Exit Polls | Pune | एक्झिट पोल मध्ये कुणाकडे आहे कल? जाणून घ्या सविस्तर

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

एक्झिट पोल मध्ये कुणाकडे आहे कल? जाणून घ्या सविस्तर

पुणे – पुण्यातील कसबा पेठ निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. शिवाय मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी गोंधळ पाहिला मिळाला होता. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी पैसे वाटपाचा आरोप करत उपोषण पुकारलं होतं. त्यातच आता एक्झिट पोल आला आहे.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल आल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी आणि भाजपने आपली ताकद पणाला लावली होती. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या ठिकाणी प्रचारासाठी गेले होते. याशिवाय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळाही मोठ्या प्रमाणावर उडाल्याचे पाहायला मिळाले. या पोटनिवडणुकीचा निकाल ०२ मार्च रोजी लागणार आहे.

पुण्यातील कसबा पेठ निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. शिवाय मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी गोंधळ पाहिला मिळाला होता. कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे अशी लढत पाहायला मिळत आहे. रिंगसाईड रिसर्च आणि स्ट्रेलिमा संस्थेने एक्झिट पोल वर्तवला आहे.

द स्ट्रेलेमा संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार चिचवडमध्ये भाजपला जागा राखण्यात यश मिळण्याचा अंदाज आहे. यामध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला १ लाख ५ हजार ३५४ मते मिळण्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना ९३ हजार आणि राहुल कलाटे यांना ६० हजार १७३ मते मिळण्याचा अंदाज आहे.

 
दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठमध्ये रवींद्र धंगेकर विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून धंगेकर यांना ७४ हजार ४२८ मते मिळू शकतात. तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना ५९ हजार ३५१ मते मिळण्याचा अंदाज आहे.

Kasba by-election | पोटनिवडणूक मतदानादिवशी अधिकारी, कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी | औद्योगिक आस्थापनांना उद्योग विभागाचे निर्देश

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

पोटनिवडणूक मतदानादिवशी अधिकारी, कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी

| औद्योगिक आस्थापनांना उद्योग विभागाचे निर्देश

पुणे | २१५-कसबा पेठ व २०५- चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीअंतर्गत रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीमध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनामध्ये काम करणारे कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क् बजावता यावा यासाठी रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी भरपगारी सुट्टी अथवा २ तासाची सवलत देण्याबाबत परिपत्रक शासनाने जारी केले आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५(ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणूकांमध्ये संस्था/आस्थापना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे आढळून आले असून अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने हे परिपत्रक जारी केले आहे.

*कामानिमित्त मतदान क्षेत्राबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी*

निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/ कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

*मतदान क्षेत्रातील कामगारांना सुट्टी किंवा कमीत कमी दोन तासांची सवलत*

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खवरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
00000

MNS Supports BJP | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हेमंत रासने यांना पाठिंबा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हेमंत रासने यांना पाठिंबा

हिंदुत्व आणि विकास हे दोन्ही मुद्दे प्रभावशाली पद्धतीने पुढे नेणारा एकच घटक सध्या आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. म्हणूनच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला पूर्ण सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय मी घेत आहे, अशा  शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा  राज ठाकरे यांनी आज आपली भूमिका व्यक्त केली.

पुण्यातील मनसे नेत्यांनी आज राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी राज यांनी ही स्पष्टोक्ती केल्याचे समजते. त्यावेळी पुण्यातील कसबा विधानसभा पोट निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बाबू वागस्कर, अजय मोरे, किशोर शिंदे आदी मनसेचे पुण्यातील स्थानिक नेते उपस्थित होते.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना आणि मित्र पक्षाच्या युतीतर्फे हेमंत रासने हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. या संदर्भात मनसेची भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्थानिक नेत्यांनी राज यांची आज भेट घेतली. हिंदुत्व आणि विकास याच्या बाजूनेच आपला कल असल्याचे राज यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे कसबा विधानसभा निवडणुकीत भाजप युतीचे उमेदवार हेमंत रासने यांना आता मोठे बळ मिळाले आहे.

निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी आज मनसेचे प्रवक्ते आणि नेते अनिल शिदोरे प्रदेश, नेते बाबू वागस्कर, उपाध्यक्ष बाळा शेंडगे, प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि कसबा विभागाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांची भेट घेतली.
यावेळी वागस्कर यांनी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.

Exit polls | एक्झ‍िट पोल प्रसारित अथवा प्रकाशित करण्यास प्रतिबंध

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक

| एक्झ‍िट पोल प्रसारित अथवा प्रकाशित करण्यास प्रतिबंध

पुणे| भारत निवडणूक आयोगाने २१५- कसबा पेठ व २०५ – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा तसेच देशाच्या इतर राज्यातील काही ठिकाणीही निवडणूक कार्यक्रम १८ जानेवारी २०२३ रोजी जाहीर केला आहे. त्यामुळे १६ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या सकाळी सात वाजेपासून २७ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस मुद्रीत अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे एक्झिट पोल आयोजित करण्यास, प्रकाशित करण्यास आणि प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिली आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ च्या कलम १२६ (१) (ब) अन्वये असे करण्यास प्रतिबंध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

(Kasba Peth and Chinchwad assembly constituencies by-elections | Prohibition of broadcasting or publishing exit polls)

 

Analysis | Kasba By-election | भाजपासाठी कसब्याची पोटनिवडणूक सोपी नाही, हे नक्की! 

Categories
Breaking News Political पुणे

भाजपासाठी कसब्याची पोटनिवडणूक सोपी नाही, हे नक्की!

पुणे | कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळते आहे. मात्र भाजपने टिळक परिवार सोडून दुसरा उमेदवार का दिला, याचे कोडे मात्र भाजपच्या लोकांना सुटलेले दिसत नाही. कारण मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज आहेत. तसेच मतदार संघातील ब्राम्हण समाजाने देखील नाराजी दाखवली आहे. तसेच वारंवार एकाच माणसाला वेगवेगळ्या पदावर संधी दिली जाते, म्हणूनही अंतर्गत कलह आहे. त्यातच महाविकास आघाडी देखील जोरदार तयारी करत आहे. रवींद्र धंगेकर सारखा तगडा उमेदवार आघाडीने दिला तर भाजप साठी ही निवडणूक त्यांना वाटते तेवढी सोपी नसणार हे नक्की मानले जात आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला, पारंपारिक गड मानला जातो. राजकीय धुरंधर मानत होते कि या जागेवर दगड जरी उभा केला तरी भाजपच निवडून येईल. काही काळापूर्वी तशी परिस्थिती होती देखील. मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. या मतदारसंघावर खासदार गिरीश बापट यांचे वर्चस्व होते. मात्र आता भाजपनेच तीच परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे बापट मागे पडले होते. शिवाय बापटांना त्यांची तब्येत देखील आता साथ देत नाही. बापट यांना जनमानसातील नेता म्हणून ओळखले जायचे. बापट लोकांबरोबर वागायचे देखील तसेच. त्यामुळे कसबा पेठ फक्त भाजपचाच राहिला. बापट खासदार झाल्यामुळे मुक्ता टिळक यांना इथे संधी  मिळाली. त्यांनी संधीचं सोनं केलं. मात्र नियतीनं डाव टाकला आणि मुक्ता टिळक यांना हे सुख फार काळ लाभू दिले नाही. मुक्ता टिळक यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे.
पोटनिवडणुकीसाठी बऱ्याच इच्छुकांची नावे  चर्चेत होती. यामध्ये टिळक पिता पुत्र म्हणजे शैलेश टिळक आणि कुणाल टिळक, हेमंत रासने, गणेश बिडकर आणि धीरज घाटे यांचा समावेश होता. मात्र पक्षाने हेमंत रासने यांना संधी दिली आहे. त्यामुळे आता नाराजी वाढताना दिसून येत आहे. शैलेश टिळक यांनी फडणवीस यांच्याकडे ही नाराजी बोलून दाखवली आहे. साक्षात गिरीश महाजन याना टिळकांची मनधरणी करण्यासाठी केसरी वाड्यावर यावे लागले. मात्र एवढ्याने टिळकांचे समाधान होणार नाही. तसेच ब्राम्हण समाजाने देखील उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. या मतदारसंघात अपेक्षित होते कि टिळक परिवारातील आणि ब्राम्हण समाजाचाच उमेदवार दिला जाईल. मात्र तसे न झाल्याने लोक नाराज झाले आहेत.
भाजपने कितीही नाकारले तरी भाजपने उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत जे केलं, तो प्रसंग विसरायला लोक तयार नाहीत. अजूनही त्यांच्याविषयी लोकांमध्ये सहानुभूती आहे. तसेच भाजपविषयी रोष देखील. तसेच भाजपमध्ये अंतर्गत कलह देखील आहे. कारण हेमंत रासने याना महापालिकेत 4 वेळा स्थायी समितीचा अध्यक्ष बनण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर आता आमदारकी साठी देखील त्यांचेच नाव पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे हा रोष वाढतानाच दिसतो आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीने ही निवडणूक खूप गंभीरतेने घेतली आहे. कारण टिळक घराण्यातील जरी उमेदवार दिला असता तरी आघाडी ही निवडणूक बिनविरोध नकरता लढणारच होती. हे भाजपच्या गोटात कळायला उशीर लागला नाही. त्यामुळेच भाजपला देखील तशी तयारी करावी लागत आहे. कसबा मतदार संघात सर्व जाती धर्माचे लोक राहतात, फक्त ब्राम्हण समाज नाही. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा इथल्या लोकांशी चांगला संपर्क आहे. शिवाय महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते मानतात कि धंगेकर उमेदवार असतील तर आम्ही प्रामाणिकपणे काम करू. असं झालं तर महाविकास आघाडीचं पारडं जड होईल. भाजपासाठी सध्या तरी जमेच्या गोष्टी कमी आहेत. भाजपला काहीतरी चमत्कार करावा लागणार. तसा तो होऊही शकेल. मात्र पोटनिवडणूक सोपी नाही, हे नक्की आहे.

By-Election | विधानसभा पोट निवडणूक मतदानाच्या तारखेत बदल | २६ फेब्रुवारी रोजी होणार मतदान

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

विधानसभा पोट निवडणूक मतदानाच्या तारखेत बदल

| २६ फेब्रुवारी रोजी होणार मतदान

पुणे |  भारत निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील २१५- कसबा पेठ व २०५- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार २७ फेब्रुवारीऐवजी रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठची, तर आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १८ जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये बदल करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक २५ जानेवारी रोजी जारी करण्यात आले आहे.

सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार ३१ जानेवारी २०२३ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार ८ फेब्रुवारी २०२३ रोजी होईल. शुक्रवार १० फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होईल. गुरुवार २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती प्र. उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली आहे.
०००००

By-election |  कसबा पोट निवडणूक भाजपा जिंकणारच | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा निर्धार

Categories
Breaking News Political पुणे

 कसबा पोट निवडणूक भाजपा जिंकणारच | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा निर्धार

पुणे | मुक्ताताई टिळक (Mukta Tilak)  यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदार संघाची पोटनिवडणूक (kasba byelection) भारतीय जनता पक्ष (BJP) जिंकणारच असा निर्धार आज भाजपा पुणे शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच ही निवडणूक माननीय खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक (city president Jagdish Mulik)यांच्या नेतृत्वात लढली जाईल, असेही यावेळी निश्चित करण्यात आले.

विधानसभा कसबा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांच्या कोथरुड निवासस्थानी भाजपा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीला भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, कुणाल टिळक, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना काकडे, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आ. भीमराव तापकीर, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपा माजी पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नामदार पाटील म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ राहिला आहे. या मतदारसंघातील सर्व मतदार नेहमीच भाजपावर मनापासून प्रेम करतात. मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला आहे.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे एकप्रकारे कोरं पाकीट असतात. पक्ष नेतृत्व जे काम सांगेल ते कार्यकर्ते अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करतात.‌ त्यामुळे विधानसभेच्या कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव पक्षाच्या पार्लिमेंटरी बोर्डकडून ठरविण्यात येईल. पण त्यापूर्वीच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मिळणारे मताधिक्य वाढविण्यावर सर्व कार्यकर्त्यांचा भर आहे. तसेच, माननीय खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होईल.

बिनविरोध निवडणूक करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना नामदार पाटील म्हणाले की, मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी; अशी सर्वांचीच भावना आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ नये; असा सुतोवाच केला आहे. त्यामुळे गाफिल न राहता ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.