Divyang | CMO Maharashtra | दिव्यांगांची दिवाळी | महाराष्ट्र सरकारने दिले हे गिफ्ट

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Divyang | CMO Maharashtra | दिव्यांगांसाठी ६६७ पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकाने खरेदीस मान्यता

| दिव्यांगांच्या सेवेसाठी महामंडळाचे बळकटीकरण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Divyang | CMO Maharashtra https://mshfdc.co.in/ | राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी ६६७ हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानांची खरेदी करण्यास तसेच महामंडळाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली, दरम्यान, दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यामाध्यमातून त्यांची सेवा करण्याकरिता कार्यरत दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे बळकटीकरण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (https://www.maharashtra.gov.in/ )यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक, वार्षिक सर्वसाधारण बैठक संपन्न झाली, त्यावेळी महामंडळाच्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.  दिव्यांग कल्याण सचिव अभय महाजन, दिव्यांग वित व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्तींसाठी ६६७ हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानांची खरेदी फरिदाबाद येथील कंपनीकडून करण्यात येणार असून जानेवारी २०२४ पर्यंत दिव्यांग लाभार्थ्यांना याचे वाटप करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. संबंधित कंपनीने लाभार्थ्यांच्या दिव्यांग प्रकाराप्रमाणे ही वाहने सुधारित करुन द्यावीत, यासाठी महामंडळाने पाठपुरावा करावा शिवाय लाभार्थी निवडीची कार्यवाही लवकर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

*दिव्यांग लाभार्थी निवड प्रक्रियेसाठी नवीन पोर्टल*

दिव्यांग बांधवांच्या कल्याणाच्या विविध योजनांची माहिती, लाभार्थी निवड प्रक्रियेसाठी वेब पोर्टल तयार करुन जागतिक दिव्यांग दिनी ३ डिसेंबर रोजी ते सुरु करण्यात यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.

*रोजंदारी, बाह्ययंत्रणेद्वारे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ*

दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या विविध कार्यालयांमध्ये रोजंदारी तत्त्वावर आणि बाह्य यंत्रणेद्वार कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सहायक, लिपिक-टंकलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, वाहनचालक, लिपिक-टंकलेखक/वसुली निरीक्षक आणि शिपाई या पदावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात अडीच हजार ते ५ हजार रुपयांपर्यंतची वाढ होणार आहे.

*दिव्यांग कल्याण विभागातील पदनिर्मिती प्रस्तावाला मान्यता देण्याचे निर्देश*

दिव्यांग कल्याण विभागातील पदनिर्मितीच्या प्रस्तावाला वित्त, नियोजन विभागाने तातडीने मान्यता देण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. बैठक सुरु असतानाच वित्त विभागाच्या प्रधान सचिवांना दूरध्वनीवरुन हे निर्देश दिले. लवकरच दिव्यांग कल्याण आयुक्तांचे पद भरण्यात येणार असल्याचे सांगून दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ देण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम आयोजनासाठी प्रति जिल्हा २५ लाख रुपये निधी देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक नवीन शाह यांची महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या पदसिद्ध संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी बैठकीत महामंडळाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
०००००

MLA Bacchu Kadu | Divyang | दिव्यांगांसाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण | आमदार बच्चू कडू

Categories
Breaking News Political social पुणे

MLA Bacchu Kadu | Divyang | दिव्यांगांसाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण | आमदार  बच्चू कडू

MLA Bacchu Kadu | Divyang |  दिव्यांग बांधवांच्या (Divyang) जीवनातील दु:ख  आणि वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने त्यांना सहकार्य करण्यासाठी पुढे यावे आणि दिव्यांगांचे सर्वेक्षण योग्यरितीने होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान’चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी केले. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण आणले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (MLA Bacchu Kadu | Divyang)
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात  ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’  या अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह (IAS Shekhar Singh), पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण (ZP CEO Ramesh Chavan), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, पिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते आदी  उपस्थित होते.
मुख्य मार्गदर्शक श्री.कडू म्हणाले, दिव्यांगांचे सर्वेक्षण चांगल्याप्रकारे होईल याची दक्षता घ्यावी आणि सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअरही चांगल्या दर्जाचे उपयोगात आणण्यावर भर द्यावा. सर्व दिव्यांगांना युडीआयडी ओळखपत्र व आधार ओळखपत्र मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. महानगरपालिकांनी बहुविकलांग व्यक्तींसाठीचे धोरण लागू करावे आणि देशाला मार्गदर्शक काम करावे. मुकबधीर मुलांच्या शाळांकडे विशेष लक्ष देताना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यांच्यातील गुणवत्तेला प्रोत्साहन द्यावे लागेल. त्यासाठीचे सॉफ्टवेअर तयार करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
शासनाने दिव्यांगांसाठी मंत्रालय सुरू करण्याचा घेतलेला निर्णय महत्वाचा आहे. हा निर्णय मनाला आनंद देणारा आहे. दिव्यांगांच्या अनेक समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. दिव्यांगांच्या  तक्रारी दूर होणे हे प्रशासनाचे यश आहे आणि त्यांची समस्या दूर झाल्यानंतर हृदयापासून मिळणारे आशिर्वाद लाखमोलाचे आहेत. महिन्यातून केवळ एक दिवस दिव्यांग बांधवांसाठी दिल्यास त्यांच्या समस्या दूर करता येतील.
दिव्यांगांना शारीरिक मर्यादा असूनही त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो. त्यांना साथ दिल्यास ते  भव्यदिव्य यश संपादन करू शकतील.  शासनस्तरावर यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. दिव्यांग बांधवांसाठी ८२ शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.  दिव्यांगांसाठी ५ टक्के खर्च करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. दिव्यांगांना देण्यात येणारे अर्थसहाय्य दरमहा वेळेत मिळेल यासाठी बँक खात्यात अर्थसहाय्य देण्याबाबत व्यवस्था निर्माण करण्याचेही विचाराधीन असल्याचेही श्री.कडू म्हणाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिव्यांग भवनासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत त्यांनी महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले.
आयुक्त श्री.सिंह म्हणाले, दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. दिव्यांग कल्याण विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी लाभ वाटप करण्यात येत आहेत. हा उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने १६ प्रकारच्या दिव्यांग कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. दिव्यांगत्वाच्या सर्व २१ प्रकारांसाठी ‘एक थांबा केंद्र’ स्वरूपातील सुविधा व उपचार पद्धती असणारे दिव्यांग भवन उभारणारी ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे. या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी पुर्नवसन आणि उपचार संबंधी सर्व सेवा उपलब्ध असणार आहेत. या भवनाच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
 शहरात दिव्यांग बांधवांची नोंद कमी प्रमाणात असल्याने त्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. लहान वयातच दिव्यांगत्वाचे निदान आणि त्यावरील उपचार सुरू व्हावे यासाठी २१० बालवाडींमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे आणि १८ बालवाड्यांमागे एक उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. निरामय आरोग्य विमा योजनेचा हप्ता भरणारी पिंपरी चिंचवड ही पहिली महानगरपालिका आहे. २ हजार ३०० व्यक्तींना या वर्षापासून योजनेअंतर्गत लाभाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या संख्येत दिव्यांग सर्वेक्षणानंतर वाढ होईल. दिव्यांगांना हयातीचा दाखला घरोघरी जावून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यापुढे यंत्र संचालित व बॅटरी संचालित व्हिलचेअर देण्याची सुविधा यावर्षीपासून करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
डॉ.खेमनार म्हणाले, दिव्यांगांसाठी शासनाचे विविध विभाग एकाच छत्राखाली आाले आहेत.  दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ व्हावा असा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र त्यात येणाऱ्या कागदपत्रांची अडचण दूर करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत दिव्यांग बांधवांसाठी १२ योजना राबविण्यात येतात. दिव्यांगांना पीएमपीएलच्या बसमध्ये मोफत पासची योजना आहे. येत्या काळात आणखी योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यात दुर्धर आजारासाठी १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य आणि खेळाडूंसाठी साहित्य खरेदीसाठी ३० हजारापर्यंत अर्थसहाय्य प्रस्तावित करण्यात आले आहे. लवकरच मोबाईल ॲपद्वारे दिव्यांगांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येत आहे. दिव्यांगांना ‘स्कील इंडिया’ अंतर्गत त्यांच्या घराजवळ प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चव्हाण म्हणाले, दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी करण्यात आलेल्या कायद्याची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर होत असताना या प्रक्रियेला गती देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या विविध ४० विभागामार्फत २६ हजार लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य आणि वस्तू स्वरुपात लाभ देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील सर्व दिव्यांगांना योजनांचा लाभ देता यावा यासाठी दिव्यांग सर्वेक्षण हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार श्री.कडू यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. दत्ता भोसले, धमेंद्र सातव आणि अभय पवार  यांचा सामाजिक कार्यासाठी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी आमदार बच्चू कडू यांनी शिबिरातील विविध कक्षांना भेट देऊन माहिती घेतली. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———-

Devendra Fadnavis | Muralidhar Mohol | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग सहाय्यता अभियान – आयोजक मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Categories
Breaking News Political social पुणे

Devendra Fadnavis | Muralidhar Mohol | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग सहाय्यता अभियान

– आयोजक मुरलीधर मोहोळ यांची माहिती

– दोन हजार दिव्यांगाना मिळणार सुसह्य उपकरणे

Devendra Fadnavis | Muralidhar Mohol | ‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग सहाय्यता अभियान आयोजित करण्यात आले असून या अभियानांतर्गत २ हजार दिव्यांगाना सुसह्य उपकरणे दिली जाणार आहेत’, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol) यांनी दिली. (Devendra Fadnavis | Muralidhar Mohol)
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ यांनी एनएचआरडी, एनॅबलर आणि भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत २२ जुलै, २०२३ दुपारी ४ वाजता डी.पी. रस्त्यावरील शुभारंभ लॅान्स येथे हा कार्यक्रम होणार आहे.
‘दिव्यांग सहाय्यता अभियानात दोन हजार दिव्यांगांसाठी सुसह्य उपकरणांचे वाटप, दिव्यांग रोजगार नोंदणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, कृत्रिम अवयव मोजमाप आणि नोंदणी देखील यावेळी करण्यात येणार आहे, असेही मोहोळ म्हणाले.
‘भारतीय जनता पक्षाचे कर्तृत्ववान आणि संवेदनशील नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना दिव्यांगांच्या प्रश्नाविषयी नेहमीच विशेष आपुलकी राहिली आहे. नुकत्याच एका दौऱ्यात एका दिव्यांग भगिनीने त्यांना ओवाळले. हा प्रसंग एवढा भावनिक होता, की त्यातून आपल्याला या दिव्यांग सहाय्यता अभियानाची कल्पना सुचली. आम्हाला सहानुभुतीची नाही तर सहकार्याची गरज आहे, ही भावना दिव्यांगांची असते. म्हणूनच त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.
——
News Title |Devendra Fadnavis Muralidhar Mohol Disability Assistance Mission on the occasion of Deputy Chief Minister Devendra Fadnavis’ birthday | Organizer Muralidhar Mohol’s information

Yashwantrao Chavan centre | कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न

Categories
Breaking News social आरोग्य पुणे महाराष्ट्र

कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न

डॉ. रजनी इंदुलकर यांची प्रमुख उपस्थिती

पुणे – यशवंतराव चव्हाण सेंटर, सिग्निया आणि महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबीर पार पडले. ७५ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉ. रजनी इंदुलकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले.

पूर्व तपासणी मध्ये आढळून आलेल्या ऐकू न येण्याच्या क्षमतेनुसार लाभार्थ्यांना दिडशे श्रवणयंत्र मोफत बसविण्यात आले.

याप्रसंगी डॉ. रजनी इंदुलकर, डॉ. सुनील जगताप, सिवान्टोस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ अविनाश पवार, किशालया चक्रवर्ती, सुमुख कसर्ले, वायडेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मधुसूदन भाडे, चव्हाण सेंटरच्या सीईओ दिप्ती नाखले, विजय कान्हेकर, दत्ता बाळसराफ, दिपिका शेरखाने तसेच कुमार वासनी, विशाल शाह, अमित पाटील हे उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी २०१३ पासून सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून तब्बल वीस हजार हून अधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे.

चव्हाण सेंटरच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे या करत असलेल्या या स्तुत्य उपक्रमाची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली असून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये सुद्धा त्याची नोंद झाली आहे. बालेवाडी येथे २०१८ मध्ये झालेल्या शिबिरात एका दिवसात म्हणजे अवघ्या ८ तासात तब्बल ४ हजार ८०० लाभार्थ्यांना श्रवणयंत्र बसविण्यात आले होते.

Divyang and senior citizens | दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू – खासदार सुळे

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू – खासदार सुळे

| राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलनात केंद्र सरकारवर सडकून टीका

पुणे| दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आम्ही आज आंदोलन करावे लागत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. याउपारही येत्या दोन दिवसांत याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठांच्या हक्कासाठी न्यायालयात दाद मागू, असा इशारा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केंद्र सरकारला दिला. त्यानंतरही मागणी पूर्ण झाली नाही, तर उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराघ्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, प्रवक्ते प्रदीप देशमुख, पंकज साठे, हरिदास शिंदे, मुणालिनी वाणी, भारती शेवाळे, आनंद सवाने, रणजित शिवतरे, आलीम शेख, त्रिंबक मोकाशी, कैलास मकवान, संभाजी होळकर, संतोष रेणुसे, संतोष घोरपडे, महादेव कोंढरे, काकासाहेब चव्हाण, माणिकराव झेंडे, अप्पासाहेब पवार, भरत झांबरे, मनाली भिलारे, सुषमा सातपुते यांच्यासह पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, पुणे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काही ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवही या आंदोलनात सहभागी झाले होते. दिव्यांग बांधवाना ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावेत याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गेले अनेक महीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांकरीता काहीच मदत केली जात नाही. याबाबत केंद्र सरकारपर्यंत आवाज पोहचवण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष आहे. आजचे आंदोलन कोणाच्याही विरूद्ध नसून जेष्ठ आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाने वयोश्री योजनेअंतर्गत तपासणीचा संपूर्ण देशात विक्रम केला आहे. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी ही योजना संपूर्ण पुणे जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्थानिकांच्या खर्चातुन ही योजना संपुर्ण जिल्ह्यात राबवण्यात आली. वयोश्री योजनेचे तब्बल एक लाख दहा हजार, तर ADIP योजनेचे दहा हजार इतके लाभार्थी पाहून केंद्र शासनाला शंका आली. त्यामुळे तपासणीसाठी एक स्पेशल टिम पाठवण्यात आली होती. त्या टीमने सुद्धा लाभार्थी संख्या योग्य असल्याचे मान्य केले आहे.

साहित्य वितरण होत नसल्यामुळे आपण स्वतः केंद्रिय मंत्र्यांना साहित्य वितरण कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. त्यात पक्षीय राजकारण येऊ दिले नाही. कारण आपल्यासाठी दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांची सेवा महत्वाची आहे. असे असूनही इतर राज्यात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधनांचे वाटप होत असून महाराष्ट्राला मात्र डावलण्यात येत आहे. अगदी महाराष्ट्रातही काही ठराविक जिल्ह्यात याचे वाटप झाले आहे. असे असेल, तर केंद्र सरकारची ही योजना देशातील दिव्यांगासाठी आहे की कुठल्या राजकीय पक्षासाठी आहे. याचा खुलासा व्हायला, अशी मागणी यावेळी खासदार सुळे यांनी केली.

शिरूर आणि बारामतीला राष्ट्रवादीचे खासदार असल्यामुळे डावलण्यात येत आहे त्याचवेळी मावळ आणि पुणे शहरात त्यांच्याच पक्षाचे खासदार असूनही केवळ राजकारणासाठी त्या दोन खासदारांचा बळी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. वारंवार स्मरणपत्रे पाठवली, मंत्र्यांच्या भेटी घेऊन मागणी केली, इतकेच नाही, तर प्रत्यक्ष लोकसभेतही अनेक वेळा प्रश्न उपस्थित करून हा विषय आपण केंद्र सरकारच्या लक्षात आणून आहे. सातत्याने आपला पाठपुरावा चालू आहे, तरीही आजपर्यंत याबाबर निर्णय न झाल्याने आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे, असे खासदार सुळे यावेळी म्हणाल्या.

बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही दिव्यांगाना घरबसल्या प्रमाणपत्र पाठवतो. अशी सुविधा संपूर्ण देशात देशात फक्त आपल्याकडे आहे. ज्याच्यासाठी शासनाच्या योजना आहेत त्यालाच जर त्या मिळत नसतील तर त्यांचा उपयोग काय, असा सवाल करत सुळे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, ”याच केंद्र सरकारने, ‘दिव्यांगाना लाभपासून वंचित ठेवणे गुन्हा आहे’, असा कायदा केला आहे. तर मग हे केंद्र सरकार गुन्हेगार आहे. केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्यानंतर आता येत्या दोन दिवसात याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही न्यायालयात दाद मागू; आणि त्यानंतरही मागणी पूर्ण झाली नाही, तर उपोषण करण्यावाचून गत्यंतर नाही, याची सरकारने नोंद घ्यावी”.
महात्मा गांधीजींची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जात आपल्याला दिव्यांगाना न्याय द्यायचा आहे. आणि तो मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

National Awards | दिव्यांग व्यक्ती व संस्थांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

दिव्यांग व्यक्ती व संस्थांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे| केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत दिव्यांग सशक्तीकरण विभागाच्या संकेतस्थळावर राष्ट्रीय पुरस्कारासाठी दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी २८ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी २०२१ व २०२२ च्या पुरस्कारांसाठी गृह मंत्रालयाने तयार केलेल्या https://www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. संकेतस्थळावर उपलब्ध विशिष्ट नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्यांची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याच्या सविस्तर वर्णनासह नमूद करावी. समक्ष अथवा पोस्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

पुररस्कारासंबधी पात्रता, निकष व इतर सविस्तर तपशील www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पुरस्कारांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्ज विचारात घेण्यात येणार असल्याचे श्री. कोरगंटीवार यांनी कळविले आहे.

Mahasharad Portal : दिव्यांग व्यक्तींना महाशरद पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

दिव्यांग व्यक्तींना महाशरद पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थ्यांसाठी महाशरद पोर्टल सुरु करण्यात आले असून त्यांनी https://www.mahasharad.in या पोर्टल वर नोदंणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांनी केले आहे.

हे पोर्टल म्हणजे शासनाचा मंच (प्लॅटफॉर्म) असून त्यावर नोंदणीद्वारे राज्यातील दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाद्वारे व्याख्या केलेल्या दिव्यांग व्यक्तींना मदत तसेच सहाय्य उपलब्ध करुन देण्याची मागणी करता येणार आहे. या पोर्टलवर राज्यातील दिव्यांग नागरिक सुलभतेने आपली नोंदणी करु शकतात.

महाशरद पोर्टल हे दिव्यांग आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणारे देणगीदार, अशासकीय संघटना, सामाजिक संस्था, कंपन्या, समाजसेवक या सर्वांना विनामूल्य जोडणारा दुवा आहे. या सर्वांना एकाच व्यासपीठाखाली आणणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या दिव्यांग वित्त व विकास महामंडळांच्या योजनांची माहिती देणे. विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगांची परिस्थिती आणि गरजा समजून घेणे या बाबी या पोर्टलमुळे शक्य होणार आहेत, असेही  कोरगंटीवार यांनी कळवले आहे.