Sahitya Ratna Annabhau Sathe Scholarship | साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

पुणे| साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमामध्ये ६० टक्केहून अधिक गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे तसेच, महामंडळाच्या अनुदान योजना व बीजभांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मांग, मातंग, मिनी मादिग, मादिंग, दानखनी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या मातंग समाज व तत्सम पोटजातीतील विद्यार्थ्यांनी साध्या कागदावर छायाचित्र लावून अर्ज करावा. अर्जावर भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा. सोबत जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिका, गुणपत्रक, पुढील वर्गात प्रवेशाबाबत पुराव्याबाबतच्या स्वयंसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती जोडाव्यात.

अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्व्हे क्रमांक १०३,१०४, मेन्टल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर, येरवडा, पुणे- ०६ या कार्यालयाकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह २५ जुलै पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

याशिवाय महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या ५० हजार रुपयेपर्यंत प्रकल्पमर्यादेची अनुदान योजना आणि ५० हजार १ ते ७ लाख रुपयेपर्यंत प्रकल्पमर्यादेच्या बीजभांडवल योजनेंतर्गत या समाजघटकातील गरजू होतकरू व्यक्तींनी व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Gurupornima | “भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या-प्री प्रायमरी शाळेत “गुरुपौर्णिमा” कार्यकम संपन्न!”

Categories
Breaking News Education पुणे

“भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या-प्री प्रायमरी शाळेत “गुरुपौर्णिमा” कार्यकम संपन्न!”

शालेय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर गुरूंच्या महात्म्याची जाणीव व्हावी, शालेय जीवनात भक्ती, शक्ती, विनम्रता, सहनशीलता, प्रामाणिकपणा, आज्ञाधारक पणा, त्याग ,सेवा,हे गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवावेत, आई वडील, शिक्षक, यांच्या विषयी कृतज्ञता विद्यार्थ्यां मध्ये निर्माण व्हावी.या उद्देशाने “गुरुपौर्णिमा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष: मा. श्री. ज्ञानेश्वरजी सावंत(व्यवस्थापक, ज्ञान प्रबोधनी, निगडी) कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  डॉ.रोहिदासजीआल्हाट(समाजसेवक, ज्येष्ठ विचारवंत) हे होते. कार्यक्रमाची सुरुवात गुरु प्रतिमा पूजन करून आणि “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु देवो महेश्वरा!”या प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेमध्ये कार्यरत शिक्षक (गुरु) म्हणून सेवेत असणाऱ्या गुरूंचे नारायण हट शिक्षण संस्थेच्या वतीने गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शिक्षकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त छोट्या मुलांना गुरुचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. रोहिदास आल्हाट यांनी मार्गदर्शन करताना”गुरु हा सर्वश्रेष्ठ असून प्रत्येक व्यक्ती गुरूंच्या मार्गदर्शनाखाली घडत असते. प्रत्येकाने गुरुस्थानी असणाऱ्या आपल्या माता-पित्यांना, शिक्षकांचा आदर केला पाहिजे. आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता नेहमी ठेवली पाहिजे”
कार्यक्रमाचे अध्यक्ष: मा. श्री. ज्ञानेश्वर सावंत यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले”गुरुपौर्णिमेसारख्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार होण्यास मदत होणार आहे. आज शिक्षणाला संस्काराची जोड मिळण्याची गरज असून ते काम ज्ञान प्रबोधनीच्या मार्गदर्शनाखाली नारायण हट शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी केले जाते. भविष्यात ही शाळा संपूर्ण भोसरी परिसरात आदर्श शाळा म्हणून लवकरच नावलौकिकास पात्र ठरेल! ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य या शाळेत करण्यात येईल!”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुशराव गोरडे (संचालक, नारायण शिक्षण संस्था) यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. आभार: सौ. प्रतिभा तांबे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता” वंदे मातरम!” गीताने झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्य, विजया चौगुले, प्रतिभा तांबे,  सायली संत, मीनल बागुल, भाग्यश्री नगरकर, सुरेखाताई मुके,  प्रवीण भाकड यांनी अतिशय मेहनत घेतली.
कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक/ पालक नारायण हट शिक्षण संस्थेचे संचालक, गृह संस्थेचे सभासद, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pavitra Portal | पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरु

Categories
Breaking News Education पुणे महाराष्ट्र

पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरु

पुणे | राज्यातील शिक्षक पदांची भरती प्रक्रियेची कार्यवाही पवित्र प्रणालीमार्फत सुरु करण्यात आली आहे. सद्यस्थितीत 196 व्यवस्थापनांतील सुमारे 769 पदांसाठी एसईबीसी आरक्षणाच्या जागा इडब्लूएस/खुल्या प्रवर्गात रुपांतरीत करुन पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी 17 जुलै 2022 पर्यंत आपले प्रमाणपत्र अद्ययावत करावेत, असे शिक्षण उपसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे.

पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक भरतीसाठी 2 सप्टेंबर 2021 रोजी 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2 हजार 62 रिक्त पदांसाठी मुलाखतीसह पर्यायांतर्गत 3 हजार 902 पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. प्रमाणपत्र अद्ययावत केल्यानंतर उमेदवारांकडून उपलब्ध रोस्टर व विषय विचारात घेऊन त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध करुन देण्यात येईल.

एकूण 196 व्यवस्थापनाच्या सुमारे 769 रिक्त पदांसाठी 1:10 या मर्यादेत उमेदवार उपलब्ध करुन दिले जातील. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण असतील. उमेदवारांची अंतिम निवड 30 गुणांच्या आधारे आरक्षण व विषय विचारात घेऊन केली जाईल.

Government hostels | सामाजिक न्याय विभागातंर्गत शासकीय वसतिगृतहात प्रवेश प्रक्रियेला सुरवात

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

सामाजिक न्याय विभागातंर्गत शासकीय वसतिगृतहात प्रवेश प्रक्रियेला सुरवात

पुणे : सामाजिक न्याय विभागातंर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेश ऑफलाईन पद्धतीने होणार असून प्रवेशाबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज करण्याचा कालावधी १५ जुलै २०२२ आहे. पहिली निवड यादी अंतिम व प्रसिद्ध करावयाची मुदत १८ जुलै आहे. इयत्ता १० वी व ११ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून प्रवेशासाठी अर्ज करण्याचा कालावधी ३० जुलै आहे. असून पहिली निवड यादी अंतिम व प्रसिद्ध करावयाची अंतिम मुदत ५ ऑगस्ट आहे.

बी.ए.,बी.कॉम.,बी.एस.सी या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या, १२ वी नंतर पदविका किंवा पदवी आणि एम.ए., एम.कॉम, एम.एस.सी. या पदव्युत्तर, पदवी, पदविका आदी अभ्यासक्रमांना (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी २४ ऑगस्टपर्यंत अर्ज करावयाचे असून पहिली निवड यादी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम व प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी ३० सप्टेंबर असून पहिली निवड यादी अंतिम व प्रसिद्ध करावयाचा कालावधी ३ ऑक्टोबर २०२२ असा आहे.

पुणे शहरामधील मुलांच्या शासकीय वसतिगृहामधील अर्जांचे वितरण व स्वीकृती संत ज्ञानेश्वर मुलांचे शासकीय वसतिगृह, विश्रांतवाडी व मुलींच्या शासकीय वसतिगृहामधील अर्जाचे वितरण व स्वीकृती संत जनाबाई मुलींचे शासकीय वसतिगृह, पुणे येथे करण्यात येणार आहे. उर्वरित पुणे जिल्ह्यातील तालुका पातळीवरील शासकीय वसतिगृहांमध्ये अर्जाचे वितरण व स्वीकृती त्याच वसतिगृहामध्ये करण्यात येईल.

पुणे जिल्ह्यात १३ मुलांची व १० मुलींची अशी २३ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. पुणे शहरात ४ मुलींची व ७ मुलांची अशी ११ वसतिगृहे व ग्रामीण भागात १२ मुलांची शासकीय वसतिगृहे आहेत. एकूण १ हजार २०८ जागा रिक्त आहेत. तरी विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

100 percent syllabus | चालू शैक्षणिक वर्षापासून पहिली ते 12 वी साठी 100 टक्के पाठ्यक्रम लागू

Categories
Breaking News Education social महाराष्ट्र

चालू शैक्षणिक वर्षापासून पहिली ते 12 वी साठी 100 टक्के पाठ्यक्रम लागू

मुंबई | शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून इयत्ता पहिली ते 12 वी साठी 100 टक्के पाठ्यक्रम लागू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मार्च 2020 पासून कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू होत्या. तसेच प्रत्यक्ष शाळेत अध्ययन-अध्यापन मर्यादित स्वरूपात होत असल्याने या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचा ताण कमी व्हावा यादृष्टीने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता पहिली ते 12 वी चा पाठ्यक्रम 25 टक्के कमी करण्यात आला होता. तसेच ही परिस्थिती कायम राहिल्याने कमी केलेला पाठ्यक्रम 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी देखील कायम ठेवण्यात आला होता.

professor recruitment : प्राध्यापकांची रिक्त पदे भरणार : राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

Categories
Breaking News Education पुणे महाराष्ट्र

 प्राध्यापकांची रिक्त पदे भरणार

राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

पुणे : राज्य सरकारने महाविद्यालयांतील ३७० प्राचार्य व २,०८८ सहायक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या रिक्त पदांवर निवड झालेल्या सर्व प्राध्यापकांचे वेतन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे दीड ते दोन वर्षांपासून भरतीवर राज्य शासनाने निर्बंध घातले होते. आजपर्यंतच्या ३७० प्राचार्यांची १०० टक्के रिक्त पदे भरण्यास यापूर्वीच निर्णय घेतला आहे. आता प्राध्यापक भरतीस वित्त विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचा निर्णय सोमवारी प्रसिद्ध केला. त्यामुळे पात्र उमेदवारांना प्राध्यापक पदाची संधी मिळणार आहे. प्रथमत: अतिरिक्त ठरलेल्या सहायक प्राध्यापकांना रिक्त पदी तातडीने समायोजित करण्याचे आदेश दिले आहेत. प्राध्यापकाचे पद अतिरिक्त नसल्याचे विभागीय सहसंचालकांनी प्रमाणित केल्यानंतर संस्थांना पदभरतीची प्रक्रिया सुरू करता येईल.

उच्च शिक्षण विभागांतर्गत प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर पदांपैकी राज्याच्या उच्चस्तरीय सचिव समितीने एकूण ४,७३८ पदांना मान्यता दिली होती. त्यापैकी १,६९२ पदे आत्तापर्यंत भरली आहेत. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर पदांचा आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही. या पदासाठी वित्त विभागाची अंतिम मंजुरी मिळेपर्यंत ही पदे अंतिम समजण्यात येऊ नयेत. त्याव्यतिरिक्त या पदांवरील पदभरती केल्यास अशा प्राध्यापकांची वेतनाची जबाबदारी ही संबंधित संस्थांची राहील, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.