Ganesh Mandal | गणेश मंडळाचे मांडव काढून घेण्यासाठी उद्या पर्यंतची मुदत |नाही काढल्यास पुढील वर्षी परवानगी नाही | महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

गणेश मंडळाचे मांडव काढून घेण्यासाठी उद्या पर्यंतची मुदत |नाही काढल्यास पुढील वर्षी परवानगी नाही

| महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश

पुणे – गणेशोत्सव संपल्यानंतरही रस्त्यावर मंडळांचे मांडव, कमानी, रनिंग मांडव काढले न गेल्याने नागरिकांना व वाहतुकीला अडथळा होत आहे. १४ सप्टेंबर पर्यंत सर्व मांडव काढून घ्यावेत, मांडवामुळे पडलेले खड्डे मंडळांनी बुजविले आहेत की नाहीत ते पाहून त्याचा अहवाल क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी १५ सप्टेंबर रोजी अतिक्रमण कार्यालयाकडे सादर करावा. जर मंडळांनी रस्ता, पादचारी मार्ग मोकळा केला नसल्यास त्यास पुढील वर्षी गणेशोत्सवासाठी परवागनी देऊ नये असे स्पष्ट प्रस्ताव सादर करा असे आदेश अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिले आहेत.

यंदाच्या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिकेने परवाना शुल्क माफ केल्याने व पुढील पाच वर्षांसाठी एकच परवाना ग्राह्य धरला जाणार असल्याने मंडळांना दिलासा मिळाला. गणेशोत्सवानंतर मंडळांनी, खासगी कंपन्यांनी रस्ते व पादचारी मार्गावरील देखावे साहित्य, मिरवणूक साहित्य, बोर्ड, बॅनर, जाहिराती तीन दिवसात काढून घेणे बंधनकारक आहे. पण मंडळांनी व खासगी व्यक्तींनी मुदतीत साहित्य व बोर्ड काढलेले नाहीत. त्याच प्रमाणे मांडव काढल्यानंतर खड्डेही बुजविले नाहीत. त्यामुळे पादचारी व वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या हद्दीतील मंडळांनी मांडव काढला की नाही, रस्ते स्वखर्चातून दुरुस्त केले की नाही याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे, त्यामुळे सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांचा अहवाल १५ सप्टेंबर रोजी अतिक्रमण विभागाकडे सादर करावा. ज्या मंडळांनी रस्ता, पादचारी मार्ग मोकळा केला नाही, त्यांना पुढील वर्षी परवानगी देऊ नये असा प्रस्तावही सादर करावा असे आदेशात नमूद केले आहे.

Ganesha idols Immersion | हौद आणि टाक्यात 3 लाखाहून अधिक गणेश मूर्तीचे विसर्जन  | 4 लाख किलोहून अधिक निर्माल्य जमा 

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

हौद आणि टाक्यात 3 लाखाहून अधिक गणेश मूर्तीचे विसर्जन

| 4 लाख किलोहून अधिक निर्माल्य जमा

पुणे | गणेश उत्सवाची सांगता झाली आहे. प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेकडून गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हौद आणि लोखंडी टाक्या बनवण्यात आल्या होत्या. यामध्ये शहर वासियांकडून एकूण 3 लाख 10 हजार 158 मूर्तीचे विसर्जन झाले.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार महापालिकेकडून बांधण्यात आलेल्या हौदात 68 हजार 547 गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. लोखंडी टाक्यात 1 लाख 32 हजार 999 मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. फिरत्या हौदात 40 हजार 522 मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. 68 हजार 90 मूर्ती संकलित करण्यात आल्या. अशा एकूण 3 लाख हुन अधिक मूर्ती विसर्जित करण्यात आल्या.
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. शिवाय निर्माल्य जमा करण्यासाठी देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. 4 लाख 4 हजार 347 किलो निर्माल्य जमा करण्यात आले. असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

Anant Chaturdashi 2022 | पुणे उपनगरात गणेश मंडळांना रात्री १२ पर्यंत परवानगी

Categories
Breaking News cultural PMC Political social पुणे

Anant Chaturdashi 2022 | पुणे उपनगरात गणेश मंडळांना रात्री १२ पर्यंत परवानगी

उपनगरातील गणेश मंडळे ही शहरातील मंडळांच्या एक दिवस अगोदर म्हणजे गुरुवारी गणेश विसर्जन करीत असतात. मात्र, गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंतच उपनगरातील मंडळांना परवानगी असल्याने ही वेळ वाढवून देण्याची मागणी उपनगरातील स्थानिक मंडळांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे जनतेचे सरकार आहे, असे सांगत जल्लोषात गणेशोत्सव साजरा करा, असे म्हणत वेळ वाढवून देत असल्याचे सांगितले.

बुधवारी सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रूक येथील संकल्प मित्र मंडळाच्या गणेश दर्शनासाठी ते आले असताना त्यांनी थेट मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, हे जनतेचे सरकार आहे. जनतेच्या भावनांचा विचार केला जाईल. निर्बंधमुक्त गणेशोत्सव केला आहे. रात्री १२ वाजेपर्यंत उत्साहात गणेशोत्सव साजरा करा, असे म्हणताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Ganesh Immersion Procession | विसर्जन मिरवणुकीनंतर शहर स्वच्छ करण्यासाठी पुणे मनपा सज्ज

Categories
Breaking News PMC social पुणे

विसर्जन मिरवणुकीनंतर शहर स्वच्छ करण्यासाठी पुणे मनपा सज्ज 

पुणे – गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असताना आता गणपतीला निरोप देण्याचे वेध लागले आहे. मंडळांकडून विसर्जन मिरवणूक रथ तयारीला वेग आला आहे. पण याच वेळी शहर स्वच्छ राहिले पाहिजे, कचरा लगेच उचलला जावा यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने क्षेत्रीय कार्यालयांशी समन्वय साधून विसर्जन मिरवणूक संपताच पुढच्या तीन-चार तासात शहर चकाचक करण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे.

त्याचप्रमाणे विसर्जनाच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नदीकाठी अग्निशामक दलाची यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे अतिशय साधेपणाने व मिरवणुकांशिवाय गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पण यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणपतीचे दर्शन व देखावे पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. शहरात खाद्यपदार्थ विक्री, खेळण्यांसह इतर साहित्य विक्रीचे स्टॉल लागलेले आहे. विसर्जन मिरवणुकीच्या वेळेत तर याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पेठांमधील सर्वच रस्त्यांवर कचरा पडलेला असोत. विसर्जन मिरवणुकीला लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकापासून ते टिळक चौकापर्यंत दुतर्फा भाविकांची प्रचंड गर्दी झालेली असते. त्यात ढकला ढकली होते. या गोंधळात अनेकांच्या चपला, बूट तुटतात, त्याचाही कचरा दरवर्षी निघत असतो. तसेच मिरवणुकीत उधळलेला गुलाल, फुले, रांगोळी असा कचरा निर्माण होतो. त्यामुळे महापालिकेला सर्व रस्ते झाडून घ्यावे लागतात.
महापालिकेचे मध्यवर्ती भागासाठी १३०० कर्मचारीआदर पूनावाला फाउंडेशन, जनवाणी यांसह इतर संस्थाचा सहभागयाच भागात २१० फिरती स्वच्छतागृहे ठेवली आहेतशहराच्या इतर भागात क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर नियोजनत्यामध्ये ७ हजार ७०० कर्मचारी असणारज्या भागातील गणेश विसर्जन मिरवणूक जसजशी पुढे जाईल, तसे लगेच स्वच्छतेचे काम सुरू होणारगणेश विसर्जनासाठी महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. मध्यवर्ती भागात १३०० कर्मचारी स्वच्छता करणार आहेत. आदर पूनावाला फाउंडेशनतर्फे कचरा उचलण्यासाठी मशिन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, त्यामुळे स्वच्छतेचे काम गतीने होईल. भाविकांच्या सोईसाठी शहरात २१० फिरती स्वच्छतागृहे असणार आहेत. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मनुष्यबळ उपलब्ध आहे.

Gauri Ganpati Decoration Competition | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित “उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धा” व “गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२२”

Categories
Breaking News cultural Political पुणे

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित “उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धा” व “गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२२”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या “उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धा” व “गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२२” या शहर स्तरावरील स्पर्धांची घोषणा आज शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.

तसेच कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर होणाऱ्या या गणेशोत्सवात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते पुणे शहरातील गणेशोत्सवात सहभागी होणार असून राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार दि.४ सप्टेंबर रोजी पुण्यात असतील तर दि.३ सप्टेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दि.५ ते ८ सप्टेंबर दरम्यान खासदार सौ.सुप्रियाताई सुळे , २ सप्टेंबर रोजी डॉ.अमोल कोल्हे हे पुणे गणेश दर्शन दौऱ्यावर असणार आहेत.
या स्पर्धेची माहिती देताना श्री.प्रशांत जगताप म्हणाले की , संपूर्ण पुणे शहर स्तरावरील मंडळांसाठी राबविली जाणारी ही सर्वात मोठी स्पर्धा असून या स्पर्धेसाठी तब्बल ५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. “सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धा” ही शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी घेण्यात येत असून या स्पर्धेसाठी शहरस्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपयांचे आहे. द्वितीय ७५,००० , तृतीय ५१,००० , चतुर्थ ३१,००० , पाचवे २१००० तर विधानसभानिहाय बक्षिसे प्रथम २५,००० ,द्वितीय १५,००० , तृतीय ५००० अशी आहेत. या स्पर्धेसाठी परीक्षकांची टीम संपूर्ण शहरातील गणेशोत्सव मंडळांना भेट देणारा असून या सर्व मंडळांच्या प्रत्यक्ष पाहणी नंतर बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत. स्पर्धेतील सर्व सहभागी मंडळांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी गणेश मंडळांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

त्यासाठी या +919096256319,+919096848484 क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत पुणे शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मी आपणास करत आहे.
पुणे शहरातील सर्व महिला भगिनींसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खास पुणे शहरस्तरीय “गौरी गणपती” स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिला भगिनींनी आपल्या घरच्या गौरी गणपतीच्या सजावटीचे फोटोज या क्रमांकावर पाठवायचे आहेत. उत्कृष्ट सजावट केलेल्या महिलाभगिनींना एलईडी स्मार्टटीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा गृह उपयोगी साहित्याची विविध बक्षिसे देण्यात येणार असून, सहभागी प्रत्येक महिलेचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.या स्पर्धेत देखील शहरातील सर्व महिला भगिनींनी सहभागी व्हावे.

Chandrakant Patil | वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचा ट्रॅफिक पोलिसांच्या बाईकवरुन प्रवास

Categories
Breaking News Political social पुणे

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचा ट्रॅफिक पोलिसांच्या बाईकवरुन प्रवास

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलवर मागे बसून प्रवास केला.

कोविडच्या दोन वर्षांनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या लाडक्या गणरायाचे अतिशय जल्लोषात स्वागत होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आज  मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या वाहनाऐवजी वाहतूक पोलिसांसोबत पुणे शहरात फिरुन वाहतुकीच्या नियोजनाचा आढावा घेतला.

आजपासून 10 दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. यादरम्यान भाविक घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजा करतील. गणेश चतुर्थीच्या दहा दिवसीय उत्सवाची सांगता 09 सप्टेंबर रोजी गणेशमूर्तीच्या विसर्जनाने होणार आहे. पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका जल्लोषात निघाल्या असून ढोल ताशांच्या गजराने वातावरण सुरमय झालं आहे  पुणे  शहराचा वैभवशाली गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यासह देशातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यात करोनामुळे दोन वर्षे बाप्पाचा उत्सव झाला नाही. त्यामुळे यंदाचा उत्सव धुमधडाक्‍यात साजरा होणार हे निश्‍चित. त्यातच भाविकांची मोठी गर्दी शहरात होणार झाली आहे. अशातच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलवर मागे बसून प्रवास केला.

Ganesh Utsav | PMC | गणपती विसर्जनासाठी महापालिकेकडून ३०३ ठिकाणे निश्चित |पुणे महापालिकेची गणेश उत्सवाची तयारी पूर्ण

Categories
Breaking News cultural PMC पुणे

गणपती विसर्जनासाठी महापालिकेकडून ३०३ ठिकाणे निश्चित

|पुणे महापालिकेची गणेश उत्सवाची तयारी पूर्ण

पुणे :  पुणे शहरात सर्वत्र गणेशोत्सव कोरोना विषयक सर्व नियम पाळून आनंदाने व मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे. यंदाचे वर्षी गणेशोत्सव करिता पुणे महानगरपालिकेच्या वतीने सर्व स्तरावर आवश्यक ती पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. गणपती विसर्जनासाठी महापालिकेकडून ३०३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

गणेशोत्सवाच्या तयारीचे दृष्टीने १५ क्षेत्रिय कार्यालयांनी त्यांचे परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, ग्रुप स्विपींग, कंटेनर, निर्माल्य कलश, किटकनाशक फवारणी विसर्जन घाटांवर अग्निशमनदल कर्मचारी व्यवस्था, घाटांवर औषध फवारणी नदी किनारच्या विसर्जन घाटांवर विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची सोय करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर जीवरक्षकांच्या नियुक्त्या सर्व ठिकाणी फिरते हौदांची व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्या यांचे गळतीची व इत्यादी बाबतची त्वरीत दुरुस्ती कामे करणेकरिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणेत आलेल्या आहेत. आवश्यकतेनुसार मंडप, बॅरिकेटस उभारणेत आलेले आहेत.

सार्वजनिक स्वच्छता गृहे, शौचालयांची स्वच्छता, फिरती शौचालये, सुचना फलक आदी स्तरावरुन तयारी करणेत आलेली आहे. पुणे महानगरपालिकेकडील सर्व क्षेत्रिय कार्यालयांच्या परिसरात विविध ठिकाणी तसेच नव्याने समाविष्ट गावामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी मंडप व्यवस्था, मुर्ती संकलन / दान केंद्रे सुरक्षेसाठी बॅरिकेटस, कृत्रिम हौदाची तसेच फिरते हौदांची सोय केलेली आहे. आपल्या घरातील निर्माल्य सार्वजनिक ठिकाणी किंवा नदी / तलाव या ठिकाणी न टाकता महानगरपालिकेच्या यंत्रणेकडे सूपूर्त करावे. यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सर्व मुर्ती संकलन / दान केंद्राच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. गणेश विसर्जन हौदाच्या ठिकाणी हौद व परीसराच्या स्वच्छतेसाठी मनपा सेवकांची १० दिवस रोज दोन पाळीमध्ये नेमणूक करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडील सर्व अग्निशमन केंद्रे २४ तास सतर्क ठेवण्यात येऊन नागरिकांना मदत लागल्यास अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. १०१ व ०२०-२६४५१७०७ वर संपर्क साधावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

FDA | Ganesh Mandal | गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश

पुणे| गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.

गणेशोत्सवात गणपतीच्या आरतीनंतर प्रसाद वाटप होते. विषबाधेच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेबाबत काळजी घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. वेळोवेळी प्रसादाच्या सेवनातून विषबाधा झाल्याच्या काही घटना यापूर्वी घडल्या आहेत. काही वेळा भाविकांनी तयार करून आणलेल्या प्रसादाचे वाटप केले जाते. या प्रसादाबद्दल कार्यकर्त्यांना कोणतीच कल्पना नसते. त्यामुळे गणेशोत्सवातील प्रसाद सुरक्षित असेल याकडे अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष असणार आहे.

गणपती मंडळांनी स्वतः तयार केलेल्या प्रसादाचे वाटप करावे. प्रसादासाठी वापरला जाणारा शिधा व अन्न पदार्थांची गुणवत्ता तपासावी. प्रसाद करण्याच्या ठिकाणी स्वच्छता बाळगावी. तयार प्रसाद थंड करण्यासाठी स्वच्छ जागेचा वापर केल्यास प्रसाद दूषित होण्याची शक्यता कमी होते. प्रसादात शक्यतो कोरड्या पदार्थांचा समावेश करावा.

सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती इत्यादी अन्न पदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनातर्फे या अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या संबंधित आस्थापनांच्या तपासण्या व नमुने घेण्यासाठी विशेष मोहिम डिसेंबर २०२२ पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी दिली आहे.

Konkan | कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकरमाफी | शासनाच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकरमाफी

| शासनाच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे | कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना, वाहनांना राज्य शासनाने पथकर माफी जाहीर केली असून त्याचे जिल्ह्यात काटेकोर पालन करत गणेशभक्तांना कोणत्याही असुविधेला सामोरे जावे लागू नये याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ही पथकर माफी असणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपजिल्हाधिकारी संजय तेली, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता महेश पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पुण्यातून जाणाऱ्या मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (एनएच ४८) तसेच इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या गणेश भाविकांच्या वाहनांना ही पथकर माफी देण्याबाबत शासन परिपत्रकानुसार निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी पथकर माफी देण्यात आली होती. हा अनुभव लक्षात घेऊन पथकर माफीची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले.

डॉ. देशमुख म्हणाले, या परिपत्रकानुसार टोलमाफी देण्याचे पथकर नाके चालकांना निर्देश देण्यात आले असून पथकर नाक्यांच्या ठिकाणी शासनाने निश्चित केलेल्या नमुन्यातील पथकर माफी पास उपलब्ध करुन देण्यात येतील. पोलीस विभाग आणि परिवहन विभागाच्या समन्वयातून हे काम केले जाईल.

पथकर माफीसंदर्भातील निर्णयाची माहिती देण्यासाठी पथकर नाके चालकांनाही या बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी करून घेण्यात आले होते.

Loudspeaker during Ganeshotsav | गणेशोत्सवात हे ५ दिवस ध्वनिक्षेपक वापरासाठी असेल परवानगी

Categories
Breaking News cultural social पुणे

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ५ दिवस परवानगी

पुणे | सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान चार ऐवजी ५ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केला आहे.

पुण्यातील सार्वजनिक गणपतींचे देखावे व आरास पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास ४ ऐवजी ५ दिवस परवानगी देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सुट दिलेल्या गणेशोत्सवाखेरीज इतर सण, उत्सव तसेच ठेवून जिल्ह्यातील गणेशोत्सवासाठी शनिवार, ३ सप्टेंबर, रविवार, ४ सप्टेंबर, मंगळवार ६ सप्टेंबर, बुधवार ७ सप्टेंबर आणि शुक्रवार, ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत एकूण ५ दिवस नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.