Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ४ निर्णय

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

नामकरणाबाबतच्या प्रस्ताव मंजूरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हे दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हे प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आले. त्यावर या दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.
—–०—–

नगर विकास विभाग

नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ” असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
नामकरणाबाबतचा प्रस्तावाच्या मंजूरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आला व त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार 12.56 योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्व. पाटील यांचे योगदान आहे. तद्नंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित जमिनीसाठी मोबदला ठरवावयाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेले 22.5% योजनेचे धोरण सुद्धा 12.5% धोरणाच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे.

नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून 1160 हे. क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसीत करण्यात येत आहे. या संपूर्ण 1160 हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबईमधील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती.

नवी मुंबई परिसरातील विकासामधील दि.बा. पाटील यांचे योगदान व स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता, नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण “लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास आज मान्यता देण्यात आली.

—–०—–

नगर विकास विभाग

एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांसाठी बँक कर्जाला शासनाची हमी

एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी 60 हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास तसेच शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या 12 हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर क्षेत्रात 1 लाख 74 हजार 940 कोटी किंमतीचे महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये विविध मेट्रो रेल प्रकल्प, बोरीवली- ठाणे भुयारी मार्ग, ठाणे कोस्टल रोड व शिवडी वरळी कनेक्टर, इत्यादी महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पांना निधी उपलब्ध होऊन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियमातील कलम 21 नुसार शासनाची पूर्वमान्यता घेण्याची तरतूद विचारात घेता महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणास आवश्यकतेनुसार 60 हजार कोटी पर्यंतचे कर्ज उभारण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली.
0000

Supriya Sule Vs CM | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुप्रियाताईंना का वाटते काळजी? सुप्रियाताईंनी दिले स्पष्टीकरण 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुप्रियाताईंना का वाटते काळजी? सुप्रियाताईंनी दिले स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मला फार काळजी वाटते आहे . त्यांना प्रॉम्पटींग करणे, चिठ्ठी देणे यासह त्यांना कमी दाखवण्याचे काम उपमुख्यमंत्री करत आहेत. सध्या अडचणीत आलेले शेतकरी, नागरिक यांच्यासाठी या सरकार ने कामे करावे, असं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. ज्यांच्याकडे एक आमदार आहे त्यांच्या घरी १०५ आमदार असलेले मंत्री जातात, असा टोलाही खासदार सुळे यांनी भाजपला लगावला.

शिवसेनेतून बाहेर पडून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी भाजपसोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केले आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बिचारे आहेत. यामागे मागे मोठे षडयंत्र आहे, त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटते आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, दिपक केसरकर यांच्या बरोबर मी खूप वर्ष कामे केले आहेत. त्यामुळे मला मुख्यमंत्र्यांची चिंता आहे. सध्या कोण कुठल्या पक्षात आहे हे आजकाल कळतच नाही. मी स्वतः गोंधळात आहे. सध्या राज्यात जे राजकारण जे चाललं आहे ते महाराष्ट्राला शोभत नाही.

काल राज्य शासनाने संरपंच आणि नगराध्यक्ष ही पदे प्रत्यक्षरित्या जनतेतून निवडली जातील अशी घोषणा केली. यावर बोलताना सुळे म्हणाल्या, सरपंच आणि सदस्या बॉडी वेगळी झाली तर एकत्र चर्चा होत नाही. त्यामुळे याचा वाईट परिणाम होईल.  राजकारण म्हणजे व्यवसाय नाही. लोकांकडून पैसे घेणे, धमक्या देणे हे राजकारण नाही, असंही खासदार सुळे म्हणाल्या.

पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सचे शिबीर आयोजित केलेल्या सहभागी झालेल्या महिलांना प्रमाण पत्र वाटप समारंभ निमित्त सुप्रिया सुळे, रुपाली चाकणकर उपस्थितीत होत्या.

Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठक निर्णय

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

मंत्रिमंडळ बैठक निर्णय

गुरूवार  १४ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात

पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय
( वित्त विभाग)

राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार.
(नगर विकास विभाग)

केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
(नगर विकास विभाग)

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार
(नगर विकास विभाग)

राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.
(ग्रामविकास विभाग)

अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.
(ग्रामविकास विभाग)

बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.
(पणन विभाग)

आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्या

CM Mets PM | केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली  : राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत  शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही सरकार स्थापन केले आहे. हे सरकार राज्यातील सर्व घटकांच्या हितांची जपणूक करण्यासाठी कार्यरत राहील व यासाठी केंद्रशासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणूनच सरकार स्थापनेनंतर शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपती , प्रधानमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या सदिच्छा भेटी घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यासह दिल्लीत आलो असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या विकासाबाबतचा दृष्टीकोन समजून घेऊन केंद्राच्या सहकार्याने राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी रात्री केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची 6 ए, कृष्ण मेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आज सकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची 17 अकबर रोड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 7 ,लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतू आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. तसेच त्यांनी लगेचच विविध विषयांवरील बैठकांना उपस्थिती देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश उपस्थित होते. यावेळी काही आमदारांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांना सदिच्छा दिल्या. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.
तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयात प्रवेश केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

Disaster Management | CM Eknath Shinde | आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र शेती

आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा

| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

मुंबई : सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावे म्हणजे यंत्रणेतील सर्व लोक देखील सतर्क राहतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील समिती सभागृहात राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेणारी बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आपत्तीमध्ये समन्वय अतिशय महत्त्वाचा आहे. एनडीआरएफने त्याचप्रमाणे लष्कराने देखील गेल्यावर्षी पुराच्या परिस्थितीत चांगले काम केले आहे. कोणत्याही परिस्थितीत संपर्क आणि संवादाचा अभाव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयांमधील वॉर रुम यंत्रणा सज्ज राहून लोकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा.गेल्या वर्षी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. विशेषत: नेहमी दरड कोसळणाऱ्या जागांव्यतिरिक्त नव्या ठिकाणी या दरडी कोसळल्या. त्यामुळे यंदा देखील अधिक दक्ष राहण्याची गरज आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना मोठ्या पावसाच्या वेळेस तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवून त्या ठिकाणी त्यांना जेवण्याखाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकांनी घ्यावी. मी आणि उपमुख्यमंत्री 24 तास आपणा सर्वांसाठी उपलब्ध असून आपल्याला गतीमानतेने शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या पाहिजेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

275 मि.मी. पाऊस एका दिवसात पडूनही महानगरपालिकेने तसेच रेल्वेने सफाई तसेच पाणी तुंबणार नाही यासाठी केलेल्या व्यवस्थेमुळे कोठेही मुंबईकरांना त्रास झाला नाही व वाहतुकही व्यवस्थित सुरळीत राहिली याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश शेठ, अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनोज सौनिक, मदत व पुनर्वसनचे प्रभारी अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर, गृह विभाग चे प्रधान सचिव संजय सक्सेना, मुंबई महापालिका अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे, अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाचे महासंचालक अभिषेक त्रिमुखे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, कोस्ट गार्डचे महासंचालक अनुराग कौशिक, नौदलाचे कमांडर कर्नल सुनिल रॉय, वायु सेनेचे ग्रुप कमांडर प्रविणकुमार, मध्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक ए.के.लाहोटी, पश्चीम रेल्वेचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक पी.बुटानी,ग्रुप कॅप्टन प्रविण कुमार, एमएमआरडीचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ.के.एच.गोविंदराज, एनडीआरएफचे कमांडर आशिषकुमार, जलसंपदाचे सहसचिव अतुल कपोले, हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.जयंत सरकर, एसडीआरएफचे अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, महावितरणचे मुख्य व्यवस्थापकिय संचालक विजय सिंघल, लष्कराचे कर्नल श्रीरंग काळे, नौदलाचे कमांडर परेश कावली यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त या बैठकीला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

धोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,मुंबई मध्ये पावसाळा सुरू झाला की धोकादायक असलेल्या इमारती कोसळतात.प्रत्येक वॉर्ड मध्ये अशा धोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांना समजतील अशा भाषेत नोटीस पाठवून या इमारती खाली केल्या पाहिजेत.जे वॉर्ड ऑफीसर ही कार्यवाही करणार नाहीत संबधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.तसेच ज्या भागात वर्षानुवर्षे दरडी कोसळणा-या ठराविक ठिकाणांचे सर्वेक्षण झालेले आहे.गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.त्यामुळे नव्याने दरडी कोसळणारी ठिकाणे देखील असू शकतात याचे सर्वेक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे ते सर्वेक्षण तत्काळ करा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले.

Special session | महाराष्ट्र विधीमंडळाचे विशेष अधिवेशन २ व ३ जुलै रोजी | पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

महाराष्ट्र विधीमंडळाचे विशेष अधिवेशन २ व ३ जुलै रोजी

महाराष्ट्र विधीमंडळाचे विशेष अधिवेशन २ व ३ जुलै रोजी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर तत्काळ  राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील खरीप हंगाम पीक पाणी पीक विमा तसेच कोबी बाबतची परिस्थिती याबाबत सादरीकरण करण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव आणि वरिष्ठाधिकारी यांच्याशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,” आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही राज्यातील विकास कामे विविध प्रकल्प आणि समाज घटकाला न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते ही एका रथाची दोन चाके आहेत लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गती किमान शासन प्रशासन आहे. असा संदेश जाणे मेट्रो समृद्धी महामार्ग जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, “आपल्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. गतिशीलता देणे आणि निर्णय क्षमता येणे महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करूया”