Aba Bagul Pune Loksabha | आबा बागुल यांची नाराजी दूर होईल | बाळासाहेब थोरात

Categories
Breaking News Political पुणे

Aba Bagul Pune Loksabha | आबा बागुल यांची नाराजी दूर होईल | बाळासाहेब थोरात

 

Aba Bagul Pune Loksabha – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने महापालिकेतील माजी गटनेते आबा बागुल नाराज आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांनी बागुल यांची भेट घेतली होती. या संदर्भातील प्रश्नावर थोरात म्हणालेनाराज्यांकडे जाणे बोलणे, आमचे काम आहे, बागुल‌ यांची नाराजी दूर होईल अशी अपेक्षा आहे.

| इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास निवडणुक रोख्यांचा तपास‌ करू – पृथ्वीराज चव्हाण

 

ईडी‌ सीबीआयच्या धाडी‌ टाकून मोदी सरकारने मोठ्या कंपन्या व व्यक्तींना भिती दाखवत निवडणुक रोख्याच्या नावाखाली पैसा गोळा केला. त्यांनी  निवडणुक रोख्याच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेश प्रचारप्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. देशात इंडीया आघाडीचे‌ सरकार आल्यावर‌ आम्ही निवडणुक रोखे प्रकरणाचा तपास करू, असेही ते म्हणाले.

 

पुणे लोकसभेचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार आ. रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार दिप्ती चवधरी, ॲडअभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड,गोपाल तिवारी इत्यादी  उपस्थित होते.

 

चव्हाण म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातील विकास‌ दर जेवढा होता, तेवढा विकास दर मोदींच्या काळात राहिला असता तर आपली अर्थव्यवस्था आज जगात‌ तिसऱ्या नंबरवर गेली असती. मात्र, मोदींच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेचा दर खाली आला आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. आज देशावर २०६ लाख कोटी‌ कर्ज आहे. लोकांना चुकीची माहिती देवून भुरळ टाकण्याचे काम मोदी करत आहेत.

 

मोदी सरकारने दहा वर्षात काय केलं याची‌ श्वेत पत्रिका काढावी, म्हणजे २०१४ पूर्वी आणि नंतर काय झालं याची‌ तुलना करता येईल.  दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. दहा वर्षात २० कोटि लोकांना रोजगार मिळायला हवा होता, मात्र काहीच झाले नाही, उलट देशात बेरोजगारी वाढली. डिझेल पेट्रोलचा‌ भाव ३५ रुपये करण्याचे आश्वासन दिले होते, यांशिवाय शंभर शहरे‌ स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याचे काय झाले याचा अहवाल मोदींनी तयार करावा, असेही चव्हाण म्हणाले.

 

मोदी सरकार शेतकऱ्याच्या जीवनात वीष कालवत आहे. कोणालाही विश्वासात न घेता शेतीसंदर्भात तीन काळे कायदे केले. शेतकरी आंदोलनात सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा‌जीव गेला. शेत मालास भाव नाही. कांदा, गहू, साखर, तांदुळ यांवर निर्यातबंदी घातल्यामुळे भाव पडले आहेत. त्यामुळे‌या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे मतदान महत्वाचे आहे.

 

२०१९ मध्ये‌ सत्तर टक्के लोकांनी मोदी विरोधी मते दिली. मात्र मत विभाजनामुळे मोदी सत्तेवर आले. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडी उभे केली आहे. भाजपला राज्य घटना बदलायची आहे, त्यासाठी त्यांचे नेते ४०० पार म्हणत आहेत. मात्र, देशात मोदी विरोधी वातावरण आहे, पंतप्रधानांचा दांभिकपणा व खोटारडेपणा जनतेसमोर आलेला आहे. त्यामुळे निवडणुकीचा‌ निकाल लागल्यानंतर भाजप २०० पारही करू शकले नाही, हे कळेल. मत विभाजनासाठी भाजपकडून वंचित व एमआयएमचे उमेदवार निवडणुकीत उतरवले जात आहेत. मागच्या वेळी वंचित व एमआयएमची आघाडी होती, या निवडणुकीत ती नाही. आता संविधान बचावण्यासाठी मोदींचा पराभव गरजेचे आहे. ही निवडणुक संविधान व देश वाचवणारी आहे, त्यामुळे वंचित व एमआयएमच्या उमेदवारांना जनता मते देणार नाहीत.

 

शेतकरी, युवक, महिला, कामगार व सामाजिक न्याय यावर आधारीत काँग्रेसचा जाहीरनामा आहे. शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर स्वतंत्र आयोग असेल. आम्ही कर्नाटकातील पाचही आश्वासने पूर्ण केली आहेत. लोकसभेसाठी‌ दिलेली देखील सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करू, असेही चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. राज्यात आर्थिक व नैतीक भ्रष्टाचार आहे. फोडा फोडीचा लोकांना राग आलेला आहे. आमदार तिकडे गेलेले असले तरी जनता गेलेली नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला प्रचंड मोठा विजय मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

 

——————-

४८ पैकी ४६ ठिकाणी एकमताने

 

महाविकास आघाडीतील जागा वाटप ४८ पेकी ४६ ठिकाणी एकमताने झाले. दोन जागांबाबत तिढा निर्माण झाला. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी, तेथे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आम्ही शेवटपर्यंत आग्रही होतो. ती जागा आमची हक्काची आहे. मात्र आता निवडणुक सुरू झाल्याने सर्वांनी एकत्र येवून लढणे गरजेचे आहे, विशाल पाटील माघार घेतील आणि सांगलीतही गोड शेवट होईल अशी आम्हाला आशा आहे , असेही‌ चव्हाण म्हणाले.

 

————

 

 

————–

 

काळ्या पैशामध्ये मोदींचे तोडपाणी :

 

परदेशी बँकांमधील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये  १५ लाख रुपये‌जमा करण्याचे आश्वासन देवून नरेंद्र मोदी २०१४ मध्ये‌ सत्तेवर आले. त्यानंतर भारत सरकारकडे विविध संस्थांच्या माध्यमातून स्विस बँक आणि परदेशात गुंतवलेल्या काळ्या पैशाची‌ सर्व माहिती आली. आजही भारत सरकारकडे यांची माहिती आहे.  तरीही मोदी सरकारने आजवर संबंधीतांवर  कारवाई केला नाही. याचा अर्थ यामध्ये कुठेतरी तोडपाणी झाले आहे. इंडिया आघाडीचे‌ सरकार आल्यानंतर आम्ही याबाबत माहिती उघड करू, असेही‌चव्हाण म्हणाले

Supriya Sule Baramati Loksabha | या लढतीत मायबाप जनता माझ्या सोबत राहिल याची मला खात्री | सुप्रिया सुळे

Categories
Breaking News Political पुणे

Supriya Sule Baramati Loksabha | या लढतीत मायबाप जनता माझ्या सोबत राहिल याची मला खात्री | सुप्रिया सुळे

Supriya Sule Baramati Loksabha- (The Karbhari News Service) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP- Sharadchandra Pawar) या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवित असणाऱ्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच त्या म्हणाल्या कि या लढतीत माय बाप जनता माझ्या सोबत राहील याची मला खात्री आहे. (Baramati Loksabha Constituency)

याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार सचिन अहिर, सुषमा अंधारे, माजी मंत्री व आमदार विश्वजित कदम, खासदार व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, आमदार अशोक पवार, माजी आमदार जयदेव गायकवाड, युगेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, दाैंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले यांच्यासह महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज आज विधान भवन येथे आदरणीय पवार साहेब व त्यांच्यावर नितांत प्रेम करणारी जनता, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साक्षीने दाखल केला. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद, शुभेच्छा, अतूट विश्वास आणि भरघोस पाठबळ यांच्या जोरावर मला पुन्हा या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल हा विश्वास आहे. मायबाप जनतेची सेवा, महिला, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राखण्यासाठी मी लढत आहे. या लढतीत मायबाप जनता माझ्या सोबत राहिल याची मला खात्री आहे.”

तत्पूर्वी त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन मी लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होत आहे” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Sunil Gogle | Congress | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले यांचा बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले यांचा बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

पुणे महानगरपालिकेत वर्ष 2007/ 2012 राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील गोगले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांच्या उपस्थिती विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे

यावेळी गोगले म्हणाले, ‘आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोहन जोशी , रमेश बागवे यांच्याशी संपर्क झाला माझ्यावर विश्वास दाखवून मला कॉंग्रेस पक्षात येण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच भाजपच्या शासन काळातील वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकन्यांवरील अत्याचार, समाजा समाजातील कटुता, संविधानाला निर्माण झालेला धोका, राष्ट्रीय असुरक्षितता, शोषित, दलीत, महिला,अल्पसंख्याक यांच्यावरील अन्याय इ. अनेक समस्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे आदरणीय राष्ट्रीय नेते सन्माननीयश्री राहुलजी गांधी यांच्या ऐतिहासिक ” भारत जोडो यात्रा” मुळे मी आत्यंतिक प्रभावित झालो आणि काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

काँग्रेस पक्षाचा एक सैनिक म्हणून आपण जी जबाबदारी माझ्यावर सोपवाल ती प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करीन व पक्षाच्या ध्येय धोरणांना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे योजले आहे

Monsoon Session | विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

शेतकऱ्यांच्याप्रश्नी सरकार गंभीर नाही; शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही

पावसाळी अधिवेशात सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरणार
-विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई| “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं राज्य सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवून विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले आहे, हे सरकार अद्याप विधीमान्य नाही. सरकारकडून विकासकांना स्थगिती देऊन राज्याच्या विकासाला खीळ घालण्याचं काम सुरु आहे. शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. विदर्भ, मराठवाडा, कोकणासह राज्यातील २८ जिल्ह्यांत अतिवृष्टी, पूरस्थितीने हाहा:कार माजला असताना, सव्वाशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असताना, राज्यातील शेतकरी मदतीअभावी आत्महत्या करत असताना, राज्य सरकारकडून सामान्य जनतेला कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. ‘एनडीआरएफ’चे मदतीचे निकष कालबाह्य झालेले असताना केवळ त्याच्या दुप्पट मदत देण्याची सरकारची घोषणाही जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे. राज्यात महिला, बालिकांवर अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असताना सत्ताधारी पक्षातले सदस्य चिथावणीखोर भाषा वापरुन लोकांना भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून सरकारला सत्तेचा दर्प चढला आहे. ज्या सरकारची विश्वासार्हता आणि वैधता संदिग्ध आहे, अशा सरकारच्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे लोकशाही व्यवस्था आणि राज्यातील जनतेशी प्रतारणा ठरेल,” असा घणाघाती आरोप करुन पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्यावतीने बोलविण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाच्यावतीनं बहिष्कार घालण्यात आल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

मुंबईतील विधानभवनाच्या वार्ताहरकक्षात आयोजित पत्रकार परिषदेत सर्व विरोधी पक्षांच्यावतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार एकनाथ खडसे, आमदार अनिल परब, आमदार भाई जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित होते. तत्पूर्वी विधानभवनातीव विरोधी पक्षनेत्यांच्या समिती सभागृहात विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नाना पटोले, अनिल परब, अजय चौधरी, रईस शेख, बाळाराम पाटील, कपिल पाटील, सुनील प्रभू, सुरेश वरपूडकर, अनिल पाटील, सचिन अहिर, मनिषा कायंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला व त्यासंबंधीचे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

विरोधी पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात अतिवृष्टीने 15 लाख हेक्टरवरील पीकांचे नुकसान झालेले असताना, अतिवृष्टीग्रस्त भागात विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबलं असताना, चहापान कार्यक्रम टाळून केवळ चर्चा करणं संयुक्तिक ठरलं असतं. परंतु ही संवेदनशीलता सरकारने दाखविलेली नाही. दि. 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून तब्बल 40 दिवस सत्ताधाऱ्यांनी राज्याला मंत्रिमंडळ दिलं नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊ शकला नाही. महाराष्ट्रासारखं देशातलं सर्वात प्रगत राज्य वाऱ्यावर सोडण्याचं काम आपण केलं.

विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत करण्याची घोषणा घाईघाईनं करुन जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न केला. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असून त्यात अनेक घटकांचा समावेश नाही. दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. त्यामुळे ही घोषणा फसवी आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री पाच वेळा दिल्लीला जाऊन आले, परंतु महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्याची किंवा राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर करण्याची मागणी केंद्र सरकारकडे त्यांनी केली नाही.

दिल्ली भेटीतील ‘नीती’ आयोगाच्या बैठकीवेळचा फोटो माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. तो फोटो महाराष्ट्राच्या सन्मानाला धक्का आहे. फोटो पाहिल्यानंतर ‘धर्मवीर’ चित्रपटातील स्वर्गीय आनंद दिघे यांनी विचारलेला ‘एकनाथ कुठे आहे…?’ हा प्रश्न महाराष्ट्राला, मराठी माणसाला पडला आहे. मा. मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभं केलं म्हणून सन्मान ढासळावा एवढा महाराष्ट्र निश्चितंच लेचापेचा नाही, परंतु आमचे मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यानंतर महाराष्ट्राचा सन्मान राखू शकले नाहीत, याचे दु:ख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राभेटीचा अभिमानास्पद इतिहास रचलेल्या महाराष्ट्राला हे दु:ख अधिक बोचणारं आहे. यापुढे तरी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही, याची काळजी आपण घ्यावी.

महाराष्ट्राच्या अभिमानाला धक्का लावण्याचं काम आपल्याकडून सातत्यानं घडत आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या स्मारक विकासाच्या कामाला आपण स्थगिती दिली. वंचित – शोषितांच्या वेदनांना आपल्या साहित्यातून वाचा फोडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती नुकतीच 1 ऑगस्टला साजरी झाली. महाविकास आघाडी सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने समिती स्थापन करून 7 खंड प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता, त्यापैकी 2 खंड प्रकाशितही झाले. परंतु, सरकारमध्ये आल्याआल्या कोणताही विचार न करता आपण ही समितीही बरखास्त केली, प्रकाशनाचे काम रखडवले. छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊं माँसाहेब महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आहेत. अशा महामानवांच्या स्मारकांच्या विकासकामांना आणि समित्यांना स्थगिती देणं, पुनर्विचाराचा निर्णय करणं, हे निषेधार्ह आहे.

तत्कालिन मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. सन्माननीय ठाकरे साहेबांनी अंतिम टप्प्यात घेतलेले अनेक निर्णय शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांना गती देणारे होते. त्या निर्णयप्रक्रियेत आपलाही सहभाग होता. असं असूनही, मंत्री म्हणून स्वत:च घेतलेल्या निर्णयांना मुख्यमंत्री झाल्यानंतर स्थगिती देण्याचा प्रकार अनाकलनीय, राजकीय हेतूने प्रेरित व विकास कामात अडथळा निर्माण करणारा आहे. राज्याचे मा. मुख्यमंत्री कुणाच्यातरी दबावाखाली असल्याने लोकोपयोगी निर्णय, विकासयोजनांना स्थगिती देत आहेत, राज्याच्या विकासप्रक्रियेला खीळ घालत आहेत, ही लोकभावना आहे. त्याबद्दल लोकप्रतिनिधी व जनतेत आपल्याबद्दल तीव्र रोष आहे. मुंबईतील बीकेसी येथील मध्यवर्ती मोक्याची जागा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नाममात्र किमतीत देण्याचा आपला निर्णय अशाच प्रकारचा व राज्याच्या हितांशी प्रतारणा करणारा आहे. मुंबईतील मेट्रो-सहाच्या कारशेडसाठी आपण आता कांजूरमार्गची जागा मागितली आहे. मेट्रो-तीन साठी आरे आणि मेट्रो-सहा साठी कांजूरमार्ग हा घोळ वाढवून पर्यावरणाचं आणि आता राज्याचं हजारो कोटींचं नुकसान करण्यास आपलं सरकार जबाबदार आहे.

आपण मुख्यमंत्री असलेल्या दोन सदस्यीय मंत्रिमंडळाने 40 दिवसात 750 शासननिर्णय निर्गमित केले. मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्र्यांना बिनखात्याचे मंत्री ठेवून मुख्यमंत्री म्हणून आपण, केवळ एका व्यक्तीने महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे सगळे निर्णय घेतलेत. राज्याचे धोरणात्मक निर्णय केवळ एका व्यक्तीने घेण्याची कृती सामुहिक निर्णयप्रक्रियेला छेद देणारी, लोकशाही व्यवस्था, नैतिकतेचे धिंडवडे काढणारी आहे. आपल्या सरकारने सत्तास्थापनेपासून शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, व्यापारी, उद्योजक, महिला, विद्यार्थी, युवक या समाजघटकांबद्दल असंवेदनशीलता दाखवली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची टक्केवारी कमी झाल्यानंतरही त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याबाबत आपल्याकडून कोणतीही पावलं उचलली गेलेली नाहीत. ही अकार्यक्षमता, असंवेदनशीलता अक्षम्य आहे.

महोदय, विधानसभेचे विरोधी पक्षनेते व अन्य नेत्यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचे दौरे केले. या दौऱ्यात अतिवृष्टीग्रस्तांचं दाहक, वेदनादायी वास्तव समोर आलं. ते वास्तव आणि करावयाच्या उपाययोजनांबद्दलचे सविस्तर निवेदन मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री महोदयांना देऊनही अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. अपेक्षित निर्णय घेण्यात आले नाहीत. अतिवृष्टीने झालेले नुकसान लक्षात घेऊन विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यात इतर भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार व फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत तत्काळ द्यावी. अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, पांरपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता शैक्षणिक शुल्क सरसकट माफ करावे, बुडालेल्या मजूरीपोटी शेतमजूरांना एकरकमी अनुदान द्यावे, आदीवासी बांधवांना खावटी अनुदान तत्काळ द्यावे, शेतजमीन पूर्ववत करण्यासाठी आर्थिक मदतीसह आवश्यक उपाययोजना कराव्यात, ‘एनडीआरएफ’, ‘एसडीआरएफ’च्या प्रचलित निकषांच्या पलिकडे जावून मदत करावी, अशा मागणी आपणास भेटून निवेदनाद्वारे केली होती. परंतु आपण ‘एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत देण्यात येईल’, अशी अवघ्या एका ओळींची घोषणा करुन आम्ही केलेल्या सर्व मागण्या दुर्लक्षित केल्या. आम्ही दिलेल्या निवेदनातील सर्व मागण्या मान्य होऊन त्यानुसार तात्काळ अतिवृष्टीग्रस्तांना, शेतकऱ्यांना, नागरिकांना मदत करण्यात यावी, अशी पुनर्मागणी करीत आहोत.

महोदय, अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. वीजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडीत आहे. शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटपाचे उद्दीष्ट निम्म्यानेही पूर्ण झालेले नाही. खरीप पिकांवरील रोगगाईचा प्रश्न गंभीर आहे. मराठवाड्यात गोगलगायींनी सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान केलं आहे. विदर्भात मिलिपिड किटकांमुळे शेतकरी संकटात आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत ई-पीकपाहणी व ऑनलाईन पद्धतीच्या वेगवेगळ्या आदेशांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. विमायोजनेच्या लाभांपासून शेतकरी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. नाफेडकडून कांदाखरेदी बंद झाल्याने कांद्याचे भाव पडले व त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आहे. या सर्वांना राज्य सरकारकडून अपेक्षित मदत तातडीने उपलब्ध करण्यात यावी.

नगराध्यक्ष व सरपंच यांची निवड थेट जनतेमधून करण्याचा निर्णय लोकशाहीविरोधी व अव्यवहार्य असल्यानं त्याचा पुनर्विचार होण्याची गरज आहे. राज्यातील नागरिक पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी, पीएनजी, वीजेच्या दरवाढीनं हवालदिल आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्ष म्हणून आपण राज्य सरकारकडे इंधनावरील करात पन्नास टक्के कपात करण्याची मागणी करत होता, परंतु सत्तेवर आल्यानंतर अवघी दोन ते तीन टक्के करकपात करुन आपण नागरिकांना फसवलं आहे. महागाई वाढवण्याचं पाप आपल्याकडून सातत्यानं घडत आहे. तांदूळ, डाळी, पीठ, दुध, दही, पनीरसारख्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी आकारण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय व आपण त्याला न केलेला विरोध हा राज्य सरकारची अगतिकता, संवेदनाशून्यता अधोरेखित करणारा आहे. जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाला विरोध करण्याचं धाडस आपण दाखवू शकला नाही, याचा खेद आहे.

राज्यातील जनता महागाईने पोळली असताना युवकांच्या वाढत्या बेरोजगारीचा प्रश्नही तितका गंभीर आहे. राज्य सरकारमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने व्हावी. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ओबीसी बांधवांच्या आरक्षणाचा मार्ग खुला झाला असला तरी आरक्षणाची टक्केवारी कमी झाली आहे. याचा तातडीने पुनर्विचार झाला पाहिजे. मराठा समाजबांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी दिलेला लढा ऐतिहासिक आहे. मराठा समाजाला त्यांचा न्याय्य हक्क, आरक्षणाचा लाभ पूर्वलक्षी प्रभावानं मिळावा. मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक विकासासाठीच्या योजनांना निधी देऊन त्या अधिक गतिमान करण्यात याव्यात.

टीईटी परीक्षा गैरव्यवहारात सत्तारुढ गटातील नेत्याच्या मुलांवर गंभीर आरोप होत असताना त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. एका निरपराध मुलीवर अत्याचार व तिच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप असलेली व्यक्ती पुन्हा मंत्रिमंडळात आली आहे. विरोधी पक्षात असतांना ज्या तत्कालिन मंत्र्यांवर आपण सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा अनेकांना आपण मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. मंत्रिमंडळातील नव्या 18 पैकी 15 मंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. मंत्रिमंडळातील मंत्री भ्रष्ट नाहीत की आपण त्यावेळी त्यांच्यावर केलेले आरोप खोटे होते, याचा खुलासा आपल्याकडून होणे अपेक्षित आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर असलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

भ्रष्टाचार व भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण, प्रोत्साहन देण्याचे आपल्या सरकारचे धोरण दिसते. भ्रष्टाचार, अकार्यक्षमतेमुळे निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा, प्रशासनात बेदिली, अनागोंदी निर्माण करणारा आहे. खुद्द राज्याचे मुख्यमंत्रीच रात्री-बेरात्री रुग्णालयांना भेट देत असतील, मध्यरात्री ध्वनीक्षेपक लावून जाहीर सभा घेत असतील, स्वत:च्याच नावाच्या अनधिकृत बागेच्या उद्घाटनाला जाणार असतील, तर या राज्यात कायदे कोण पाळणार? कायद्याची भिती कुणाला वाटणार? पोलिस कायदा-सुव्यवस्था कशी राखणार ? राज्यातलं पोलिस दल आज हतबल दिसत आहे.

गोंदिया जिल्ह्यात एका महिलेवर दोन वेळा सामुहिक बलात्कार होतो. पुण्यात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करुन हत्या केली जाते. सत्तारुढ पक्षाच्या जिल्हाध्यक्षाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होतो. राज्यात गुंडगिरी वाढली आहे. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मात्र 50% लोकसंख्या असणाऱ्या महिलांना आपल्या मंत्रिमंडळात स्थानच दिलेले नाही. कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. त्याचबरोबर राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचाही बोजवारा उडालेला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच राज्यात लेप्टो, मलेरिया व स्वाईन प्लूचे रुग्ण दिवसेंगणिक वाढत आहेत. राज्यात या सारख्य महत्वाच्या खात्यांना मंत्री नव्हते. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याची नामुष्की सरकारवर आली होती, त्यामुळे जनतेला कुणी वाली राहिलेला नाही.

आपल्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रविरोधी आहे. राज्याच्या हिताचे प्रकल्प, विकासयोजनांना स्थगिती दिली जात असताना गुजरातच्या हिताचे निर्णय धडाधड होत आहेत. गुजरातसाठी महत्वाच्या अशा बुलेटट्रेन प्रकल्पाला बीकेसीतील मध्यवर्ती तसंच पालघर येथील दुग्धव्यवसाय विभागाची जागा देताना आपण दाखवलेला वेग बुलेटट्रेनच्या वेगालाही लाजवणारा आहे.

महोदय, राज्याच्या मा.महामहिम राज्यपाल महोदयांकडून महाराष्ट्राबद्दल, महापुरुषांबद्दल सातत्याने अवमानास्पद वक्तव्ये केली जात आहेत. जातीवाद, भाषावाद, प्रांतवाद निर्माण करुन सामाजिक अस्थैर्य निर्माण करण्याचा, राजकीय वातावरण बिघडवण्याचा, कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मा.महामहिम राज्यपाल महोदयांची वक्तव्ये सरळसरळ महाराष्ट्रविरोधी, महाराष्ट्रवासियांच्या भावना दुखावणारी आहेत. ही वक्तव्ये सहन करणं शक्य नाही. महामहिम राज्यपाल महोदयांच्या वक्तव्यांची पाठराखण करण्याचा आपल्याकडून होत असलेला प्रयत्नही तितकाच निषेधार्ह असून अशी वक्तव्ये आणि त्यांची पाठराखण सहन केली जाणार नाहीत, असा इशारा देण्यात येत आहे.
महोदय, राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे. सरकारची वैधता संदिग्ध असल्याने, आपण आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे भारतीय संविधानाशी, महाराष्ट्र राज्याशी व राज्यातील जनतेच्या हिताशी प्रतारणा ठरणार आहे. सबब मा. मुख्यमंत्री महोदयांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर आम्ही सर्वजण बहिष्कार टाकत आहोत, असे पत्रात म्हटले आहे.

Balasaheb Thorat : Congress : काँग्रेसने उभारली महागाईची गुढी : बाळासाहेब थोरात म्हणाले, महागाई लादणाऱ्या मोदी सरकारने राजीनामा द्यावा 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महागाई लादणाऱ्या मोदी सरकारने राजीनामा द्यावा 

  – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी

: काँग्रेसने उभारली महागाईची गुढी.

पुणे : सध्याच्या महागाईला कारणीभूत असलेल्या मोदी सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या महागाईविरोधी आंदोलनात बोलताना केली.

     जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी अलका टॉकीजजवळील टिळक चौकात निदर्शने करण्यात आली. चौकात महागाईची गुढी उभारून निषेध नोंदविण्यात आला. यामध्ये आमदार संग्राम थोपटे, पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, देवीदास भन्साळी, अभय छाजेड, आबा बागुल, संजय बालगुडे, दीप्ती चवधरी, वीरेंद्र किराड, लता राजगुरू, रविंद्र धंगेकर, अरविंद शिंदे, अजित दरेकर, कमल व्यवहारे, दत्ता बहिरट, गोपाळ तिवारी, रमेश अय्यर, चंद्रशेखर कपोते, महिला काँग्रेस अध्यक्षा पूजा आनंद, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, सोनाली मारणे, प्रशांत सुरसे, स्वाती शिंदे आदी सहभागी झाले होते.

     महागाईच्या विरोधात २०१४ सालापूर्वी आंदोलन करणारे भाजपचे नेते आता कुठे लपले आहेत? असा सवाल थोरात यांनी केला आणि या नेत्यांना जनता जाब विचारल्याशिवाय राहाणार नाही, असे थोरात यांनी सांगितले. जनतेच्या मनात महागाईबद्दल असंतोष असून त्याचा कधीही उद्रेक होईल, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला.

     जनतेला अच्छे दिनचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते परंतु २०१४ पासून सातत्याने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत चालले आहे. या विषयावर पंतप्रधान भाष्य करीत नाहीत. भाववाढमुळे सर्वसामान्य जनतेला जगणे कठिण झाले आहे. सणासुदीच्या काळात भाववाढ करून मोदी सरकारने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यात मोदी सरकार अपयशी ठरले असे पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

      महाराष्ट्रात उद्या गुढीपाडव्याचा सण साजरा होईल. या सणाला गोड पदार्थ करून नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. पण सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत चालले आहेत, सणाचा आनंद राहिला नाही. केंद्रातील मोदी सरकार भाववाढ रोखण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.

     यावेळी सुजीत यादव, विनोद रणपिसे, शिलार रतनगिरी, वाल्मीक जगताप, किरण मात्रे, अविनाश अडसूळ, बाळासाहेब अमराळे, राहुल वंजारी, शानी नौशाद, राकेश नाणेकर, नरेंद्र व्‍यवहारे, शोभना पण्णीकर, प्रकाश पवार, शिवा मंत्री, छाया जाधव, संगीता पवार, रजनी त्रिभुवन, अनुसया गायकवाड, ज्योती परदेशी, सतिश पवार, राजेंद्र भुतडा, प्रविण करपे, प्रदिप परदेशी, रमेश सोनकांबळे, अजित जाधव,  गौरव बोराडे, विठ्ठल गायकवाड, सुरेश कांबळे, कान्होजी जेधे, मेहबुब नदाफ, शाबीर खान, आयुब पठाण, चेतन आगरवाल, दिपक ओव्‍हाळ, इंद्रजीत भालेराव, सुंदरा ओव्‍हाळ, सीमा महाडिक, ताई कसबे, जावेद निलगर, सुनिता नेमुर, जयश्री कांबळे, अण्णा राऊत यासंह असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.