Mohan Joshi Vs Chandrkant Patil | चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ? | मोहन जोशी यांचा सवाल

Categories
Breaking News PMC Political पुणे

चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ?

– मोहन जोशी यांचा सवाल

पुणे | पुण्याची मेट्रो कधी पूर्ण होणार या प्रश्नावर ‘तारीख पे तारीख’ असेच उत्तर भाजपाने तयार ठेवले आहे. याचे कारण म्हणजे गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मार्गावरील मेट्रोचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा नवा वायदा पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. आता २६ जानेवारी हा दिवस उलटून गेला. म्हणूनच यावर असे विचारावेसे वाटते की, चंद्रकांतदादा, क्या तुम्हारा वादा ? प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी हा सवाल केला आहे.

जोशी म्हणाले, आता म्हणे मार्च महिन्याचा वायदा करण्यात येत आहे. जनतेला वायदे करायचे, आश्वासने द्यायची आणि ती पूर्ण करायची नाहीत ही त्या भाजपची नीती बनली आहे. ‘अच्छे दिन लायेंगे’, ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार’, ‘गॅस, पेट्रोल, ‘डीझेल दरवाढ कमी करणार’ , ‘महागाई कमी करणार’, ‘दरवर्षी २ कोटी नवे रोजगार निर्माण करणार…’ असे असंख्य वायदे भाजपच्या मोदी सरकारने केले. मुख्य म्हणजे असे अनेक वायदे करताना जनतेला आपण बांधील आहोत असे ते मानत नाहीत. त्यांचे वायदे ‘हेडलाईन मॅनेजमेंट’पुरतेच असतात. आदरणीय चंद्रकांतदादा पाटीलदेखील याच मुशीत घडले आहेत. त्यामुळे पुण्याच्या मेट्रोबाबत प्रत्येकवेळी नवीन वायदे करताना त्यांना ना खंत ना खेद! ‘हेडलाईन छापून येण्यापुरताच त्यांचा पुण्याच्या विकासाशी संबंध आहे. त्यामुळेच आता नवा वायदा करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या खात्यांमध्ये ‘वायदामंत्री’ हे नवे खातेदेखील स्वीकारावे. सुज्ञास अधिक सांगणे न लागे !

जोशी पुढे म्हणाले, दीर्घकालीन पाठ्पुराव्यानंतर काँग्रेस पक्षाने पुण्याॉत मेट्रो प्रकल्प आणला. मात्र भाजप राजवटीत काम रेंगाळले व अखेरीस मागीलवर्षी मार्च महिन्यात जेमतेम १२ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले. आताही गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मेट्रो मार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. आता २६ जानेवारी दिवस उजाडला. आता नवा वायदा मार्च महिन्याचा ! तसेच, पुण्यातील ३३ किलोमीटर लांबीचे दोन्ही मेट्रो मार्ग मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले होते.

 

Kasba by-election | कसबा पोटनिवडणूक | आज भाजपाचा उमेदवार ठरण्याची शक्यता | चंद्रकांत पाटील यांनी बोलावली बैठक

Categories
Uncategorized

कसबा पोटनिवडणूक | आज भाजपाचा उमेदवार ठरण्याची शक्यता

| चंद्रकांत पाटील यांनी बोलावली बैठक

पुणे | कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक सकाळी 11 वाजता बोलावली आहे. त्यामुळे यात भाजपचा उमेदवार ठरवला जाईल, असे मानले जात आहे.
सकाळी ११ वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी  बैठक होणार आहे.  सर्व प्रमुख नेते बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत भाजपचा उमेदवार ठरला जाईल. असे मानले जात आहे.
ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे, असं वक्तव्य नुकतंच अजित पवार यांनी केलं होतं. तसेच सर्व पक्षांच्या इच्छुकांची देखील जोरदार तयारी दिसून येत होती. त्यामुळे हा विषय भाजपच्या बाबतीत गंभीर झाला आहे. आता भाजप कोण उमेदवार निवडणार यावर सगळे गणित अवलंबून आहे. मुक्ता टिळक यांच्या परिवारातील कुणी उमेदवार दिला तरच ही निवडणूक बिनविरोध होईल. अन्यथा यात अटीतटीची लढाई दिसून येणार आहे.

Prashant Jagtap vs chandrkant Patil| २७ दिवसांनी पहिली आढावा बैठक घेतली, त्याबद्दल  मनापासून आभार | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रशांत जगताप यांचे खुले पत्र 

Categories
Breaking News Political पुणे
२७ दिवसांनी पहिली आढावा बैठक घेतली, त्याबद्दल  मनापासून आभार
| पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रशांत जगताप यांचे खुले पत्र
पुणेकरांना होणाऱ्या त्रासाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये जगताप यांनी पालकमत्र्यांनी २७ दिवसांनी पहिली आढावा बैठक घेतली, त्याबद्दल  मनापासून आभार मानले आहेत.
| असे आहे पत्र
मा.ना.श्री. चंद्रकांतदादा बच्चू पाटील
(पालकमंत्री, पुणे जिल्हा)
आदरणीय चंद्रकांतदादा,
 सप्रेम नमस्कार,
 आपणास व आपल्या कुटुंबीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अर्थात आपली दिवाळी सुरू झाली असेल,आम्ही पुणेकर मात्र अजूनही ट्रॅफिक जॅम मध्येच आहोत.
पत्रास कारण की,
आपण गेल्या आठवड्यात पालकमंत्री झाल्यानंतर तब्बल २७ दिवसांनी पहिली आढावा बैठक घेतली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. किमान गुडघाभर पाण्यात पोहल्यानंतर तरी पुणेकरांचा कोणीतरी वाली असून आढावा बैठकीत काहीतरी चांगले निर्णय होतील अशी आम्हाला अपेक्षा होती.
 मागील आठवड्यात पाण्यामुळे अतोनात नुकसान झालेल्या पुणेकरांना या आठवड्यात दिवाळीची चाहूल लागली होती, त्यामुळे सर्वसामान्य चाकरमाने- गोरगरीब- पुणेकर खरेदीसाठी रस्त्यांवर आले आणि पुन्हा नियोजन नसलेल्या प्रचंड ट्रॅफिकचा पुणेकरांना सामना करावा लागत आहे.
पुणे शहरातून जाणाऱ्या मुंबई महामार्ग, सोलापूर महामार्ग, नगर रोड, सातारा रोड, सासवड रोड या सर्व रस्त्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असून ही ट्रॅफिक कंट्रोलच्या बाहेर गेली आहे. पुणे शहराबाहेर जाणाऱ्या सर्वच महामार्गांवर टोल नाक्यांवर दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागत असून आपल्या लोकप्रिय घोषणा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी जर किमान दिवाळी पुरते टोल माफी केली तर, नागरिकांचे पैसे वाचण्यापेक्षा नागरिकांचा वेळ वाचेल त्यामुळे टोल माफी करण्यात यावी एवढी माफक अपेक्षा.
नागरिकांना येरवडा ते वाघोली हे ११ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल २ तास लागत आहेत. हीच परिस्थिती शहरातील प्रत्येक रस्त्यावर असून या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शहरातील वाहतुकीचे पुन्हा एकदा नियोजन करण्यात यावे.
सीसीटीव्ही द्वारे ट्रॅफिकचे नियोजन होईल तेव्हा होईल, आता मात्र असे प्रयोग करत बसण्यापेक्षा प्रत्येक जंक्शनला ट्रॅफिक
पोलीस नेमण्यात यावे ही आपणास एक त्रस्त पुणेकर म्हणून मागणी करत आहे.
 त्याचप्रमाणे जे पुणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे बाहेरगावी जात आहेत त्यांना देखील प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या बसेसचे देखील नियोजन झालेले नाही. शिवाजीनगर व स्वारगेट या दोन्ही प्रमुख बस स्थानकांवर हजारो प्रवासी ताटकळत उभे आहेत. दिवाळीची गर्दी पाहता या दोन्ही बस स्थानकाजवळील काही मैदानांमध्ये बसेसची व्यवस्था करत व्यवस्थित नियोजन करायला हवे होते परंतु ते झालेले दिसत नाही. या बस स्टँडच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून येथे देखील तात्काळ ट्रॅफिक
पोलीस नेमण्यात यावे.
 काल पुणे स्टेशन येथे रेल्वेमध्ये चढताना एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला कदाचित नियोजन व्यवस्थित झाले असते तर तो एक जीव आपल्याला वाचवता आला असता.
दिवाळीच्या निमित्ताने आपल्या सरकारने घोषणा केलेल्या “आनंदाचा शिधा किराणा किट” ही योजना देखील पूर्णपणे फसलेली असून, शहरातील तब्बल ६०% दुकानांवर अजूनही या किट पुरेश्या उपलब्ध नाहीत. जिथे उपलब्ध आहेत तेथे सर्व्हर डाऊन असल्याने संबंधित किट पैसे देऊनही मिळत नाहीत. कित्येक ठिकाणी शंभर रुपये घेऊन पाच ऐवजी केवळ तीन किंवा चार वस्तू दिल्या जातात. तर या आनंदाच्या शिध्यामुळे जी नियमित धान्य वितरण प्रणाली सुरू होती ती सुद्धा पूर्णपणे कोलमडलेली आहे. आपण जर या गोष्टीचे योग्य नियोजन केले असते तर आज योग्य वेळेत पुणेकरांची दिवाळी गोड करता आली असती.
बाकी आपण कोल्हापुरात आहात की पुण्यात माहित नाही, परंतु शक्य झाल्यास पुणेकरांची या सर्व त्रासातून सुटका करावी एवढीच कर्तव्यदक्ष पालकमंत्री म्हणून आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो.
– प्रशांत जगताप
माजी महापौर तथा अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

Sanitation| Pune| पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उद्योजक आणि सामाजिक संस्थांशी संवाद

Categories
Uncategorized

स्वच्छतेबाबत नवे उपक्रम राबविण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे | पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उद्योजक आणि सामाजिक संस्थांशी संवाद

पुणे | पुण्याचे उद्योग संशोधन आणि उत्पादनात पुढे आहेत. स्वच्छतेबाबतही उपयुक्त संशोधन करीत नवे उपक्रम राबविण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे आणि पुण्याला स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे आयोजित बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मराठा चेंबरचे अध्यक्ष डॉ.सुधीर मेहता , माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, शहरातील नागरिकांसाठी शहर स्वच्छता, वाहतूक नियोजन आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होणे असे तीन महत्वाचे विषय आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे आणि कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यातून उत्पन्न घेण्याचे प्रयोग गरजेचे आहेत. अशा विषयांबाबत चांगल्या सूचना चेंबरने कराव्यात.

स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि त्यांना कचरा वेचण्यासाठी आवश्यक सुविधा देणे गरजेचे आहे. त्यांना काही प्रमाणात वस्तूंच्या स्वरूपात मदत करून त्यांची कार्यक्षमता वाढवता येईल. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मितीसारखे प्रकल्प राबविण्यासाठी उद्योजकांचे सहकार्य महत्वाचे ठरेल. स्वच्छतेबाबत सर्व संबंधित घटकांचा सहभाग वाढवून जनप्रबोधनावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाऊस बंद होताच ही कामे सुरू करण्यात येईल. एनडीए चौकातील वाहतूक समस्याही दूर होत आहे, असेही श्री.पाटील म्हणाले.

डॉ.मेहता यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. शहर स्वच्छ करण्यासाठी शासन आणि प्रशासनासोबत चेंबर काम करेल. स्वच्छतेचे उद्दीष्ट सामुहिक प्रयत्नातून साध्य करता येईल असे ते म्हणाले.

बैठकीला उद्योग संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.
000

Inauguration of flyover connecting Pashan-Sus | राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण

Categories
Breaking News PMC Political social पुणे

राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण

| शहराच्या विकासासाठी  लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे| पाषाण-सूसला जोडणारा उड्डाणपूल हा हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कच्या बाजूला होणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास बऱ्याच अंशी मदत होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. शहराच्या विकासासाठी  लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पुणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण  मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विलास कानडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते गणेश बीडकर आदी उपस्थित होते.

चांदणी चौकातील सहापदरी पूल झाल्यावर या भागातील बरेचसे प्रश्न मार्गी लागतील असे सांगून श्री. पाटील म्हणाले, या परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि त्यासाठी वाहतूक वळवण्यासाठी काही बाबतीत हा पूल उपयुक्त होईल. पुणे शहराची गतीने वाढ होत आहे. उद्योग, व्यापार, शैक्षणिक क्षेत्र आदींमध्ये शहर पुढे राहण्यासाठी रस्ते, उडाणपूल, मेट्रो, पूल आदी पायाभूत सुविधांची निर्मिती गरजेची आहे. चांगल्या प्रकारचे घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाण्याची व्यवस्था, शांतता आदीमुळे सर्वांनाच हे शहर राहण्यासाठी सुरक्षित वाटते.

मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, येत्या काळात शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहे. मेट्रो, सर्व भागात २४ तास समप्रमाण पाणी पुरवठा, जायका प्रकल्प आदी प्रकल्प गतीने पूर्ण करायचे आहेत. पाषाण- सूस भागातील घनकचरा प्रकल्प हलवण्याची नागरिकांची मागणी असून येथील लोकप्रतिनिधींनी नागरी वस्तीपासून दूर असलेली योग्य जागा शोधावी. या जागेचे संपादन करून तेथे हा प्रकल्प स्थलांतरीत करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

उद्घाटन करण्यात आलेल्या पूलाला राजमाता जिजाऊ भोसले यांचे नाव देण्यात  येईल आणि राजमाता जिजाऊंचा पुतळाही या ठिकाणी उभा केला जाईल, असेही श्री. पाटील म्हणाले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, १९९५ नंतर उड्डाणपूल, तसेच रस्त्यांच्या बाबतीत राज्यात चांगली पाऊले टाकली गेली आहेत. शहरात मोठ्या पावसामुळे सिग्नल व्यवस्था बंद पडू नये यावर उपाययोजना करणे आणि अशावेळी ऐनवेळचे वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, घनकचरा, सांडपाण्याचे व्यवस्थापन गरजेचे आहे.

माजी महापौर मोहोळ म्हणाले, या भागातील वाहतूक कोंडीवर हा पूल उपयुक्त ठरणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करणारे देशातील ५ व्या क्रमांकावर पुण्याचा समावेश आहे.

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी प्रास्ताविकात पुलाबाबत माहिती दिली.  हा पूल ४७० मीटरचा असून पुलामुळे कात्रज व हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

फेब्रुवारी २०२० पासून काम सुरू झालेल्या या पुलाचे काम कोविडकाळातही गतीने सुरू ठेऊन पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिकेचे अधिकारी, अभियंते तसेच कंत्राटदारांचा सत्कार करण्यात आला. तसेच  श्रावणी सतीश गोगुलवार हीचा १२ वी सीबीएसई बोर्डात ९९.४० टक्के गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल  सत्कार करण्यात आला.

असा आहे उड्डाणपूल
४१ कोटी रुपये खर्चातून उभारलेला ४७० मीटर लांबीचा हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पाषाण-सूसला जोडणारा आहे. पाषाण-कात्रज, हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क, मुळशीला जोडणारा हा पूल वाहतूकीसाठी मोठा उपयुक्त ठरणार आहे. हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी आणि मुळशीकडून येणारी वाहतूक सुकर होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
उड्डाणपुलाचे उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. तांत्रिक कारणामुळ त्यांना सहभागी होता आले नाही. तथापि, मुख्यमंत्र्यांनी मंत्री श्री. पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत या लोकार्पण सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.

Pashan-sus Road | पाषाण -सूस सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा | नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

Categories
Breaking News PMC Political पुणे

पाषाण -सूस सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा

| नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

सूस खिंडीतील गार्बेज प्लांटची भिंत आत घेऊन वाहतूक कोंडी सोडवा, तसेच सेवा रस्ता जलदगतीने पूर्ण करा, तसेच पाषाण सूस उड्डाणपुलासाठी अधिग्रहण केलेल्या जागेचा मोबदला तातडीने आदा करा, आदी सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पाषाण -सूस मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सूस खिंड उड्डाणपुलाची पाहाणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज करुन आढावा घेतला. तसेच स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, राजेंद्र मुठे, वाहतूक शाखेचे श्रीनिवास बोनाला राष्ट्रीय महामार्गाचे संजय कदम, अधिकारी, स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
पाषाण -सूस मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सूस खिंड उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत असून, या उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत असले, तरी सेवा रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यासोबतच सूस भागातील गार्बेज प्लांटच्या भिंतीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर उड्डाणपुलाची पाहाणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत नामदार पाटील यांना अवगत केले.
यावर नामदार पाटील यांनी नागरिकांच्या अडचणी तातडीने दूर करुन; त्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या सूचना यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. यात प्रामुख्याने सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे, तसेच गार्बेज प्लांटची भिंत मागे घेऊन रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवणे, त्याचप्रमाणे उड्डाणपुलासाठी अधिग्रहित केलेल्या जमीन मालकांना त्याचा मोबदला तातडीने आदा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

Chandrakant Patil | वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचा ट्रॅफिक पोलिसांच्या बाईकवरुन प्रवास

Categories
Breaking News Political social पुणे

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचा ट्रॅफिक पोलिसांच्या बाईकवरुन प्रवास

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलवर मागे बसून प्रवास केला.

कोविडच्या दोन वर्षांनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या लाडक्या गणरायाचे अतिशय जल्लोषात स्वागत होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आज  मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या वाहनाऐवजी वाहतूक पोलिसांसोबत पुणे शहरात फिरुन वाहतुकीच्या नियोजनाचा आढावा घेतला.

आजपासून 10 दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. यादरम्यान भाविक घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजा करतील. गणेश चतुर्थीच्या दहा दिवसीय उत्सवाची सांगता 09 सप्टेंबर रोजी गणेशमूर्तीच्या विसर्जनाने होणार आहे. पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका जल्लोषात निघाल्या असून ढोल ताशांच्या गजराने वातावरण सुरमय झालं आहे  पुणे  शहराचा वैभवशाली गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यासह देशातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यात करोनामुळे दोन वर्षे बाप्पाचा उत्सव झाला नाही. त्यामुळे यंदाचा उत्सव धुमधडाक्‍यात साजरा होणार हे निश्‍चित. त्यातच भाविकांची मोठी गर्दी शहरात होणार झाली आहे. अशातच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलवर मागे बसून प्रवास केला.

New Government | MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांना मंत्रिपद! | चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आमदार सुनील कांबळे यांना मंत्रिपद!

पुणे | उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने भाजप एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन सरकार बनवण्याच्या तयारीत आहे. लवकरच नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे. यामध्ये कॅंटोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांना मंत्रिपद मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.
आमदार सुनील कांबळे हे पुणे भाजपचे जुने नेते आहेत. तसेच त्यांनी नगरसेवक पदी निवडून येण्याचा देखील विक्रम केला आहे. आमदार होण्या अगोदर ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. कॅंटोन्मेंट मध्ये आपल्या कामामुळे नेहमी निवडून येतात. खास करून मागासवर्गीय समाजात त्यांना मानणारा वर्ग आहे. याचाच फायदा कांबळे यांना नवीन मंत्रिमंडळात होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण भाजपच्या आमदारांमध्ये मागासवर्गीय आमदार कमी आहेत. कांबळे आणि उमरखेड चे नामदेव ससाणे ही ती नावे आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याला जर पद द्यायचे असेल आणि मागासवर्गीय समाजाचा प्रतिनिधी म्हणून सुनील कांबळे यांना सामाजिक न्याय मंत्री पद दिले जाऊ शकते. असा कयास व्यक्त केला जात आहे. दिलीप कांबळे यांना देखील हे पद देण्यात आले होते. त्यावेळी गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे पुणे परिसरातून तशी मागणी देखील होत आहे.

चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री

मात्र दुसरीकडे अशीही चर्चा आहे कि चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होऊ शकतात. त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे पुणे शहरातील या दोन आमदारापैकी कुणाला मंत्री पद मिळणार आणि कुणाला पुण्याचा पालकमंत्री करणार याकडे लक्ष लागले आहे. कारण पुण्याकडे सर्वांचे लक्ष असते. आता आगामी काळात महापालिका निवडणूका येऊ पाहताहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

NCP Vs Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील जिथे दिसतील, तिथे घेराव घालणार  | पुणे राष्ट्रवादीचा इशारा 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील जिथे दिसतील, तिथे घेराव घालणार

| पुणे राष्ट्रवादीचा इशारा

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी त्वरित माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला भगिनी चंद्रकांत पाटील जिथे दिसतील, तिथे घेराव घालतील, असा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी देण्यात आला.

चंद्रकांत पाटील यांनी सुप्रियाताईंबाबत केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सारसबाग येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध नोंदविण्यात आला. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच, पाटील यांच्या पुतळ्याला जोडेमार आंदोलनही करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, मृणाल वाणी, रुपाली पाटील, संतोष नांगरे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले चंद्रकांत पाटील हे पुण्याची व महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम करीत आहेत. सुप्रियाताई यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींविरोधात व समस्त महिला वर्गाविरोधात त्यांनी केलेले वक्तव्य हे निषेधार्ह आणि तितकेच लाजीरवाणे आहे. ‘घरी जा, स्वयंपाक करा, मसणात जा’ ही त्यांची वक्तव्ये महिलांनी चूल व मूल इतक्यापुरतेच मर्यादित राहावे, त्यांना समाजकारणात व राजकारणात वाव नसावा, या मानसिकतेचे प्रदर्शन करणारे आहे. यातून चंद्रकांत पाटील व भाजपची मनुवादी वृत्ती दिसून येत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा प्रकारची वृत्ती लादू पाहणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा आम्ही निषेध करतो. चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्वरित माफी मागावी अन्यथा ते जिथे दिसतील तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला – भगिनी त्यांना घेराव घालतील. त्यासाठी चंद्रकांत पाटील तयार राहावेत,’ असा इशारा  शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला.