Pune Municipal Corporation | बोपोडीत पुणे महानगरपालिकेची भूसंपादन कारवाई

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation | बोपोडीत पुणे महानगरपालिकेची भूसंपादन कारवाई

Pune Municipal Corporation | जुना मुंबई-पुणे रस्ता (Old Pune-Mumbai Road) रूंदीकरणासाठी आज गुरूवार (ता.२५) रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पुणे महापालिकेच्या (PMC Pune) वतीने कारवाई  करण्यात आली. यामध्ये एकूण ६३ मालमत्ता ताब्यात घेवून जमीनदोस्त करण्यात आल्या. एकूण ४९७९ चौरस मीटर क्षेत्रफळावर हि भूसंपादन (Land Acquisition) कारवाई करण्यात आली. २०१८ पासून रस्ता रुंदीकरणासंदर्भात या ठिकाणचे भूसंपादन प्रलंबित होते. (Pune Municipal Corporation)

जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर (Old Pune-Mumbai Road) बोपोडी हद्दीमध्ये (Bopodi Limit) सुमारे १५ ते २० मी रुंदीचा रस्ता अस्तित्वात होता. भूसंपादन अवॉर्ड नुसार ४२ मी रुंदीचे नियोजन होते. हॅरिस पुल ते खडकी रेल्वे स्टेशन दरम्यान बोपोडी हद्दीतील सुमारे 1 की.मी हद्दीतील रस्ता रुंदीकरण मधील बांधकामे आज कारवाई करून निष्कासित करणेत आली. यापूर्वीच खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील ४२ मी रुंदिनुसार डिफेन्स ची 2की.मी लांबितील रस्ता रुंदीकरण जागा ताब्यात आली व प्रत्यक्ष काम पुणे म.न.पा मार्फत सुरू करणेत आले. तसेच रेंज हिल चौक ते CEOP दरम्यानचे सुमारे 2.25 किमी लांबीचे रुंदीकरण यापूर्वीच पूर्ण करणेत आले आहे. आजचे कारवाई मूळे हॅरिस पुल ते सिओपी पर्यंत संपूर्ण रस्ता 42 मी रुंदिनुसार नागरिकांना सुमारे एक वर्षात उपलब्ध होऊ शकेल. (Pune Municipal Corporation news)

या कारवाईमध्ये ५० अधिकारी व ७५ मजूर सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे ५ पोलिस निरीक्षक आणि २५ अधिका-यांसह सुमारे ४५० पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे आणि पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, उपायुक्त महेश पाटील, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, विशेष भूसंपादन अधिकारी शेंडगे, नगरनियोजनच्या सहायक शीतल भिंगारदिवे, औंध क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप खलाटे, कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे, उपअभियंता प्रशांत महिंद्रकर, तसेच अतिक्रमण विभागातील अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. (PMC pune News)

४ प्रकरणांमध्ये महानगरपालिकेच्या विरूध्द जे दावे होते त्या दाव्यांचा निकाल महानगरपालिकेच्या बाजूने लागलेला आहे. लवकरच या ठिकाणी रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. (PMC Pune Marathi News)


News Title | Pune Municipal Corporation | Land acquisition action of Pune Municipal Corporation in Bopodi

Vadgaonsheri | वडगाव शेरीतील प्रश्नांबाबत महापालिका ऍक्शन मोडवर

Categories
Breaking News PMC Political पुणे

वडगाव शेरीतील प्रश्नांबाबत महापालिका ऍक्शन मोडवर

| आमदार टिंगरे यांच्या उपोषणाला यश

| भिंत तोंडून आमदारांनी रस्ताच केला मोकळा

पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार सुनिल टिंगरे यांनी केलेल्या उपोषनानंतर महापालिका प्रशासन लगेच कामाला लागले आहे. शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आमदार टिंगरे यांनी मांडलेल्या प्रलंबित कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. तसेच त्यावर कार्यवाहीचे निर्देश संबधित अधिकार्‍यांना दिले. याशिवाय पोरवाल रस्त्यांच्या समातंर रस्त्यावरील भिंत पाडून आमदार टिंगरे यांनीही कच्चा रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला.

मतदारसंघातील वाहतुक कोंडी, रखडलेले रस्ते, उड्डाणपूल, लोहगावचा पाणी प्रश्न याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याने आमदार सुनिल टिंगरे यांनी गुरूवारी महापालिका भवनासमोर उपोषण केले होते. त्यावर प्रशासनाने नरमाईची भुमिका घेऊन प्रलंबित प्रश्नाबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल असे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळीच महापालिकेची यंत्रणा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कामाला लागली. पालिका अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन रखडलेल्या कामांची पाहणी केली. तसेच संबधित अधिकार्‍यांनाही त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

|  या कामांची अति. आयुक्तांनी केली पाहणी

 

अति. आयुक्त ढाकणे यांनी विमानतळ रस्त्यावरील 509 चौकातील रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी चौकातील बुध्दविहार स्थलांतरीत केल्या जाणार्‍या पर्यायी जागेची पाहणी करून संबधित अधिकार्‍यांना सुचना दिल्या. त्यानंतर धानोरीतील लक्ष्मी टाऊनशीप ते स्मशान भुमी या रस्त्यांची पाहणी केली. त्यासंबधीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी जागेवर संबधितांना दिले. पुढे त्यांनी धानोरीतील सर्व्हे. न. 5 ते 12 जागेची पाहणी करून त्यासंदर्भात पुढील आठवड्यातच संरक्षण विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत तसेच वन विभागाच्या जागेसंदर्भात बैठकिचे आयोजन केले जाईल असे सांगितले. यावेळी अति आयुक्त ढकणे यांनी लोहगावच्या पाणी पुरवठ्याबाबत येत्या आठवडाभरात निविदा प्रक्रिया राबविली जाईल असेही सांगितले. तसेच नगर रस्ता बीआरटी काढण्याबाबत वाहतुक पोलिस आणि पीएमपी समवेत बैठक घेऊन सकारात्मक कार्यवाही केली जाईल आणि नदीकाठचा रखडलेला नदीकाठच्या ज्या जागा अद्याप ताब्यात आलेल्या नाहीत, त्याबाबत घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपुलाबाबत येत्या महिनाभरात निविदा प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.

| अन आमदारांनी भिंत तोंडून रस्ताच केला मोकळा

धानोरीतील पोरवाल रस्त्यांवरील वाहतुक कोंडीचा गंभीर झालेला प्रश्नही आमदार टिंगरे यांनी हाती घेतला आहे. या रस्त्याला पर्यायी समांतर जो रस्ता होत आहे. त्यावर मार्थोफिलिप्स शाळेजवळ असलेली भिंत आमदार टिंगरे यांनी जेसीबी बोलावून तोडली आणि स्वत: त्यावरून गाडी घेऊन जात हा रस्ता मोक़ळा केला. या रस्त्यावरही येत्या आठ दिवसात डांबरीकरण केले जाईल असे उपस्थित पथ विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
या वेळी पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विसास ढाकणे, उपायुक्त किशोरी शिंदे, सहायक आयुक्त नामदेव बजबलकर, अधिक्षक अभियंता मीरा सबनीस, कार्यकारी अभियंता संजय धारव, कनिष्ठ अभियंता शाहिद पठाण उपस्थित होते.
——————-

Former Mayor | PMC Pune | माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या निधनानिमित्त महापालिकेची कार्यालये ठेवण्यात आली बंद

Categories
Breaking News PMC पुणे

माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या निधनानिमित्त महापालिकेची कार्यालये ठेवण्यात आली बंद

पुण्याच्या माजी महापौर (Former Mayor Mukta tilak) आणि भाजपच्या कसबा विधान सभा  मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांचे गुरुवारी दुपारच्या सुमारास निधन झाले.  माजी महापौर म्हणून दुखवटा व्यक्त करण्यासाठी पुणे महापालिकेची कार्यालये नियमित वेळेपेक्षा १ तास अगोदर बंद ठेवण्यात आली. याबाबत महापालिकेकडून आदेश जारी करण्यात आले. (PMC Pune)

आदेशानुसार पुणे शहराचे माजी महापौर कै. मुक्ता शैलेश टिळक यांचे २२ डिसेंबर रोजी  निधन झाले आहे. त्यांच्या दुःखद निधना निमित्त दुखवटा व्यक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिकेची सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळून) मान्य धोरणानुसार आज २२/१२/२०२२ रोजी दुपारनंतर एक तास अगोदर (दु.५.१५ ते ६.१५) बंद ठेवण्यात आली. याबाबतचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी जारी केले. (Pune Municipal corporation)

 

 

 

Additional Commissioner Vikas Dhakne | विकास ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) पदाचा पदभार | १४ खात्यांचे कामकाज सोपवले

Categories
Breaking News PMC पुणे

विकास ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) पदाचा पदभार

| १४ खात्यांचे कामकाज सोपवले

पुणे | महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) पदी राज्य सरकारने नुकतीच विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांची नियुक्ती केली आहे. मात्र अजूनही त्यांच्याकडे कुठलाही पदभार देण्यात आला नव्हता. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar)  यांनी  ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) पदाचा पदभार सोपवला आहे. तसेच त्यांच्याकडे विविध १४ खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) हे पद महापालिका अधिकाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आले होते. सरकारने तसा अध्यादेश देखील जारी केला होता. मात्र हे पद मनपा अधिकाऱ्यांना न देता सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यामुळे सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे.(Pune Municipal corporation)

| महापालिका अधिकाऱ्यांसाठी पद निर्माण केले होते

   महापालिका सेवा नियमावली नुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण करण्यात आली होती. त्यातील एक पद महापालिका अधिकाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आले होते. अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) हे पद महापालिका अधिकाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आले होते. तसा अध्यादेश देखील राज्य सरकार कडून जारी करण्यात आला होता. पदोन्नतीने या पदावर महापालिका अधिकाऱ्याला जाता येईल. त्यानुसार सुरेश जगताप हे पहिले महापालिका अधिकारी होते जे अतिरिक्त आयुक्त बनले होते. जगताप सेवानिवृत्त झाल्यानंतर ही संधी ज्ञानेश्वर मोळक यांना मिळाली. मोळक देखील  सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे ही संधी विलास कानडे यांना मिळाली मिळाली होती.  कानडे काही दिवसापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे या पदावर महापालिकेचा अधिकारी येणे अपेक्षित होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने या पदासाठी ७ मनपा अधिकाऱ्यांची यादी आयुक्ताकडे पाठवली होती. यातील बरेच अधिकारी प्रयत्न देखील करत होते. मात्र यातील कुठल्याही अधिकाऱ्याला हे पद न देता सरकारी अधिकाऱ्याला हे पद देण्यात आले आहे.  यामुळे सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. (PMC Additional Commissioner)
दरम्यान ढाकणे यांच्याकडे कुठलाही पदभार देण्यात आला नव्हता. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी  ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) पदाचा पदभार सोपवला आहे. तसेच त्यांच्याकडे विविध १४ खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. नुकतेच याबाबतचे आदेश आयुक्तांनी जारी केले आहेत. (PMC Pune)
| ही आहेत खाती
विधी विभाग
मालमत्ता व व्यवस्थापन विभाग
भवन रचना विभाग
भूसंपादन व व्यवस्थापन विभाग
कामगार कल्याण विभाग
बीएसयूपी सेल
बीओटी सेल विभाग
पथ विभाग
ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर विभाग
उद्यान विभाग
स्थानिक संस्था कर विभाग
मध्यवर्ती भांडार विभाग
जिल्हा नियोजन व विकास समिती विभाग
क्रीडा व सांस्कृतिक विभाग

Additional commissioner Vikas Dhakne | भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या मदतीने विकास ढाकणे यांना पुणे मनपात येण्याची मिळाली संधी!

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या मदतीने विकास ढाकणे यांना पुणे मनपात येण्याची मिळाली संधी!

पुणे : महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) अतिरिक्त आयुक्तपदी रुजू झालेले विकास ढाकणे (Additional commissioner Vikas Dhakne) यांची आता पुणे महापालिकेत (PMC Pune)  अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील एका बड्या नेत्याने मदत केल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. पुणे महापालिकेत येण्यासाठी बरेच अधिकारी इच्छुक असतात. (pune municipal corporation)

विकास ढाकणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या मदतीने एकहाती कारभार चालवला होता. महाविकास आघाडीतील नेत्यांना पुरक भूमिका घेतल्यामुळे ढाकणे भाजपाकडून ‘लक्ष्य’ झाले होते. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर ढाकणे यांची बदली झाली. त्यांना काही काळासाठी रेल्वे सेवेत (IRPFS) काम करण्याचे आदेश देण्यात आले होते.

दरम्यान, पुणे महापालिकामधील तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खेचाखेची सुरू असतानाच राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्त म्हणून भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे यांची नियुक्ती केली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त विलास कानडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर वर्णी लागण्यासाठी महापालिकेतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली होती. यामध्ये प्रतिस्पर्धी अधिकाऱ्याचा स्पर्धेतून पत्ता कट करण्यासाठी विविध पर्यायांचा वापर केला. या पदावर नेमकी कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता असताना, राज्य शासनाने महापालिकेचे तिसरे अतिरिक्त आयुक्त म्हणून भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश राज्य नगरसचिव विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी काढले आहेत. या प्रक्रियेत पुणे जिल्ह्यातील भाजपाच्या एका बड्या नेत्याने ढाकणे यांना मदत केल्याचे सांगण्यात येत आहे.