Parner : Ajit Pawar : मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार

Categories
Political महाराष्ट्र

मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

अहमदनगर :- मुळा धरणाच्या बॅक वाॅटरमधून पारनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करण्यात येत असून या योजनेचे विद्युत देयक नियमितपणे भरावे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री क्षेत्र पिंपळनेर येथे केले.

पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याचा जिर्णोद्धाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते झाला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,गृह मंत्री दिलीप वळसे पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आ. निलेश लंके, चैतन्य महाराज देगलुरकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व्यासपिठावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. संत परंपरेत वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. संत साहित्य आपला अध्यात्मिक ठेवा आहे. संतांनी मानवकल्याणाची शिकवण दिली असून या विचारांवर महाराष्ट्र मार्गक्रमण करत आहे. ही परंपरा सर्वांनी पुढे चालू ठेवली पाहिजे.

पारनेर शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेसंबधी सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची सूचना  पवार यांनी यावेळी संबंधिताना केली. श्री क्षेत्र पिंपळनेरला प्रतीपंढरपूर म्हणून नावलौकिक मिळाला आहे. संत निळोबाराय मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी तिर्थक्षेत्र विकास योजनेतून पन्नास लक्ष रुपयांची मदत देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले .

कोरोनाकाळात आमदार निलेश लंके यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन सर्वांनी शासनाने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन्ही डोस घ्यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संत परंपरेत श्री निळोबारायांच्या स्थान अतिशय महत्त्वाचे असल्याचे आणि सर्वजण समान असून आपापसात कोणताही भेदभाव नाही ही शिकवण संत निळोबारायांनी दिल्याचे सांगितले.

आ. निलेश लंके यांनी प्रास्ताविकात श्री क्षेत्र पिंपळनेर येथील प्रस्तावित योजनांची माहिती दिली. पारनेर परिसरातील विकास कामे मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे सांगितले.

श्री संत निळोबाराय अभंग गाथेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्रीमहोदयांनी संत निळोबारायांच्या समाधीचे दर्शन घेतले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Sanjay Shinde : Karmala : अपक्ष आमदार असलो तरी माझे नेते अजित पवारच!  : संजयमामा शिंदे यांची सावध भूमिका 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

अपक्ष आमदार असलो तरी माझे नेते अजित पवारच!

: संजयमामा शिंदे यांची सावध भूमिका

कुर्डूवाडी :  नगरपरिषदेच्या निवडणुका बाबत कुर्डूवाडी व करमाळा शहरातील आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. मी राज्यातील महाविकास आघाडीला पाठिंबा केवळ विकास कामांच्या मुद्द्यांवर दिला असून मी आजही अपक्ष आमदार आहे, पण माझे नेते हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच आहेत, अशी सावध भूमिका आमदार संजयमामा शिंदे मांडली.

निमगाव(टे) (ता. माढा) येथे आमदार आपल्या दारी उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार आपल्या दारी ही योजना गेल्या वर्षभरापासून राबवत असून मध्यंतरी कोरोनामुळे त्यात खंड पडला होता. पण आता नव्या जोमाने प्रत्येक मतदारसंघातील जिल्हा परिषद गटात,पंचायत समिती गणात जाऊन सर्वसामान्य माणसांची कामे मार्गी लावण्यात येणार आहे. या उपक्रमाला दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता रावगाव येथून सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी आमदार संजयमामा शिंदे म्हणाले, करमाळा तालुक्यातील कोणत्याही संस्थेचे नुकसान होईल असे काम करणार नसून आर्थिक अडचणीत आलेल्या संस्थाही बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण करणार नसल्याचे त्यांनी सांगून बेंद ओढ्याला पाणी सोडण्याबाबत सर्व प्रकारच्या मंजुरी झाल्या असून त्याची कार्यवाही करण्यात येईल व सीना माढा  उपसा सिंचन योजनेंतर्गत अंबाड,कुर्डू, पिंपळखुटे, शिराळ या गावालाही पाणी मिळेल याबाबत काम सुरू असल्याचे सांगितले. करमाळा तालुक्यात एक सूतगिरणी उभी करणार असल्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून त्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, डॉ. विकास वीर, राष्ट्रवादी युवकचे तुषार शिंदे, राजेंद्र बाबर, हिंगणीचे माजी सरपंच हनुमंत पाटील आदी उपस्थित होते.

वरिष्ठांना बोलून वीज तोडणी थांबविणार

राज्य सरकारची सध्या आर्थिक परिस्थिती खूप गंभीर आहे. तशीच महावितरण कंपनीची आहे. त्यामुळे त्यांनी वीज बिल वसुली मोहीम काढली असेल पण साखर कारखाने आता सुरू झाले आहेत. त्याचे पहिले बिल येईपर्यंत तरी महावितरण कंपनीने थांबायला हवे. याबाबत वरिष्ठांना बोलणार असून लवकरच त्यात बदल होईल, असे आश्वासन आमदार संजयमामा शिंदे यांनी दिले.

Mhada pune : पुणे म्हाडाच्या 4222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

पुणे म्हाडाच्या 4222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

 मुंबई :- पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्विकृतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.

            मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने आदी मान्यवर उपस्थित होते.

            पुणे म्हाडाच्या माध्यमातून पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या 4 हजार 222 घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीस आजपासून सुरुवात झाली. जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात ही सोडत निघणार आहे. पुणे म्हाडाची ‘जानेवारी 2022-ऑनलाईन सोडत’ योजना राज्यातल्या अनेक गरजूंचं, पुण्यासारख्या शहरात स्वस्त घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे.

Pawar Family : Baramati : पवार कुटुंबियांच्या दिवाळी कार्यक्रमात अजित पवार का नव्हते? शरद पवार यांनी सांगितले हे कारण 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पवार कुटुंबियांच्या दिवाळी कार्यक्रमात अजित पवार का नव्हते?

शरद पवार यांनी सांगितले नेमके कारण

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दरवर्षी कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करतात. तसेच दिवाळी पाडव्यादिवशी पवार कुटुंबीय बारामतीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार करत असतात. यावर्षीही दिवाळी पाडव्यानिमित्त आज सकाळी पवार कुटुंबीयांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, तसेच रोहित पवार उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. दरम्यान, अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत म्हणाले की, अजित पवार यांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर अजितदादा यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे अजित पवार यांनी दिवाळीनिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी येणे टाळले. अजित पवार यांच्या ताफ्यामधील दोन वाहन चालक आणि तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे पवार कुटुंबाकडून दिवाळी निमित्त होणाऱ्या भेटीगाठीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र शरद पवार यांनी याबाबत स्वत: स्पष्टीकरण देत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पवार कुटुंबीय हे दरवर्षी दिवाळी पाडव्या दिवशी बारामती येथील निवास्थानी ग्रामस्थ, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असतात. यासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

Chandrakant patil : मनसेची परप्रांतियांची भूमिका भाजपाला मान्य नाही : चंद्रकांत पाटील 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मनसेची परप्रांतियांची भूमिका भाजपाला मान्य नाही : चंद्रकांत पाटील

: मनसे सोबत युती बाबत पाटील यांची भुमिका

पुणे : महापलिका आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष बाह्य सरसावून कामास लागले आहेत. दरम्यान येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि मनसे एकत्र येणार अशा वावड्या उठल्या होत्या. राज ठाकरे यांनी त्याबाबत संकेत दिले होते.शिवाय पुण्यातील काही कार्यकर्त्यांनी देखील तसे सांगितले होते. मात्र भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही युती होण्याची सुतराम शक्यता नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भाजपाची युती होईल का, असे एका पत्रकाराने विचारले असता प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, संपूर्ण देश एक आहे, अशी भाजपाची भूमिका असून मनसेची परप्रांतियांची भूमिका भाजपाला मान्य नाही. त्यामुळे मनसेसोबत भाजपाची युती होण्याची सुतराम शक्यता नाही.

 

: सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात जाहीर केलेल्या सर्व ६५ साखर कारखान्यांच्या विक्रीची अवश्य चौकशी करा. केवळ जरंडेश्वरची चौकशी करा आणि उरलेल्या ६४ कारखान्यांची करू नका अशी आमची भूमिका नाही, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी दिले.
ते पिंपरी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जरंडेश्वर साखर कारखान्याचे प्रकरण काळा पैसा पांढरा करण्याचे आहे व त्याची चौकशी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी करत आहे. ऊर्वरित साखर कारखान्यांचे प्रकरणही मनी लाँडरिंगचे असेल तर त्याचीही चौकशी करावी. उपलब्ध माहितीनुसार इतर कारखान्यांची विक्री कमी किंमतीला झाल्याची तक्रार आहे. त्याची चौकशी करताना त्या विक्रीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या राज्य सहकारी बँकेची आणि त्या बँकेचे संचालक असलेल्या अजित पवार यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. या गैरव्यवहाराला मौन संमती देणाऱ्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांची आणि मदत करणाऱ्या नेत्यांचीही चौकशी करावी.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी त्यांना धमकीचा फोन आल्याची तक्रार केली आहे, त्याविषयी पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी केवळ तक्रार करण्यापेक्षा राजस्थानमधील सरकारच्या मदतीने धमकी देणाऱ्याचा शोध घेऊन त्याला शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भाजपाची युती होईल का, असे एका पत्रकाराने विचारले असता मा. प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, संपूर्ण देश एक आहे, अशी भाजपाची भूमिका असून मनसेची परप्रांतियांची भूमिका भाजपाला मान्य नाही. त्यामुळे मनसेसोबत भाजपाची युती होण्याची सुतराम शक्यता नाही.

 

संभाजी ब्रिगेडसोबत भाजपाची युती होण्याचा काहीही प्रस्ताव नाही

संभाजी ब्रिगेडसोबत भाजपाची युती होण्याचा काहीही प्रस्ताव आलेला नाही. त्याबाबत आपण केवळ वर्तमानपत्रातून वाचले. असा प्रस्ताव आला तरीही भाजपाची संभाजी ब्रिगेडशी युती होण्याची शक्यता आपल्याला वाटत नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने विजयी व्हावे यासाठी स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांना यावे लागले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहीत पवारही प्रयत्न करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टी किती भक्कम आहे, याचे हे उदाहरण आहे. शहरातील परिस्थिती हाताळण्यास भाजपाचे नेतृत्व सक्षम आहे, असा टोला त्यांनी हाणला.

Ajit Pawar : पुन्हा जर हा प्रश्न विचारला तर मी उठून जाईन  : अजित पवार पत्रकारांवर चिडले 

Categories
Political पुणे महाराष्ट्र

पुन्हा जर हा प्रश्न विचारला तर मी उठून जाईन

: अजित पवार पत्रकारांवर चिडले

पुणे : पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत एरवी शांत आणि संयमी असणारे अजित पवार  ( Ajit Pawar) आज भर पत्रकार परिषदेत खवळल्याचे पहायला मिळाले. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विषयी  विचारलेल्या एका प्रश्नावरून हा सर्व प्रकार घडला. नो कमेंट्स (No Comments) असे म्हणत पुन्हा जर हा प्रश्न विचारला तर मी उठून जाईन असे ते म्हणाले.

पुण्यातील विधान भवन येथे प्रत्येक शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडते. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधतात. आज देखील त्यांची पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत अजित पवारांना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविषयी केलेल्या वैयक्तिक विरोधात विचारले असता अजित पवार खवळले.

मला नो कमेंट्स म्हणण्याचा अधिकार आहे.

”नवाब मलिकांबद्दल मला काही विचारू नका, त्यांचे प्रश्न त्यांना विचारा, समीर वानखेडेंचे प्रश्न त्यांना विचारा. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी या ठिकाणी आलो नाही..इतर काही बोलले त्याबद्दल उत्तर देण्याला मी बांधील नाही. तुम्हाला जसा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तसा मला नो कमेंट्स म्हणण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नो कमेंट्स. त्याबद्दल तुम्ही पुन्हा विचारणार असाल तर मी उठून जाईन. असं ते यावेळी म्हणाले आहेत.”

दिवाळीनंतर १०० टक्के क्षमतेने थिएटर सुरू करण्याचा विचार

”दिवाळीनंतर १०० टक्के क्षमतेने थिएटर सुरू करण्याचा विचार आहे. तसेच गेल्या ९ दिवसांत लसीकरणात वाढ झाली आहे. राज्यात १० कोटींपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. लस घेऊनही ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये कोरोनाची लागण होत असल्याचे आढळले. मेट्रोसाठी ‘नागपूर पॅटर्न’ राबविला जाणार. पुणे मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम दिवाळीच्या आसपास सुरू होईल असे पवार यांनी सांगितले.”

तपासात जे काही निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई होईल

”भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खोटा असून वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी करून काहीही उपयोग नाही. तसेच सध्या खोटी आकडेवारी दाखवून आरोप केले जात आहेत. एनसीबी प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव घेतलं जातं आहे यावर बोलताना पवार म्हणाले, नियम कायदा सर्वांना सारखा आहे. त्यामुळे तपासात जे काही निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई होईल. मागील काही कळत नकळत मोठमोठ्या व्यक्तीचे नाव घेण्याचे प्रकार सुरू झाले.”

Balgandharva Theatre : बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत कलाकारांच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक : अजित पवार

Categories
cultural पुणे महाराष्ट्र

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत कलाकारांच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका

पुणे : महापालिकेच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराची नुतनीकरण करण्यात येणार आहे. मात्र नुकतेच रंगमंदिरात नाटक सुरु करण्यास परवानगी दिली आहे. जे कित्येक दिवस बंद होते. नुतनीकरण करण्यासाठी पुन्हा नाट्यगृह बंद ठेवले तर कलाकारांच्या अडचणीत वाढ होईल. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत कलाकारांच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक आहे. अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.

: नाट्यगृहे आजपासून सुरु

बालगंधर्व रंगमंदिरात नाट्यगृह  पुन्हा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित रंगभूमी पूजन आणि तिसरी घंटा वाजवून झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, पूजा पवार, जयमाला इनामदार, सुरेश विश्वकर्मा, गिरीश परदेशी, प्रशांत जगताप, लक्ष्मीकांत खाबिया आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री  म्हणाले,  कोल्हापूर आणि मुंबई येथील चित्रनगरीत उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. चित्रपट आणि नाट्यगृहांसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात येत आहे. 19 महिने नाट्यगृह बंद राहिल्याने कलावंतांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. दिवाळीनंतर परिस्थितीत अधिक सुधारणा झाल्यास   नाट्यगृहात 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थिला परवानगी देण्यात येईल.

कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांचे झालेले नुकसान लक्षात घेता त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला आहे.  एकल कलावंतांना 5 हजार आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील  संस्थांना ५० ते ७० हजार रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरील समितीद्वारे एकल कलावंतांची निवड करण्यात येणार आहे. यासंदर्भात अडचणी आल्यास त्या प्राधान्याने सोडविण्यात येतील.

राज्याचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून राज्याचे सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनीही या क्षेत्रासाठी मोठे योगदान दिले आहे. सांस्कृतिक चळवळ अधिक गतीने पुढे नेण्याचे प्रयत्न शासन करीत आहे.  राज्याच्या विकासाचा विचार करताना कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीचा विचार तेवढाच महत्वाचा आहे. महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी एक कुटुंब म्हणून सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत कला क्षेत्रातील व्यक्तींच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक असल्याने त्याबाबत संबंधितांशी चर्चा करण्यात येईल असेही ते म्हणाले.

यावेळी मंजुळे, पवार, इनामदार यांनी नाट्यगृह सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले. हा कलावंतांसाठी महत्वाचा दिवस असल्याचे मंजुळे म्हणाले.

प्रास्ताविकात राजेभोसले म्हणाले, सांस्कृतिक विकासासाठी मोठी तरतूद करून शासनाने कलेला राजाश्रय दिला आहे. त्यामुळे कलाकारांना कौतुकाची थाप मिळेल.

यावेळी कलाकारांनी विविध कलाप्रकार सादर केले. कार्यक्रमाला नाट्यसृष्टीशी संबंधित कलाकार आणि कलारसिक उपस्थित होते.

Pune : NCP : सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजपचा शहर राष्ट्रवादीतर्फे निषेध

Categories
Political पुणे महाराष्ट्र

सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजपचा शहर राष्ट्रवादीतर्फे निषेध

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने व कंपन्या आणि अजितदादांच्या नातेवाईकांच्या कंपन्या व कार्यालयांवर इन्कम टॅक्सने टाकलेले छापे हे केंद्रातील सत्ताधारी भाजपचे कारस्थान आहे. केवळ प्रतिमा मलीन करण्यासाठी सत्तेचा गैरवापर करीत असलेल्या भाजपच्या या कृतीचा गुरुवारी शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. पक्षाच्या कार्यकारिणीत हा निषेधाचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची दुसरी कार्यकारिणी बैठक

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची दुसरी कार्यकारिणी बैठक गुरुवारी लोकमान्य टिळक सभागृह येथे पार पडली. या बैठकीस मोठ्या संख्यने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी सत्तेचा गैरवापर करून केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून राज्यातील नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या निषेधाचा ठराव मांडला. त्यास श्रीकांत शिरोळे यांनी अनुमोदन दिले. हा ठराव कार्यकारिणीत एकमुखाने मंजूर करण्यात आला.

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी संगितले कि अजित  दादा हे कायद्याप्रमाणे वागणारे आणि जनतेच्या कामासाठी अहोरात्र झटणारे नेते आहेत. पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून असे अयशस्वी प्रयत्न होत आहेत. केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून अजितदादांची व राज्यातील इतर नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचे षडयंत्र भाजपकडून रचण्यात येत आहे, हे जनता जाणून आहे. मुळात अजितदादांबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना केवळ राजकीय हेतूने अशा प्रकारचे छापे टाकले जात आहेत. त्यात कोणताही संबंध नसताना केवळ अजितदादांचे नातेवाईक म्हणून त्यांनाही यामध्ये ओढले जात असून, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भाजपने केवळ राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न म्हणून राज्याची संस्कृती बिघडवू नये.

महाराष्ट्रात अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जेव्हा जेव्हा विघातक शक्तींनी हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा तेव्हा मावळ्यांनी हे हल्ले अधिक ताकदीने परतावून लावले आहेत. सध्याही असाच प्रयत्न सुरू असून, अजितदादांच्या मावळ्यांकडून भाजपचे हे प्रयत्न निश्चितच परतावून लावले जातील, हे भाजपने लक्षात ठेवावे. लोकशाही देशात सरकार येतात आणि जातात. परंतु, देशाचा गाभा असलेली लोकशाही मूल्ये जपावी लागतात. देशाचा आत्मा असलेल्या लोकशाहीवरच घाला घालण्याचा जो प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे, तो धोकादायक आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही खात्रीने सांगत आहोत. यातून काहीही धडा न घेता भाजपने यापुढेही सत्तेचा गैरवापर सुरूच ठेवल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र आंदोलन करून भाजपला धडा शिकवला जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

तसेच, २० तारखेपासून शाळा – महाविद्यालये सुरू होत असून, क्रीडांगण परिसरात पोलिसांची गस्त सुरू करण्यात यावी. येत्या एक महिन्यात बूथ कमिटीच्या सर्व नियुक्त्या पूर्ण करण्याचाही ठराव या वेळी मंजूर करण्यात आला.