NCP Youth | Pune | राष्ट्रवादीने आता तुकाराम महाराजांनाच घातले साकडे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादीने आता तुकाराम महाराजांनाच घातले साकडे

श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात महारष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भाषण न करू दिल्यामुळे राजशिष्टाचाराचा भंग झाला व समस्त महाराष्ट्रातील नागरिकांचा अपमान झाला. याच्याच निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष किशोर कांबळे यांच्या नेतृत्वात संत तुकाराम महाराज पादुका चौकात , फर्ग्युसन रोड येथे आज पंतप्रधान कार्यालयाचा व भाजप चा भजन, अभंग व कीर्तन करून निषेध केला गेला .

याप्रसंगी बोलताना प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले की मागील वेळीस पंतप्रधानांच्या कार्यक्रमांमध्ये अजित दादा पवार यांचे भाषण संपूर्ण देशभर गाजले होते याचाच धसका घेऊन या वेळी जाणून बुजून अजित दादांना चे नाव भाषणाच्या यादीतून वगळण्यात आले मात्र अजित दादा हे असे नेते आहेत जे बोलले असते तरी त्यापेक्षा जास्त चर्चा त्यांनी भाषण का केले नाही यावरच धडली मात्र टेलिप्रॉम्पटर वर वाचून केलेल्या भाषणापे़क्षा ते जास्त लोकांना भावले असते त्यामुळे भाजपाने केलेला हा खोडसाळपणा जनतेने पूर्णपणे हाणून पडलेला आहे. यापुढे तरी त्यांना सुबुद्धी लाभो असे या ठिकाणी बोलताना देशमुख म्हणाले.

यावेळी प्रवक्ते प्रदिप देशमुख, बाळासाहेब बोडके, कार्याध्यक्ष मनोज पाचपुतेव अजिंक्य पालकर, महेश हांडे,दीपक जगताप, गणेश नलावडे,पंकज साठे, स्वप्नील जोशी , केतन ओरसे व पुणे शहर युवक पदाधिकारी व युवक मतदारसंघ अध्यक्ष उपस्थित मोठया संख्येने होते.

Sant Tukaram Maharaj | PM Narendra Modi | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

Categories
Breaking News cultural देश/विदेश पुणे महाराष्ट्र

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

पुणे : देशात आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा विकास होत असताना विकास आणि देशाचा वैभवशाली प्राचीन वारसा सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

देहू येथे आयोजित जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील, वारकरी संप्रदायाचे मारुतीबाबा कुरेकर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, तुषार भोसले आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री म्हणाले, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक असल्याचा आपल्याला अभिमान आहे, याचे श्रेय भारतीय संत परंपरेला आणि ऋषी मुनींना आहे. राष्ट्रीय ऐक्य मजबूत करण्यासाठी आपली प्राचीन ओळख आणि परंपरेचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. भारत ही संतांची भूमी असल्याने या देशाचा विचार शाश्वत आहे. प्रत्येक काळात महापुरुषांनी जन्म घेऊन आपल्या शाश्वत मूल्यांचे रक्षण केले आणि देश व समाजाला मार्गदर्शन केले. समाजातील अखेरच्या व्यक्तींचे कल्याण करावे हाच संतांचा संदेश आहे. या संदेशानुसार गरिबांचे कल्याण ही देशाची प्रथमिकता आहे.

संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने अनेक पिढ्यांना प्रेरणा
संत भिन्न परिस्थितीत समाजाला मार्गदर्शन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांच्या जीवनात संत तुकाराम यांच्यासारख्या संतांची महत्वाची भूमिका आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर कैदेत असताना तुकाराम महाराजांचे अभंग म्हणत. संत तुकारामांची करुणा, दया आणि सेवेचा बोध त्यांच्या अभंगाच्यारुपाने आजही आपल्यात आहे. या अभंगांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आजही हे अभंग आपल्याला ऊर्जा देतात, मार्गदर्शन करतात. ऐक्यासाठी संत विचारांच्या प्राचीन परंपरेला जपावे लागेल.

प्रयत्नातून अशक्याला शक्य करता येते हे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. देशात पर्यावरण, जलसंरक्षण आणि नदी वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आपल्या अध्यात्मिक परंपरेशी हे विषय जोडल्यास पर्यावरणाचे मोठे काम होईल. सेंद्रिय शेतीला प्रत्येक शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी मिळून प्रयत्न करावे लागतील. योग ही भारताची जगाला देणगी आहे असे सांगून आंतरराष्ट्रीय योग दिवसात सर्वांनी सहभाग व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

संत तुकाराम महाराज शिळा बोध आणि वैराग्याची साक्ष
तुकाराम महाराजांनी जीवनात भूक आणि दुःख पाहिले. संकटकाळात कुटुंबाच्या संपत्तीला जनसेवेसाठी समर्पित केले. त्यांचे कार्य भविष्यासाठी आशेचा किरण आहे, तर ही शिळा त्यांच्या बोध आणि वैराग्याची साक्ष आहे. संतांच्या अभंगवाणीने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आज देश सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे पुढे जात असताना अभंग समाजाला मार्गदर्शन करीत आहेत. मराठी संतांच्या अभंगवाणीतून नित्यनवी प्रेरणा मिळते. तुकाराम महाराजांनी माणसात भेदभाव करणे मोठे पाप म्हटले आहे. समाजासाठी हा संदेश महत्वाचा आहे असेही ते म्हणाले.

मोदी म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पाच टप्प्यात आणि आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. या दोन्ही एकूण ३५० किलोमीटरपेक्षा अधिक चौपदरी मार्गासाठी ११ हजार कोटीपेक्षा अधिक खर्च होणार आहे. या मार्गामुळे परिसरातील विकासालाही गती मिळेल. शास्त्रात म्हटले आहे मानवजन्मात संतसंग सर्वात महत्वाचा आहे, त्यांच्या सहवासात सुखाची अनुभूती असते. असा अनुभव देहूसारख्या तीर्थक्षेत्री आल्यावर मिळतो.

यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनीही विचार व्यक्त केले. तुकाराम महाराजांनी समाजाला अंधश्रद्धेपासून दूर नेत अध्यात्म मार्ग दाखविला असे त्यांनी सांगितले. नितीन महाराज मोरे यांनी प्रास्ताविक केले.

प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते संत चोखामेळा सार्थ अभंग गाथेचे विमोचन करण्यात आले. प्रधानमंत्री श्री.मोदी यांचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विठ्ठल रखुमाई मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी तिन्ही संस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण आणि ध्वजपूजन करण्यात आले. त्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यांनी इंद्रायणी नदी, भंडारा, घोरवडेश्वर आणि भामगिरी टेकडीचे दर्शन घेतले. प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी संत तुकाराम महाराज लिखित अभंगगाथेची हस्तलिखित प्रत आणि पालखीचेही दर्शन घेतले.

Supriya Sule | Ajit Pawar | मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषण करू दिले नाही 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषण करू दिले नाही 

: सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी 

पुणे : देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी कार्यक्रमादरम्यान भाषण केलं पण अजित पवार यांना भाषण करू दिले गेले नाही. त्यामुळं यावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांच्या कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, अजित दादांना भाषण करायचं होतं, याबाबत पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिण्यात आलं होतं. कारण ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण पीएमओकडून लेखी उत्तरात त्यांच्या भाषणाला ओके आलं नाही. हे अतिशय गंभीर असून मला स्वतःला वेदना देणारं आहे. कारण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचा, पालकमंत्र्याचा आणि आमच्या नेत्याचा प्रोटोकॉलनुसार सन्मान झालेला नाही. त्यामुळं हे अतिशय धक्कादायक आणि अयोग्य आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे.

आमच्या महाराष्ट्राचा आमचा उपमुख्यमंत्री जर व्यासपीठावर असेल तर तिथं भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यावेळी फडणवीसांना भाषण करु द्यायचं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हे जे झालं ते अयोग्य असल्याचं माझं मत आहे. त्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणं लोहगाव विमानतळ ते देहू आणि देहू ते मुंबई या दोन्ही प्रोटोकॉल प्रमाणं अजित दादांना हजर राहणार हा प्रोटोकॉल आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

देहू संस्थानने या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करताना देहूच्या मंदिर संस्थांचं प्रमुख नितीन महाराज मोरे म्हणाले, “हा आमचा धार्मिक कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदींना मुंबईत संध्याकाळी कार्यक्रम होता. त्यानुसार व्यासपीठावरील प्रोटोकॉल आम्हाला दिल्लीवरुन आले होते. त्यामध्ये संस्थानचा संबंध येत नाही. संस्थाननं हा कार्यक्रम संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी घेतला होता.

PM Modi Pune Tour | पंतप्रधान देहू इथल्या जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करणार

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

पंतप्रधान 14 जून रोजी महाराष्ट्राला भेट देणार

पंतप्रधान देहू, पुणे इथल्या जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 1:45 च्या सुमाराला पंतप्रधान देहू, पुणे येथील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करतील. संध्याकाळी 4:45 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबई मधील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होतील.

 

पंतप्रधान पुणे येथे

पंतप्रधान देहू, पुणे इथल्या जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करतील. संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे संत आणि कवी होते, जे त्यांचे अभंग आणि अध्यात्मिक कीर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजाभिमुख पूजनासाठी ओळखले जातात. ते देहू इथे रहायचे. त्यांच्या निधनानंतर एक शिला मंदिर बांधण्यात आलं, पण त्याची औपचारिक रचना देऊळ म्हणून करण्यात आली नव्हती. या मंदिराची 36 शिखरांसह दगडी पुनर्बांधणी करण्यात आली असून त्यामध्ये संत तुकाराम महाराजांची मूर्ती देखील आहे.

 

पंतप्रधान मुंबई येथे

पंतप्रधान मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करतील. जल भूषण इमारत हे 1885  सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. या इमारतीचे आयुर्मान संपल्यामुळे ती पाडण्यात आली होती आणि त्या जागी नव्या इमारतीच्या बांधकामाची मंजुरी देण्यात आली होती. भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते ऑगस्ट 2019 मध्ये नव्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. जुन्या इमारतीची सर्व वैशिष्ट्ये नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत जतन करण्यात आली आहेत.

सन 2016 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनामध्ये एक भुयार सापडले होते. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटीश या भुयाराचा उपयोग करत होते. 2019 साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले. या भुयारात बनवण्यात आलेली गॅलरी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले अशा स्वरूपाचे एकमेव संग्रहालय आहे. हे संग्रहालय वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर बंधू, मॅडम भिकाजी कामा, व्ही. बी. गोगटे, 1946 मधील नौदल क्रांती आणि अन्य क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करते.

पंतप्रधान मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील सहभागी होतील. 1 जुलै,1822 रोजी फरदुनजी मर्झबानजी यांच्या हस्ते मुंबई समाचारची एक साप्ताहिक म्हणून छपाई सुरु झाली. त्यानंतर 1832  साली ते दैनिक झाले. हे वृत्तपत्र गेली 200 वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत आहे. या दुर्मिळ विक्रमाचे स्मरण म्हणून या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले जाईल.

Palkhi ceremony : जगद्गुरू तुकोबा महाराज अन् ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तारखा जाहीर 

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

जगद्गुरू तुकोबा महाराज अन् ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तारखा जाहीर

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. २० जून रोजी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू होणार आहे. तर २१ जून रोजी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड उत्साहाने वारकरी देहू नगरीत दाखल होतील, अस देहू संस्थानाकडून सांगण्यात आलं आहे.

मागील दोन वर्षांपासून देशात करोना संकट असल्याने नियम व अटींचं पालन करून हा पालखी सोहळा पार पडला आहे. पण यावर्षी करोना संकट काहीसं कमी झालं झालं आहे. त्यामुळे सध्या देहू आणि आळंदी येथे पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. जगद्गुरू संत तुकोबांची पालखी २० जून रोजी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे.

गेल्या दोन वर्षापासून देशात करोना संकट असल्याने काही मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थित पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आलं होतं. यावर्षी करोनाच संकट काहीसं कमी झालं आहे. पालखी सोहळ्याची तारीख जाहीर झाल्याने जोरदार तयारी सुरू झाली आहे. अखेर दोन वर्षानंतर हा पालखी सोहळा संपन्न होतोय, त्यामुळे लाखोंच्या संख्येनं वारकरी देहूत दाखल होतील, अशी माहिती माणिक महाराज मोरे यांनी दिली आहे.

२० जून रोजी तुकोबांच्या पालखीचं पंढरपूकडे प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असेल. आषाढी एकादशीला म्हणजे १० जुलै रोजी तुकोबांची पालखी पंढरपूरमध्ये नगर प्रदक्षिणा घालेल.