PMC election 2022 | इच्छुकांना खरेच कळेना … कामाला लागायचे की शांत बसायचे? : निवडणूक कधी होईल याचा काहीच अंदाज लागेना

Categories
Breaking News PMC Political पुणे

इच्छुकांना खरेच कळेना … कामाला लागायचे की शांत बसायचे?

: निवडणूक कधी होईल याचा काहीच अंदाज लागेना

पुणे : महापालिका निवडणूक कधी होणार, हे वरचेवर गुलदस्त्यातच राहत चालले आहे. महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेची अधिसूचना आणि प्रभागाचा नकाशा जाहीर केला खरा, मात्र त्यामुळे स्पष्टता येण्यापेक्षा गोंधळच वाढताना दिसतो आहे. यामुळे इच्छुकांना खरेच कळेना … कामाला लागायचे की शांत बसायचे?
पुणे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी बरेच इच्छुक आहेत. गेल्या कित्येक दिवसापासून नाही तर महिन्यापासून हे लोक निवडणूक होण्याची वाट पाहत आहेत. मात्र वाट पाहणे एवढा एकच पर्याय त्यांना वापरावा लागत आहे. कारण कितीतरी दिवस फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार अशी भाकिते वर्तवली जात होती. मात्र obc आरक्षणाच्या मुद्द्याने यावर पाणी फेरले. मग महापालिकेत प्रशासक आले. पुन्हा असे वाटले कि मे महिन्यात निवडणूक होऊ शकेल. मात्र त्यावेळी ही निराशाच पदरी आली. त्यानंतर मग सुप्रीम कोर्टानेच निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे कशीतरी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. मग मरगळ झटकत महापालिका प्रशासनाने अर्धवट प्रभाग रचना जाहीर केली. यामुळे देखील स्पष्टता येत नाही.
अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी 17 मे ही तारीख देण्यात आली होती. मात्र त्याआधीच प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुकांना खरेच वाटेना. मग महापालिकेच्या वेबसाईट वरील नकाशे बघून सत्यता पटू लागली. मात्र अजूनही चित्र स्पष्ट व्हायला तयार नाही. कारण आता आरक्षण कधी जाहीर होणार? याबाबत उत्सुकता आहे. बरं आरक्षण जाहीर झाले तरी निवडणूक जून महिन्यात होणार कि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये याबाबत ही कुठली निश्चितता आलेली नाही. कारण जून च्या शेवटी निवडणूक घ्यायची म्हटले तर ते शक्य होताना दिसत नाही. कारण त्याच कालखंडात पालखीचे आगमन होणार आहे. यावेळी तर मुक्काम देखील वाढला आहे.  पालखीच्या आधी घ्यायचे म्हटले तर प्रशासनाची तेवढी तयारी अजून नक्कीच झालेली नाही. अशातच निवडणूक आयोगाचे नवीन आदेश आले तर काय सांगावे? दुसरा पर्याय मग सप्टेंबर ऑक्टोबर चा. कारण त्यावेळी प्रशासकाचा सहा महिन्याचा कालावधी देखील पूर्ण होईल. शिवाय पावसाळा ही संपला असेल.  मग राज्य सरकार याआधी जेव्हा निवडणूक घ्यायची म्हणत होते, तेव्हाच होणार असे दिसते. कोर्टाच्या याचिकेचातसा फार फायदा झाला, असे म्हणता येत नाही.
पण या झाल्या जर तर च्या गोष्टी. पण निवडणूक कधी लागणार, याबाबतची संदिग्धता मात्र तशीच आहे!

PMC Election 2022 : अखेर ठरले …17 मे ला प्रसिद्ध होणार अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना! : महापालिका निवडणुकीला वेग

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२

अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिध्द करण्याचा कार्यक्रम जाहीर

पुणे : पुणे आणि राज्यातील महापालिका निवडणुकांना आता वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 11 मे ला अंतिम प्रभाग रचनेचे काम पूर्ण करायचे आहे. 12 मे ला प्रभाग रचनेच्या अंतिम प्रस्तावास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेऊन निवडणूक आयुक्त यांच्याकडे सादर करायचा आहे. तसेच 17 मे ला अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करून त्याचा नकाशा व सर्व परिशिष्टे मनपाच्या सूचनाफलक आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करायचे आहेत. नुकत्याच या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागांच्या सिमा निश्चित करण्याबाबत खालील कार्यवाही पूर्ण झाली आहे :-
१) प्रारुप प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मान्यता दि. २८ जानेवारी, २०२२ रोजी देण्यात आली.
२) प्रारुप प्रभाग रचना दि. १ फेब्रुवारी, २०२२ रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली.
३) प्रारुप प्रभाग रचनेवर दि. १ फेब्रुवारी, २०२२ ते १४ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीमध्ये हरकती व सूचना मागविण्यात आल्या.
४) प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत दि. १७ ते २६ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत सुनावणी देण्यात आली.
५) सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या शिफारशी नमूद केलेला
महानगरपालिकेमार्फत राज्य निवडणूक आयोगास दि. ५ मार्च, २०२२ पर्यंत सादर अहवाल करण्यात आला.

महानगरपालिकेने सादर केलेल्या अहवालाची तपासणी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सुरु असताना दि. ११ मार्च, २०२२ रोजी शासनाने प्रभाग रचनेच्या अनुषंगाने अधिनियमात दुरुस्ती केल्यामुळे त्याबाबत आयोगाने पुढील कार्यवाही थांबविली होती. शासनाने अधिनियमात केलेल्या सदर दुरुस्तीच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्या. या सर्व याचिका विशेष अनुमती याचिका (सिव्हील) क्र. १९७५६/२०२१ सोबत संलग्न करुन त्यावर सुनावणी झाली. त्यामध्ये दि.४ मे, २०२२ रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने, आयोगाने दि. १० मार्च, २०२२ रोजी ज्या टप्प्यावर निवडणुकांची प्रक्रिया स्थगित केली होती, तेथून पुढे सुरुवात करुन निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्याचे निर्देश दिले आहेत.
उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता प्रभाग रचनेची कार्यवाही तात्काळ पूर्ण करणे आवश्यक असल्यामुळे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दि.६ ते १०
मे, २०२२ या कालावधीत उपस्थित राहून अंतिम प्रभाग रचना प्रसिध्दीच्या अनुषंगाने उर्वरित कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्व शिफारशींचा सखोल अभ्यास करुन आयोगाने आता वरील १४ महानगरपालिकांच्या प्रभाग रचना अंतिम केल्या आहेत. सदर अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिध्द करण्याच्या अनुषंगाने सोबतच्या परिशिष्ट-१ मध्ये दर्शविल्यानुसार पुढील कार्यक्रम राबविण्यात येऊन आयोगास कळवावे.

PMC Election 2022 : पुणे महापालिकेची प्रभाग रचना रद्द  : निवडणूक लांबणार हे स्पष्ट

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महापालिकेची प्रभाग रचना रद्द 

: राज्य सरकार कडून अध्यादेश जारी 

 

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी (PMC Election)  तीन सदस्यांची प्रभागरचना ( Ward Structure) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना  राज्य सरकारने 11 मार्च ला काढलेल्या आदेशामुळे प्रभागरचना  रद्द झाली. नगरसेवक व इच्छुक उमेदवारांकडून प्रारूप प्रभागरचनेवरून निवडणुकीची तयारी सुरू केली असताना आता प्रभाग रद्द झाल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. नव्याने प्रभाग रचना करताना इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (OBC) आरक्षण टाकले जाणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (Local Body) ओबीसीचे आरक्षण कायम असावे अशी भूमिका राज्यातील सर्वच पक्षाने घेतली आहे. त्यामुळे नुकताच विधिमंडळात नवीन कायदा पारित झाला. त्यास राज्यपालांनी देखील मंजुरी दिली आहे. या कायद्यात निवडणूक घेण्याबाबत व प्रभागरचना करण्याचे अधिकार शासनाने स्वतःकडे घेतले आहेत त्यानुसार ही प्रभाग रचना रद्द झाली आहे.पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. निवडणूक आयोगाने या आदेशानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश पुणे महापालिका प्रशासनाला दिले होते. तीन सदस्यांचा प्रवास करताना अनेक नाट्यमय घडामोडी पुणे शहरात घडल्या होत्या. स्वतःच्या सोयीचा प्रभात तयार करून घेण्यासाठी नगरसेवकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती.

महापालिकेने सादर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत झाल्याने निवडणूक आयोगाने बैठका घेऊन या प्रदर्शनात 24 बदल करण्याचे आदेश दिले होते. हे बदल केल्यानंतर आयोगाने एक फेब्रुवारी रोजी प्रवासा जाहीर केली. यामध्ये चित्रविचित्र पद्धतीने प्रभाग तयार झाल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे तब्बल साडेतीन हजार पेक्षा जास्त हरकती व सूचना नोंदविल्या गेल्या. निवडणूक आयोगाने या हरकतींवर सुनावणी घेतली त्यानंतर यशदाचे महासंचालक व आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी चोक्कलिंगम यांच्या समितीने शिफारशींचा अहवाल तयार करून तो नुकताच आयोगाला सादर केलेला आहे. त्यामुळे प्रभाग रचना अंतिम टप्प्यात आलेले असताना राज्य शासनाच्या आदेशामुळे ही प्रभाग रचना रद्द झाली आहे. महाराष्ट्र शासनाने काढलेल्या राज्य पत्रामध्ये पुणे महापालिकेस राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती यांचीही प्रभाग रचना रद्द केलेले आहे.या आदेशामुळे भविष्यात पुन्हा एकदा तीन सदस्यांचा प्रभाग रचना करण्यासाठी निवडणूक आयोगाला तयारी करावी लागणार आहे. एकंदरीतच ही प्रभाग रचना रद्द झाल्याने महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Local Body Election : DCM Ajit Pawar : जागृत राहा : मनपा निवडणुकीबाबत अजित पवारांचे सूचक विधान 

Categories
Breaking News PMC Political पुणे

जागृत राहा : मनपा निवडणुकीबाबत अजित पवारांचे सूचक विधान 

 
पुणे : शहरातील लांबलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना सूचक विधान करत शहरातील प्रभाग रचना न बदलता तशीच राहणार आहे. तीन सदस्यांचा प्रभाग राहणार असून ओबीसी राजकीय आरक्षण याबाबत कोर्टाचा निकाल लागल्यानंतरही ताबडतोब निवडणुका लागू शकतात. तेव्हा सर्वांनी जागृत राहा असे विधान यावेळी केले. त्यामुळे निवडणुकीबाबत पुन्हा हालचाली सुरु झाल्या आहेत.

बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढले. असुन उत्तोत्तम आरोग्यासाठी सकस आहार आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच रुग्णालयाच्या माध्यमातून शहरातील आरोग्य सुविधाच गुणवत्तापूर्ण भर पडेल. असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. माजी महापौर तथा नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांच्या संकल्पनेतून राजीव गांधीनगर परिसरात उभारलेल्या महापालिकेच्या स्व. माणिकचंद नारायणदास दुगड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लोकार्पण सोहळ्यात पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी शहरातील लांबलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना सूचक विधान करत शहरातील प्रभाग रचना न बदलता तशीच राहणार आहे व तीन सदस्यांचा प्रभाग राहणार असून ओबीसी राजकीय आरक्षण याबाबत कोर्टाचा निकाल लागल्यानंतरही ताबडतोब निवडणुका लागू शकतात. तेव्हा सर्वांनी जागृत राहा असे विधान यावेळी केले. व कात्रज पर्यंत मेट्रो लवकरात लवकर काम सुरू होऊन मेट्रो सुरू होईल. यावेळी धनकवडे तसेच दुगड परिवारातर्फे अजित पवार यांचा सन्मान करण्यात आला. प्रस्तावना करताना दत्तात्रय धनकवडे म्हणाले, या भागातील मध्यमवर्गीय नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने येथील आरोग्य सुविधा सक्षम व्हावी यासाठी या रुग्णालयाची उभारणी केली आहे.

अजित पवार म्हणाले की, कोरोनाचे संकट जगासह राष्ट्र,राज्य, परिसरावर आले. अन आपण खळबळून जागे झालो. आरोग्याला जेवढे महत्त्व देऊ, तेवढे पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे आरोग्य सुविधांसाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. तसेच यावेळी राज्यासाठी काल मांडलेले पंचसूत्री अर्थसंकल्प यातील बाबी मांडल्या. शहरातील अनेक खाजगी हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासारखी महापालकेच्यावतीने रुग्णालय उपलब्ध झाले.तर सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात आरोग्य सेवा मिळतील. मात्र हॉस्पिटल कितीही चांगल्या सुविधा असल्या तरी कोणाला याचा वापर ना करण्याची संधी मिळो. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. तसेच डॉक्टरांनी त्याचा अनुभव पणाला लावून रुग्णांचा विश्वास संपादन केला पाहिजे.  कार्यक्रमात आमदार चेतन तुपे, रा.कॉ.शहराध्यक्ष प्रशांत जगताप,अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, राज्य महिल आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी उपमहापौर दीपक मानकर, उद्योजक प्रकाश धारीवाल, ओमप्रकाश रांका, प्रमोद दुग्गड, व राष्ट्रवादीचे परिसरातील नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

Aspirants : PMC election : मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांचे वेगवेगळे प्रयत्न  : यात्रा, सहल, सांस्कृतिक कार्यक्रमावर भर 

Categories
Breaking News cultural PMC Political पुणे

मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांचे वेगवेगळे प्रयत्न

: यात्रा, सहल, सांस्कृतिक कार्यक्रमावर भर

पुणे : महापालिका निवडणूक (PMC election) जवळ आली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी (All political parties) जोरदार तयारी सुरु केली आहे. त्याचप्रमाणे सगळ्या पक्षामधील इच्छुक (Aspirants) देखील कंबर कसून कामाला लागले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांचे वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये खासकरून काशी यात्रा, सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिकेट स्पर्धा, यांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने नागरिक देखील याला प्रतिसाद देत आहेत.

पुणे महापालिकेसह राज्यातील मोठ्या महापालिकांची मुदत मार्च 2022 मध्ये संपुष्टात येत आहे. पण, करोना आणि आरक्षणाच्या प्रक्रियेमुळे निवडणुकीच्या प्रक्रियेला विलंब झाला आहे. नियमित वेळेत निवडणूक झाल्यास आतापर्यंत आचारसंहिता लागू होणे अपेक्षित होते. परंतु, तसे न झाल्याने अनेक इच्छुकांची घालमेल वाढली आहे. त्यातच आरक्षणाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत निवडणुका न घेण्याचा राजकीय मंडळींनी सूर आवळला होता. मुदत संपणाऱ्या महापालिकांवर प्रशासक नियुक्‍त करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या. 1 फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना जाहीर होऊन त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या. त्यावर सुनावणीही पार पडली. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. यावरून निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होईल, असे बोलले जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा शहरातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. राजकीय पक्षांकडूनदेखील उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. इच्छुक उमेदवाराची प्रतिमा, त्यांचा संपर्क, आर्थिक क्षमता, मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड आदी बाबींचा त्यासाठी आढावा घेतला जात आहे. त्यामुळे इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरू आहे.

 

गेले दोन वर्षे करोनामूळे भीती आणि चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता करोना प्रतिबंधक लसीकरण झाल्याने संसर्गाचा धोका बराच कमी झाला आहे. त्यामुळे करोनामुळे लावण्यात आलेले निर्बंध आता शिथिल होत आहेत. जनजीवन पूर्ववत होत आहे. त्यामुळे इच्छुकांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-वारांच्या दिवशी गाठीभेटींचा कार्यक्रम आयोजनावर जोर दिला आहे.

Heat of PMC Election 2022 : मोदी, पवार, ठाकरे यांच्या सभा!

Categories
Breaking News PMC Political पुणे

मोदी, पवार, ठाकरे यांच्या सभा!

: मार्चपासून शहरातील राजकीय वातावरण तापणार

: महापालिका निवडणुकीची तयारी

 पुणे : महापालिका निवडणुकांचा (PMC election) कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी शहरात राजकीय ज्वर चढण्यास सुरूवात झाली आहे. मार्च महिन्यात  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार (NCP chief Sharad pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या सभांनी शहरातील राजकीय वातावरण महापालिका निवडणूकांच्या तोंडावर चांगलेच तापणार आहे.

दि. 1 मार्चला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा “परिवार संवाद’ पुण्यात येणार असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे नेते शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार असून महापालिका निवडणूकांच्या तोंडावर सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून पुण्यातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष विधानसभा निहाय बैठका घेणार आहेत. त्यानंतर दि. 5 मार्चला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते शहरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या विकासकामांची उद्घाटने करणार असून ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही घेण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

 

त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते महापालिकेच्या वेगवेगळया विकासकामांचे भूमीपूजन तसेच मेट्रोचे उद्घाटनही करणार आहेत. यानिमित्ताने त्यांची जाहीर सभा घेऊन महापालिकेच्या निवडणूकांसाठी शक्‍ती प्रदर्शन करण्याचे भाजपकडून नियोजन असून पंतप्रधान मोंदीच्या दौऱ्याचे नियोजन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: लक्ष देऊन करीत आहेत. त्यानंतर लगेचच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही जाहीर सभा दि. 9 मार्चला होणार आहे. पक्षाच्या वर्धापनदिना निमित्ताने पुण्यातील शहर पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर ही सभा पुण्यात घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

BJP : PMC Election : भाजपने या शिलेदाराकडे दिली पुणे महापालिका निवडणुकीची सूत्रे

Categories
Breaking News PMC Political पुणे

भाजपने या शिलेदाराकडे दिली पुणे महापालिका निवडणुकीची सूत्रे

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीमध्ये (PMC election)  पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता राखण्यासाठी शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे (General secretary Rajesh pandey) यांची पक्षाने महापालिका निवडणूक प्रमुख या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. भाजपने नेहमीच्या जुन्या शिलेदाराकडे याची जबाबदारी न देता ती या  संघटनेत महत्वाच्या असणाऱ्या पांडे यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

पुण्यातील निवडणुकीतील भाजपची सूत्रे कोणाकडे जाणार याची उत्सुकता होती. खासदार गिरीश बापट किंवा पालिकेतील कोणत्या तरी पदाधिकाऱ्याला सहप्रभारी म्हणून जबाबदारी मिळणार, याची चर्चा होती. प्रत्यक्षात बापट आणि महापौर मुरलीधर मोहोळ, गटनेते गणेश बीडकर यांच्यापैकी कोणाकडेही जबाबदारी न देता पांडे यांचे पुढे करण्यात आले आहे. पर्यायाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडेच सारी सूत्रे राहणार असल्याचेही पांडे यांच्या निवडीमुळे स्पष्ट झाले आहे. चंद्रकात पाटील यांनी गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली पुण्याची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही.

मितभाषी असलेले पांडे हे गेल्या 30 वर्षांपासून संघ परिवारात सक्रिय आहेत. मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले पांडे अकरावीमध्ये शिक्षणासाठी पुण्यात आले. तेव्हापासूनच ते पुण्यात आले. करियरच्या सुरवातीच्या टप्प्यात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते.

Hearing On Ward Structure : PMC Election 2022 : आज 1380 हरकतींवरील सुनावणी पार पडली!

Categories
Breaking News PMC पुणे

आज 1380 हरकतींवरील सुनावणी पार पडली!

पुणे :. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 (PMC election 2022)  प्रारुप प्रभाग रचना (Ward structure) हरकत व सुचना (Objection and Suggestion)  सुनावणी बालगंधर्व रंगमंदिर येथे आज पार पडली. आजच्या सुनावणीमध्ये प्रभाग क्र. १ ते २० व २७ ते ३१ तसेच ३३ व ३५ यांचा समावेश होता. वरील सर्व प्रभागातील १३८० इतक्या हरकती व सुचना आल्या असून त्यावर सुनावणी घेण्यात आली. मा. आजी माजी सभासद, राजकीय हरकतदार व नागरिक यांनी हरकती व सुचना दाखल केल्या होत्या. राहिलेल्या प्रभागावर उद्या सुनावणी होणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रारुप रचनेबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर गुरुवार दि. २४/२/२०२२ व शुक्रवार दि. २५/२/२०२२ रोजी जाहीर सुनावणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार २४/२/२०२२ रोजीची सुनावणी मा. चोकलिंगम, महासंचालक यशदा, (राज्य निवडणूक
आयोग प्राधिकृत अधिकारी), पुणे यांच्या अधिपत्याखाली पार पडली.  सुनावणी बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर, पुणे ५ येथे सकाळी १० वाजता सुरु झाली. आज दि. २४/२/२०२२ च्या सुनावणीमध्ये प्रभाग क्र. १ ते २० व २७ ते ३१ तसेच ३३ व ३५ यांचा समावेश होता. वरील सर्व प्रभागातील १३८० इतक्या हरकती व सुचना आल्या असून त्यावर सुनावणी घेण्यात आली. कोविड-१९ च्या अनुषंगाने सर्व शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सदर सुनावणी कार्यक्रम शांततेत पार पडला. मा. आजी माजी सभासद, राजकीय हरकतदार व नागरिक यांनी हरकती व सुचना दाखल केल्या होत्या.
सुनावणी प्रसंगी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रविंद्र बिनवडे, अप्पर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, सचिव राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र दिपक नलावडे, अप्पर सचिव राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र अतुल जाधव, उप आयुक्त राज्य निवडणूक
आयोग महाराष्ट्र अविनाश सणस, उप आयुक्त (निवडणूक) अजित देशमुख इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Chairman of Standing Commitee : PMC : निवडणूक लांबल्याने स्थायी समिती अध्यक्ष पदाबाबत घडणार इतिहास! 

Categories
Breaking News PMC पुणे

निवडणूक लांबल्याने स्थायी समिती अध्यक्ष पदाबाबत घडणार इतिहास!

: थोड्या दिवसासाठी नवीन अध्यक्ष कि जुन्याच अध्यक्षांना संधी मिळणार?

पुणे – महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सभासदांची मुदत 1 मार्च रोजी संपणार असल्याने त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपद बदलणार की सध्याचे अध्यक्ष हेमंत रासनेच अध्यक्ष राहणार, याबाबत महापालिकेत विभिन्न तर्क वितर्क लढवले जात आहेत. आताचे अध्यक्ष दावा करत आहेत की मीच अध्यक्ष राहू शकतो. जर तसे नाही झाले तर 10 ते 12 दिवसासाठी अध्यक्ष बनण्यासाठी कोण पुढे येणार, याबाबतही चर्चा सुरु आहे. दरम्यान यामुळे मात्र महापालिकेत इतिहास घडणार आहे. कारण अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे.

: 14 मार्च संपणार मुदत

महापालिकेची मुदत 14 मार्चला संपत आहे. निवडणूक वेळेत होणार नसल्यामुळे 14 मार्चला सर्व सभासदांची मुदत संपत आहे. त्यामुळे स्थायी समितीत नव्या सभासदांची नेमणूक होणार का? आणि अध्यक्ष बदलणार का? 2022-23 चे अंदाजपत्रक कोण मांडणार? याविषयी महापालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सध्याचे अध्यक्ष हेमंत रासनेच यावर्षीचे अंदाजपत्रक मांडणार, अशी चर्चा होती. याविषयी विधी विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे. मात्र नियमाप्रमाणे एक मार्चच्या आधी स्थायी समितीच्या ज्या आठ सदस्यांची मुदत संपणार आहे, तेथे नवे आठ सदस्य नेमण्याविषयीची निवडणूक घ्यावी लागणार आहे.

 

त्यासाठी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक केल्यानंतर या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येतील आणि अर्ज मागवण्यात येतील. प्रशासनाने राज्यसरकारला पत्र पाठवून या प्रक्रियेविषयी मार्गदर्शन मागितले होते. यावर राज्यसरकारचे काहीच उत्तर आले नाही.

महापालिका निवडणूक मे-जूनपर्यंत पार पडण्याची शक्‍यता आहे. अशावेळी दोन-तीन महिन्यांसाठीच स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी नवीन नेमणूक होईल की आहे त्याच अध्यक्षांना पुन्हा संधी मिळेल याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत. रासने यांना सलग तीन वर्षे अध्यक्षपद मिळाले आहे. दरम्यान सदस्य निवडल्यानंतर अध्यक्ष पदाची निवड होते. यात 5-6 दिवसांचा कालावधी जातो. त्यामुळे नवीन अध्यक्ष जरी झाला तरी त्याला अवघे आठच दिवस मिळतात. त्यामुळे त्यासाठी कोण पुढे येणार, याबाबत आता उत्सुकता लागून राहिली आहे.

Chandrakant patil : BJP : PMC Election 2022 : विरोधकांची ५० वर्षे विरुद्ध भाजपाच्या माध्यमातून झालेल्या पुण्यातील विकासकामांचा हिशोब जनतेसमोर मांडणार

Categories
Breaking News PMC Political पुणे

विरोधकांची ५० वर्षे विरुद्ध भाजपाच्या माध्यमातून झालेल्या पुण्यातील विकासकामांचा हिशोब जनतेसमोर मांडणार

:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

:कोथरूड मधील आशिष गार्डन- सागर कॉलनी- शांतीबन चौक डीपी रोडचे लोकार्पण

पुणे: महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून पुणे मेट्रो, चांदनी चौकातील सहापदरी रोड, नदी सुधार असे अनेक विकासाचे प्रकल्प(Devlopment Projects) उभारले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात ५० विरुद्ध पाच वर्षांच्या कामांचा हिशेब जनतेसमोर मांडणार असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष . चंद्रकांतदादा पाटील(Chandrakant Patil) यांनी केले. गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित कोथरूड मधील आशिष गार्डन- सागर कॉलनी- शांतीबन चौक डीपी रोड पाटील यांच्या पुढाकारातून मार्गी लागला. या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर MLA भीमराव  तापकीर, नगरसेवक किरण दगडे-पाटील, दिलीप वेडे-पाटील, नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, अल्पना वर्पे, अॅड. वासंती जाधव, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, सरचिटणीस दिनेश माथवड, स्विकृत सदस्य बाळासाहेब टेमकर, गणेश वर्पे, प्रभाग क्रमांक १० (कोथरुड)चे अध्यक्ष कैलास मोहोळ, (खडकवासला) सागर कडू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, १९८२ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असताना, अनेकदा पुण्यात ‌येण्याचा योग आला. तेव्हापासून पुणे शहराची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे आशियातील सर्वात जलदगतीने वाढणारं शहर म्हणून पुण्याची ख्याती झाली. वाढत्या लोकसंख्येनुसार रस्ते, पाणीपुरवठा वाहिन्या, ड्रेनेज लाईन आदी नागरी सुविधा महापालिकेच्या माध्यमातून निर्माण करण्याची गरज असते. गेल्या पाच वर्षांत महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून हे विषय मार्गी लावण्यासोबतच पुण्याच्या विकासाच्या अनुषंगाने मेट्रो, चांदनी चौकातील सहापदरी रोड, नदी सुधार प्रकल्प यांसारखे अनेक प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात विरोधकांची ५० वर्षे विरुद्ध भाजपाच्या माध्यमातून झालेल्या पुण्यातील विकासकामांचा हिशोब जनतेसमोर मांडणार आहोत.

ते पुढे म्हणाले की, २० वर्षांपूर्वी पुणे महापालिकेचे बजेट १३०० कोटी होतं.‌ पण केंद्रातील भाजपा सरकारने मेट्रोच्या माध्यमातून ११ हजार कोटींचा प्रकल्प पुणेकरांसाठी आणला. आता त्याचे उद्घाटन, पाहाणी काही नेते करत आहेत. पण पुण्यातील नागरिकांना मेट्रो कुणामुळे आली हे माहित आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात विविध ठिकाणी एक लाख ७६ हजार कोटींचे मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर वाहतूककोंडीची समस्या संपेल. त्यामुळे पुणेकरांच्या आशीर्वादाने महापालिकेत पुन्हा सत्ता आल्यानंतर, घर ते मेट्रो स्टेशनप्रवासासाठी मोफत ई-बस किंवा ई-रिक्षाची व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. चांदनी चौकातील सहापदरी रस्त्याचे कामही पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. असे एक ना अनेक प्रकल्प भाजपा सरकारच्या काळात पूर्ण होत आहेत. त्यामुळे शहराच्या विकासासाठी भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. सागर कॉलनीतील रस्त्याचा प्रश्न ही संवादाच्या आणि सततच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लावता आला.

भीमराव आण्णा तापकीर म्हणाले की, चंद्रकांतदादा पाटील हे कोथरुडचे आमदार झाल्यानंतर अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने कोथरुडकरांना वेळ देऊ शकतील का? पण प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळताना, त्यांनी मतदारसंघावर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ दिला नाही. डीपी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावतानाही माननीय दादांनी सर्वांना सोबत घेऊन कुणावरही अन्याय होऊ दिला नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाही हायब्रीड अँन्यूटीच्या माध्यमातून जे रस्ते उभारले गेले, त्यामुळे खडकवासला मतदारसंघातील सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.

यावेळी नगरसेवक किरण दगडे-पाटील दिलीप वेडे-पाटील नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक अल्पना वर्पे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना डीपी रस्त्याचे काम पूर्णत्वास येण्यापर्यंतचा इतिहास मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव मुरकुटे यांनी केले. तर सागर कडू यांनी आभार मानले.