Raj Thackeray : राज्यपाल आणि संजय राऊत यांची राज ठाकरे यांनी केली नक्कल 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राज्यपाल आणि संजय राऊत यांची राज ठाकरे यांनी केली नक्कल

पुणे – मनसेच्या वर्धापन दिनानिमित पुण्यात झालेल्या कार्यक्रमात मनसे सुप्रीमो राज ठाकरे  यांनी बऱ्याच काळातनंतर तुफान बॅटिंग केली. यावेळी राज ठाकरे  यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यपालांवर जोरदार निशाणा साधला. तुम्हाला शिवराय समजतात का? जर एखाद्या विषयातलं आपल्याला समजत नसेल तर त्यावर भाष्य कशाला करायचं, अशा शब्दात राज ठाकरे  यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा समाचार घेतला. शिवाय आपल्या ठाकरी शैलीत राज्यपाल आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची नक्कल केली.

राज्यपालांवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले. सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे. त्यात हे आपले राज्यपाल. एकदा मी त्यांना भेटायला गेलो तर वाटलं हे तर कुडमुडे ज्योतिषी आहेत की काय. त्यांनी शिवरायांबाबत एक विधान केलं. पण आपल्याला ज्या विषयातील माहिती नाही, त्या विषयावर बोलायचं कशाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण कधी रामदास स्वामींचे शिष्य असल्याचं सांगितलं नाही. ना रामदास स्वामींनी आपण शिवरायांचा गुरू असल्याचा दावा केलाय. पण रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जेवढं चांगलं लिहिलंय, तेवढं कुणीही लिहिलेलं नाही. निश्चयाचा महामेरू… हे सुभाषित आज पुन्हा वाचा, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.

यावेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अवमान करण्यावरूनही राज ठाकरेंनी राज्यपालांवर निशाणा साधला. इतक्या छोट्या वयात लग्न व्हायची, हे मला माहितच नव्हतं, असे राज्यपाल म्हणाले, पण त्याकाळात लहानपणी लग्न व्हायची. बालविवाह व्हायचे. पण तुमचे अजून झाले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Jayant Patil : आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही!  

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही!

: राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

पुणे : नवाब मलिक (Nawab Malik) यांना तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून (ED) अटक करण्यात आली होती. अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी सुद्धा राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. आता भाजपचे नेते आणि पदाधिकारी मलिकांच्या  राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आम्ही राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्टंच सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने पुणे शहरातील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पाटील म्हणाले, अनिल देशमुख यांच्याबाबत जे घडलं नाही, ते दाखवायचा प्रयत्न भाजपकडून  सुरू आहे. त्यामुळे आम्ही एक राजीनामा घेतला. ते रोज उठून एका मंत्र्यांमागे चौकशी करतील. अशा वेळी आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ असं नाही. आम्ही नवाब मालिकांचा राजीनामा घेणार नाही. आणि किरीट सोमय्या यांच्याबाबत आता तरी न बोललेलं बरं आहे. असंही ते यावेळी म्हणाले.

 महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना माहिती असून औरंगाबाद कोर्टाने देखील निर्णय दिला आहे. त्यामुळे जबाबदार पदावर असलेल्या राज्यपालांसारख्या व्यक्तीने अशा गोष्टी बोलणं टाळायला हवं, अशी वक्तव्ये करणं योग्य नसल्याचं जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान केंद्र सरकारने युक्रेन मधील वाचवण्यास उशीर केला असून त्यांनी मुलांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यावर लक्ष दिलं पाहिजे. दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता अनेक पालक आणि मुलांशी बोलणं सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Pune Congress : Agitation Against Governor : राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे ‘‘जोडो मारो आंदोलन’’‌

Categories
Political पुणे महाराष्ट्र

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे ‘‘जोडो मारो आंदोलन’’‌

 

पुणे :  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमानकारक वक्तव्‍य केल्याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली एस. एस. पी. एम. एस. शाळा, शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ‘‘जोडो मारो आंदोलन’’ करण्यात आले.

काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी वक्तव्‍य केले की, ‘समर्थ रामदास नसते तर शिवाजींना कोणी विचारलं नसते’. अशा प्रकारे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी शब्दात उल्लेख करून महाराजांचा आणि देशाचा अपमान केला आहे. राज्यपांल सातत्याने वादग्रस्त विधाने करीत आहेत आणि मोदी सरकार त्यांची पाठराखण करीत आहे. भारतीय जनता पक्ष राज्यपालांच्या वक्तव्‍यावर मौन बाळगून आहेत. राज्यपालांनी त्वरीत माफी मागावी अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’

     यावेळी बोलताना नगरसेवक अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्राचे राज्यपालांनी कुठलेही पुरावे नसताना असे सांगितले की, शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाली. खोटे बोलून जनतेची दिशाभुल करणे हा भाजपाचा अंजेडा राज्यपाल अतिशय चोखपणे राबवित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी शब्दात उल्लेख करण्याची मजाल राज्यपालांनी केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा घ्यावा. जर तसे झाले नाही तर आम्ही महाराष्ट्रात राज्यपालांचा कार्यक्रम होऊ देणार नाही याची नोंद मोदी सरकारने घ्यावी.’’

     यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, गटनेते आबा बागुल, कमल व्‍यवहारे, संजय बालगुडे, अनिल सोंडकर, शेखर कपोते, पुजा आनंद, विशाल मलके, नीता रजपूत, सोनाली मारणे, हाजी जाकीर शेख, नगरसेवक रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, संगिता तिवारी, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, रजनी त्रिभुवन, अरूण वाघमारे, राजाभाऊ कदम, प्रकाश पवार, रामदास मारणे, बाळासाहेब अमराळे, मुख्तार शेख, साहिल केदारी, यासीर बागवे, नारायण पाटोळे, राजू साठे, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, प्रविण करपे, विजय खळदकर, रमेश सकट, विजय जाधव, वाल्मिक जगताप, अजित जाधव, अविनाश अडसूळ, मुन्नाभाई शेख, क्लेमेंट लाजरस, रॉर्बट डेव्हिड, परवेज तांबोळी, सुरेश कांबळे, विनोद रणपिसे गणेश भंडारी, बबलू कोळी, राजू गायकवाड, ॲड. राजश्री अडसूळ, सिमा महाडिक, शारदा वीर, फैय्याज शेख, रवी मोहिते आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Shivsena Pune : Agitation : कोशारींच्या वक्तव्यावर भाजप कडून राजीनामा घेतला जाणार का ? : शिवसेना पुणे

Categories
Political पुणे महाराष्ट्र

कोशारींच्या वक्तव्यावर भाजप कडून राजीनामा घेतला जाणार का ?

: शिवसेना पुणे

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिह कोशारी यांचा शिवसेना पुणे शहराचे वतीने जाहिर निषेध करून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

कोशारींनी दाखवली आपली अर्धवट होशारी, छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास आणि पराक्रम संपूर्ण देशाला माहिती आहे, परदेशात त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो. राज्यपालांना महाराष्ट्रातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी छ शिवाजी महाराजांचा ज्वलंत ईतिहास व पराक्रमाची माहिती देउ शकेल. ती त्यांनी आत्मसात करावी. महाराष्ट्रात भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवरायांचा कायम अपमर्द होत आहे. आणि ईतर राज्यामधे देखील त्यामधे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, कर्नाटक सरकार, केंद्रीय मंत्री, राज्यपाल भगतसिंग कोशारी, पुणे शहर भाजप यासर्वांनी छ शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. महाराजांचा एकेरी उल्लेख करून त्यांना दुय्यम दर्जाचे स्थान देण्याचा भाजप नेत्यांकडून कायम प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. कोशारींच्या वक्तव्यावर भाजप कडून राजीनामा घेतला जाणार का ? हे जाहिर करावे.

याप्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, नगरसेवक संजय भोसले, पल्लवी जावळे, विशाल धनवडे, गजानन पंडित, राजेंद्र शिंदे, मतदार संघ संपर्कप्रमुख रामभाऊ कदम, दिपक शेडे, प्रशांत राणे, भरत कुंभारकर, उत्तम भुजबळ, प्रविण डोंगरे, संजय डोंगरे, उमेश गालिंदे, अनिल दामजी, चंदन साळुंके, सुरज लोखंडे, राहुल जेकटे, जावेद खान, प्रसाद काकडे, योगेश पवार, नंदू येवले, संदिप गायकवाड, जगदिश दिघे, सागर बारणे, बाळासाहेब गरुड महिला आघाडीच्या सुनिता खंडाळकर, करूणा घाडगे, प्रज्ञा लोणकर, स्वाती कथलकर, धनश्री बोराडे, वैशाली दारवटकर, जयश्री भणगे, अनुपमा मांगडे, युवा सेनेचे आकाश शिंदे, युवराज पारिख, सनी गवते, परेश खांडके, अक्षय फुलसुंदर उपस्थित होते.

Savitribai phule pune university: विद्यापीठात सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळा!

Categories
cultural Education Political पुणे महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे : महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशातील गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी, शिक्षणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महात्म्यांनी केलेले कार्य त्यांचे जीवन चरित्र अभ्यासून हे कार्य आपण पुढे नेले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अन्न व नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विधान  परिषदेच्या सभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (दूरदृष्य प्रणालीद्वारे) राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

कोश्यारी पुढे म्हणाले, फुले दांपत्याने ज्यावेळी समाजसुधारणेचे काम केले त्या काळात इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा समाजाला कुप्रथांपासून दूर करणे अधिक कठीण होते. त्या काळात समाजातील सर्वात दबलेल्या महिला, मातृशक्ती तसेच मागास, गरीब समाजाच्या उत्थानासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी काम केले. त्यांच्या शिक्षणप्रसाराच्या, समाजसुधारनेच्या कामाला प्रचंड विरोध झाला परंतू कुप्रथा दूर करण्याचे त्यांनी जे स्वप्न पाहिले ते जीवनाच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी काम केले.

सावित्रीबाई यांच्या जीवनाचा कालखंड हा इतिहास वाचण्यापेक्षा इतिहास घडवण्याचा, लिहिण्याचा कालखंड होता असेही श्री. कोश्यारी म्हणाले. सावित्रीबाई जर आज असत्या तर विद्यापीठे, शैक्षणिक क्षेत्रात मुली, महिलांचे अग्रस्थान पाहून त्यांना अतिशय आनंद वाटला असता असेही ते म्हणाले.

सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री म्हणाले, सर्वांना अभिमान वाटेल असा हा सोहळा आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव त्याच्याविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण दिले, मात्र त्या स्वत: एक विद्यापीठ होत्या. फुले दाम्पत्याने समाजबांधवांच्या आयुष्यात फुले फुलविण्याचा, त्यांच्या संसारात आनंद ‍निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाने केवळ पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादीत न रहाता सावित्रीबाईंच्या कार्याबाबात आदर वाटेल आणि त्यांच्या नावाला साजेसे असे अभ्यासक्रम राबवावेत, जेणेकरून विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

देश आणी समाज निरोगी असावयास हवा यासाठी समाजाला विचार देण्यासोबत सावित्रीबाई फुले यांनी आपल्या वर्तनात तो विचार आणला. देश स्वतंत्र झाल्यावर तो रुढी परंपरांमध्ये अडकलेला नसावा यासाठी महात्मा फुले आणि इतर समाजसुधारकांनी प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले यांनी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे इतरांना प्रकाश देण्याचे कार्य केले. त्यांचा ज्ञानार्जनाबाबतचा विचार  स्वीकारला तर प्रगती शक्य आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत समाजासाठी कार्य केले. प्रत्येकाला मर्यादेचे भान आले  आणी भेद बाजूला सारता आले तर खऱ्या अर्थाने  हे विचार समाजापर्यंत पोहोचले असे म्हणता येईल.

शिक्षण क्षेत्रात भेदाला थारा नसावा-छगन भुजबळ

भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनावर जगातील विविध भाषेत प्रकाशित झाले आहे.  त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या जीवनावर लहान पुस्तिका तयार करण्यात येणार आहेत. सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. या वास्तूचे जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.

सामाजिक कार्य करणाऱ्या द्रष्ट्या महापुरुषांचे महत्व कळायला समाजाला उशीर लागतो. महात्मा फुले यांचा पहिला पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे बसविला. अशा महापुरुषांमुळे सामान्य माणसाला समाजात प्रतिष्ठा मिळण्याचे कार्य झाले. सावित्रीबाई फुले यांच्यासमवेत फातिमाबी शेख या महिलेने  शिक्षणाचा आग्रह धरला. प्रत्येक भेद दूर सारण्याच्या महापुरुषांनी प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रात भेदाला थारा न देता विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, त्यातून त्यांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल घडून येईल, असे त्यांनी सांगितले.

महात्मा फुले अध्यासनासाठी राज्य शासन 3 कोटी देणार : उदय सामंत

सामंत म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्यासाठी शासनस्तरावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. समाजहिताच्या कोणत्याही कामासाठी शासनाकडून पुढाकार घेण्यात येतो. राज्यस्तरावर विविध महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठात अध्यासने सुरू करण्यात आली आहेत. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनासाठी ३ कोटी रुपये देण्यात येतील. विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र दर्शवणारी शिल्पे, लाईव्ह शो आदी बाबींच्या निर्मितीसाठी २ कोटी रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते  फडणवीस म्हणाले, आज शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम असलेली महिला समाजात ‍दिसते, याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांचे आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याला सावित्रीबाईंची साथ होती. त्या द्रष्ट्या समाजसुधारक होत्या. त्यांनी आणि महात्मा फुले यांनी समाजाला संघर्ष शिकविला. न्याय आणी ज्ञान यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. अनेक हालअपेष्टा सहन करताना त्यांनी संघर्ष केला. विधवांच्या मुलांचे संगोपन, अंधश्रद्धेचा विरोध, बालहत्येचा विरोध अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांचा ‘काव्यफुले’ हा संग्रह ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाला समर्पित आहे.

सावित्रीबाई लिंग समानता चळवळीच्या आधारस्तंभ: डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांचे कार्य अजरामर आहे. अनेक समाजसुधारकांनी या राज्यात समाजजागृतीचे कार्य केले. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना प्रगतीची संधी मिळाली. त्या कृतिशील समाजसुधारक आणी तत्वचिंतक होत्या. विधवा ‍ महिलांची बाळंतपणं त्यांनी केली होती. सावित्रीबाई फुले लिंग समानतेच्या चळवळीचा आधार होत्या. समाजातील तेढ बाजूला सारून एकरूप करण्यासाठी त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार अध्यासनाच्या माध्यमातून व्हावा. त्यांचे विचार येणाऱ्या पिढीला  मार्गदर्शक ठरतील, असे त्या म्हणाल्या.

कुलगुरू डॉ.करमळकर म्हणाले, समाजाच्या उद्धारासाठी ‍शिक्षण हे एकमात्र साधन आहे हे लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि वंचितांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनी सामाजिक कार्यातही आदर्श प्रस्तूत केला. हा आदर्श विद्यार्थ्यांसमोर प्रस्तूत करण्यासाठी विद्यापीठ परिसरात पूतळा उभारण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. सावित्रीबाई फुले यांचा पुतळा १५०० किलो ब्रांझचा आणी साडेतेरा फुटाचा  आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नाने सर्व परवानग्या तातडीने मिळाल्या. अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनीदेखील विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची  माहिती त्यांनी ‍ दिली.

कार्यक्रमाला उपमहापौर सुनिता वाडेकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता आदी उपस्थित होते. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मूर्तीकार संजय परदेशी यांचा सत्कार राज्यपाल महोदयांच्या हस्ते करण्यात आला. हरी नरके लिखीत ‘ज्ञानज्योती  सावित्रीबाई फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.
000