UPSC Results | केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल जाहीर | महाराष्ट्रातील 60 हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश

Categories
Breaking News Education देश/विदेश महाराष्ट्र

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल जाहीर

महाराष्ट्रातील 60 हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश

यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली

 

नवी दिल्‍ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण 685 उमेदवारांपैकी 60 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 10 टक्के महाराष्ट्रातील आहेत. यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातूनही महिला उमेदवार पुढे आहेत. राज्यातून प्रियंवदा म्हडाळकर प्रथम तर अंजली श्रोत्रीय यांचा दूसरा क्रमांक आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार या दोघी 13 व्या आणि 44 व्या क्रमांकावर आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2021 च्या परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 5 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये प्रियंवदा म्हडाळकर (१३) अंजली श्रोत्रीय (44), श्रध्दा गोमे (६०), शुभम अशोक भैसारे (९७), अंकित हिरडे (९८),आदित्य काकडे (१२९),शुभम भोसले (१४९),विनय कुमार गाडगे (१५१), ओंकार पवार (१९४), रामेश्वर सब्बनवाड (202), अक्षय वाखरे (२०३), अक्षय महाडिक (२१२), तन्मयी देसाई (२२४), अभिजीत पाटील (२२६), तन्मय काळे, (२३०), विशाल खत्री (236), संचित गुप्ता (237), उत्कर्ष खंडाळ (243), मृदुल शिवहारे (247), इशान टिपणीस (२४८), प्रतीक मंत्री (252), सुयश कुमार सिंग (262), सोहम मांढरे(२६७), अश्विन राठोड़ (265), अर्शद मोहम्मद (276), सागर काळे (२८०), रोहन कदम (२९५), रणजित यादव (315) गजानन बाळे (३१९), वैभव काजळे (३२५), अभिजीत पठारे (३३३), राहूल देशमुख (३४९), सुमित रामटेके (३५८), विनायक भोसले (३६६),आदित्य पटले (३७५), स्वप्न‍िल सिसळे (३९५),सायली म्हात्रे (३९८), हर्षल महाजन (४०८), शिवहर मोरे (४०९), चेतन पंढेरे (४१६), स्वप्न‍िल पवार (४१८), पंकज गुजर (४२३), अजिंक्य माने (४२४), ओंकार शिंदे (४३३), रोशन देशमुख (४५१), देवराज पाटील (४६२), अनिकेत कुलकर्णी (४९२), शिल्पा खानिकर (५०६), अस्मर धनविजय (558), नितीश डोमले(५५९), निरज पाटील (५६०), आकांक्षा तामगाडगे (५६२), आशिष पाटील (५६३), शुभम नगराळे (५६८), अमीत शिंदे (५७०), स्वप्न‍िल माने (५७८), प्रशांत डगळे (५८३), अभय सोनारकर (६२०), अश्विन गोलपकर (६२६), मानसी सोनवणे (६२७), अमोल आवटे (६७८), पुजा खेडकर (६७९).

एक नजर निकालावर

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी 2021 मध्ये परीक्षा घेण्यात आली. जानेवारी 2022 मध्ये मुख्य लेखी परीक्षा घेण्यात आली असून एप्रिल-मे 2022 महिण्यात मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 685 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (खुला) गटातून –244, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 73, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – 203, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 105, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 60 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 26 दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 126 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- 63, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 20, इतर मागास वर्ग -36, अनुसूचित जाती- 07, अनुसूचित जमाती – निरंक उमेदवारांचा समावेश आहे.

April will be hotter : मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये अजून गरम होणार!  : मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता.

Categories
Breaking News social आरोग्य महाराष्ट्र

मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये अजून गरम होणार!

: मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता…

मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात अधिक गरमी असू शकते, असा हवामान विभागाने दिलेला इशाऱ्याचा प्रत्यय एप्रिल महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांत येत असून विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये बुधवारी व गुरुवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४३.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. सर्वांत कमी किमान तापमान पुण्यात १५.६ अंश सेल्सिअस आहे.

विदर्भातील अकोला, चंद्रपूर, अमरावती या परिसरात उष्णतेची लाट आली आहे. ही लाट आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान ४० अंशाचे पुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात बुधवार व गुरुवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

पुणे ३९.७, लोहगाव ३९.६, कोल्हापूर ३८.३, महाबळेश्वर ३२.९, मालेगाव ४३.२, नाशिक ३८.७, सांगली ४०.२, सातारा ३९.५, सोलापूर ४२.८, मुंबई ३२.७, सांताक्रूझ ३१.८, रत्नागिरी ३१.६, पणजी ३३.३, डहाणू ३३.७, औरंगाबाद ४०.२, परभणी ४२.२, नांदेड ४१.८, अकोला ४३.५, अमरावती ४२, बुलडाणा ४०.२, ब्रम्हपुरी ४१.६, चंद्रपूर ४३.४, गोंदिया ४१, नागपूर ४१.१, वाशिम ४१, वर्धा ४२.४.

Maharashtra Budget : Ajit Pawar : अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून राज्याला काय दिले? 

Categories
Breaking News Commerce Political महाराष्ट्र

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून राज्याला काय दिले?

मुंबई :- कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतीमान करणारा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या पाच क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. विकासाची पंचसूत्री, सामाजिक उत्तरदायित्व, पर्यटन विकासाच्या नव्या क्षेत्रांना बळ, संस्कृती जतन आणि वारसा स्थळांचा विकास करण्यासाठी योजना ही या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणारा सर्व समावेशक अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सादर केला.

सन 2022-23 साठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी 13,340 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. वार्षिक योजनेसाठी 1,50,000 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 12,230 कोटी, अनुसूचित जमाती उपयोजनेसाठी 11,199 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. महसूली जमा 4,03,427 कोटी प्रस्तावित असून महसुली खर्च 4,27,780 कोटी रूपये आहे. महसुली तूट 24,353 कोटी रूपये अपेक्षित आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 23,888 कोटी रूपयांची तरतूद

कोवीड-19 च्या कालावधीत कृषी क्षेत्राने र्थव्यवस्थेला बळकटी दिली. या क्षेत्राला आणखी बळकट करण्यासाठी 23 हजार 888 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत, भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी, आधारभूत किंमतीनुसार शेतमाल खरेदीकरीता 6,952 कोटी रूपयांची तरतूद आणि येत्या दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्यांचा समावेश करून अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करून ती 75 हजार करण्यात आली आहे.

वर्षभरात 60,000 वीज पंपांना जोडणी देणार

कृषी संलग्न क्षेत्राला बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या संगणकीकरणासाठी 950 कोटी, मृद आणि जलसंधारणासाठी 4,774 कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. वर्षभरात 60,000 वीज पंपांना जोडणी देण्याचे उद्दीष्ट आहे. रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड योजनेत केळी, ड्रॅगन फ्रुट, अॅव्हॅकॅडो, द्राक्षे फळांचा तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा समावेश करून फळशेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. पशुधन विकासासाठी देशी गायी आणि म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी राज्यात तीन मोबाईल प्रयोगशाळा विकसित केल्या जाणार आहेत, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी 5,244 कोटींची तरतूद

महाराष्ट्राने कोवीड-19 महामारीचा खंबीरपणे सामना केला. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशिल आहे. यासाठी 5,244 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्थेचे विस्तारीकरण आणि बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे. नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा येथे प्रथम दर्जाचे ट्रॉमा केअर युनिट उभारले जाणार आहेत. 200 खाटांच्या सर्व रूग्णालयात येत्या तीन वर्षात लिथोट्रिप्सी उपचारपद्धती सुरू केली जाणार आहे. महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत 16 जिल्ह्यात 100 खाटांची खास महिलांसाठी रूग्णालये उभारली जाणार आहेत. जालना येथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरूग्णालय उभारण्यासाठी 60 कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले आहे.

मनुष्यबळ विकासासाठी 46,667 कोटींची तरतूद

विकास योजनांची अंमलबजावणी प्रभावीरित्या होण्यासाठी मनुष्यबळ विकासावर भर देण्यात आला आहे. रोजगारक्षम मनुष्यबळ विकासासाठी इनोव्हेशन हब उभारण्यात येणार असून त्यासाठी 500 कोटी रूपये तर स्टार्टअप फंडासाठी 100 कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना ई-शक्ती योजनेतून मोबाईल सेवा दिली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात अमृत महोत्सवी महिला व बाल भवन आणि नागरी बाल विकास केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. शासकीय वसतीगृहातील मुलींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिसपेन्सींग मशिन दिले जाणार आहे.

दळणवळण सेवेचे बळकटीकरण आणि विस्तारीकरण

राज्यातील दळणवळण सेवांचा विकास, बळकटीकरण आणि विस्तार करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. यासाठी 28,605 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून 10,000 कि.मी. च्या रस्त्यांसाठी साडेसात हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यास प्रारंभ केला जाणार असून यातून 6,550 कि.मी.चे रस्ते विकास करण्याचे नियोजन आहे. राज्य परिवहन महामंडळासाठी 3,000 नवीन बसगाड्या घेण्यासाठी तसेच राज्यातील 103 बस स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यासाठी भांडवली अर्थसहाय्य दिले जाणार आहे. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार नागपूर ते भंडारा-गोंदिया, नागपूर ते गडचिरोलीपर्यंत केला जाणार आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरीता भूसंपादन सुरू करण्यात आले आहे. मुंबईतील मेट्रो मार्ग क्रमांक 3- कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गिकेचा विस्तार कफ परेडपासून नेव्हीनगर पर्यंत केला जाणार आहे. पुण्यातील मेट्रो सेवा अधिक व्यापक करण्यावर भर आहे. त्यासाठी स्वारगेट ते कात्रज, पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खडकवासला ते स्वारगेट या मार्गावरील प्रकल्प अहवालाचे काम सुरू करण्यात आले आहे. शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर येथील विमानतळांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी भरीव निधीची तरतूद तर गडचिरोलीसाठी नवीन विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

उद्योग विकासासाठी 10,111 कोटी रूपयांची तरतूद

राज्याला अधिकाधिक उद्योगस्नेही करण्यासाठी 10,111 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0, ई-वाहन धोरण, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना यांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील कौडगाव, शिंदाळा, धुळे जिल्ह्यातील साक्री, चंद्रपूर जिल्ह्यातील वाशिम आणि यवतमाळ येथील सौर उर्जा प्रकल्पा उभारण्यात येणार आहेत. मुंबईतील पारेषण प्रणालीच्या क्षमेत वाढ करण्यासाठी पाच प्रकल्प उभारले जाणार आहेत, असे उपमुख्यंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नवीन उपक्रम

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. कोयना, जायकवाडी, गोसीखुर्द धरणांच्या जलाशयात जलपर्यटन प्रस्तावित आहे. पुरातत्व स्मारकाच्या जतन, संवर्धन, दुरूस्तीसाठी जिल्हानिहाय महावारसा सोसायटीची स्थापना करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात आफ्रिकन सफारी तर पुणे वन विभागात बिबट्या सफारी प्रस्तावित करण्यात आली आहे.

नवीन उपक्रमांची घोषणा

स्थानिक संस्थांतील इतर मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांना प्रत्येकी 250 कोटी रूपये तर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी 250 कोटींची तरतूद वाढविण्यात आली आहे. भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगित महाविद्यालय व संग्राहालय स्थापन करण्यासाठी 100 कोटी रूपये निधी राखीव ठेवला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 250 कोटींचा निधी उपलब्ध करणार असून छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरू करणार आहे. महापुरूषांशी संबंधित 10 शाळांकरीता 10 कोटींचा निधी राखीव ठेवणार असून स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत मुंबई, पुणे व नागपूर येथील स्थळांचा हेरिटेज वॉक विकसित केला जाणार आहे.

नैसर्गिक वायूवरील कर, मुद्रांक शुल्कात सवलती प्रस्तावित

महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क थकबाकी तडजोड 2022 अभय योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेमुळे वस्तू आणि सेवा कर लागू होण्यापूर्वी विक्रीकर विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध करांवरील सवलती संदर्भात विचार केला जाईल. ही योजना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी असेल. पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक वायुवरील मूल्यवर्धीत कर 13.5 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर आणला जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात सवलती प्रस्तावित करण्यात आल्या असून जल वाहतुकीवरील करात पुढील तीन वर्ष सवलत देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

Ukraine Students Return : युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी दिल्लीत दाखल

Categories
Breaking News देश/विदेश महाराष्ट्र

युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी दिल्लीत दाखल

: महाराष्ट्रातील 27 विद्यार्थी सुखरूप परतले

नवी दिल्ली : युध्दजन्य युक्रेनदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विशेष विमान आज मध्यरात्री, 3.30 वाजता दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्रातील 27 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. त्यांनतर दुसरेही विमान सकाळी ८ वाजता दाखल झाले.

सद्या युक्रेनमध्ये युध्द सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची ‘ऑपरेश गंगा’ मोहीम भारत सरकारने सुरु केली आहे. याअंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीने पाठविण्यात आलेल्या एयर इंडियाच्या ‘एआय-1942’ या विशेष विमानाने बुखारेस्ट (रोमानिया) येथून 250 विद्यार्थी आज मध्यरात्री दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.देशाच्या विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील 27 विद्यार्थी आहेत.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र सदनाच्यावतीने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहे. तसेच, या कक्षाच्यामाध्यमातून आवश्यक ते मार्गदर्शन व सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. व विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे सुखरुप स्वगृही पोहचविण्यात येत आहे.

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

विशेष विमानाने महाराष्ट्रातील आणखी 19 विद्यार्थी दिल्लीत

दरम्यान, एयर इंडियाचे ‘एआय-1940’ हे दुसरे विशेष विमान बुखारेस्ट (रोमानिया) येथून विद्यार्थ्यांना घेऊन आज रविवारी सकाळी 8.00 वाजता दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील 19 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Jumbo Covid Center : Mahavikas Aghadi : Thackrey Govt : पुण्याच्या जम्बो सेंटर वरून देखील ठाकरे सरकार ‘टार्गेट’! 

Categories
Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र संपादकीय

पुण्याच्या जम्बो सेंटर वरून देखील ठाकरे सरकार ‘टार्गेट’!

: येनकेन प्रकारेण कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

पुणे : केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप अर्थात विरोधी पक्ष ठाकरे सरकार अर्थात महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. महाविकास आघाडीतील महत्वाचे मोहरे या त्रासाला कंटाळले आहेत. नुकतीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महापालिकेत भेट दिली. त्यांच्या भेटीवरून देखील ठाकरे सरकारला टार्गेट करण्याचे काम केंद्र सरकार करते आहे, हे आता उघड होत आहे.

: महाराष्ट्र बाबत आकस वाढला

किरीट सोमय्या हे जम्बो कोविड सेंटर ची तक्रार करण्यासाठी महापालिकेत आले होते. ते ही सुट्टीच्या दिवशी. गम्मत म्हणजे हे सेंटर चालवले जाते PMRDA कडून. महापालिकेचा त्याचा फक्त डॅशबोर्ड शी संबंध आहे. सगळी प्रक्रिया PMRDA कडून राबवली जाते. तरीही सोमय्या महापालिकेत तक्रार देण्यासाठी आले. शिवसैनिकांशी धक्काबुक्की झाल्यानंतर सोमय्या हॉस्पिटल मध्ये गेले. हॉस्पिटल मधून नंतर महापालिकेत व्हीलचेअर वर आले. सुरक्षा रक्षकांना निवेदन देताना मात्र उभा राहून फोटो काढला. संजय राऊत यांना टार्गेट करण्यासाठी सोमय्या या प्रकरणाच्या मागे लागले आहेत. त्यात कहर म्हणजे या प्रकारची चौकशी करण्यासाठी केंद्राने एक पथक देखील पुण्यात पाठवले आहे.  यातून सिद्ध एकच होते कि यामागे जनतेची काळजी नसून ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव आहे.
आतापर्यंत फक्त राज्यातील विरोधी नेतेच महाविकास आघाडी सरकारविषयी आकस दाखवण्याचे काम करत होते. मात्र परवाच्या संसदेतील पंतप्रधान मोदींच्या भाषणावरून देखील हेच दिसून आले. शिवाय केंद्र सरकारने राज्यातील मंत्री आणि मोठ्या नेत्यांच्या मागे केंद्रीय एजेंसीचा ससेमिरा मागे लावून ठेवला आहेच.
महापालिका निवडणूका तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत ठाकरे सरकार आणि त्यांचे मंत्री याचा सामना कसा करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Weather update : राज्यातील तापमानाचा पारा वाढला!

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

राज्यात तापमानाचा पारा वाढला

पुणे : राज्यातील काही भागात थंडी ओसरत असल्याचं समोर येत आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात काही भागात या वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्रीची थंडी असं मिश्र वातावरण राज्यात पाहायला मिळतंय. (Maharashtra Weather Update)

सध्या कमाल आणि किमान तापमानात जवळपास २० अंश सेल्सिअसचा फरक जाणवतोय. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळी धुक्याची चादर पसरल्याचं चित्र आहे.उत्तर महाराष्ट्रातही हीच परिस्थिती असली, तरीही दिवसभर उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. पुण्यात मागील चोवीस तासात सर्वाधिक म्हणजेच 32 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात हळूहळू दिवस मोठा होत असून दिवसा तापमान वाढलं आहे.

Dust Storm : Maharashtra : महाराष्ट्राला धुळीच्या वाऱ्याचा धोका : हवामान खात्याचा इशारा

Categories
Breaking News महाराष्ट्र

महाराष्ट्राला धुळीच्या वाऱ्याचा धोका

: हवामान खात्याचा इशारा

मुंबई : पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रामार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे येत्या १२ तासांमध्ये उत्तर कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये  काही ठिकाणी धुळीचे वारे ताशी २० ते ३० किमी वेगानं येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे.

धुळीच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी दृश्यमानता कमी होण्याचीही शक्यता आहे. हवेतील धुलीकणांचं प्रमाण वाढल्यानं मुंबईत लोकल ट्रेन, आणि उंच इमारती काहीशा अंधुक दिसत असल्याचेही फोटो समोर आले आहेत. तसंच मुंबईत आज सकाळपासूनच हवेची गुणवत्ता खालावल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे वरीष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

हवेत धुलीकणांचं प्रमाण वाढल्याचा परिणाम मुंबईत काही ठिकाणी दिसून आला आहे. मुंबईतील उंचच उंच इमारती धुळीच्या वाऱ्यामुळे दिसेनाशा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.

 

Corona virus in Maharashtra : १० जानेवारी पासून राज्यात नवीन नियमावली : असे आहेत नवे नियम : काय चालू आणि काय बंद घ्या जाणून

Categories
Breaking News आरोग्य महाराष्ट्र

राज्यात नवी नियमावली जाहीर

: असे आहेत नवे नियम, काय चालू आणि काय बंद घ्या जाणून

मुंबई – नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच वाढलेल्या कोरोनाच्या संसर्गाने राजधानी मुंबईसह संपूर्ण राज्यात भयावह रूप धारण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत २० हजारांहून अधिक तर महाराष्ट्रामध्ये ४० हजारांहून अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी १० जानेवारीपासून होणार आहे. तसेस हे निर्बंध १५ फेब्रुवारीपर्यंत लागू राहतील, असे राज्य सरकारने जाही केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

नव्या नियमावलीनुसार राज्यात सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत जमावबंदी, रात्री ११ ते सकाळी ५ संचारबंदी लागू राहणार आहे. त्याबरोबरच सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमधून प्रवास करण्यासाठी दोन डोस घेतलेले असणे अनिवार्य आहे.मात्र लोकल वाहतुकीवर कुठलेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाही. तसेच राज्यातील शाळा आणि महाविद्यालये हे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

असे आहेत कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लागू केलेले नवे नियम 

-राज्यात सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत जमावबंदी, रात्री ११ ते सकाळी ५ संचारबंदी
– शाळा महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
– मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद
– स्विमिंग पूल, जिम, स्पा पूर्णपणे बंद
– लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत
– खासगी कार्यालयात २ डोस घेतलेल्यांनाच परवानगी
– २ डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक सेवेचा लाभ घेता येणार
– रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेनं रात्री १० पर्यंत सुरू
– लग्नाला ५० तर अंत्यविधीला २० जणांनाच परवानगी

 

Omicron Variant : मोठी बातमी : महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये

Categories
Breaking News आरोग्य देश/विदेश महाराष्ट्र

महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये

मुंबई : ४ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.

हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.

या रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

या दरम्यान झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही तथापी डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.

आज सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ३८३९ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या १७,१०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबर पासून आता पर्यंत ८ प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.