PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | बेवारस वाहनांच्या तक्रारीसाठी महापालिकेकडून व्हाट्सअप नंबर जारी

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | बेवारस वाहनांच्या तक्रारीसाठी महापालिकेकडून व्हाट्सअप नंबर जारी

PMC Pune Encroachment Department | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) अतिक्रमण विभागाच्या (PMC Encroachment Department) वतीने बेवारस वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. असे वाहन रस्त्यावर किंवा फुटपाथवर आढळल्यास गाडी जप्त केली जाईल. ती गाडी सोडवण्यासाठी गाडी मालकाला 5 हजार पासून ते 25 हजार पर्यंत दंड होऊ शकेल. अतिक्रमण विभागाकडून अशा लोकांना नोटीस देखील पाठवणे सुरु केले आहे. त्यानुसार 139 वाहने जप्त देखील करण्यात आली आहेत. तसेच नागरिकांना बेवारस वाहनाची तक्रार करायची असल्यास विभागाकडून 9689931900 हा व्हाट्सअप नंबर जारी करण्यात आला आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)

पुणे महानगरपालिका हद्दीत रस्ता, पदपथावर इत्यादी ठिकाणी बंद / बेवारस वाहने, पडीक नादुरुस्त वाहने आढळ होत आहेत. अशी वाहने रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे तसेच सदर वाहने जागेवरून न हलविल्यामुळे कचरा तयार होऊन दुर्गंधी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी रस्त्यावरील बंद / बेवारस वाहने उचलणेची कारवाई करणेत आली आहे. रस्त्यावरील  बंद / बेवारस वाहनांबाबत नागरिकांच्या देखील तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत.  त्यामुळे अशी वाहने पुणे महानगरपालिकेकडील क्षेत्रिय कार्यालयामार्फत कारवाई करून जप्त करणेत येणार आहेत.  (PMC Pune News)

-जप्त केलेली वाहनासाठी  रिमुव्हल चार्जेस खालील प्रमाणे –
1. अवजड वाहनासाठी (प्रवासी बस, ट्रक इ.) = २५,०००/-
2. हलकी वाहने (१० टना पर्यंत) = २०,०००/-
3. चार चाकी वाहने (कार, जीप इ.) = १५,०००/-
4. तीन चाकी (रिक्षा, टेम्पो) = १०,०००/-
5. दुचाकी (स्वयंचलित) र= ५०००/-
अतिक्रमण विभागाच्या माहितीनुसार  संबंधित वाहनमालक १ महिन्याचे कालावधीमध्ये सोडवून घेऊ शकेल. सदर वाहनांवर क्षेत्रिय कार्यालयामार्फत नोटीस लावण्यात येणार असून याकरिता ७ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. संबंधित वाहनधारकांनी ७ दिवसांच्या मुदतीत वाहन काढून न घेतल्यास सदर वाहनावर पुणे महानगरपालिकेकडून जप्तीची कारवाई करण्यात येत आहे, त्यानुसार शहरात 139 वाहने जप्त करण्यात आली असून काही वाहनाना नोटीस लावण्यात आल्या आहेत. असे ही खात्याकडून सांगण्यात आले.
—–

Special Article | वेगाची प्रगती की अधोगती….!!!

Categories
social देश/विदेश महाराष्ट्र लाइफस्टाइल संपादकीय

Special Article | वेगाची प्रगती की अधोगती….!!!

        रस्त्यासाठी वाहन आहे, की वाहनासाठी रस्ता आहे. हेच आज कळेनासे झाले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाची गर्दी पाहिल्यानंतर कुणाच्याही मनामध्ये प्रश्न पडतो, की ही वाहन येतात कुठून आणि जातात कुठे ? या वाहनाची प्रचंड गर्दी रस्त्यावर आहे. ही वाहनं इकडून तिकडं अगदी सुसाट वेगामध्ये जात आहेत. कोणत्या कामासाठी जातात? त्यांची काय कामे आहेत? असे अनेक प्रश्न मनामध्ये फेर धरू लागतात आणि अपेक्षेप्रमाणे  त्याची उत्तरे माञ कुणाकडेच मिळत नाहीत. आज प्रत्येक घरोघरी वाहनाची संख्या खूप वाढलेली आहे. मग त्यामध्ये दोन चाकी असो किंवा चार चाकी असो. डोईप्रमाणे वाहनांची संख्या प्रत्येक घरामध्ये असलेली पाहायला मिळत आहे. घरामध्ये कोणतेही एक वाहन असेल तरीही आपली कामे होतात परंतु आज प्रत्येक जण इतक्या घाईगडबडीमध्ये आहे. प्रत्येकाला वाहनाची आवश्यकता स्वतः गणिक वाटू लागले आहे. घरामध्ये जेवढेही व्यक्ती आहेत त्यांची प्रत्येकाची कामे वेगवेगळ्या ठिकाणी असलेली पाहायला मिळत आहेत.  त्या कामाची किंवा गरजेची पूर्तता करण्यासाठी  प्रत्येकजण आता गाडीवर स्वार होऊ पाहत आहे.
        दारातून बाहेर पाय टाकला की तो पाय गाडीवरच असावा अशी मानसिकता प्रत्येकाची होऊ लागली आहे. कदाचित माणसाच्या गरजा, माणसाची कामे वेगवेगळ्या दिशेला असतील हे कोणीही नाकारू शकत नाही कारण घरापासून भाजी मार्केट लांब असेलही. समजा ते दोन किलोमीटर असेल, मुलांची शाळा दोन किलोमीटर असेल, दवाखाना दोन-तीन किलोमीटर असेल, नातेवाईकांची, मित्रमंडळीची घरे दोन तीन किलोमीटर असतील. तिथपर्यंत जाण्यासाठी आपण वेळेची बचत करतोय हे चांगलेही आहे; पण वाहन आणि माणूस याचे नाते इतके घट्ट झाले आहे की आता माणसाला वाहनांचे व्यसन लागलेली आहे हे नाकारून चालणार नाही. खरोखरच कामासाठी वाहन चालवणाऱ्यांची संख्या आणि एखाद्या कामानिमित्त वाहनाची आवश्यकता नसून अशा वाहन चालवणाऱ्यांची संख्या यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर काहीही काम नसताना वाहन चालवणाऱ्या धारकांची संख्या नक्कीच जास्त आहे. हे कोणीही मान्य करेल. कोणत्या कामासाठी कोणत्या वाहनाची  आवश्यकता आहे. याचा विचार आत्ता प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.
            आजची तरुणाई तर या वेगावर इतकी आरूढ झालेले आहे, की त्यांच्या गाडीचा प्रचंड वेग पाहून, त्यांच्या गाडीचा सायलेन्सरचा आवाज ऐकून कुणाच्याही मनाचा थरकाप उडेल. अशीही तरुणाई अपघाताला बळी पडते ती कायमचा मृत्यू घेऊन किंवा कायमचं अपंगत्व घेऊन. हायवेचं चित्र तर फार विचित्र पाहायला मिळत आहे . ताशी १०० ते १२० च्या वेगाने चाललेल्या गाड्या हे कशाचा द्योतक आहे ?कोणती गडबड आहे? कदाचित त्यांना गडबड असेल तर ही मंडळी लवकर का निघत नाहीत. याचा विचार  आपण कधी करणार आहोत. अशा ह्या अपघाताचे चित्र किंवा प्रसंग आपल्याला हायवेवर सर्रास पाहायला मिळते .तसे तर भारतामध्ये दर चार मिनिटाला एक अपघाती मृत्यू होतो. भारतामध्ये अतिवेगाने गाडी चालवण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे कदाचित अपघाताचे प्रमाणही जास्तच आहे. एखाद्या रोगापेक्षा किंवा एखाद्या आपत्तीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाण हे वाहन अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे आहे. हे निर्विवाद सत्य आहे. याची आकडेवारी आपल्याला इंटरनेटवर किंवा भारत सरकारच्या ‘रस्ते व वाहतूक परिवहन ‘ संकेतस्थळावर मिळूही शकेल ;पण आपल्याला हा आकड्याचा खेळ न खेळता त्यामध्ये अडकून न राहता प्रत्येकाने जागृत होणं आवश्यक आहे. रोज किती तरी अपघात होतात ते आपल्या हलगर्जीपणामुळे! ते आपल्या दृष्टीलाही पडतात.
परवा असाच एका मुलाचा अपघात पहावा लागला.कानामध्ये इयरफोन लावून तो तरुण  भन्नाट वेगाने गाडी चालवत असताना अपघाताला बळी पडला. कारण काय तर त्याच्या कानामध्ये असलेला इयरफोन. या इयरफोनमुळे पाठीमागून आलेली गाडी कळत नाही ना पुढून आलेली गाडी कळत नाही आणि ही तरुणाई अपघाताला बळी पडते ती अशा छोट्या छोट्या कारणामुळे. तो  मुलगा क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात पडला. आणि अशा परिस्थितीमध्ये कानामध्ये असलेल्या इयरफोनवर गाणं मात्र जोर जोरात चालू असलेलं पाहायला मिळालं.  त्याच गाण्याच्या धुंदीमध्येच तो तरुण शेवटच्या घटका मोजत होता. सर्वांनी त्याला दवाखान्यात नेण्याची, वाचवण्याची धडपड प्रामाणिकपणे केली. परंतु अशा ह्या प्रसंगामधून प्रत्येकाने बोध घेण्याची वेळ आली आहे.  मानवी मनाला कशाचीही शुद्ध राहिली नाही. ना विचारांना बुद्धी. हे चित्र काय सांगते? कुठे चाललोय ? इतके गाड्यांचे व्यसन का लागले आहे? हे  खरोखरच विचार करण्यासारखी बाब आहे.
        अमेरिकी सारखी आपली परिस्थिती नाही. अमेरिकेमध्ये वर सांगितल्याप्रमाणे घरापासून शाळा- महाविद्यालय, दवाखाना, मार्केट, नोकरीचे ठिकाण ही स्थळे लांब- लांब आहेत . कारण भारतापेक्षा अमेरिका क्षेत्रफळाच्या बाबतीत आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. त्यामुळे तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार ते योग्यही आहे; पण भारतामध्ये तशी परिस्थिती नाही. आपल्याकडे रस्ते अरुंद आहेत. रस्त्यामध्ये खड्डे आहेत. आणि यामधून वाहन चालवत असताना आपलं मन, शरीर याच्यावर विपरीत परिणाम होत असतो .आपला मानसिक समतोल, मनाची एकाग्रता वाहन चालवताना ढासळत आहे ही प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. वाहन चालवण्याची शिस्त आपल्यामध्ये नाही. ट्रॅफिकमध्ये आपण थांबतो; पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण अनेक नियम पायदळी तुडवून अधून मधून पुढे जाण्याचा मार्ग शोधतच असतो. वाहन चालवण्याची शिस्त आपल्यामध्ये कधी येणार? आपण आपल्या इच्छित स्थळी पायीही जाऊ शकतो पण आता पायी चालणं म्हणजे मागासलेपणाचे वाटू  लागलं आहे. गाडी चालवण्यामध्ये आत्ता प्रतिष्ठा आली आहे. मुंबई ,पुणेची परिस्थिती तर फार वेगळी आहे. कदाचित तिथे रेल्वे जीवनवाहिनी असल्यामुळे माणूस कमीत कमी रेल्वेमध्ये घटकाभर बसतो तरी. पण आपल्यासारख्या अर्बन , निमशहरी भागामध्ये मात्र प्रत्येकाचा अट्टाहास आहे तो गाडीचा. गाडी चालवणाऱ्या तरुणाच्या पाठीमागे जर तरुणी बसली असेल किंवा पुरुषाच्या पाठीमागे जर त्याची पत्नी बसली असेल तर गाडीचा वेग कसा वाढतो हे न सांगणेच बरे. आपण गाडी घेतो तो दुसऱ्याच्या इर्षेमुळे, प्रतिष्ठेमुळे आणि नवीन गाडी घेतल्यानंतर आपण सहज फेरफटका मारतो, काम नसताना उगीचच रोडवर जाण्याचा अट्टाहास करतो.
        गाडीचा वेग वाढवण्यापेक्षा आपण आपल्या विचाराचा वेग वाढवणे आवश्यक आहे. आपल्या विचाराची प्रगती होणे आवश्यक आहे. नाही तरी आपण या सर्व भौतिकसुविधा आपल्या सोयीसाठी घडवून आणू ; पण त्यामधून जर आपल्या प्रगतीला बाधा येत असेल तर अशा भौतिकसुविधाचा उपयोग आपल्या जीवनासाठी प्रगतीची अधोगती कधी करेल हे सांगता येत नाही. आपण अशा मोहात पाडणाऱ्या भौतिक सुविधा पासून चार पावलं किंवा चार हात लांब राहिलेलंच बरं! आपल्याला प्रगती करण्यासाठी या सगळ्या भौतिक सुविधांची आवश्यकता आहेच; पण कोणती वस्तू केव्हा वापरायची हे मात्र आपल्याला कळणे फार गरजेचे आहे. वाहन आपण आपल्या सोयीसाठी घेऊ पण आपण  वाहनावर स्वार होण्याऐवजी वाहनच आपल्यावर स्वार होऊ नये एवढे मात्र एवढे मात्र या ठिकाणी नमूद करावेसे वाटते.
   —-
 –  प्रा. दशरथ ननवरे
  (लेखक  दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
    संपर्क | ८६६९११८५९७

 PMC Pune Solid Waste Management | पुणे महापालिकेची कचरा वाहतूक करण्याची क्षमता वाढणार!

Categories
Breaking News PMC social पुणे

 PMC Pune Solid Waste Management | पुणे महापालिकेची कचरा वाहतूक करण्याची क्षमता वाढणार!

| अत्याधुनिक सुविधा असलेले 3 ट्रक महापालिकेच्या ताफ्यात

PMC Pune Solid Waste Management | पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) शहरातील सुक्‍या कचऱ्याची (Dry waste) वाहतूक करण्यासाठी बीआरसी ट्रक (BRC Truck) वापरण्यात येतात. या ट्रकची क्षमता 7 ते 10 टन कचऱ्याची आहे. मात्र, आता महापालिकेच्या ताफ्यात तब्बल 20 ते 22 टन कचरा एकाच वेळी वाहतूक करू शकणारे आणि वॉकिंग फ्लोरची सुविधा असलेले तीन ट्रक दाखल झाले आहेत. या ट्रकचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. (PMC Pune Solid waste management)

आमदार भिमराव तापकीर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार , कीथ कंपनीच्या अध्यक्षा लिंडसे फॉस्टर ड्रॅग्रो, संचालक वरून गजरा, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यावेळी उपस्थित होत्या. (PMC pune news)

केंद्रशासनाने 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी (solid waste management) उपलब्ध करून दिलेल्या निधीतून प्रायोगिक तत्वावर सुमारे अडीच कोटी रूपयांचे हे तीन ट्रक खरेदी करण्यात आले आहेत. या ट्रक मध्ये कीथ कंपनीने विकसित केलेली वॉकिंग फ्लोरची यंत्रणा उपलब्ध करून दिलेली आहे. ही यंत्रणा चालविण्यास सोपी असून महापालिका कर्मचाऱ्यांनाच याचे प्रशिक्षण दिले जाणार असून कंपनीच पुढील दहा वर्षे या यंत्रणेची देखभाल दुरूस्ती करणार आहे. दरम्यान, महापालिकेसोबत काम करणे ही आमच्यासाठी खास बाब असून शहराच्या कचरा व्यवस्थापनासाठी या गाडया महत्वाची भूमिका निभावतील असा विश्‍वास कीथ कंपनीच्या अध्यक्षा ड्रॅग्रो यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. (PMC pune Waste Transport)

महापालिकेकडून सध्या शहरात कचरा वाहतूकीसाठी हायवा ट्रक वापरण्यात येतात. त्यांची क्षमता 5 ते 10 टनांच्या आसपास आहे. तसेच या ट्रक मध्ये कचरा भरल्यानंतर तो आत मध्ये दाबण्याची यंत्रणा नाही. तर सध्याच्या गाडयांमध्ये कचरा भरण्यासाठी व उतरविण्यासाठी अर्धा ते पाऊन तास जातो . तसेच कचरा मोठया प्रमाणात बाजूला पडतो. या नवीन ट्रक मध्ये वॉकिंग फ्लोर असून कचरा 5 ते 10 मिनिटात भरता येतो. आत मध्ये पडलेला कचरा स्वयंचलित यंत्रणेत दाबला जातो. परिणामी, जुन्या हायवाच्या तीन ट्रक मध्ये बसणारा कचरा कीथच्या एकाच ट्रक मध्ये बसतो. परिणामी, कचरा वाहतूकीचा खर्चही कमी होणार आहे. शिवाय, गाडी रिकामी करताना कचऱ्याचे सांडण्याचे प्रमाणही कमी होते. (Pune waste management)
—————————————–

ही आहेत वैशिष्टे

– 3 ट्रकच्या कचऱ्याची एकाच ट्रकमध्ये वाहतूक
– कचरा लोडींग-अनलोडींगचा वेळ एक तासाने वाचणार
– वॉकिंग फ्लोरमुळे कचरा पडण्याचे प्रमाण नगण्य


News Title |PMC Pune Solid Waste Management | The capacity of Pune Municipal Corporation to transport waste will increase!| 3 trucks with modern facilities in the municipal fleet

Vehicles : PMC : वर्षानुवर्षे दोनच ठेकेदाराकडून गाड्या घेतल्या जाताहेत भाड्याने!  

Categories
Breaking News PMC पुणे

वर्षानुवर्षे दोनच ठेकेदाराकडून गाड्या घेतल्या जाताहेत भाड्याने!

: टेंडर न काढता दिली जातेय फक्त मुदतवाढ

पुणे : महापालिका प्रशासनाकडून वेगवेगळ्या कामासाठी गाड्या भाडेतत्वावर घेतल्या जातात. संबंधित ठेकेदारांचा करार संपल्यानंतर नवीन टेंडर लावणे अपेक्षित असते. मात्र महापालिका प्रशासनाकडून असे न करता गेली काही वर्ष दोनच ठेकेदारांना गाड्या भाडेतत्वावर देण्यासाठी मुदतवाढ दिली जाते. महापालिका प्रशासनाच्या कामकाजाविषयी यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

: नवीन टेंडर प्रक्रिया करणे आवश्यक

 मोटार वाहन विभाग हा पुणे महानगरपालिकेतील अत्यंत महत्वाचा विभाग आहे. या विभागाद्वारे इतर विभागांना आवश्यक त्या वेळी वाहने आणि इतर साहित्य पुरविण्यात येते. पुणे महानगरपालिकेच्या वाहतूक विभागामार्फत नागरिकांना खालील सुविधा दिल्या जातात.
  • पुणे शहरातील स्वच्छ ठेवण्यासाठी ओला आणि सुका कचरा संकलन आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वाहतूक
  • सार्वजनिक शौचालये, मुतारी आणि सांडपाण्याच्या नाल्याची स्वच्छता
  • अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञान आणि यंत्रे वापरून आगीपासून होणारी आर्थिक आणि जीवित हानी टाळणे
  • बाजारपेठा आणि सार्वजनिक स्थळे प्रकाशित करणे
  • शहरातील पाणीपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे
  • मृतदेहांचे विघटन करणे
 
त्याचप्रमाणे कोविड काळात डॉक्टर आणि नर्स ची ने आण करण्यासाठी देखील गाड्या घेतल्या गेल्या होत्या. महापालिका आपल्या मालकीच्या गाडया शिवाय काही गाड्या भाडेतत्वावर देखील घेते. प्रशासनाकडून वेगवेगळ्या कामासाठी गाड्या भाडेतत्वावर घेतल्या जातात. संबंधित ठेकेदारांचा करार संपल्यानंतर नवीन टेंडर लावणे अपेक्षित असते. मात्र महापालिका प्रशासनाकडून असे न करता गेली काही वर्ष दोनच ठेकेदारांना गाड्या भाडेतत्वावर देण्यासाठी मुदतवाढ दिली जाते. यामध्ये चिन्नू ट्रॅव्हल्स आणि जे के टुरिस्ट अँड ट्रान्सपोर्ट यांचा समावेश आहे. याच दोघांना नेहमी मुदतवाढ दिली जाते. आखून दिलेली प्रक्रिया पाळली जात नसल्याने प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

: टेंडर न काढता केलेली काही कामे

१) मा. महापालिका आयुक्त, ठराव क्र. ६/३४८ दि.१०/०९/२०२० याच्या मान्यतेने पुणे मनपाकरीता कोविड रुग्णांसाठीडी टाईप अत्याधुनिक कार्डीयाक रुग्णवाहिका महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ६७ (३) (क) मधील तरतुदीच्या अनुषगांने खरेदी करण्यात आली आहे

२) महाराष्ट्र महानगरपलिका अधिनियम कलम ६७ (३) (क) मधील तरतुदीच्या अनुषगाने पुणे शहरामध्ये कोरोना या विषाणूजन्य महामारीवर नियंत्रण मिळविणेसाठी करावयाचे उपाय योजना अंतर्गत मे. चिनु ट्रॅव्हर्ल्स पुणे याना त्याचेकडून दि. ०१/०८/२०२० ते दि.१५/१०/२०२० रोजी पर्यत घेण्यात आलेल्या वाहनांचे मोटार वाहन विभागाकडील भाडेतत्वावर टुरिस्ट परवाना असलेले वाहने घेणेकामी शेड्युल मान्य दरानुसार एकूण रक्कम रु. ९७१७८६०.०० (अक्षारी रु.सत्याण्णव लाख सतरा हजार आठशे साठ फक्त) इतक्या रकमेची देयके आदा करणेत आली आहे. सदरची बाब मा. स्थायी समिती ठराव क्र. ९१८ दि.०५/०१/२०२१ नुसार मा. मुख्य सभा यांच्या निदर्शनास आणण्यात आली आहे.
३) महाराष्ट्र महानगरपलिका अधिनियम कलम ६७ (३) (क) मधील तरतुदीच्या अनुषगाने पुणे शहरामध्ये कोरोना या विषाणूजन्य महामारीवर नियंत्रण साठी करावयाचे उपाय योजना अंतर्गत तसेच मनपाच्या प्रशासकीय कामकाजासाठी सन २०२० – २१ करीता मोटार वाहन विभागाकडील शेड्युल मान्य दरानुसार मे. जे. के. टुरिस्ट अँण्ड ट्रान्सपोर्ट पुणे यांचेकडून दि.०१/१०/२०२० पासून ते दि.२१/०१/२०२१ पर्यंत भाडेतत्वावर शेण्यात आलेल्या वाहनांचे मोटार वाहन विभागाकडील टुरिस्ट परवाना असलेले वाहने घेणेकामी रक्कम रु. ६३४७५४९.०० देयके आदा करणे आली आहे. सदरची बाब मा. स्थायी समिती ठराव क्र. १५१ दि.२०/०४/२०२१ नुसार मा. मुख्य सभा यांच्या निदर्शनास आणण्यात आली आहे.
४) पुणे शहरामध्ये तुर-फुटी सदृश्य पाऊस झाल्याने उदभविलेली पुर परिस्थितीवेळी आपातकालीन परिस्थिती मध्ये मोटार वाहन विभागामार्फत पुरविण्यात आलेली वाहने व यंत्रसामुग्री यांचे वापरापोटी महाराष्ट्र महानगरपलिका अधिनियम कलम ६७ (२) (क) मधील तरतुदीनुसार केलेल्या कामास व त्यापोटी संबधितास देयके आदा करणे आली आहे. सदरची बाब मा. स्थायी समिती ठराव क्र. २० दि.१६/०४/२०२० नुसार मा. मुख्य सभा यांच्या निदर्शनास आणण्यात आली आहे.
५) टेंडर क्र. ४२/२०२० भाडेतत्वावर टुरिस्ट परवाना असलेली वाहने मे. जे. के. टुरिस्ट अँण्ड ट्रान्सपोर्ट, पुणे यांचेकडून त्यांचे टेंडर दराने (७% ने जादा) निविदा रक्कमेच्या वाढीव ५०% म्हणजेच वाढीव रक्कम रुपये ५३,५०,०००/- (अक्षरी रक्कम रुपये त्रेपन्न लाख पन्नास हजार फक्त) पर्यंत नविन निविदा मान्य होईपर्यंत घेणेत आली आहे. त्यास मा. स्थायी समिती ठराव क्र. २३६ दि.१८/०५/२०२१ नुसार मान्यता मिळाली आहे.
६) टेंडर क्र. ४३/२०२० मे.चिन्नू ट्रॅव्हर्ल्स, पुणे यांचेकडून त्यांचे टेंडर दराने ((७% ने जादा) निविदा रकमेच्या वाढीव ५०% म्हणजेच वाढीव रक्कम रुपये ५३,५०,०००/- (अक्षरी रक्कम रुपये त्रेपन्न लाख पन्नास हजार फक्त) पर्यत अगर नविन निविदा मान्य होईपर्यंत प्रत्यक्ष होणाऱ्या रक्कमेपर्यत घेणेत आली आहे.
७) टेंडर क्र. ८६/२०२० भाडेतत्वावर टुरिस्ट परवाना असलेली वाहने मे जे. के. टुरिस्ट अॅण्ड ट्रान्सपोर्ट, पुणे यांचेकडून त्यांचे टेंडर दराने (८.१५% ने जादा) निविदा मान्य रकमेच्या वाढीव ५०% पर्यंत रक्कम रुपये ५४,०७,५००/- (अक्षरी रक्कम रुपये चौपन्न लाख सात हजार पाचशे फक्त) पर्यंत आवश्यकतेनुसार भाडेतत्वावर घेणेकामी त्यास मा. स्थायीसमिती यांचे समोर प्रस्ताव सादर केला असून मा. स्थायी समिती ठराव क्र. १८०६ दि. २८/१२/२०२१ नुसार मान्यता
मिळाली आहे
८) भनपाचे घनकचरा वाहतुक करणेचे कामकाजामध्ये वाहनांअभावी अडचणी निमार्ण होऊ नये म्हणून या कामाची नवीन निविदा मान्य होईपर्यंतच्या कालावधीसाठी निविदा क्र. २०९/२०१५-१६ – DOOR TO DOOR SEGREGATED GARBAGAE COLLECTION BY PRIMARY AND SECONDARY TRANSPORTATION BY 7 TON GVW AND 15 TON GVW CAPACITY BELL TIPPER/TRUCK & TRANSPORTATION TO TRANSFER STATIONS, SWM PROJECT WITH OPERATION & MAINTENANCE OF PMC’S OWN AND CONTRACTORS VEHICLES FOR 3+2 YEARS या निविदेस पाचवे वर्षामधील मान्य दरानुसार रु. ९,००,००,०००/- नवीन निविदा मान्य होईपर्यंत प्रत्यक्ष होणाऱ्या रक्कमेपर्यत काम करुन घेणेकामी
मुदतवाढ मिळणेस व त्यानुसार करारनामा करणेस मा. स्थायी समिती ठराव क्र. २१३ दि. १८/०५/२०२१ नुसार
मान्यता मिळाली आहे.

PMC : Petrol-diesel price : इंधन दरवाढीने पुणे महापालिका देखील हैराण  : 5 कोटींनी खर्च वाढला 

Categories
Breaking News Commerce PMC पुणे

इंधन दरवाढीने पुणे महापालिका देखील हैराण

: 5 कोटींनी खर्च वाढला

पुणे : गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार सुरु आहे. वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य लोक तर हैराण आहेतच मात्र आता महापालिका देखील परेशान आहे. इंधनाच्या खर्चासाठी केलेली तरतूद अपुरी पडल्याने 5 कोटी 67 लाख रुपयाचे वर्गीकरण महापालिका प्रशासनाला करावे लागले आहे. या अतिरिक्त खर्चास नुकतीच स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

: महापालिकेची 1358 वाहने

पुणे महानगरपालिकेकडे विविध कंपन्यांची विविध मेकची सुमारे १३५८ वाहने आहेत. यामध्ये टाटा, लेलॅण्ड, आयशर, फोर्स या कंपनीची हेवी व्हेईकल तर टाटा, महिंद्रा अँन्ड महिंद्रा, हिन्दुस्थान मोटार्स या कंपनीची लाईट व्हेईकल व जेसीबी, टेलकॉन, एल अँण्ड टी, एस्कॉर्ट या कंपनीची अर्थमुव्हींग मशिनरी या सर्ववर्गातील वाहने आहेत. ही  वाहने मनपाचे विविध विभागांकडे सतत कार्यरत असतात. पुणे महानगरपालिकेकडील वाहनांकरीता आवश्यक असणारे इंधन म्हणून पेट्रोल, डिझेल, सिएनजी खरेदी करणे आवश्यक असल्याने सन २०२१-२०२२ चे अंदाजपत्रक तयार करते वेळी सदर तरतुदीकरीता अंदाजीत रक्कम रू.२१.५० कोटी इतकी तरतुद आवश्यक असल्याने त्याप्रमाणे मोटार वाहन विभागाकडून मागणी करण्यात आलेली होती. तथापि प्रत्यक्षात रु. २०.५० कोटी इतकी तरतुद खालील अंदाजपत्रकीय अर्थशिर्षकावर तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेकडे मनपा प्रशासकीय कामकाज व शहराचा वाढता विस्तार पाहता कामकाजामध्ये झालेली वाढ, कोविड -१९ चे कामकाजामुळे वाहनाच्या वापरामध्ये झालेली वाढ, इंधनदरामध्ये होणारी सततची दरवाढ यामुळे सदरची तरतुद अपुरी पडणार आहे. सध्या इंधनाचे प्रचलित दरांचा विचार करता चालु वर्षी याकामी अपुरी पडणारी रक्कम रु. ५.६७ कोटी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करणे आवश्यक राहणार आहे. त्यानुसार स्थायी समिती समोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

: पहिल्या 6 महिन्यात इंधनावर 12 कोटींचा खर्च

महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावानुसार आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यातच 12 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यापुढील 6 महिन्यासाठी देखील तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त देखील खर्च होऊ शकतो. त्यानुसार अजून  5 ते 6 कोटींची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वर्गीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. याला नुकतीच स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.