Ajit Pawar | Municipal election | महाविकास आघाडी म्हणून महापालिका निवडणूक लढविण्यास  इच्छुक | अजित पवार 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाविकास आघाडी म्हणून महापालिका निवडणूक लढविण्यास  इच्छुक | अजित पवार

महापालिका निवडणुकी बाबत अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस असे आम्ही महाविकास आघाडी म्हणून महापालिका निवडणूक लढविण्यास  इच्छुक असून प्रत्येक मित्र पक्षाने आपल्या ताकदीनुसार, व्यवहार्य जागा मागाव्यात. काहीही मागायला लागले तर जमणार नाही. एकला चलो रे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नये, असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे शुक्रवारी दिला.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात मेळावा झाला. त्यात पवार बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असणारे राजकारण, महापालिका निवडणूक, हनुमान चालिसा, हनुमान जन्मस्थळ यावरून सुरू असणारा वाद, राज ठाकरेंचे आंदोलन यावर भाष्य केले.

पवार म्हणाले, ‘‘जाती धर्माचे विष पेरण्याचे काम काही लोक करीत आहेत. त्यांच्या मागे आपल्या कार्यकर्त्यांनी फरपटत जाऊ नये. जातीचे विष पेरण्यामध्ये कोणती शक्ती आहे, कोणाचे डोके आहे. हे आपल्याला माहित आहे. मुंबईत पवार साहेबांच्या घरावर हल्ला आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यास मारहाण करणे चुकीचे आहे. शरद पवारांचा कोणताही आणि काहीही संबंध नसताना घरावर हल्ला केला गेला, ही बाब चुकीची आहे. चुकणाऱ्यांना शिक्षा मिळेलच.

पुढे पवार म्हणाले, आपल्या धर्मानुसार कोणाला काय धार्मिक विधीकरायचे असेल, तो अधिकार दिला आहे. कोणाला हनुमान चालिसा करायचा असेल? तो त्यांनी आपल्या घरी करावा. दुसऱ्यांच्या घरी जाऊ नये. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणायचा अट्टहास का? मला धार्मिक कार्य करायचे असेल, तर मी काटेवाडीच्या घरी किंवा देवगिरीवर करेल. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी. महागाई आणि बेरोजगारी या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे.’’

Rajyasabha Election | Jayant Patil | राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारावरून जयंत पाटलांनी केला खुलासा 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारावरून जयंत पाटलांनी केला खुलासा

भाजपाला जशी काही मते कमी पडतात तशी काही मते महाविकास आघाडीला कमी पडतात. परंतु आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केला.” असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईल तेव्हा आपल्या सोबत किती आमदार आहेत याचा विचार सर्वच पक्ष करतील. महाराष्ट्र विधानसभेत कधी घोडेबाजार पाहिला नाही, त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही. खास करुन भाजपा करणार नाही असे सांगतानाच जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल.”, असेही जयंत पाटील म्हणाले.

OBC Reservation | BJP | ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी : योगेश टिळेकर

पुणे : मध्य प्रदेशमधील भाजप सरकारच्या यशानंतर महाविकास आघाडी सरकारचे अपयश पुन्हा स्पष्ट झाले आहे. या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी. असे आवाहन ओबीसी प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केले.

दोन वर्षांत घरात बसूनही सरकारला अभ्यास करता येत नसेल तर त्यांनी मध्य प्रदेशमधील भाजप सरकारची कॉपी करावी आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यासाठी मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्रातही ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष जगदीश मुळीक आणि ओबीसी प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्या वेळी मुळीक बोलत होते.

ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, सरचिटणीस राजेश येनपुरे, दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर सुशिल मेंगडे, धनंजय जाधव, गायत्री खडके, आरती कोंढरे, मनिषा लडकत, प्रशांत हरसुले, प्रतिक देसरडा, दीपक माने, नंदकुमार गोसावी, राजेश धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुळीक पुढे म्हणाले, राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमवावे लागले नसून, राज्य सरकारने ते पद्धतशीरपणे घालवले आहे. आरक्षण हातचे जात असताना छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड हे ओबीसींचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री केंद्र सरकारकडे बोट दाखवित निमूटपणे बसून राहिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला वेळोवेळी सूचना केल्या, मात्र ठाकरे सरकारने त्या सुचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा आदेश दिला. याउलट मध्य प्रदेश सरकारने र्नयायालयाने सांगितलेली ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्याने त्यांना आरक्षण मिळाले. आरक्षण गमविण्यासाठी पूर्णपणे ठाकरे सरकार जबाबदार आहे. आता तरी जागे व्हावे आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राला ओबीसींचे आरक्षण मिळवून द्यावे.

टिळेकर म्हणाले, ओबीसींना राजकीय आरक्षण देताना ते किती प्रमाणात द्यावे हा प्रश्न आहे. त्यासाठी समर्पित आयोगामार्फत एंपिरिकल डेटा अर्थात ओबीसींची वस्तुस्थितीनुसार आकडेवारी गोळा करून प्रमाण ठरवणे आणि एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत ठेवणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रातील राजकीय आरक्षण स्थगित करतानाच ते पुन्हा लागू करण्यासाठी तिहेरी चाचणी पूर्ण करण्यास सांगितले होते. महाविकास आघाडी सरकारने नेमके हेच काम केले नसल्याने राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा लागू झाले नाही. दुसरीकडे मध्य प्रदशेने न्यायालयाच्या आदेशानंतर ताबडतोब डेटा गोळा करून चाचणी पूर्ण केली आणि ओबीसी आरक्षण पुन्हा मिळविले. मध्य प्रदेशमधील भाजप सरकारच्या यशानंतर महाविकास आघाडी सरकारचे अपयश पुन्हा स्पष्ट झाले आहे. या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी.

Raj Thackeray’s morning Rally | राज ठाकरेंच्या सकाळच्या सभेमुळे भुवया उंचावल्या! 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या सकाळच्या सभेमुळे भुवया उंचावल्या!

: राजकीय वर्तुळात  चर्चाना उधाण

पुण्यात रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे राज ठाकरे यांची सकाळी सभा होणार आहे. मात्र ठाकरे यांच्या सकाळच्या सभेच्या वेळेमुळे मात्र भुवया उंचावल्या गेल्या आहेत. कारण ठाकरे नेहमी संध्याकाळी सभा घेतात. त्याला प्रतिसाद देखील तसाच मिळतो. मात्र आता सकाळी सभा असल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

शहरात सभेसाठी दोन ठिकाणे पाहण्यात आली होती. त्यापैकी एक मुळा मुठा नदीपात्र निश्चित करण्यात आले होते. परंतु पावसाचे कारण देत कार्यकर्त्यांनी नदीपात्रात सभा रद्द झाल्याचे सांगितले. अखेर स्वारगेटला रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पण राज ठाकरे  नेहमी सायंकाळी सभा घेतात. पण यावेळी मात्र चक्क सकाळी सभा ठेवल्याने चर्चाना उधाण आल्याचे दिसत आहे. सायंकाळच्या सभेवरूनच अजित पवारांनी  राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली होती. आता सकाळी सभा घेऊन राज यांनी पवारांचे  चॅलेंज स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

‘आम्ही सकाळी, दुपारी सभा घेतो. यांनी कधी दुपारी सभा घेतली आहे का, तसेच कधी कष्ट घेतले आहेत का, यांची सभा कधी होते तर संध्याकाळी होते,’ अशा शब्दात अजित पवार यांनी राज यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र राज ठाकरेंनी सकाळी सभा आयोजित करून अजित पवार यांचे आव्हान स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मशिदींवरील भोंग्याचा मुद्द्यावरून राज ठाकरे यांची मुंबई, ठाणे, औरंगबाद येथे जाहीर सभा झाली होती. या सभेत राज ठाकरे यांनी भोंगे, हिंदुत्व, या मुद्द्यांना हात घातला होता. त्याचबरोबर शरद पवार आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. पुण्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज यांनी अयोध्या दौरा स्थगित केला आहे. त्याबाबतही ते पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

पुण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टिझर मनसे द्वारा  प्रदर्शित

टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सुरुवातीला औरंगाबादच्या सभेतील एकदा काय ते होऊनच जाऊ दे… हे वाक्य घेण्यात आले आहे. तर टिझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणंही वाजत आहे. या टीझरवरून पुण्यातील सभा जोरदार होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्या अनुषंगाने मनसेचे पुण्यातील सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत.