Science exhibition | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इऑन ग्यानांकुर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

Categories
Breaking News cultural Education social पुणे

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इऑन ग्यानांकुर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

शरद पवार (Sharad pawar) हे भारतीय राजकारणातील मोठं नाव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रिय कृषीमंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पेलल्या. त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून 12 डिसेंबर 2022 रोजी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इऑन ग्यानांकुर इंग्लिश स्कूलने (Eon Gyankur School) शाळेच्या परिसरात विज्ञान प्रदर्शनाचे (Science Exhibition) आयोजन केले होते. प्रदर्शनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अंकुश शिंदे (उप. शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद ,पुणे) होते. त्याचबरोबर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे समन्वयक  एन. के. निंबाळकर सर,  सचिन काळे साहेब ( सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग)  प्रवीण भोसले सर आदि मान्यवर उपस्थित होते. (Sharad Pawar Birthday)

प्रदर्शन सुरू होताच सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रोजेक्ट्स आणि मॉडेल्समध्ये त्यांची प्रतिभा मेहनत आणि ज्ञान प्रदर्शित केले. प्रदर्शनात त्यांच्या संबंधित विषय विभागप्रमुख आणि टीमने आयोजित केलेल्या सर्व विषयांसाठी कॉर्नर, दोन सेल्फी कॉर्नर, गेम्स कॉर्नर, स्पेस शटल, अँटी ग्रॅव्हिटी फनेल, भूकंप अलार्म सिस्टम, विमानाचे वायुगतिकी, पावसाचे पाणी शोधणारे यंत्र असे विविध आकर्षण होते.

शाळेतील बारावीच्या विद्यार्थ्यांनी आणि भौतिकशास्त्र विद्याशाखेने आयोजित केलेल्या ISRO च्या सभागृहात बनवलेल्या खोलीत द रोबो आणि वॉक थ्रू स्पेसची रेस हे दिवसाचे खास आकर्षण होते. विद्यार्थ्यांची मेहनत त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व पालक मोठ्या संखेने आले होते. विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यामागे शाळेतील विज्ञान विषयाच्या विज्ञान विभाग प्रमुख सौ. दीपा यादव यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. मा.श्री. अंकुश शिंदे (उप. शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद ,पुणे) यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल आणि सहभागाबद्दल कौतुक केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता राय यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sonia Gandhi’s birthday |  सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह २०२२ | ‘एक पाऊल विश्वासाचे ‘ उपक्रमाने २ डिसेंबर रोजी प्रारंभ

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश पुणे

 सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह २०२२

| ‘एक पाऊल विश्वासाचे ‘ उपक्रमाने २ डिसेंबर २०२२ रोजी प्रारंभ

 |भारत जोडो यात्रा प्रदर्शन, सोनिया शक्ती शिष्यवृत्ती प्रारंभ, महिला पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर आदी विविध कार्यक्रम.

पुणे : कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या, सोनियाजी गांधी (Soniya Gandhi, Congress Leader) यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. एक पाऊल विश्वासाचे या उपक्रमाने सप्ताहाचे उदघाटन माजी मंत्री मा. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता एस.एम. जोशी सभागृह येथे होणार आहे. याप्रसंगी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार संग्रामदादा थोपटे, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती सप्ताहाचे मुख्य संयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी दिली.

सोनियाजी गांधी यांनी २००४ साली पंतप्रधानपदाचा (Prime Minister) त्याग केला. तेव्हापासून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने २००४ सालापासून सलग हा सप्ताह साजरा केला जात असून यंदा १८वे वर्ष आहे. या सप्ताहात दि. २ ते ९ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रम होतील. महाराष्ट्रातील दिग्गज नेतेही मार्गदर्शन करणार आहेत.

भारत जोडो यात्रा प्रदर्शन

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी (MP Rahul Gandhi)  यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra)  चालू असून जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील यात्रेदरम्यानच्या निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन दि. ७ ते ९ डिसेंबर रोजी भरविण्यात येणार आहे.

महिला पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर

पत्रकारितेच्या व्यस्त जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे बऱ्याच महिला पत्रकारांना (Woman Journalist) जमत नाही. हे लक्षात घेऊन पूना हॉस्पिटल येथे दि. ७ ते ९ डिसेंबर मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.

सोनिया शक्ती शिष्यवृत्ती योजना

सोनियाजी गांधी यांचा ७६ वा वाढदिवस आहे. यानिमित्त महाविद्यालयीन ७६ विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

माजी मुख्य मंत्री  पृथ्वीराजजी चव्हाण यांचे दि. ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी ‘ राज्यघटनेचे संरक्षण आवश्यक विषयावर व्याख्यान.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग संस्थांमध्ये विविध कार्यक्रम.

एडस नियंत्रण जनजागृतीसाठी (AIDs control) देवदासींच्या उपस्थितीत सामुदायिक शपथ आणि चित्र प्रदर्शन. बुधवार पेठेतील गुजराती शाळेत दि. ७ रोजी कार्यक्रम होईल.

गाथा रयतेच्या राजाची, हा शाहिरी पोवाड्यांचा जोशपूर्ण कार्यक्रम. दोन तासांचा हा कार्यक्रम शहरात विविध भागात सादर केला जाईल.

सफाई कर्मचाऱ्यांना मोफत साडी वाटप.

तृतीय पंथीयांशी संवाद आणि सन्मान.

सुकन्या समृध्दी योजना कार्ड वाटप.

महाआरोग्य तपासणी शिबीर

स्त्री पुरुष समानता विषयावर चर्चा.

आईला सुटी हा गृहिणींसाठी अभिनव उपक्रम.

बॉक्सिंग स्पर्धा.

महिलांसाठी रोजगार मेळावा.

DCM Devendra Fadanvis Birthday | राष्ट्र प्रथम, मग पक्ष, शेवटी आपण…हाच देवेंद्रजींचा बाणा | अमोल बालवडकर

Categories
cultural Political पुणे महाराष्ट्र

राष्ट्र प्रथम, मग पक्ष, शेवटी आपण…हाच देवेंद्रजींचा बाणा

| अमोल बालवडकर, नगरसेवक, भारतीय जनता पार्टी

आपण राहतो त्या परिसराचं, आपल्या शहराचं, आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं भलं करावं अशी सामाजिक ओढ असणारा मी एक कार्यकर्ता आहे. समाजकारण साधण्यासाठी लोकशाहीत राजकारण महत्वाचं असतं. म्हणून मी महापालिकेची निवडणूक लढवली. लोकांनी भरपूर प्रेम करत मला निवडून दिलं. माझ्या सारख्या तरूण कार्यकर्त्यांपुढं आदर्श आहेत आपले देवेंद्रजी फडणवीस. वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे नगरसेवक बनले. पाच वर्षांनी नागपुरकरांनी त्यांना पुन्हा भरघोस मतांनी निवडून दिलं. या दुसऱ्या खेपेस तर अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी म्हणजे सन १९९७ मध्ये नागपुरचे महापौर बनले. महापालिकेचं कार्यक्षेत्र त्यांच्या झपाट्याला, कर्तुत्वाला अपुरं पडू लागल्यानं १९९९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर आजतागायत त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाही. विधानसभेच्या १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग पाच निवडणुका त्यांनी जिंकल्या. विरोधी पक्षात असताना देवेंद्रजींनी त्यांच्या अभ्यासूपणाच्या बळावर सत्ताधाऱ्यांना किती वेळा सळो की पळो करून सोडलं याची गणतीच नाही. देवेंद्रजी विधानसभेत प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिल्यानंतर दहा-दहा वर्षं मंत्री म्हणून काम केलेल्या ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा घाम फुटायचा. प्रत्यक्षात घेतलेल्या वकिलीच्या शिक्षणाचा सगळा उपयोग देवेंद्रजी जनतेची वकिली करण्यासाठी विधिमंडळात करतात. आमदारकीच्या चौथ्या खेपेस देवेंद्रजींना पक्षानं थेट मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. पूर्वपुण्याई, घराणेशाही, धनशक्ती या बळावर भारतीय जनता पक्षात काहीही मिळत नाही. वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना महाराष्ट्रासारख्या देशातल्या सर्वात प्रगत राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा मान मिळू शकला.

देवेंद्रजींचा आज वाढदिवस आहे. वयाचं अर्धशतक पूर्ण केलेल्या या आपल्या नेत्यानं सार्वजनिक जीवनातली तीस वर्षं पूर्ण करावीत ही फार मोठी गोष्ट आहे. विशेष म्हणजे महापालिकेपासून सुरु झालेली त्यांची वाटचाल आजवर अपराजित राहिलेली आहे. हेवा वाटण्यासारखा हा प्रवास आहे. या प्रवासात देवेंद्रजींची सगळ्यात मोठी कमाई कोणती असेल तर प्रचंड विश्वासार्हता होय. देवेंद्रजींनी एखादा मुद्दा उपस्थित केला, प्रश्न मांडला म्हणजे त्यात शंभर टक्के तथ्य असतेच हे त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतून दिसून आलं. व्यक्तिगत आरोप, निंदानालस्ती यांना त्यांनी कधीही स्थान दिलेलं नाही. परंतु, राष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या हिताच्या आड कोणी येत असेल तर त्याची हजेरी घ्यायला ते चुकत नाहीत. त्यांच्या नैतिकतेचा दरारा विरोधकांना असतो. सत्ताधारी म्हणून काम करत असतानाही त्यांनी महाराष्ट्रातील सर्व घटकांचा प्रतिनिधी म्हणून राज्य केलं. त्यामुळं प्रत्येक मराठी माणसाला देवेंद्रजींचं मुख्यमंत्रीपद आपलं वाटल. ‘जे बोलतो ते करतो,’ ही पारदर्शकता राज्यकर्ता फडणवीस यांनी दाखवली आहे. पुण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा धडाका यापूर्वी खचितच कोणी दाखवला असेल. यापुर्वीच्या राज्यकर्त्यांनी मेट्रोच्या पोकळ घोषणा करत वर्षानुवर्षे काढली. परंतु, पुणेकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढणारी, घरी किंवा ऑफिसमध्ये जलद वेळेत पोहोचवणारी आणि पुण्याची हवा शुद्ध ठेवणारी पुणे मेट्रो ही फडणवीसांच्याच काळात आली. देवेंद्रजींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा केल्याने आता तर काही भागात ती धावूसुद्धा लागली आहे. वाढत्या पुणेकरांची तहान भागवणाऱ्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचंही असंच आहे. विरोधकांनी चर्चेत वेळ घालवला. फडणवीसांनी ती योजना विक्रमी वेळेत पूर्णत्वास नेऊन दाखवली. या शिवाय पुरंदर विमानतळ, चांदणी चौकातील उड्डाणपूल, कात्रज-कोंढवा रस्ता, बाणेर-बालेवाडीला स्मार्ट करण्याचा विषय, समान पाणीपुरवठा योजना, माण- म्हाळुंगे हायटेक सिटी, माण- हिंजवडी- बाणेर- बालेवाडी- शिवाजीनगर मेट्रो व मुळा-मुठा नद्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसन अशा पुण्याला अत्याधुनिक करणाऱ्या कितीतरी योजना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरु झाल्या. महापालिका हद्दीत नव्यानं समाविष्ट २३ गावांचा निर्णय देवेंद्र फडणवीस असते तर केवळ राजकीय हेतु साठी झाला नसता , देवेंद्रजींनी भरघोस निधी या गावांना मनपा हद्दीत समाविष्ट करताना त्यांनी नक्कीच दिला असता .मात्र मधल्या काळात मराठी माणसांचा विश्वासघात करून मविआ सरकार सत्तेत आलं. मविआच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचारी आणि ढिसाळ कारभारामुळं पुण्याची प्रगती ठेचकाळली. मला पूर्ण विश्वास आहे की गतीमान कार्यकुशलता असणारे देवेंद्रजी आता पुन्हा सत्तेत आल्यानं या सर्व योजनांना वेग देतील. पुणेकरांचं जीवन सुखमय करतील.

शत्रुसुद्धा बोट दाखवणार नाही इतके निष्कलंक चारित्र्य देवेंद्रजींनी राजकारणाच्या बजबजपुरीत राहून जपलं आहे. स्वच्छ हात, सही दिशा, स्पष्ट निती ही देवेंद्रजींच्या राजकारणाची त्रिसूत्री आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिलेली राष्ट्र प्रथम, मग संघटना आणि शेवटी स्वतः ही शिकवण हाच देवेंद्रजींचा बाणा आहे. म्हणूनच सत्तेत सहभागी होणार नसल्याचे सांगून एकनाथजी शिंदे यांच्या मस्तकावर मुख्यमंत्रीपदाचा मुकूट ठेवून देवेंद्रजी निर्लेपपणे बाजूला झाले होते. मात्र केवळ पक्षाचा आदेश म्हणून ज्या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषविलं त्याच ठिकाणी ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास तयार झाले. व्यक्तिगत अहंकार, इच्छा त्यांनी बाजूला ठेवली. पक्षाचा आदेश सर्वोच्च मानला. असा त्याग राजकारणात दुर्मिळ असतो. केवळ गुणवत्ता, प्रामाणिकपणा, जनतेप्रती असणारी बांधिलकी, निस्सिम राष्ट्रभक्ती आणि पक्षावरची अतूट निष्ठा या गुणांच्या बळावर राजकारणातली शिखरं कशी चढत जावीत, याचं उदाहरण म्हणून माझ्यासारखा तरुण कार्यकर्ता देवेंद्रजींकडं पाहतो. ‘क्या करेगा अकेला देवेंद्र’ असं म्हणून कधी कोणी खिजवण्याचा प्रयत्न केला. कधी जवळच्या नातेवाईंकावर हल्ला करून त्यांना डिवचलं गेलं. ‘मी पुन्हा येईन’, या राजकीय सभेतील वक्तव्यावरून देवेंद्रजींना कमी लेखलं गेलं. कधी ज्येष्ठ म्हणवणाऱ्या नेत्यांनी जातीवरून त्यांच्यावर हल्ले केले. मात्र यातल्या कशाबद्दलच सूडाची भावना न ठेवता देवेंद्रजींनी सर्वांना माफ केलं आणि शांतपणे काम करीत राहिले. पुरेसं संख्याबळ नसतानाही त्यांनी पक्षाला राज्यसभा आणि विधानसभेत अशक्यप्राय वाटणारं यश मिळवून दिलं. सुसंस्कृत, सज्जन तरूणांना राजकारणात भवितव्य असल्याची आशा देवेंद्रजींमुळे जिवंत राहिली आहे. राजकीय डावपेचात आणि बेरजेच्या राजकारणातही महारथी असणाऱ्या देवेंद्रजींनी भल्याभल्यांचे अंदाज धुळीस मिळवले. महाराष्ट्राचा हा लाडका चतुर, चतुरस्त्र नेता आज ना उद्या राष्ट्राच्या सेवेत महत्त्वाची भूमिका निभावणार आहे याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. महाराष्ट्राच्या या सुपूत्रास पुणेकरांच्यावतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना उदंड, निरामय आयुष्य देवो.

अमोल बालवडकर
भाजपा नगरसेवक पुणे मनपा
(२०१७-२०२२)

Birthday Of Raj Thackeray | वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना कळकळीचे आवाहन 

Categories
Breaking News cultural Political महाराष्ट्र

वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना कळकळीचे आवाहन 

राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज मनसे कार्यकर्त्यांना एका ऑडिओ क्लिपच्या माध्यामातून एक कळकळीचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी ट्वीटरवर याबाबत एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांना १४ तारखेला वाढदिवसानिमीत्त मनसे कार्यकर्त्यांना भेटायला घरी येऊ नका, अशी विनंती केली आहे.

याआधी पुण्यात झालेल्या सभेत, राज ठाकरे यांनी त्यांच्या पायावरील शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती, मात्र कोरोना संसर्गामुळे त्यांची ती शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती, त्यानंकर राज ठाकरे यांनी हे आवाहन केले आहे. ते म्हणाले आहेत की, माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे, त्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तपासणीत कोविडचे डेड सेल आढळल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ते काय असतं हे मलाही आणि कोणालाच नाही माहिती नाही. त्यामुळे ती शस्त्रक्रिया रद्द झाली. त्यानंतर मी १०-१२ दिवस कोविडच्या नियमांप्रमाणे घरातच क्वॉरंटाईन आहे. त्या सगळ्या दरम्यान १४ तारखेला माझा वाढदिवस आहे. आपण सर्वजण दरवर्षी मा‍झ्या वाढदिवसाला प्रेमाने, उत्साहाने माझ्याकडे भेटायला येता. मीही आपल्या सर्वांची आतुरतेने वाट पाहातो. सर्वांना भेटल्यावर बरंही वाटतं, असे राज ठाकरे म्हणालेत
तसेच त्यांनी यापुढे बोलताना, पण, या वर्षी मला १४ तारखेला वाढदिवसाला कोणालाही भेटता येणार नाही. याचं कारण म्हणजे, त्या गाठी भेटीत परत जर संसर्ग झाला तर त्यातून मला परत जर शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली, तर मी ती किती पुढे ढकलायची यालाही मर्यादा असते. त्यामुळे पुढल्या आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरलेली आहे, त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. 

याबरोबरच त्यांनी या कारणामुळे मी १४ तारखेला कुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे , असे सांगितले आहे. ते म्हणाले की, आपण जिथे आहात तिथेच राहा. माझी शस्त्रक्रिया पूर्ण होईल, जेव्हा मला बरं वाटेल तेव्हा मी आपल्या सर्वांना निश्चित भेटेन. पण, १४ तारखेला कृपया आपण कुणीही घरी येऊ नये, ही विनंती, असे ते म्हणालेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांना भेटता येणार नाहीदरम्यान यावर्षी राज ठाकरे हे १४ जून रोजी आपला ५४ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक कार्यकर्ते भेटून शुभेच्छा देत असतात. मात्र यंदा राज ठाकरे यांच्या आरोग्याच्या कारणास्तव कार्यकर्त्यांना त्यांना भेटता येणार नाहीये.

Sharad pawar : आमची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे…. आम्ही असा नेता पहिला 

Categories
cultural Political पुणे महाराष्ट्र

आमची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे…. आम्ही असा नेता पहिला

१२ डिसेंबर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज जन्मदिवस. देशाचे लोकनेते असणारे आणि या महाराष्ट्राची संपूर्ण जाण असणारे या राज्यातील,या देशातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची खाती ख्याती आहे असे आदरणीय शरद पवार साहेब हे वयाची ८१ वर्ष  पूर्ण करून अर्थात सहस्रचंद्र दर्शनाचा योग पूर्ण करून  ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा….

आमची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. मी वयाची ८० वर्षे पूर्ण करणारा परंतु या वयात सुद्धा तरुणांनाही लाजवेल अशा प्रकारचा अफाट जनसंपर्क असणारा त्याचबरोबर उदंड उत्साह असणारा या वयातील एकमेव नेता पाहिला , हे भाग्य या पुढच्या पिढीला मिळेल की नाही याबाबत भाकीत वर्तवता येणार नाही. परंतु आम्हाला हा योग मिळाला आहे, हे आम्ही आमचं नशीब समजतो. आज देशात विविध राजकीय पक्षांच्या  विविध विचारधारा मानणारे विविध क्षेत्रातील मंडळी असतील या सर्वांशी एकाच वेळेस थेट संपर्क ठेवणाऱ्या पवारसाहेब आपल्याला परिचित आहेत. महाराष्ट्राच्या भूमीतून दिल्लीत जाणारे आणि तब्बल मागची तीन दशकं आपलं कर्तृत्व सिद्ध करणारे पवार साहेब हे महाराष्ट्रातील एकमेव नेते ठरले आहेत. महाराष्ट्राने यापूर्वी देशासाठी अनेक नेते दिले परंतु त्यांना काम करण्यासाठी खूप कमी वेळ मिळाला. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर   त्या वेळेपासून देशाच्या, राज्याच्या सर्व राजकीय प्रमुख, राजकीय पक्षांच्या नेत्यांशी  सलोख्याचे संबंध ठेवत असताना आपल्या कारकीर्दीतील खूप जास्तीचा  वेळ विरोधी पक्षात घालवत असताना प्रत्येक सत्ताधारी पक्षाबरोबर दोन हात करण्याची वेळ आदरणीय पवार साहेबांवर आली पण या परिस्थितीमध्ये देखील आपला पक्ष आपली विचारधारा त्याचबरोबर उपेक्षित वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका तसेच  आपण ज्या  राज्याला, आपल्या जनतेला, ज्यांच्याशी आपली बांधिलकी आहे त्यांच्याशी आपले उत्तरदायित्व आहे, त्या वर्गाला यांच्याबरोबर पवार साहेबांनी कधीही प्रतारणा केली नाही, सत्ताधाऱ्यांच्या  विरोधात जात केलेला संघर्ष संपूर्ण देशाने ,उभ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे. साहेबांचा हा लढवय्या स्वभाव निश्चितच आम्ह कार्यकर्त्यांना भाऊन जातो. मागच्या सहा दशकांच्या या राजकीय प्रवासात पवार साहेब अभेद्य का राहिले. ते राजकीय असो व आपल्या वैयक्तिक आयुष्यातील आलेल्या शारीरिक-मानसिक संकटांमध्ये ते का डगमगू  शकले नाही हा अनुभव माझ्या राजकीय आयुष्यात फार जवळून घेता आला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.

सप्टेंबर २०१९ ला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि महाराष्ट्रातील भाजप विरोधी पक्षांचा संघर्षाचा काळ होता. या संघर्षाच्या काळात मोदी शहा या जोडीने या देशात भाजपेतर पक्ष्यांच्या सत्ता येणारच नाही अशा प्रकारच्या खोट्या कारवाया सुरू केल्या होत्या.  अर्थात वेगळ्या प्रकारच्या गळचेपीचे राजकारण सुरू केले होते. पण  ६० वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या व्यक्तिगत आयुष्यावर वा त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर राजकीय पक्षांनी काही जरी बेछूट आरोप केले तरी  ते आरोप एखाद्या सभेपुरते मर्यादित असायचे आरोपांना लेखी तक्रारीचे स्वरूप कधीही प्राप्त झाले नव्हते.  त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेलाही हे कळून चुकलं होतं की पवार साहेबांसारखे  नेतृत्व हे कायम महाराष्ट्राच्या जडण घडणीसाठी काम करणारे व्यक्तिमत्व आहे ,परंतु साहेबांचा राजकीय प्रवास थांबवावा किंवा अडचणीत घ्यावा यासाठी हे आरोप होत आले आहेत  आणि त्यासंदर्भात निवडणुका झाल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या हालचाली होत नसायच्या असे असताना महाराष्ट्रातील २०१९ची निवडणूक जिंकायची या वैर भावनेने केंद्रातील मोदी सरकारने ईडीच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवली मुळातच पवार साहेब हे राज्यातील कुठल्याही साखर कारखान्याचे किंवा राज्य सहकारी बँकेचे सभासद नसताना त्या कारखान्यांमधील व्यवहारांमध्ये किंवा राज्य सहकारी बँकेकडून कारखान्यांना देण्यात येणारे कर्जाच्या  कुठल्याही प्रक्रियेमध्ये साहेबांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आलेला नसताना फक्त विरोधी  पक्षातील सर्वात  दिग्गज नेता आम्ही कसा अडचणीत आणला व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाटचाल कशी थांबवयाची  या हेतू पोटी ही नोटीस पाठवली होती. ८० वर्षाच्या योद्ध्याला आयुष्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कायदेशीर नोटीशीला सामोरे जावे लागले होते. ही नोटीस मिळाल्यानंतर इतर कुठलीही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विपरीत आदरणीय पवार साहेबांनी भूमिका घेतली आणि थेट ईडीला आव्हान  दिले  की, मी तुमच्या कार्यालयांमध्ये तुमच्या भेटीला येत आहे . अशा या अनपेक्षित उत्तराने भांबावलेले मोदी सरकार यांना एकूणच बॅकफूटवर जाण्याची वेळ आली आणि एकूणच भारतात आणि महाराष्ट्रात एक वेगळा संदेश गेला जाणून-बुजून पवार साहेबांना अशाप्रकारे टार्गेट केले जात आहे आणि खुद्द पवार साहेब येत आहेत असं म्हटल्यानंतर ईडीची आणि या एकूणच कट-कारस्थानाची हवाच निघून गेली होती.  त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांनी अगदी टोकाची भूमिका सार्वजनिक माध्यमांमध्ये जाहीर केल्यामुळे यासंदर्भात आपण अडचणीत येतोय याची जाणीव मोदी सरकारला झाली होती.  मला आठवतंय ज्या दिवशी ईडीच्या कार्यालयांमध्ये पवार साहेब भेट देण्यास जाणार होते. त्या दिवशी पवार साहेबांना पाठिंबा देण्यासाठी मी आणि माझे मित्र नगरसेवक विशाल तांबे आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो मुंबईचा प्रवास चालू असताना या संपूर्ण प्रवासात आम्ही विविध माध्यमांमध्ये या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होतो याच वेळी माध्यमांमध्ये एक माहिती अशी मिळाली की,मुंबईच्या कमिशनरने  स्वतः साहेबांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जात साहेबांना विनंती केली की, आपण ईडीच्या कार्यालयात भेट द्यायला जाणे टाळावे. या गोष्टीतून एक जाणवले की ईडीचे नोटीसमुळे अडचणीत आलेले फडणवीस सरकार आणि एकूणच मोदी सरकार यांनी पवार साहेबांना समोर सपशेल गुडघे टेकले होते आणि हे संपूर्ण चित्र उभ्या महाराष्ट्राने आणि महाराष्ट्रातील जनतेने बघितले होते. असे  असताना आम्ही ईडीच्या कार्यालयात जाणे टाळले  व  थेट साहेबांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी गेलो. आमची गाडी सिल्वर ओक  निवासस्थानी पोहोचे पर्यंत पवार साहेबांची पत्रकार परिषद संपत आली होती तेवढ्यात आम्हाला समजले की पवार साहेब दोन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील पाहणी दौऱ्यासाठी जाणार आहेत म्हणून, पवार साहेब पुण्याला जाणार असणाऱ्या ताफ्याजवळ आम्ही थांबलो.  साहेब सिल्वर ओकच्या पायऱ्या उतरून खाली येत असताना तेवढ्यात त्यांचे लक्ष माझ्याकडे गेलं आणि तेव्हा त्यांनी तेवढ्यात मला विचारलं की कधी आलात? मी त्यांना सांगितलं की, साहेब सकाळीच आलोय त्यानंतर आता पुढे कुठे जाणार ? मी म्हटलं साहेब पुण्याला निघणार आहोत ते म्हणाले गाडी कुठे आहे ? मी म्हटलं गाडी सोबतच आहे साहेब . ते म्हणाले ठीक आहे गाडी माझ्या ताफ्यासोबत ठेवा असं म्हटल्यानंतर आम्ही साहेबांच्या ताफ्याच्यामागे गाडी ठेवली हा ताफा वाशीजवळ आल्यानंतर जिल्हा पोलीस बदलासाठी थांबला.

दोन ते तीन मिनिट झाले तरी ताफा हलला नाही म्हणून आम्ही विचारात असतानाच तेवढ्यात साहेबांचे चालक श्री. गामा  मामा आमच्या गाडीजवळ आले आणि त्यांनी सांगितले की पवार साहेबांनी तुम्हाला गाडी जवळ बोलवले आहे त्याचबरोबर मी आणि विशाल दोघेही साहेबांच्या  गाडी जवळ गेलो, साहेबांनी आम्हाला सांगितले की तुम्ही दोघे गाडीत बसा, मी पुढे बसतो तुम्ही दोघे मागे बसा.  त्याचबरोबर मी, विशाल आणि आमदार रोहित पवार आम्ही तिघेही गाडीत मागे बसलो, असा आमचा प्रवास वाशी पासून सुरू झाला.  या प्रवासामध्ये साहेबांनी इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.  मला आठवतंय जसा खोपोलीचा घाट क्रॉस  करून आम्ही वर आलो,तशी साहेबांची तेथील पवनचक्क्यांवर  नजर पडली तसं या पवनचक्क्यांकडे  बोट करून साहेब म्हणाले की या पवनचक्क्यांचा प्रवास तुम्हाला माहिती आहे का? आम्ही म्हंटलं  नाही साहेब? मग साहेबांनी सांगितलेकी ९०च्या दशकामध्ये मी राज्याचा मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी परदेशात  गेलो होतो,लोक तिथेj असणाऱ्या पवनचक्क्यांच्या माध्यमातून विद्युत निर्मिती आणि स्थानिकांना मिळणारा रोजगार याची माहिती घेत ही संकल्पना आपल्या महाराष्ट्रात प्रत्यक्षात उतरेल की नाही याचा अभ्यास घेतला त्यानंतर महाराष्ट्रात एकदा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना तेथील स्थानिक आमदार श्री. विक्रमसिंह पाटणकर यांच्या मतदारसंघात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट देण्याचा योग आला,तो कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पवार साहेबांना आजूबाजूच्या परिसरात सर्व पठार दिसले आणि पवार साहेबांनी हेलिकॉप्टर उपलब्ध करण्याच्या सूचना श्री. पाटणकर यांना दिल्या.  थोड्याच वेळात हेलिकॉप्टर आले . हेलिकॉप्टरच्या माध्यमातुन आदरणीय पवार साहेबांनी आजूबाजूच्या डोंगरांची पाहणी केली व या पठारावर  पवनचक्क्या बसवणे शक्य होईल का ?याबाबत चाचपणी केली . त्या माध्यमातून महाराष्ट्रात त्याकाळी कमी असणारे विजेची गरज भागवता येईल तसेच या पठारी भागातील नागरिकांना यातून उत्पन्न सुद्धा सुरू होईल अशी दूरदृष्टी त्या वेळेस साहेबांची होती.  याबाबतची कल्पना त्यांनी स्थानिक लोकांसमोर मांडली त्यावेळी ही कल्पना महाराष्ट्रातील नागरिकांसाठी त्या परिसरातील नागरिकांसाठी थोडी शंकास्पद होती की, ही योजना यशस्वी होईल की नाही परंतु पवार साहेबांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांनी तयार होत  हा बदल स्वीकारला आणि त्यानंतर सुरुवातीला सातारा आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात  अशाप्रकारे पवनचक्क्यांच्या जाळं उभं राहिलं. त्यानंतर या तंत्रज्ञानाने राज्याभर खूप मोठा विस्तार केला.  एका नव्या व्यवसायाची सुरुवात महाराष्ट्रात झाली ही सगळी माहिती घेत असताना आम्ही पुण्यात कधी पोहोचलो,हे  आम्हाला समजलं नाही.  या प्रवासात लोणावळा पासुनच ठीक ठिकाणी कार्यकर्त्यांनी साहेबांच्या समर्थनार्थ तसेच स्वागतासाठी उभे राहून मोठ्या मोठ्या मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या, तसेच अनेक  ठिकाणी  साहेबांचा स्वागत करण्यात आले .

या सर्व काळात साहेबांनी एकदा देखील असे म्हटले नाही की केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने माझ्यावरती सूडबुद्धीने  कार्यवाही केली किंवा मला त्यांचा राग आहे असं साहेब बोलले देखील नाही.  खूप साऱ्या  लोकांना अशा प्रकारची काही घटना घडल्यानंतर एकमेकांना फोन करून शेखी  मिरवण्याची सवय असते अशा प्रकारचे चित्र मी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बघत असतो परंतु या संपूर्ण दोन तासाचा प्रवासामध्ये साहेबांनी एकदाही मोबाईलला हात लावला नाही किंबहुना मी आज मोदी अथवा फडणवीस सरकारला कसा धडा शिकवला अशा प्रकारचा एकही वाक्य वापरलेले नाही त्याही पलीकडे जाऊन आपल्या साठ वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये महाराष्ट्रात गुंतवणूक कशी आली, इतर सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील काही मंडळींच्या आठवणी आम्हाला सांगितल्या  हा आमच्यासाठी निश्चितच एक वेगळा अनुभव होता.  मी पुन्हा एकदा सांगेल आयुष्यामध्ये एवढी मोठी घडामोडी घटना दिवस ज्याने त्याच्या आयुष्यात आला त्याच दिवशी पवार साहेबांचा सोबत प्रवास करण्याचा योग पवार साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपलब्ध करून दिला ही माझ्या आयुष्यातील सुवर्णमय घटना आहे.  आयुष्यात कितीही वादळ आली,संकट  आली तरी ङगमगायचे  नसतं ,त्याला जायचं असत आणि त्याला सामोरे जात असताना त्याची शेखी मिळून घ्यायची नसते तर या वादळ वाऱ्यामध्ये सुद्धा जमिनीवर पाय घट्ट रोवून त्या परिस्थितीची सामना कसा करावयाचा हे पवार साहेबांनी सांगितले हा एक पुढच्या काळात राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना संकटांशी दोन हात करण्याचा वेगळा विचार पवार साहेबांच्या कृतीतून आम्हाला आम्ही शिकलो आदरणीय पवार साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिला हे ऋण  कधीच न फिटणारे आहे या हिमालयाएवढ्या उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या नेतृत्वाला मी मनापासून सलाम करतो वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो.  साहेब आपण शतायुषी व्हा..  शतायुषी होत असताना या देशाचं पंतप्रधानपद भूषवावे ,  ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची निश्चितच अपेक्षा राहील.  पंतप्रधानपद हे कुठल्याही वयाच्या चौकटीत मोजले जाणारे नाही ते या देशात सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या हातात यावे , यासाठीचा काळ असून येत्या काळात आपण हे पद भूषवाल,  अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अपेक्षा आहे.  पुन्हा एकदा आपणांस  वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…

 

श्री. प्रशांत सुदाम जगताप

शहराध्यक्ष. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.