडतीचे वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात – दि. 5 जानेवारी
ऑनलाइन पेमेंट स्वीकृती सुरुवात – दि. 7 जानेवारी
ऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची मुद्‌त – दि. 4 फेब्रुवारी
सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास अंतिम मुदत – दि. 5 फेब्रुवारी
ऑनलाईन पेमेंट,अनामत रक्कम स्वीकृती अंतिम मुदत – दि. 6 फेब्रुवारी
सोडतीसाठी अंतिम अर्जांची यादी प्रसिद्ध – दि. 15 फेब्रुवारी
सोडत – दि.17 फेब्रुवारी

MHADA pune | पुणे म्हाडाकडून 5 हजार घरांची लॉटरी 

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

पुणे म्हाडाकडून 5 हजार घरांची लॉटरी 

29 जुलै, 2022 रोजी सकाळी 10 वाजता पुण्यातील पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन, आगरकर नगर येथील कार्यालयात या लॉटरीतील सदनिकांच्या वितरणासाठीच्या अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. लॉटरीची नियमावली , मार्गदर्शक सूचना इत्यादीची माहिती म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ https://lottery.mhada.gov.in वर जाऊन इच्छूक अर्जदार पाहू शकतात.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या हस्ते पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 5 हजार 69 सदनिकांच्या विक्रीकरता पुणे म्हाडातर्फे ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ झाला आहे. ‘गो – लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत हा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सदनिका सोडतीसंदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. ही पुस्तिका https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये, तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.असे आहे वेळापत्रक-
काल 9 जून, 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून इथून पुढे एक महिना म्हणजेच 9 जुलै, 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर 10 जून, 2022 रोजी सकाळी 10 वाजेपासून ऑनलाईन अर्ज करता येईल. 10 जुलै, 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अनामत रक्कमेची स्वीकृती 11 जुलै, 2022 रात्री 11.59 पर्यंत केली जाईल. 12 जुलै, 2022 रोजी अर्जदारांना बँकेच्या कार्यालयीन वेळेत RTGS / NEFT द्वारे अनामत रक्कम भरता येईल. 21 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.किती व कोठे आहेत सदनिका-
सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत एकूण १९४५ सदनिकांचा सोडतीत समावेश असून पुणे महापालिकेच्या हद्दीत ५७५ सदनिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत १३७० सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत २७९ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेतील १७० सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेतील दोन हजार ६७५ सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत

Mhada | Pune | पुण्यात हक्काचे घर मिळण्याची संधी  | म्हाडा लवकरच काढणार सोडत 

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

पुण्यात हक्काचे घर मिळण्याची संधी 

: म्हाडा लवकरच काढणार सोडत 

पुण्यात आता तुमच्या हक्काच घर घेण्याच स्वप्न साकार होणार आहे.  पुणे विभागातील नागरीकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण म्हाडा आता तब्बल ४,७४४ घरांची सोडत काढणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना त्यांचं हक्काच घराचं स्वप्न साकारता येईल. बाबत येत्या दिवसात एक अधिकृत जाहिरातसुद्धा जाहीर काढली जाणार आहे. अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

यात प्रामुख्याने येरवडा, कसबा पेठ, महंमदवाडी, केशवनगर, मुढंवा, बाणेर, वाघोली, फुरसुंगी, लोहगाव, वाघोली, पाषण खराडी, वाकड, थेरगाव, वडमुखवाडी, ताथवडे, किवळे, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, चिखली आणि पुनावळे या भागात म्हाडा या ४,७४४ घरांची सोडत काढणार.

pradhanmantri awas yojna : प्रधानमंत्री आवास योजनेस आणखी दोन वर्ष मुदतवाढ 

Categories
Breaking News social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

प्रधानमंत्री आवास योजनेस आणखी दोन वर्ष मुदतवाढ

केंद्र शासनाने 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना 2015 मध्ये सुरू केली. आता या योजनेस आणखी दोन वर्षे म्हणजे 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ही योजना पूर्ण होण्यासाठी कमी कालावधी असल्याने प्रधानमंत्री आवास योजनेस गती देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे.

या योजनेंतर्गत मंजूर झालेले प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करणाच्या दृष्टीने तसेच त्यामध्ये एकसंघता व सुसुत्रता राहण्यासाठी आणली आहे. यामध्ये खासगी भागीदारी, पालिका अथवा पीएमआरडीएमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची तांत्रिक तपासणी करून या अहवालाच्या आधारेच निधी वितरणाचे प्रस्ताव पाठविले जाणार आहे.

 

काही प्रकल्पांमध्ये अनियमितता झाली असल्यास त्याची झळ लाभार्थ्यांना सोसावी लागते. तसेच प्रकल्प वर्षानुवर्षे रखडून लाभार्थ्यांना आपल्या हक्‍काच्या घरापासून वंचित राहावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून म्हाडामध्ये स्वतंत्र तांत्रिक कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षामार्फत सर्व परवानग्या दिल्या जाणार आहेत.

MHADA : Pune : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्या ‘म्हाडा’च्या 4 हजार 222 घरांसाठी सोडत

Categories
Breaking News social पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्या ‘म्हाडा’च्या 4 हजार 222 घरांसाठी सोडत

पुणे : पुणे म्हाडाच्या वतीने तब्बल 4 हजार 222 घरांसाठी सोडत जाहीर केली असून, यासाठी तब्बल 65 हजार 180 लोकांनी अर्ज केले आहेत. यापैकी नक्की कोणाला घरांची लाॅटरी लागणार हे शुक्रवार (दि.7) रोजी स्पष्ट होणारा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या घरांच्या सोडतीचा जाहीर कार्यक्रम रद्द केला असून,  उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार मुंबईत मंत्रालयातून आपल्या कार्यालयातून ऑनलाईन पध्दतीनेच ही सोडत जाहीर करणार असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.

गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळेच शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळेच पुणे म्हाडाच्या साडेचार हजार घरांची लाॅटरी ऑनलाईन काढण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकटात समाजातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीने दीड वर्षांत हजारो घरांची तीन वेळा सोडत जाहीर करत नवीन विक्रम केला. म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी पुढाकार घेऊन खाजगी व मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून 20 टक्क्यांतील फ्लॅट उपलब्ध करून घेतले. यामुळे शहरातील नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पांमध्ये देखील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील लोकांना घरे मिळू लागली आहेत.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) पुणे अंतर्गत ८ वी ऑनलाईन सोडत असून, म्हाडाच्या विविध योजनतील २८२३ सदनिका व २०% सर्वसमावेशक योजनअंतर्गत १३९९ सदनिका असे एकूण ४२२२ नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदनीचा शुभारंभाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर सोडतीमधील ४२२२ सदनिकांसाठी आतापर्यंत 65 हजार 180  इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हाडा’च्या सोडतीकडे लोकांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत घराची लाॅटरी लागलेल्या लोकांना अधिकृत एसएमएस पाठवून माहिती देण्यात येणार आहे.

MHADA : Pune : म्हाडाच्या घरांसाठी 22 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ 

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

म्हाडाच्या घरांसाठी 22 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

: लोकांच्या मागणीमुळे अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली

पुणे : म्हाडाच्या (mhada home) वतीने तब्बल ४ हजार २२२ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. यासाठी अर्ज दाखल करण्यास १६ डिसेंबरपर्यंत मुदत होती. आतापर्यंत तब्बल ५२ हजार ९२८ लोकांनी अर्ज केले असून, लोकांच्या मागणीमुळे अर्ज दाखल करण्यासाठी २२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोरोनाच्या संकटात समाजातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीने दीड वर्षांत हजारो घरांची तीन वेळा सोडत जाहीर करत नवीन विक्रम केला. म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी पुढाकार घेऊन खासगी व मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून २० टक्क्यांतील फ्लॅट उपलब्ध करून घेतले. यामुळे शहरातील नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पांमध्येदेखील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील लोकांना घरे मिळू लागली आहेत.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) पुणेअंतर्गत ८ वी ऑनलाइन सोडत असून, म्हाडाच्या विविध योजनांतील २८२३ सदनिका व २०% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत १३९९ सदनिका असे एकूण ४२२२ नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीच्या शुभारंभाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या हस्ते करण्यात आले होते.

सदर सोडतीमधील ४२२२ सदनिकांसाठी आतापर्यंत ५२९२८ इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३२५५३ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. ही सोडत यापूर्वी ठरल्याप्रमाणेच ७ जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. केवळ अर्ज भरण्यासाठी २२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे नितीन माने-पाटील यांनी स्पष्ट केले.