Khadakwasla Canal Advisory Committee | पुणे महानगरपालिकेने गळती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात | अजित पवार | 25 नोव्हेंबर पासून रब्बी आवर्तन

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र शेती

Khadakwasla Canal Advisory Committee | पुणे महानगरपालिकेने गळती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात | अजित पवार | 25 नोव्हेंबर पासून रब्बी आवर्तन

| खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

Khadakwasla Canal Advisory Committee | खडकवासला प्रकल्पातून नवीन मुठा उजवा कालव्याचे रब्बीचे आवर्तन २५ नोव्हेंबरपासून सोडण्यात येईल, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Municipal Corporation) वितरणातील पाणीगळती रोखण्यासह आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, रवींद्र धंगेकर, संजय जगताप, भीमराव तापकीर, चेतन तुपे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदींसह समितीचे निमंत्रित सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत पुणे महानगरपालिकेचा पाणीवापर, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, शहरातील पाणीगळती आदींच्या अनुषंगाने चर्चा झाली. सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी पुणे महानगरपालिकेने पाणीगळती रोखण्यासह आवश्यक उपाययोजना करुन काटकसर करावी, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.
यावेळी दौंड नगरपालिका व ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी, नवीन मुठा उजवा कालवा, सणसर जोड कालवा, जनाई शिरसाई उपसा सिंचना योजना, मुंढवा जॅकवेलद्वारे पुणे मनपाने उपलब्ध करुन दिलेल्या सांडपाण्याद्वारे जुना मुठा उजवा कालव्यातून शेतीसाठी देण्यात येणारे पाणी आदींच्या अनुषंगाने चर्चा झाली.
पवना व चासकमान प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला असून भामा आसखेडमध्येही समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या प्रकल्पांच्या सिंचन, बिगर सिंचन आदी पाणी नियोजनाबाबत कोणतीही अडचण नाही असे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले. खडकवासला प्रकल्पात ९५  टक्के पाणीसाठा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पातील पाणीसाठा तसेच नियोजनाची माहिती दिली.
0000

Audit | Water Reservior | महापालिका पाण्याच्या टाक्यांचे करणार ‘ऑडिट’!  | पाण्याची गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न

Categories
Breaking News PMC social पुणे

महापालिका पाण्याच्या टाक्यांचे करणार ‘ऑडिट’!

| पाण्याची गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न

पुणे | पाण्याचा प्रत्यक्ष वापर करावा, त्याचप्रमाणे पाण्याची गळती लक्षात घेऊन त्याची दुरुस्ती करावी, यासाठी महापालिका आता पाण्याच्या टाक्यांचे ऑडिट करणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत गंभीरपणे लक्ष दिले असून पाणीपुरवठा विभागाला तशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने देखील याचे नियोजन सुरु केले आहे. अशी माहिती अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली.
शहराची वाढती लोकसंख्या, समाविष्ट झालेली 34 गावे यामुळे महापालिकेचा पाणीवापर वाढला आहे. सद्यस्थितीत महापालिका दिवसाला 1650 MLD पेक्षा अधिक पाणी वापरत आहे. म्हणजेच प्रतिमहिना 1.5 TMC पाण्याची आवश्यकता महापालिकेला आहे. खडकवासला धरण साखळी, भामा आसखेड, पवना अशा वेगवेगळ्या धरणातून महापालिका पाणी उचलत आहे. असे असतानाही शहरच्या काही भागातून पाणी कमी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तर दुसरीकडे महापालिका पाणी वापर जास्त करते, असा आरोप जलसंपदा विभागाकडून वारंवार केला जातो. याकडे आता महापालिका आयुक्तांनी गंभीरपणे लक्ष दिले आहे. पाण्याचा प्रत्यक्ष वापर करावा, त्याचप्रमाणे पाण्याची गळती लक्षात घेऊन त्याची दुरुस्ती करावी, यासाठी महापालिका आता पाण्याच्या टाक्यांचे ऑडिट करणार आहे.
याबाबत अधीक्षक अभियंता जगताप यांनी सांगितले कि शहरात सद्यस्थितीत पाण्याच्या जुन्या टाक्या 83 आहेत. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 41 टाक्या बांधून झाल्या आहेत. त्यानुसार या टाक्यांचे ऑडिट होईल. यामध्ये धरणातून उचलले जाणारे पाणी, पाणी टाकीपर्यंत येताना होणारी गळती, टाकीत किती पाणी पोहोचते, टाकीतून संबंधित परिसराला किती पाणी जाते, जेवढ्या लोकसंख्येला आवश्यक आहे तेवढे पाणी जाते का, तिथे जाताना किती गळती होते, या सगळ्याचा अभ्यास केला जाईल. यामध्ये पाणी गळती होत असेल तर दुरुस्त करून पाणी वाचवणे हा मुख उद्देश आहे.

| मशीन टू मशीन होणार काम

जगताप पुढे म्हणाले, हे काम मशीन टु मशीन केले जाणार आहे. शहरात 90 हजार मीटर लागले आहेत. पाण्याच्या टाक्यांना देखील मीटर बसवण्याचे काम सुरु आहे. यामुळे सगळा डेटा मशीनमध्येच फीड होऊन जाईल. हातोहात काम करण्याची कर्मचाऱ्यांची गरज भासणार नाही. त्याचा अहवाल तयार करून आयुक्तांना दिला जाईल.