Nana Patole | महापालिका निवडणुकीत काँग्रेस चा राहणार ‘हा’ फॉर्म्युला! | नाना पटोले यांनी दिले संकेत

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

महापालिका निवडणुकीत काँग्रेस चा राहणार ‘हा’ फॉर्म्युला! 

नाना पटोले यांनी दिले संकेत 

काँग्रेसचे उदयपूरमध्ये तीन दिवसीय चिंतन शिबीर (Congress Chintan Shivir) पार पडले. यामध्ये ‘एक कुटुंब-एक तिकीट’ हा फॉर्म्युला ठरविण्यात आला. हाच नियम आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिकांच्या निवडणुकांमध्ये (Maharashtra local Bodies Election) लागू करण्यात येईल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितलं.

काँग्रेससकडून देशात जनजागरण मोहीम केली जाणार आहे. त्याद्वारे काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. येत्या निवडणुकांमध्ये तरुणांना ५० टक्के जागा देण्यात येणार आहे. एका कुटुंबाला एकच तिकीट देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा नियम लागू करणार आहोत. स्वातंत्र्यांनंतरचे ५० वर्ष काँग्रेसने देशाला महासत्ता बनविण्याचं काम केलं आहे. पण, मोदी सरकारने ८ वर्षात देशाला मागे आणले आहे. देश श्रीलंकेच्या वाटेवर आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाही. संविधान सुरक्षित राहिलेलं नाही. याबाबत गेल्या ३ दिवसांच्या चिंतना शिबारात चर्चा केली, असं नाना पटोले म्हणाले.

 ”भाजपने सत्तेसाठी धर्माचं बाजारीकरण केलंय”

 -काँग्रेस हा एक विचार आहे. आम्ही सत्तेसाठी नको ते काम करत नाही. त्यामुळे आम्ही मोठे झालो आहोत. भाजप निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातो, तसा गैरवापर काँग्रेस करणार नाही. आम्ही विचाराने लढाई जिंकतो. देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांसोबत बोलायला तयार नाही. महागाई वाढत चालली आहे. भाजपच्या काळात नोकऱ्या गेल्या आहेत. भाजपकडून निवडणुका जिंकण्यासाठी धर्माचा वापर केला जात आहे. माझ्या हिंदू धर्माचं राजकीयकरण करणं बरोबर नाही. माझा धर्म हे शिकवत नाही. भाजप सत्तेसाठी धर्माचं बाजारीकरण करत आहे, असा आरोप देखील पटोलेंनी केला.

अजित पवारांना प्रत्युत्तर –

नाना पटोले भाजपमधून आले आहेत. त्यामुळे आमच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका भाजपने करावी का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता. त्यालाच आता पटोलेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ”नाना पटोलेंचा इतिहास सर्वांना माहिती आहे. मी सत्तेसाठी लढणारा कार्यकर्ता नाही. माझ्या पार्श्वभूमीची चर्चा करण्याची गरज नाही. सत्तेत राहून गद्दारी करण्याचं काम नाना पटोलेंनी केलं नाही. जे माझ्याबद्दल बोलतात त्यांची पार्श्वभूमी देशाला माहिती आहे”, असं प्रत्युत्तर नाना पटोलेंनी अजित पवारांना दिलं आहे.

सप्टेंबरमध्ये काँग्रेस अध्यक्षांची निवड –

पक्षाच्या अंतर्गत निवडणुका सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील निवडणूक होणार आहे. त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनावे, अशी आमची भूमिका आहे, असं नाना पटोले म्हणाले.

Congress Vs BJP : भाजप मिस कॉलने करोडो सभासद केले अशी घोषणा करतो  : कॉंग्रेसचा भाजपला टोला

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भाजप मिस कॉलने करोडो सभासद केले अशी घोषणा करतो

: कॉंग्रेसचा भाजपला टोला

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार संघटनात्मक निवडणुकीच्या प्रक्रिया चालू आहे. पुण्याचे निवडणुक निर्णय अधिकारी दौलत राम नायक यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली.

     आपल्या प्रास्ताविकपर भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहरामध्ये संघटनात्मक निवडणुका घेण्यात येणार आहे. त्याच्या तयारीसाठी आज दौलत राम नायक यांच्या उपस्थितीत ही बैठक बोलविण्यात आली आहे. बुथ पातळीवरून शहर पातळीपर्यंत टप्प्या टप्प्याने निवडणुका घेण्यात येणार आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण संघनात्मक निवडणुक व्‍यवस्थित पार पाडू.’’

     मुख्य निवडणूक अधिकारी दौलत राम नायक म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेस कार्यकारिणीच्या आदेशानुसार देशात काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. संघटनात्मक निवडणुका पारदर्शक करण्यासाठी राहुल गांधी यांनी यावेळी डिजीटल सभासद नोंदणीची प्रक्रिया राबविली. या डिजीटल सभासद नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांनी बुथ पातळीवर सभासद नोंदणी केली आहे. बुथ पातळीवरची निवडणुक २८ मे पर्यंत आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यानंतर ब्लॉक व शहर पातळीवरच्या निवडणुका होणार. ज्यांनी संघटनेसाठी काम केलेले आहे त्यांना संघटनेमध्ये स्थान देण्यात येणार आहे. १० जून पर्यंत शहर काँग्रेची निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाची निवडणुक ऑगस्ट महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे.’’

     यानंतर माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्षाची संघटनात्मक निवडणुक मिस कॉलने करता येत नाही. भारतीय जनता पक्ष मिस कॉलने करोडो सभासद केले अशी घोषणा करतात. वास्तविक पाहता मिस कॉलद्वारे केलेली  निवडणुक प्रक्रिया पारदर्श नसते. काँग्रेस एकमेव पक्ष आहे की ज्याची निवडणुक प्रक्रिया बुथ पातळीवरून अखिल भारतीय पातळीपर्यंत पारदर्शक पध्दतीने राबविली जाते. मला खात्री आहे की, आपणा सर्वांच्या सहकार्याने आपण संघटनात्मक निवडणूक यशस्वीपणे पार पाडू.’’

     यावेळी माजी आमदार माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांची भाषणे झाली.

      यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस अरविंद शिंदे, कमल व्‍यवहारे, पुजा आनंद, गोपाळ तिवारी, रमेश अय्यर, लता राजगुरू, रविंद्र धंगेकर, अजित दरेकर, रफिक शेख, राजेंद्र शिरसाट, मेहबुब नदाफ, प्रविण करपे, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, विजय खळदकर, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, सुनील घाडगे, शोएब इनामदार, प्रदीप परदेशी, साहिल केदारी, शिलार रतनगिरी, राहुल तायडे, शानी नौशाद, स्वाती शिंदे, प्रकाश पवार, सुरेश कांबळे, रजनी त्रिभुवन, अंजली सोलापूरे, गीता तारू, पपिता सोनावणे, शारदा वीर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Mohan Joshi : मोदी सरकारने दिला मध्यमवर्गीयांना धोका – माजी आमदार मोहन जोशी

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

मोदी सरकारने दिला मध्यमवर्गीयांना धोका

– माजी आमदार मोहन जोशी

पुणे – महागाईचा दणका देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मध्यमवर्गीयांचा केवळ अपेक्षाभंगच केला नाही तर, धोकाही दिला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

पेट्रोल, डिझेल, इंधनाच्या दरवाढीवर मोदी सरकारने नियंत्रण ठेवले नाही, भाव वाढत राहिले. पर्यायाने खाद्यतेल, दूध, आदी जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले. महागाईने गरीब, मध्यमवर्ग त्रस्त झाला. पुण्यात पेट्रोल लिटरमागे १२०रुपये झाले. पेट्रोल, डिझेलचे दराची शंभरी केव्हाच ओलांडली आणि आता घरगुती गॅस सिलिंडरमध्ये ५० रुपये दरवाढ करून त्याची किंमत एक हजार रुपये केली आहे. गॅस दरवाढीने गरीब, मध्यमवर्गाचे घरगुती बजेट कोलमडलेच शिवाय चहा, खाद्यपदार्थ यांचेही भाव वाढणार आहेत. महागाई अशी चौफेर वाढत असताना भाजपचे नेते मूग गिळून गप्प बसले आहेत हे संतापजनक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाने गरीब, मध्यमवर्गाचा नेहमीच कैवार घेतला. २०१४ पर्यंत केंद्रात काँग्रेस आघाडी सरकार होते. त्यावेळी घरगुती गॅस सिलिंडरचा दर ४१० रुपये होता. सरकार ८२७ रुपये सबसिडी देत होते. आठ वर्षात भाजप सरकारने सिलेंडर चा दर ४१०रुपयांवरून १०००रुपयांवर नेऊन ठेवला आहे. देशातील गरीब, मध्यमवर्गाचे जीणे हैराण करुन मोदी सरकारने केवळ अपेक्षाभंग केला नसून त्यांना धोकाही दिला आहे.

महागाई विरोधात काँग्रेस पक्ष सतत आंदोलन करत आला असून यापुढेही जनतेचा आवाज मांडत राहील, असे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

Congress Vs BJP : भाजप शिष्टमंडळाची भेट निव्वळ स्टंटबाजी : भाजपच्या ५ वर्षाच्या कारभारात पुणे गेले ‘ खड्डयात ‘

Categories
PMC Political पुणे

भाजपच्या ५ वर्षाच्या कारभारात पुणे गेले ‘ खड्डयात ‘

भाजप शिष्टमंडळाची भेट निव्वळ स्टंटबाजी

– माजी आमदार मोहन जोशी

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात महापालिकेचा कारभार ढासळला आणि जाता जाता रस्ते खोदाई करून भाजपने पुणे शहर अक्षरशः खड्डयात घातले, अशी खरमरीत टीका महाराष्ट् प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे .

गेले वर्ष, सव्वा वर्ष झाली शहराच्या मध्यवस्तीत रस्ता खोदाईची कामे चालू आहेत. या कामांमुळे वाहतूक विस्कळीत झाली असून रहिवासी आणि दुकानदार वैतागले आहेत. रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने व्हावीत, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मोहन जोशी यांनी आज ( गुरुवारी ) दिले.

नवीन जलवाहिनी टाकणे, ड्रेनेज लाईन टाकणे अशा विकास कामांना काँग्रेस पक्षाचा विरोध नाही. परन्तु महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपने पाच वर्ष ठोस कामे केली नाहीत आणि निवडणुका जवळ येताच घाईघाईने काम सुरू केली. त्यामुळे रस्ते खोदले गेले पण नियोजन नसल्याने कामे लांबत गेली, खोदाईनंतर रस्त्यांची डागडुजी अशास्त्रीय आणि निकृष्ट पद्धतीने केली जात आहे. काही ठिकाणी अर्धा रस्ता डांबरी आणि अर्धा काँक्रीटचा अशी अवस्था झाली आहे. सततच्या खोदकामामुळे वातावरणात धूळ पसरून रहिवासी, दुकानदार यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

महापालिकेच्या कामांबद्दल तक्रार करणारे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना नुकतेच दिले. हा प्रकार निव्वळ स्टंटबाजीचा आहे. दि. १५मार्च २०२२पर्यंत भाजपची सत्ता होती. त्या ५ वर्षाच्या कार्यकाळात उदासिनता दाखविली आणि आता सत्ता गेल्यावर विकासकामे लवकर व्हावीत याची आठवण भाजपला झाली, हा ढोंगीपणा पुणेकरांच्या लक्षात आला आहे. मुळा मुठा नदी सुधारणा, समान पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती अशा कोणत्याच मोठ्या प्रकल्पातही भाजपला कार्यक्षम दाखविता आलेली नाही, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे.

congress Agitation : सर्व सामान्य महिलांसाठी मोदी हे विकास पुरुष नसून विनाश पुरुष  :  अभय छाजेड

Categories
Breaking News Political पुणे

सर्व सामान्य महिलांसाठी मोदी हे विकास पुरुष नसून विनाश पुरुष  :  अभय छाजेड

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष  नानाभाऊ पटोले तसेच पुणे शहर अध्यक्ष  रमेश बागवे यांच्या सूचनेनुसार पंडित नेहरू स्टेडियम ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दांडेकर पूल चौक येथे ‘ महागाई जुमला आंदोलन ‘ घेण्यात आले.

यावेळी बोलताना कमलताई व्यवहारे म्हणाल्या ” मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारला आहे. महिलांच्या डोळ्यातून महागाईचे अश्रू वाहत असून महिलांसाठी मोदी हे महागाईचे प्रतीक झाले असून अनेक ठिकाणी महिला रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा व भाजपा सरकारचा धिक्कार करीत आहेत.”

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यावेळी म्हणाले ” केंद्रातील भाजपा प्रणित सरकारमधील सर्वेसर्वा असलेले नरेंद्र मोदी हे हुकूमशहा प्रमाणे काम करीत असून केवळ जुमलेबाजी करणारे प्रचार मंत्री म्हणून काम बघत आहेत. नोटबंदी सारख्या देशाला मागं येणाऱ्या घोषणेनंतर जीएसटी ची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी तसेच निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये खोटी आश्वासने देणे , देशातील प्रमुख राज्यांमध्ये निवडणुका असताना संपूर्ण देशामध्ये पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ न करता निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर घरगुती गॅस दर पेट्रोल डिझेल खाद्यतेल सर्व जीवनावश्यक वस्तू मध्ये वाढ करणे अशा प्रकारे मोदी सरकारने सर्वसामान्यांना देशोधडीला लावले असून मोदी हे विकास पुरुष नसून सर्वसामान्यांसाठी व महिलांसाठी विनाश पुरुष झाले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचणाऱ्या या केंद्रातील मोदी सरकारचा मी जाहीर निषेध करतो.”

सदर आंदोलनामध्ये पं. नेहरू ब्लॉक कांग्रेसचे अध्यक्ष सचिन आडेकर , द स पोळेकर , सौ अनिता अनिल धिमधिमे , रोहिणी मल्हाव , स्वाती शिंदे , पपीता सोनवणे सोनिया ओव्हाळ , किरण मात्रे , अविनाश खंडारे , अविनाश अडसूळ , राजाभाऊ नकाते , किरण सोमवंशी , विजय घोलप , अमित काळे , अजय खुडे, दिलीप लोळगे उपस्थित होते.

Congress : MNS : Sanjay Jagtap : मनसे पदाधिकाऱ्यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मनसे पदाधिकाऱ्यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

पुणे : काँग्रेस भवन, पुणे येथे पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार  संजय चंदूकाका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस विचारसरणीने प्रेरित झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देहूरोड येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी मलिक हसन शेख, असिफ इसा सय्यद, हसन शेख, जावेद शेख, हुसेन शेख, जेदिन नाडार, सुरज गायकवाड, अजय बाला, संकेत गायकवाड, आकाश सुतार, अजय रामोशी रवी स्वामी, शरद सोनी व माजी पोलीस अधिकारी आबूबकार लांडगे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आगामी काळात देहूरोड परिसरात काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चय केला.
या सर्वांचे स्वागत करत असताना पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष-आमदार संजय चंदूकाका जगताप म्हणाले की, काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडी मध्ये एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच इतर दोन पक्षाला कधीही दुखावण्याचा प्रयत्न केला नाही किंवा भविष्यातदेखील आम्ही कधीही तो प्रयत्न करणार नाही. सध्या वर्तमानपत्रातून मावळ परिसरातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसात सातत्याने येत आहेत.  या निमित्ताने मला मित्र पक्षाला सूचित करायचे आहे की, काँग्रेस पक्षाला अनेक जणांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण तो कधीही संपला नाही कारण काँग्रेस जनसामान्यांची मजबूत विचारधारा आहे.  तसेच आजही देहूरोड लोणावळा मावळ या ठिकाणी काँग्रेस पक्ष अतिशय सक्षम असून या ठिकाणच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर ती अशा कोणत्याही वाऱ्या वादळाचा काहीही फरक पडणार नाही. जे आता या पक्षातून दुसरीकडे गेले आहेत ते काँग्रेस पक्षात किती दिवस होते याचा देखील अभ्यास करावा असे संजय जगताप म्हणाले.
  यावेळी मावळ परिसरातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत  सातकर, मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा यशवंत मोहोळ, देहूरोड काँग्रेसचे अध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, खजिनदार महेश बापु ढमढेरे, सरचिटणीस पृथ्वीराज पाटील,दीपक साचसर वेंकटेश कोळी,गफूरभाई शेख, राणी पाडियन, मेहबूब गोलंदाज, बबन टोपे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Madhav Bhandari : पंतप्रधान संग्रहालयाला काँग्रेसचा विरोध दुर्दैवी

Categories
Political पुणे

पंतप्रधान संग्रहालयाला काँग्रेसचा विरोध दुर्दैवी

पुणे : ‘‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथे तीन मूर्ती भवन येथे उभारण्यात आलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला काँग्रेस पक्षाने केलेला विरोध हा त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या सरंजामी वृत्तीचा निदर्शक आहे. देश बदलला आहे याची जाणीव ठेऊन काँग्रेस पक्षाने आता तरी भारत हा कोण्या एकट्याची जहागीर असल्याची भावना सोडावी,’’ असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.
 भांडारी म्हणाले, ‘‘पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे तीन मूर्ती भवन येथे वास्तव्य होते. तेथे देशाचे पंतप्रधान म्हणून आतापर्यंत काम केलेल्या सर्व नेत्यांच्या कार्यांचे स्मरण करणारे संग्रहालय उभारले आहे. येथे केवळ भाजपचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण केलेले नाही. तर, काँग्रेससह अन्य पक्षांच्या माजी पंतप्रधानांच्या कार्याचाही गौरवपूर्ण उल्लेख आहे. त्यामुळे काँग्रेसने संग्रहालयावर टीका करून ते अन्यत्र उभारायला हवे होते, असे म्हणणे दुर्दैवी आहे.’’‘‘देशात लोकशाही असली तरी प्रत्यक्षात काँग्रेसने आणि त्यातही नेहरू गांधी घराण्याने देशावर राज्य करत राहावे, अशी काँग्रेस पक्षाची मानसिकता आहे. भारत बदलला आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत जनतेने काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतक्याही जागा दिल्या नाहीत. आता तरी काँग्रेसने इतर पक्षातील नेत्यांचा आदर करावा,’’ असे त्यांनी नमूद केले.

Balasaheb Thorat : Congress : काँग्रेसने उभारली महागाईची गुढी : बाळासाहेब थोरात म्हणाले, महागाई लादणाऱ्या मोदी सरकारने राजीनामा द्यावा 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महागाई लादणाऱ्या मोदी सरकारने राजीनामा द्यावा 

  – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी

: काँग्रेसने उभारली महागाईची गुढी.

पुणे : सध्याच्या महागाईला कारणीभूत असलेल्या मोदी सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या महागाईविरोधी आंदोलनात बोलताना केली.

     जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी अलका टॉकीजजवळील टिळक चौकात निदर्शने करण्यात आली. चौकात महागाईची गुढी उभारून निषेध नोंदविण्यात आला. यामध्ये आमदार संग्राम थोपटे, पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, देवीदास भन्साळी, अभय छाजेड, आबा बागुल, संजय बालगुडे, दीप्ती चवधरी, वीरेंद्र किराड, लता राजगुरू, रविंद्र धंगेकर, अरविंद शिंदे, अजित दरेकर, कमल व्यवहारे, दत्ता बहिरट, गोपाळ तिवारी, रमेश अय्यर, चंद्रशेखर कपोते, महिला काँग्रेस अध्यक्षा पूजा आनंद, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, सोनाली मारणे, प्रशांत सुरसे, स्वाती शिंदे आदी सहभागी झाले होते.

     महागाईच्या विरोधात २०१४ सालापूर्वी आंदोलन करणारे भाजपचे नेते आता कुठे लपले आहेत? असा सवाल थोरात यांनी केला आणि या नेत्यांना जनता जाब विचारल्याशिवाय राहाणार नाही, असे थोरात यांनी सांगितले. जनतेच्या मनात महागाईबद्दल असंतोष असून त्याचा कधीही उद्रेक होईल, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला.

     जनतेला अच्छे दिनचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते परंतु २०१४ पासून सातत्याने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत चालले आहे. या विषयावर पंतप्रधान भाष्य करीत नाहीत. भाववाढमुळे सर्वसामान्य जनतेला जगणे कठिण झाले आहे. सणासुदीच्या काळात भाववाढ करून मोदी सरकारने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यात मोदी सरकार अपयशी ठरले असे पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

      महाराष्ट्रात उद्या गुढीपाडव्याचा सण साजरा होईल. या सणाला गोड पदार्थ करून नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. पण सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत चालले आहेत, सणाचा आनंद राहिला नाही. केंद्रातील मोदी सरकार भाववाढ रोखण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.

     यावेळी सुजीत यादव, विनोद रणपिसे, शिलार रतनगिरी, वाल्मीक जगताप, किरण मात्रे, अविनाश अडसूळ, बाळासाहेब अमराळे, राहुल वंजारी, शानी नौशाद, राकेश नाणेकर, नरेंद्र व्‍यवहारे, शोभना पण्णीकर, प्रकाश पवार, शिवा मंत्री, छाया जाधव, संगीता पवार, रजनी त्रिभुवन, अनुसया गायकवाड, ज्योती परदेशी, सतिश पवार, राजेंद्र भुतडा, प्रविण करपे, प्रदिप परदेशी, रमेश सोनकांबळे, अजित जाधव,  गौरव बोराडे, विठ्ठल गायकवाड, सुरेश कांबळे, कान्होजी जेधे, मेहबुब नदाफ, शाबीर खान, आयुब पठाण, चेतन आगरवाल, दिपक ओव्‍हाळ, इंद्रजीत भालेराव, सुंदरा ओव्‍हाळ, सीमा महाडिक, ताई कसबे, जावेद निलगर, सुनिता नेमुर, जयश्री कांबळे, अण्णा राऊत यासंह असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Congress Digital Member Registration : कॉंग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणीला प्रतिसाद : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ३० तारखेला पुण्यात घेणार आढावा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कॉंग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणीला प्रतिसाद

: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ३० तारखेला पुण्यात घेणार आढावा

पुणे : समाजाच्या सर्व थरातून कॉंग्रेस पक्षाच्या डिजीटल सभासद नोंदणीला प्रतिसाद मिळू लागल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साह वाढला आहे, असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले.

पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा लोकसंपर्क वाढावा, पक्षाची ध्येयधोरणे लोकांना सांगावीत अशा उद्देशाने पक्षाच्या अध्यक्ष श्रीमती सोनियाजी गांधी यांनी डिजिटल सभासद नोंदणीची मोहीम राबविण्याचा आदेश दिला. त्यानुसार देशभरात सभासद नोंदणी मोहीमदि. ३१ मार्चपर्यंत राबविण्यात येत आहे. पुणे शहरातही सर्व पेठा आणि उपनगरांमध्ये पक्षाचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली सक्रीय झाले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दि. ३० मार्च रोजी पुणे शहराला भेट देणार असून सभासद नोंदणीचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.

महागाई, पेट्रोल -डिझेल दरात वाढ, बेरोजगारी या कारणाने केंद्रातील मोदी सरकारविषयी जनतेत रोष आहे किंबहुना मोदी सरकारबद्दल नैराश्याची भावना आहे, असे सभासद नोंदणीच्यावेळी लोकांशी संपर्क साधताना आढळले आणि लोकांना काँग्रेस हाच योग्य पर्याय वाटत आहे. त्यामुळे तरुणवर्ग, गरीबवर्ग काँग्रेसचा सभासद होत आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

Sunil Shinde : असंघटित कामगार काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक पदी सुनील शिंदे यांची निवड

Categories
Political social पुणे महाराष्ट्र

असंघटित कामगार काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक पदी सुनील शिंदे यांची निवड

पुणे:- काँग्रेस पक्षाच्या असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक पदी कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या मान्यतेने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी श्री शिंदे यांची निवड झाल्याचे कळविले आहे.

सुनील शिंदे हे गेली पंचवीस वर्षे संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय देण्याचे काम करीत आहेत. त्यांनी या पूर्वी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाचे संचालक म्हणूनही काम केले आहे. सध्या पुणे जिल्हा माथाडी मंडळाचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. कामगार क्षेत्रातील कार्य संदर्भात  शिंदे यांना विविध देशांमध्ये कामगार प्रश्नांवर बोलण्यासाठी ही यापूर्वी संधी मिळाली आहे. पुण्यातील कामगार नेत्याला काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल येथील कामगारांनी व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी श्रीमती सोनिया गांधी यांचे आभार व्यक्त केले व आनंदही व्यक्त केला आहे. असंघटित कामगारांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर सोडविण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी याचा उपयोग होईल असे शिंदे यांनी सांगितले व ही मोठी संधी दिल्याबद्दल श्रीमती सोनिया गांधी व असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदित राज यांचेही आभार व्यक्त केले आहेत.