PMC Garden Department | होळीसाठी झाडाला हानी पोहोचवाल तर सावधान! 1 लाखापर्यंत होऊ शकतो दंड!  | पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाचा इशारा 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Garden Department | होळीसाठी झाडाला हानी पोहोचवाल तर सावधान! 1 लाखापर्यंत होऊ शकतो दंड!

| पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाचा इशारा

PMC Garden Department – (The Karbhari News Service) | होळी (Holi) निमित्ताने कोणत्याही वृक्षांची तोड करू नये. असे आवाहन पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या (PMC Garden Department) वतीने करण्यात आले आहे. विनापरवाना झाडे जाळणे, तोडणे किंवा कोणत्याही प्रकारे झाडास हानी पोहचवणे असे कोणतेही कृत्य करणे हा गुन्हा आहे. त्यासाठी 1 लाखा पर्यंत दंड होऊ शकतो. असा इशारा उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे (Ashok Ghorpade PMC) यांनी नागरिकांना दिला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे महानगरपालिका अधिकार क्षेत्रास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ चा कायदा लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५, महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्षसंरक्षण व संवर्धन नियम २००९ व मे.उच्च न्यायालय, मुंबई यांचे २० सप्टेंबर २०१३ रोजीच्या आदेशान्वये,वृक्ष प्राधिकरणाचे कामकाज करण्यात येते. (Pune PMC News)
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम २०२१ या कायद्यानुसार विनापरवाना झाडे जाळणे, तोडणे किंवा कोणत्याही प्रकारे झाडास हानी पोहचवणे असे कोणतेही कृत्य करणे हा गुन्हा आहे. अश्या गुन्हास “शासनाद्वारे अधिसुचित करण्यात येईल अशा पद्धतीचा वापर करून, काढलेल्या मुल्याइतके परंतू, एक लाख रूपयांपेक्षा अधिक नसेल इतक्या रकमेच्या दंडाची शिक्षा आहे.’

तथापि महापालिका उद्यान विभागाकडून शहरातील सर्व नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात आले की, होळी निमित्ताने कोणत्याही वृक्षांची तोड करू नये. कोणतीही व्यक्ती विनापरवाना वृक्ष तोडीत असल्यास किंवा विस्तार कमी करीत असल्यास, संबंधित क्षेत्रिय कार्यालयाचे मा. महापालिका सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी / वृक्ष प्राधिकरण कार्यालय, पुणे महानगरपालिका, यांचेकडे तक्रार करावी किंवा टोल फ्री क्रमांक – १८००१०३०२२२, व्हॉटस अॅप क्रमांक ९६८९९००००२ यावर किंवा www.complaint. punecorporation.org या तक्रार पोर्टलवर अथवा एस.एम.एस. अॅलर्ट या भ्रमणध्वनी सेवा क्र. ९२२३०५०६०७ यावरही विनाविलंब एस. एम. एस. करावा.

River revival project | टीका झाल्यानंतर महापालिकेला आली जाग

Categories
Breaking News PMC पुणे

टीका झाल्यानंतर महापालिकेला आली जाग

| बाधित वृक्षांच्या बदल्यात लावणार तब्बल ६५ हजार स्थानिक प्रजातीची वृक्ष

पुणे| पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (Mula Mutha River Revival Project) हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. हे काम करताना नदी लगत असणारी काही वृक्ष (Tree) बाधित होणार असून त्याचे पुर्नरोपण (Tree plantation) करणे व नव्याने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. बाधित वृक्षांच्या बदल्यात महानगरपालिकेने तब्बल ६५ हजार ४३४ वृक्ष लावण्याचे नियोजन केले आहे. यावरून महापालिकेची आलोचना झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून हा खुलासा करण्यात आला आहे. (pune municipal corporation)

महापालिकेकडून दिलेल्या निवेदनानुसार मुळा मुठा नदी पुनरुज्जीवनाचे संगमब्रिज ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा याठिकाणी कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना नदी लगत असणारी बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी ४ हजार ४२९ वृक्षांचे पुर्नरोपण करण्यात येईल. तर, ३ हजार ११० वृक्ष काढण्यात येणार आहेत. मात्र, याबदल्यात स्थानिक प्रजातीच्या ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्षांचे रोपण करण्याचे तसेच मोठ्या प्रमाणात नदीच्या दोन्ही काठ्यांवर झुडपांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येणार आहे. याद्वारे नदीकाठच्या परिसंस्था सुधारण्यासाठी मदत होणार आहे.

दरम्यान, नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांबाबत पुणे महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागामार्फत दैनिक वर्तमानपत्रामध्ये जाहीर प्रकटन देण्यात आले होते. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५, महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन नियम २००९, मे. उच्च न्यायालय, मुंबई यांची जनहित याचिका क्र. ९३/२००९ चे दिनांक २० सप्टेंबर २०१३ रोजीचे आदेश तसेच मे. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी पारित केलेले अध्यादेश यांस अनुसरून हे जाहीर प्रकटन देण्यात आले होते. तसेच याबाबतची तपशिलावर सविस्तर माहिती निर्देशपत्र स्वरुपात पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली होती. तसेच सदर प्रकल्पास बाधित होणाऱ्या वृक्षांची पाहणी उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार गठीत केलेल्या वृक्ष तज्ज्ञ समितीमार्फत प्रत्यक्ष जागेवर जाऊन करण्यात आलेली आहे.

वर्तमानपत्रातील जाहीर प्रकटनानुसार नागरिकांना याबाबत हरकती घेण्यास १ मार्च ते १३ मार्च २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार काही नागरिकांनी यावर हरकती घेतल्या असून त्यावर सुनावणी घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव हा वृक्ष प्राधिकरणामार्फत महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरण यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यांनी दिलेल्या मान्यतेनुसार
पुणे महानगरपालिकेकडून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

योग्य उंचीची वृक्ष लावणार

मुळा मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात पुणे महानगरपालिका एकूण ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्षांचे नव्याने रोपण करणार आहे. ही वृक्ष लावताना ती स्थानिक प्रजातीची, तज्ज्ञांनी सुचवलेली व योग्य उंचीची चांगल्या प्रतीची वृक्ष लावली जातील. या वृक्षांचे पुढील पाच ते सात वर्ष संगोपन करण्यात येणार आहे. असे कार्यकारी अभियंता (प्रकल्प) यांच्याकडून सांगण्यात आले.

Environmental Friendly roads | रस्त्याचे आयुर्मान वाढवण्यासाठी महापालिका करणार पर्यावरण पूरक रस्ते!   | प्रस्ताव अंतिम टप्प्यात 

Categories
Breaking News PMC social पुणे

रस्त्याचे आयुर्मान वाढवण्यासाठी महापालिका करणार पर्यावरण पूरक रस्ते!

| प्रस्ताव अंतिम टप्प्यात

पुणे | रस्ते आणि रस्त्यावरील खड्ड्यावरून महापालिका प्रशासनाला नेहमीच टीकेला तोंड द्यावे लागते. सद्यस्थितीत देखील महापालिका पुणेकरांच्या रोषाचा सामना करत आहे. यावर आता महापालिकेनेच उपाय शोधला आहे. शहरातील रस्ते चांगले असावेत तसेच त्यांचे आयुर्मान वाढावे यासाठी महापालिका पर्यावरणपूरक रस्ते तयार करणार आहे. विशेष म्हणजे यात पथविभागासहित महापालिकेच्या सर्व विभागाचा समावेश असणार आहे. याबाबतचा प्रशासनाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. महापालिका आयुक्तांची याला मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ यावर अंमल केला जाणार आहे. अशी माहिती महापालिका पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली. दरम्यान अशा पद्धतीचे रस्ते तयार करणारी पुणे मनपा राज्यात पहिली मनपा असणार आहे.
महापालिकेकडून रस्त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पावसाळी पूर्व कामे करून पुन्हा पावसाळा संपल्यानंतर रस्त्यांची डागडुजी केली जाते. मात्र शहरातील जंगली महाराज रस्ता वगळता सगळ्याच रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य दिसून येते. खासकरून पावसाळ्यात महापालिकेला याबाबत खूप टीकेचा सामना करावा लागतो. सद्यस्थितीत महापालिका पुणेकरांच्या रोषाचा सामना करत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पथ विभाग आणि त्यांचे वाहतूक नियोजनकार यांनी एक नामी उपाय शोधून काढला आहे. त्यानुसार आगामी काळात शहरात पर्यावरण पूरक रस्ते तयार केले जाणार आहेत.
अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे आणि वाहतूक नियोजनकार निखिल मिजार यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यावरण पूरक रस्त्याच्या माध्यमातून महापालिका रस्त्याचे आयुर्मान वाढवणार आहे. यामध्ये वेगवेगळे उपाय केले जाणार आहेत. त्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरण्यासाठी rainwater recharge spit केले जातील. तसेच बोअर घेतले जातील. ज्यातून पाणी रस्त्यावर न राहता बाजूला मुरेल. रस्ते तयार करताना त्यात बांधकामातील राडारोडा वापरला जाईल. यामुळे रस्ते तयार करताना माती आणि खडी टाकण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच जे वेस्टेज राहील त्याचा देखील पुनर्वापर करता येणार आहे.
महापालिकेच्या वतीने आता रस्त्याच्या कडेला व मध्यभागी झाडे लावली आहेत मात्र ज्यादा पाण्यामुळे ही झाडे अशक्त झाली आहेत. मात्र पर्यावरण पूरक रस्ते करताना रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी देशी प्रकारची झाडे लावली जाणार आहेत. Treeguard या संकल्पनेच्या माध्यमातून झाडांना पाणी मिळेल. ज्याला छिद्र असतील, त्यातून पाणी जाऊन झाडांच्या मुळाना मिळेल. त्याने झाडे चांगली वाढतील. तसेच झाडांना पाणी देण्यासाठी ड्रीप इरिगेशन चा वापर करण्यात येईल. ज्यामुळे पाण्याचा जास्त होणारा वापर देखील रोखला जाईल.
Waste plastic या संकल्पनेच्या माध्यमातून रस्ते तयार करताना त्यामध्ये waste प्लास्टिक चा वापर केला जाईल. प्लास्टिक चे श्रेड तयार करून ते डांबरात मिसळण्यात येतील. त्यामुळे डांबराची लाईफ वाढते. साहजिकच यामुळे देखील रस्त्याचे आयुर्मान वाढण्यास मदत होणार आहे.
पार्किंग  च्या ठिकाणी  पाणी साचू नये यासाठी पोरस पेविंग ब्लॉक वापरले जातील. हा प्रयोग महापालिकेनं तळजाई टेकडीवर केला आहे. यातून पाणी फिल्टर होते. यामुळे पाणी जमिनीत जिरेल. ज्यातून पाणी वाचवले जाणार आहे.
याच योजनेच्या माध्यमातून सगळ्या रस्त्यावर सौर उर्जेवर चालणारे दिवे बसवले जातील. त्याचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न महापालिका करेल.
महापालिकेकडून रस्त्यावर विविध हेतूंसाठी पेंट केले जाते. मात्र यात असणाऱ्या विविध कंपोनंट मुळे रस्त्याला हानीपोहोचते. हे टाळण्यासाठी महापालिका इको फ्रेंडली पेंट वापरणार आहे. ज्यामुळे रस्त्यांना हानी पोहोचणार नाही.
यासाठी वेगळे काही न करता महापालिका आहे त्याच कामात याचा अंतर्भाव करणार आहे. यामुळे फक्त 10% खर्च वाढू शकतो. मात्र यामुळे रस्त्याचे आयुर्मान वाढून पुणेकरांना चांगले रस्ते मिळतील. विशेष म्हणजे यामध्ये महापालिकेच्या सगळ्या विभागाना सहभागी करून घेतले जाणार आहे.
—-
महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्या आदेशानुसर आम्ही ही योजना राबवत आहोत. पर्यावरणपूरक रस्त्यांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हा प्रस्ताव महापालिका आयुक्तांसमोर ठेवला जाईल. आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर तात्काळ यावर अंमलबजावणी केली जाईल.

– साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग.

—-
पर्यावरण पूरक रस्ते केल्याने रस्त्याचे आयुर्मान वाढेल. पर्यावरण रक्षण ही महापालिकेची जबाबदारी आहे. या माध्यमातून हे काम होईल. तसेच राडारोडा, वेस्टेज जाणाऱ्या गोष्टीचे नियोजन करता येईल, त्याचा पुनर्वापर करता येईल. यासाठी महापालिकेला तज्ञ् लोक देखील सहायता करणार आहेत. अशा पद्धतीचे रस्ते करणारी पुणे महापालिका पहिलीच असेल. त्या निमित्ताने इतर शहरांना ते एक रोल मॉडेल ठरेल.

– निखिल मिजार, वाहतूक नियोजनकार.

 

Balbharati to Paud Fata road | बालभारती ते पौड फाटा रस्ता | महापालिकेला सल्लागाराने दिले तीन पर्याय

Categories
Breaking News PMC पुणे

बालभारती ते पौड फाटा रस्ता | महापालिकेला सल्लागाराने दिले तीन पर्याय

पुणे – बालभारती ते पौड फाटा रस्ता तीन प्रकारे करण्याचे पर्याय सल्लागाराकडून देण्यात आले आहेत. यामध्ये १.८ किलोमीटरचा बोगदा करणे, उन्नत मार्ग (इलोव्हेटेड) किंवा थेट डोंगरातून रस्ता करणे या तीन पर्यायांचा समावेश आहे. यावर आता पथ विभाग यापैकी एका मार्ग अंतिम करून तसा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवणार आहे. अशी माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी यांनी दिली.
 सेनापती बापट रोड ते कोथरूड तसेच शहराच्या आग्नेय भागात जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही.  त्यामुळे सेनापती बापट रोडसह लॉ कॉलेज रोडवर सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होत आहे.  येथे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी बालभारती ते पौड फाटा हा रस्ता महापालिका प्रशासनाने हनुमान डोंगरापासून शहराच्या विकास प्रारूपात प्रस्तावित केला होता.  विकास मॉडेलला मंजुरी मिळाल्याने आता या रस्त्याच्या कामाची तयारी मनपा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.  यापूर्वी त्याचे कामही महापालिकेने सुरू केले होते.  मात्र मनपाच्या विरोधात अनेक पर्यावरणप्रेमी न्यायालयात गेले होते.  त्यामुळे या रस्त्याचे काम बंद पडले.  दरम्यान, या रस्त्याच्या वरच्या भागात एचसीएमटीआरही होत आहे.  यामुळे आता या भागात दोन रस्त्यांऐवजी एकाच ठिकाणी हा रस्ता करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.  त्यामुळे पर्यावरणाचीही हानी होणार नाही.  त्यामुळे मैदानावरील रस्त्याऐवजी एलिव्हेटेड रोडबाबतही पालिकेचे लक्ष आहे.
या रस्त्याचे काम करण्याचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला होता, या सल्लागाराचे काम पूर्ण झाले असून. त्याचा अहवाल येत्या आठवड्याभरात सादर केला जाणार आहे. दरम्यान या बालभारती ते पौड रस्ता हा रस्ता तीन प्रकारे केला जाऊ शकतो, पण पर्यावरणाचे रक्षण व खर्चाचा विचार करून यातील एक पर्याय निश्‍चीत केला जाणार आहेत. बालभारती ते पौड फाटा रस्ता करताना तो थेट जसा डोंगर आहे तसा रस्ता केला जाईल. त्यामुळे चढ, उतार याचा समावेश असेल. आवश्‍यक तेथे नाले किंवा डोंगरावरील पाण्याचा प्रवाह वाहून जाण्यासाठी छोटे पूल असतील. पण यामुळे या टेकडीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी अडथळा होऊ शकतो. या रस्त्यासाठी ८५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.  १.८ किलोमीटरचा रस्ता मेट्रोप्रमाणे उन्नत मार्ग करावा. साधारणपणे तीन मीटरचे पिलर उभारून त्यावरून हा रस्ता केला जाईल. त्यामुळे फिरायला येणाऱ्या नागरिकांना अडथळा होणार नाही. या मार्गासाठी १७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.  या दरम्यान टेकडीच्या खालून बोगद्याचा पर्याय सल्लागाराने दिला असून, त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. पण बोगदा केल्याने पाण्याचे झरे खंडित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शहरातील कोणत्याही टेकडीच्या खालून बोगदा करण्यास पर्यावरण प्रेमींनी विरोध केलेला आहे. खर्चाचा विचार करता महापालिका या पर्यायाचा विचार करण्याची शक्यता कमी आहे.
 एक किंवा पर्याय दोन निवडला या टेकडीवरील १ हजार ४०० झाडे तोडावे लागणार आहेत. त्याबदल्यात शासनाच्या नियमानुसार वृक्षारोपण केले जाईल.

Rain In pune | पहिल्या पावसात पुणेकरांची तारांबळ | झाडपडीच्या 30 घटना 

Categories
Breaking News पुणे

पहिल्या पावसात पुणेकरांची तारांबळ | झाडपडीच्या 30 घटना 

पुणे : शहरात शुक्रवारी दुपारी झालेल्या पहिल्या पावसात शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये झाडपडीच्या 30 घटना घडल्या. कर्वे रस्त्यावरील एका रुग्णालयाच्या पाठीमागील बाजुला असलेली भिंत पडल्याने 11 वाहने तर पोलिस आयुक्तालयाच्या परिसरातील झाड कोसळल्यामुळे 25 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठल्याच्याही घटना घडली.

यंदा कडक ऊन्हाळा अनुभवलेल्या पुणेकरांकडून पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. दरम्यान, शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले. पहिल्याच पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडविल्याचे चित्रही शुक्रवारी दिसुन आले. जोराचा वारा व पावसाच्या मोठ्या सरींमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात मोठमोठी झाडे उन्मळुन, तर काही ठिकाणी तुटून पडली. पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात मोठे झाड कोसळून रस्त्यावर पडले. त्यामुळे संपुर्ण रस्ता काही वेळ बंद राहीला. तर रस्त्याच्याकडेला पार्कींग केलेल्या 20 ते 25 दुचाकींवर झाड पडल्याने त्यांचे नुकसान झाले. याबरोबरच कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयाच्या पाठीमागील बाजुला असलेली भिंत पडल्याने तेथेही दहा दुचाकी व एक चारचाकी वाहन अडकल्याने त्याचे नुकसान झाले.
दरम्यान, पावसामुळे शहरातील पर्वती शाहू कॉलनी, जीपीओ, पर्वती येथील स्टेट बॅंक कॉलनी, स्वारगेट एसटी कॉलनी, पोलिस आयुक्तालय, भवानी पेठ येथील बीएसएनएलचे कार्यालय, प्रभात रस्ता, औंध येथील आंबेडकर चौक, राजभवन परिसर, गुरुवार पेठेतील पंचहौद, कोंढवा येथील शिवनेरी नगर, एनआयबीएम रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, नवी पेठेतील पत्रकार भवन, राजेंद्र नगर, कोंढवा येथील आनंदपुरा रुग्णालय, कर्वे सह्याद्री हॉस्पिटलच्या मागे सीमा भिंत पडली असून दहा दुचाकी व एक चारचाकी गाडी अडकल्याची माहिती अग्निशामक दलाच्यावतीने देण्यात आली.
दरम्यान, झाडपडीच्या घटना घडलेल्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या पथकाने तत्काळ पोहचून रस्ता मोकळा करण्यास प्राधान्य दिले. जोरदार पावसामुळे शहराच्या काही भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. त्यातुन दुचाकी काढताना नागरीकांची तारांबळ उडाली. तर काही ठिकाणी रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी वाहने घसरून पडण्याच्या घटनाही काही प्रमाणात घडल्या.