Pune Metro Timetable | पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल | दोन्ही मार्गावर वेळेत बदल

Categories
Breaking News social पुणे

Pune Metro Timetable | पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल | दोन्ही मार्गावर वेळेत बदल

Pune Metro Timetable | पुणे मेट्रो (Pune Metro) आता सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरू राहणार आहे. पुणे मेट्रो आपली प्रवासी सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी १ तास लवकर सुरू करीत आहे. अशी माहिती पुणे मेट्रोच्या (Pune Metro) वतीने देण्यात आली. (Pune Metro Timetable)
नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार पुणे मेट्रोच्या वेळेतील बदल हा दोन्ही मर्गांसाठी लागू करण्यात आला आहे. आता पुणे मेट्रोची प्रवासी सेवा वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते सिव्हिल कोर्ट या दोन्ही मार्गांवर सकाळी 6 ते रात्री 10 अशी सुरू राहील. हा बदल दिनांक  17 ऑगस्ट 2023 पासून लागू करण्यात येणार आहे. (Pune Metro News)
17 ऑगस्ट 2023 पासून वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मार्ग व पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्ग यांच्यावर पुणे मेट्रोची वारंवारता पुढीलप्रमाणे असेल:
सकाळी ६ ते ८ – दर १५ मिनिटांनी
सकाळी ८ ते ११ – दर १० मिनिटांनी
सकाळी ११ ते दुपारी ४ – दर १५ मिनिटांनी
दुपारी ४ ते रात्री ८ – दर १० मिनिटांनी
रात्री ८ ते १० – दर १५ मिनिटांनी
—-
News Title | Pune Metro Timetable | Pune Metro Timetable Change | Time change on both routes

Pune Metro | पुणे मेट्रो धावली रुबी हॉल मेट्रो स्थानकापर्यंत

Categories
Breaking News social पुणे

पुणे मेट्रो धावली रुबी हॉल मेट्रो स्थानकापर्यंत

– रुबी हॉल स्थानकापर्यंत मेट्रोची चाचणी घेण्यात आली

– मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक ही ठिकाणे लवकरच मेट्रोद्वारे जोडली जाणार
आज पुणे मेट्रोची सिव्हिल कोर्ट स्थानक ते रुबी हॉल स्थानक ही चाचणी घेण्यात आली. ठीक ३.५० मिनिटांनी सिव्हिल कोर्ट स्थानक येथून मेट्रो ट्रेन निघाली. ४.०७ मिनिटांनी रुबी हॉल स्थानक येथे ट्रेन पोहोचली. ट्रेनचा वेग १० किमी प्रति तास असा होता. मुळा-मुठा संगम पूल पार करून ट्रेन मंगळवार पेठ (RTO) स्थानक येथे पोहोचली. तेथून पुणे रेल्वे स्थानक पार करून रुबी हॉल स्थानकात नियोजित वेळेनुसार पोचली. चाचणी दरम्यान ठरलेली उद्दिष्ट पार पडले. चाचणी अत्यंत व्यवस्थित पार पडली. अशी माहिती पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही १२ किमीची मार्गिका २०२२ मध्ये प्रवाशांसाठी सुरू केल्यानंतर आता लवकरच फुगेवाडी स्थानक- सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक – सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक – रुबी हॉल स्थानक  या एकूण १२ किमीची मार्गिका लवकरच प्रवाश्यांसाठी सुरू करण्यात येतील.
गरवारे स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गीकेवर मेट्रो रेल्वेची चाचणी दिनांक २५/११/२०२२ रोजी घेण्यात आली. त्याचप्रमाणे फुगेवाडी स्थानक  ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक मार्गावर चाचणी दिनांक ३१/१२/२०२२ रोजी घेण्यात आली. आज दिनांक २७/०३/२०२३रोजी सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक- मंगळवार पेठ (RTO) – पुणे रेल्वे स्थानक – रुबी हॉल स्थानक या मार्गावर चाचणी घेण्यात आली. या तिन्ही मार्गीकेवरील कामे जवळपास संपुष्टात आली आहेत. उर्वरित कामे येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण झाल्यावर या मार्गीकांचे सी एम आर एस निरीक्षण करण्यासाठी रेलवे सुरक्षा आयुक्त यांना बोलावण्यात  येईल आणि लवकरच सी एम आर एस यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रवासी सेवा या मार्गावर सुरू करण्यात येईल.
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानक या मार्गीकेवर  मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक,  रुबी हॉल स्थानक ही महत्त्वाची स्थानके आहेत.  यामुळे आरटीओ कार्यालय, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल, जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज जोडले जाणार आहेत.  यामुळे मोठ्या प्रमाणावर पुण्याच्या नागरिकांना या भागात येणे-जाणे सोयीचे होणार आहे.  पुणे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाला मेट्रोच्या कॉनकोर्स मजल्याशी जोडण्यात आल्यामुळे रेल्वे आणि मेट्रो प्रवाशांना थेट एकमेकांच्या सेवांचा लाभ घेणे सोईचे होणार आहे.  मेट्रो स्थानकावरून रेल्वेच्या सर्व फलाटांवर जाणे सहज शक्य होईल. मंगळवार पेठ स्थानक (RTO) हे अत्यंत गजबिल्या ठिकाणी आहे.  आरटीओ कार्यालयात येणाऱ्या असंख्य नागरिकांना याचा फायदा होईल. तसेच या भागात शाळा इंजिनिअरिंग कॉलेज, नायडू हॉस्पिटल ही महत्वाची ठिकाणे आहेत. या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्या तीन ते चार हजार विद्यार्थ्यांना या मेट्रो स्थानकामुळे फायदा होणार आहे.
या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे की, “आज घेण्यात आलेली चाचणी नियोजित उद्दिष्ठानुसार पार पडली. लवकरच पुणे रेल्वे स्थानक, RTO व रुबी हॉल मेट्रो नेटवर्क द्वारा जोडले जाईल”.

Pune Metro | डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक आव्हानांवर मात करत पूर्णत्वाकडे | पुणे मेट्रो

Categories
Breaking News social पुणे

डेक्कन  आणि छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक आव्हानांवर मात करत पूर्णत्वाकडे  | पुणे मेट्रो

मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या मार्गीकेमध्ये वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही मार्गीका प्रवाशांसाठी मागील वर्षी खुली करण्यात आली. गरवारे कॉलेज स्थानक ते रामवाडी स्थानक मार्गीकेवरील कामे अत्यंत वेगाने सुरू असून मार्च २०२३ अखेर गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गिकेचे काम पूर्ण करून सी. एम. आर. एस. इन्स्पेक्शन करण्यात येणार आहे. तदनंतर ही मार्गीका प्रवासी वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. या मार्गिकेवर डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका, सिव्हिल कोर्ट, मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक आणि रुबी हॉल क्लिनिक ही महत्त्वाची स्थानके आहेत.

ही मार्गिका खुली करण्यात आल्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (एफसी रोड), जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व, पुणे मनपा, दिवाणी न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी आणि जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज इत्यादी महत्त्वाची ठिकाणे मेट्रो द्वारे जोडली जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा होणार आहे. या मेट्रो स्थानकांपैकी डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान स्थानक यांचे काम अत्यंत आव्हानात्मक होते आणि त्या आव्हानांवर मात करत ती स्थानके पूर्णत्वाकडे आली आहेत. अशी माहिती पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात आली.

मेट्रो ने दिलेल्या निवेदनानुसार डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान या स्थानकांची वैशिष्ट्यपूर्ण रचना असल्यामुळे ही स्थानके पुण्याची शान असणार आहेत. या स्थानकांची रचना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याच्या पगडीच्या आकाराप्रमाणे करण्यात आली आहे. सुमारे १४० मीटर लांब, २६ मी उंच आणि २८ मीटर रुंद अशा भव्य स्थानकांची रचना मावळा पगडी प्रमाणे करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. स्थानकांच्या छताची रचना त्रिमितीय असल्यामुळे स्थानकाच्या लांबीच्या दिशेने छताच्या रुंदी आणि उंचीमध्ये फरक पडतो. त्यामुळे छतावर असलेल्या प्रत्येक लोखंडी खांब, मेंबर्स आणि रूफ शीट या प्रत्येकाची लांबी, उंची व रुंदी भिन्न आहे. अशा प्रकारचे तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट बांधकाम वेळ खाऊ आणि तांत्रिकदृष्ट्या खूपच अवघड असते, कारण प्रत्येक लोखंडी खांब, मेंबर्स आणि रूफ शीट यांचे आरेखन स्थानानुसार बदलते त्यामुळे अत्यंत्य सावधानी पूर्वक स्थानकाचे बांधकाम करावे लागते

प्रत्येक रूफ शीटचा बाक आणि लांबी वेगळी असल्याने त्याला बाक देण्यासाठी स्थानकाच्या जागेजवळ ‘प्रोग्रेसिव रोलिंग मिल’ बसवण्यात आले आहे. जेणेकरून गरजेनुसार रूफ शीटची बेंडिंग आणि क्रिपिंग जागेवरच करता येईल. रूफ शिटचे पीईबी स्ट्रक्चरला फिटिंग करताना वैशिष्ट्यपूर्ण फिटिंग फिक्चर चा वापर करण्यात येतो. जेणेकरून रूफ शीट स्टील स्ट्रक्चरला घट्ट बसेल आणि हवा, पाऊस, ऊन इत्यादी गोष्टींनी त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. विशिष्ट प्रकारचे फिक्सर्स लावल्याने छताला छिद्र पाडून नटबोल्ट लावण्याची गरज पडली नाही, त्यामुळे पाणी लीक होणार नाही.

डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान ही स्थानके नदीपत्रात असून स्थानकांची उंची जमिनीपासून ६० ते ७० फूट आहे. या दोन्ही स्थानकांचे छताची पगडी आणि नॉन पगडी असे काम करण्यासाठी विभागणी करण्यात आले होती. दोन्ही विभागाचे काम त्यांच्या त्रिमितीय रचनेमुळे आव्हानात्मक होते. दोन्हीही भागांसाठी वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे ही स्थानके अत्यंत विलोभनीय दिसणार आहेत. इतक्या उंच काम करणे आणि तेही तिन्ही मितीमध्ये निमुळत्या असणाऱ्या छतावर हे अत्यंत जोखमीचे आणि आव्हानात्मक होते. अशा उंचीवर विविध उपकरणे घेऊन रूफ शीट आणि पीईबी मेंबर लावण्यासाठी अत्यंत कुशल अशा कामगारांच्या आवश्यकता भासते. कुठलाही अनुचित प्रकार न घडता या छतांची कामे आता पूर्णत्वाकडे आली आहेत.

Pune Metro | जमिनीच्या १०८ फूट खाली साकारतेय सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानक

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

जमिनीच्या १०८ फूट खाली साकारतेय सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानक

सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानकाचे (Civil court metro station) 95 टक्के काम पूर्ण झाले असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा समितीकडून पुढील दोन महिन्यांत या मार्गाची तपासणी केली जाणार आहे. मार्च अखेरपर्यंत पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा दोन मार्गिका सुरू केल्या जातील, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली. (pune metro)

पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट (17 किमी) आणि वनाज ते रामवाडी (16 किमी) अशा दोन मार्गिका आहेत. दोन्ही मार्गिका सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे एकमेकांना छेदतात आणि त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक एक महत्वाचे स्थानक म्हणून उभारण्यात येत आहे. सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकामध्ये पीसीएमसी ते स्वारगेट मार्गिकेवरील भूमिगत स्थानक आणि वनाज ते रामवाडी या मार्गिकेवरील उन्नत स्थानक आहे. भूमिगत स्थानक ते उन्नत स्थानक यांना एस्किलेटर आणि लिफ्ट यांनी जोडले आहे. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाचा एकूण परिसर 11.17 एकर असून, या स्थानकाला येण्या-जाण्यासाठी एकूण सात एन्ट्री पॉइंट असणार आहेत. प्रवाशांची संख्या लक्षात घेता या स्थानकात मोठ्या प्रमाणावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्थानकात 8 लिफ्ट आणि 18 एस्किलेटर बसविण्यात येत आहेत. सिव्हिल कोर्ट ते हिंजवडी ही पुण्यात बांधण्यात येणारी तिसरी मेट्रो मार्गिका देखील पादचारी पुलाने या स्थानकाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक हे मध्यवर्ती स्थानक म्हणून नावारूपाला येईल.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकात मेट्रो भवनचे काम करण्यात येणार आहे. संपूर्ण पुणे मेट्रोवर येथून नियंत्रण केले जाईल. मेट्रो भवनची इमारत खइउ प्लॅटिनम मानांकनानुसार बांधण्यात येणार असून, मल्टी मोडल इंटिग्रेशनसाठी पीएमपीएमएलचा थांबा असणार आहे. या संपूर्ण परिसराचे लॅंडस्केप अत्यंत आकर्षक करण्यात येणार आहे. ज्यामध्ये कारंजे, विविध झाडे, हरित पट्टे, आकर्षक झाडी लावण्यात येणार आहे.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाची खोली 33.1 मीटर (108.59 फूट) असून, हे भारतातील सर्वांत खोल मेट्रो स्थानक असणार आहे. या भूमिगत स्थानकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या भूमिगत स्थानकाचे छत 95 फूट उंच असून, देखील तेथे थेट सूर्यप्रकाश पोहचेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. इतक्‍या खोल स्थानकावर सूर्यप्रकाश पोहचणारे हे एकमेव भूमिगत मेट्रो स्थानक असणार आहे.

 
दोन महिन्यांत फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट या मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नुकतेच या दोन्ही मार्गांवर चाचणी घेण्यात आली आहे. हे मार्ग प्रवाशांसाठी खुले झाल्यावर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरे मेट्रोसारख्या मास ट्रान्झिट वाहतूक व्यवस्थेने जोडली जाणार आहेत. पीसीएमसी ते वनाज या 22 किमीचा प्रवास केवळ 31 मिनिटांमध्ये पार करणे शक्‍य होणार आहे.

Pune Metro | पुणे मेट्रोतर्फे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात!

Categories
Breaking News social पुणे

पुणे मेट्रोतर्फे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात

पुणे मेट्रोच्या कामादरम्यान अवजड यंत्र सामग्रीचा वापर केल्यामुळे बऱ्याचठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. तसेच या वर्षी मोठयाप्रमाणात पडलेल्यापाऊसामुळे त्याच्या भर पडली आहे. मेट्रो वेळोवेळी रस्ते दुरुस्त करीत आलीआहे. रस्त्यांवरचे खड्डे, ड्रेनेजची दुरुस्ती, मॅनहोलची दुरुस्ती, पाइपलाइनचीदुरुस्ती, पादचारी मार्गाची दुरुस्ती हि कामे मेट्रो करीत आली आहे. सध्या वनाझते गरवारे, PCMC ते फुगेवाडी आणि RTO ते बंडगार्डन येथील कामे संपली असल्याने तेथील बॅरिकेड हटवून रास्ता पूर्ववत करण्यात आला आहे. अशी माहिती महामेट्रो कडून देण्यात आली.

ज्या ठिकाणी मेट्रोची कामे झाली आहेत तेथे रस्ता पूर्ववत करण्यासाठी मेट्रोने कामे सुरु केली आहेत. बोपोडी येथे एल्फिस्टन रस्ता ते MSEB चौक आणिएल्फिस्टन रस्ता ते रेल्वे क्रॉसिंग येथील रस्ता पूर्णपणे डांबरीकरण करण्यात आला आहे. तसेच खडकी येथील खडकी पोलीस स्टेशन ते रेल्वे अंडरपासआणि रेल्वे अंडरपास ते साई मंदिर चौक येथे रस्त्याचे डांबरीकरण करण्यातआले आहे. RTO ते रामवाडी या भागामध्ये कल्याणी नगर, बंडगार्डन, पुणेस्टेशन येथे देखील डांबरीकरण करण्याची कामे करण्यात आली आहे. डांबरीकरण करताना मॅनहोलची दुरुस्ती करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त जसेजसे मेट्रोचे काम संपेल तसे बॅरिकेड हटवून रस्ता पूर्ववत करण्यात येईल वरस्त्याची कामे हाती घेण्यात येतील.

संबधीत प्रकल्पाच्या अभियंत्यांना मेट्रोचे काम संपलेल्या ठिकाणी बॅरिकेडहटवणे किंवा बॅरिकेडमधील रुंदी कमी करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

मेट्रोच्या उन्नत मार्गाचे काम चालू असताना रस्ता दुभाजकाच्या दोन्ही बाजूलालोखंडी बॅरिकेड सुरक्षिततेच्या दृष्ट्टीने लावावे लागतात. अश्या रस्त्यांवरवाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी मेट्रोने २०१७ सालापासून ट्रॅफिकवॉर्डनची नेमणूक केली आहे. हे ट्रॅफिक वॉर्डन वाहतूक पोलिसांना मदत करून वाहतुकीचे नियोजन करतात. आजमितीस मेट्रोने २७२ ट्रॅफिक वॉर्डन शहराच्या विविध भागात मेट्रोचे काम सुरु असणाऱ्या ठिकाणी तैनात ठेवले आहेत. सध्याहे ट्रॅफिक वॉर्डन फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट, गरवारे ते सिव्हिल कोर्ट आणि RTO ते रामवाडी येथे वाहतूक पोलिसांना मदत करण्याचे काम करीत आहेत. याव्यतिरिक्त मेट्रोने या मार्गांवर जलद कृती दल (क्विक रिस्पॉन्स टीम) तैनात केली आहे. जलद कृती दल या मेट्रोचे काम सुरु असणाऱ्या रस्त्यांवर कोणतीहीदुर्घटना झाल्यास त्वरित मदतीसाठी पोहचते. तसेच या भागांत वाहतूकवाढल्यास वाढीव कुमक म्हणून वाहतूक पोलिसांना मदत करत आहे.

नुकतेच मेट्रोने फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट या उन्नत मार्गावरील व्हायडकतचे कामपूर्ण केले आहे. त्यामुळे या मार्गावरील लोखंडी बॅरिकेड काढण्यात आले आहेत. मेट्रोने वेळोवेळी जेथे जेथे उन्नत मार्गाचे काम किंवा स्थानकाचे काम संपले आहेतेथे तेथे बॅरिकेड काढून रास्ता पूर्ववत करून वाहतूकीसाठी खुला केला आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होत आहे.

याव्यतिरिक्त मेट्रोने रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी खालीलप्रमाणेउपाययोजना केल्या आहेत –

१. मेट्रो मार्गातल्या रस्त्यांची डागडुजी, तसेच पादचारी मार्ग, ड्रेनेजची झाकणे इत्यादींची नियमित दुरुस्ती, खड्डे बुजवणे, दुभाजकांची कामे यामुळे वाहतूक नियोजनात मदत होत आहे.

२. मेट्रो काम करत असलेल्या रस्त्यांवर बॅरिकेड लावून मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आला. त्याव्यतिरिक्त वाहतूक सूचना, मार्गावरील सूचना, रिफ्लेक्टर, रात्रीचे दिवे, सोलर विजेवर चालणारा वाहतूक सूचना फलकइत्यादी कामे करण्यात आली आहेत.

३. सध्या मेट्रो बंडगार्डन रस्ता, खडकी, कल्याणी नगर, इत्यादी ठिकाणी नवीनरस्ते बनविण्याचे काम करत आहे. या मार्गिकांमधील पादचारी मार्ग देखील पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे.

४. मेट्रोने कामासाठी जेंव्हा जेंव्हा रस्ता वळविला आहे, तेंव्हा स्थानिक वाहतूकपोलीसांशी सल्ला-मसलत करून रीतसर परवानगी घेऊन हि सर्व कामे केलीआहेत. तसेच रस्ता वळविताना पूर्व सूचना वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्थानिकलोकांपर्यंत पोहचविली आहे. रस्ता वाळविण्या आधी दुरुस्त केला आहे. त्यामुळे वाळविलेल्या मार्गावर वाहतूक नियोजनात मदत होणार आहे.

५. मेट्रोचे काम चालू असलेल्या रस्त्यांवर सहयोग केंद्र व माहिती केंद्रउभारण्यात आले आहेत. यांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या समस्या मेट्रो प्रशासनाकडे पोहोचविण्यास मदत होत आहे. मेट्रोच्या टोल फ्री क्रमांकाचीमाहिती शहरभर मेट्रोच्या सर्व बॅरिकेडवरील पोस्टरवर प्रदर्शित करण्यात आली आहे. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या समाजमाध्यमांमध्ये येणाऱ्या वाहतूकविषयी सूचनांवर त्वरित कार्यवाही करण्यात येत आहे.

६. मेट्रो संवाद या माध्यमातून स्थानिक गृहनिर्माण सोसायटींद्वारे जास्तीत जास्तलोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न मेट्रो करीत आहे. लोकांकडून प्राप्त झालेल्यासूचनांवर त्वरित कार्यवाही करण्यात येत आहे.

 

Pune Metro | पुणे मेट्रोचे ई-तिकीट आता व्हॉट्सअँप वर उपलब्ध

Categories
Breaking News social पुणे लाइफस्टाइल

पुणे मेट्रोचे ई-तिकीट आता व्हॉट्सअँप वर उपलब्ध

पुणे मेट्रोचे काम शहरामध्ये प्रगतीपथावर आहे. मेट्रो लवकरच नवीन मार्ग प्रवासासाठी सुरु करणार असल्याने मेट्रोने प्रवाश्यांच्या सोयीसाठी तिकीट व्हॉट्सअँप वर उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक नागरिक व्हॉट्सअँपचा मोठ्याप्रमाणावर उपयोग करत असतो. तरुणाई या ऑनलाईन साधनांचा वापर सहज करत असते. त्यासाठी पुणे मेट्रोने प्रवाश्यांना तिकिटाच्या रांगेत उभे राहायला लागू नये आणि त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी व्हॉट्सअँप वर तिकीट काढण्याची सोय केली आहे.

व्हॉट्सअँपवर ई-तिकीट काढण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे मेट्रोने प्रत्येक स्थानकात उपलब्ध करून दिलेल्या किऑस्क मशीनच्या साहाय्याने प्रवासी स्वतः हे तिकीट काढू शकतो. तर दुसरी पद्धत म्हणजे स्थानकात जाऊन टॉम (TOM) ऑपरेटरशी संपर्क साधून आपल्याला हे ई तिकीट मिळवता येईल.
पहिली पद्धत – किऑस्क मशीनद्वारे
१. स्थानकात गेल्यावर आपल्याला हवा तो मार्ग व मेट्रोची वेळ, तिकिटांची संख्या किऑस्क मशीनवर निवडा
२. त्यानंतर तिकिटाचे पैसे देताना आपल्याला कागदी तिकीट वा ई-तिकीट असा पर्याय विचारेल, त्यातील आपल्याला हवा तो पर्याय निवडा
३. ई-तिकीट असा पर्याय निवडल्यावर आलेला स्कॅनर (QR कोड) आपल्या मोबाईलद्वारे स्कॅन करा
५. स्कॅन केल्यावर आपल्या व्हॉट्सअँप वर क्रमांकावर OTP येईल
६. हा OTP किऑस्क मशीनमध्ये टाईप करा
७. OTP मान्य झाल्यावर आपल्याला मोबाईल वर एक लिंक मिळेल
८. या लिंक वर क्लिक केल्यावर आपल्याला आपले ई-तिकीट दिसेल
दुसरी पद्धत – TOM काउंटर/टॉम (TOM) ऑपरेटरशी संपर्क साधून
१. स्थानकात गेल्यावर आपल्याला हवा तो मार्ग व मेट्रोची वेळ निवडा
२. त्यानंतर तिकिटाचे पैसे देताना टॉम (TOM) ऑपरेटर आपल्याला कागदी तिकीट वा ई-तिकीट असा पर्याय विचारेल
३. आपण टॉम (TOM) ऑपरेटरला ई-तिकीट असा पर्याय सांगितल्यावर तो आपणास काउंटरवर लावण्यात आलेला
स्कॅनर (QR कोड) देईल
४. TOM काउंटरवर लावण्यात आलेला स्कॅनर (QR कोड) आपल्या मोबाईलद्वारे स्कॅन करा.
५. स्कॅन केल्यावर आपल्या व्हॉट्सअँप वर क्रमांकावर OTP येईल
६. हा OTP टॉम (TOM) ऑपरेटरला सांगा
७. OTP मान्य झाल्यावर आपल्याला मोबाईल वर एक लिंक मिळेल
८. या लिंक वर क्लिक केल्यावर आपल्याला आपले ई-तिकीट दिसेल

याव्यतिरिक्त पुणे मेट्रोने ९४२०१०१९९० हा व्हॉट्सअँप सुरु केला आहे. दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची आपल्या मोबाईलमध्ये हा नं सेव्ह करून ठेवावा. प्रवासी पुणे मेट्रोच्या या फोन नंबर वर 'हाय' मेसेज पाठवून चॅटबॉटशी संवाद साधण्यासाठी किंवा कोणत्याही मेट्रो स्टेशनवर उपलब्ध QR कोड स्कॅन करून व्हॉट्सअॅप चॅट सुरू करू शकतात.
सध्या, व्हॉट्सअॅपद्वारे QR कोड ई-तिकीट TOM काउंटर आणि डिजिटल किओस्क मशीनद्वारे वितरित केले जाते. लवकरच प्रवासी व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे तिकिटे बुक करू शकतील आणि व्हॉट्सअॅप वापरकर्ते त्यांच्या तिकिटांसाठी पेमेंट करू शकतील. व्हॉट्सअॅपवर त्यांचा प्रवास तपशील निवडल्यानंतर एकात्मिक पेमेंट पार्टनरद्वारे रिचार्ज करू शकतील.

ही सुविधा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असेल. हि सुविधा प्रवाश्यांसाठी लागू करताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हंटले आहे की, पुणे मेट्रोच्या नवीन व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुविधेमुळे प्रवाशांना सुलभ आणि त्रासमुक्त प्रवास उपलब्ध होणार आहे. ही नवीन
तिकीट प्रणाली नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी खूप मदत करेल आणि हे एक पर्यावरणास अनुकूल पेपरलेस तिकीट समाधान देखील आहे. पुणे मेट्रो पुण्यातील नागरिकांना आणि अभ्यागतांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास देण्यावर विश्वास ठेवते. पुणे मेट्रोने लोकांना व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा वापरण्याचे आवाहन केले आहे.

Rehabilitation | Pune Metro | PMC | मेट्रो बाधित कुटुंबाचे पुनर्वसन झाशीची राणी शाळेत!   | महामेट्रोला 30 वर्षासाठी शाळा दिली जाणार भाड्याने 

Categories
Breaking News PMC social पुणे

मेट्रो बाधित कुटुंबाचे पुनर्वसन झाशीची राणी शाळेत!

| महामेट्रोला 30 वर्षासाठी शाळा दिली जाणार भाड्याने

पुणे | पुणे शहरात राबविण्यात येणाऱ्या पुणे महामेट्रो प्रकल्पांतर्गत महात्मा फुले मंडई येथील भुयारी मेट्रो  स्टेशनच्या कामामुळे बाधित होणाऱ्या लंके वाडा, शुक्रवार पेठ, सि.स.नं. ९ या जागेतील निवासी कुटुंबाचे पुनर्वसन करणेसाठी पुणे मनपाच्या सदाशिव पेठ येथील कवठे अड्डा किंवा झाशीची राणी शाळेची जागा तात्काळ मंजूर करून जागेचा ताबा पुणे मेट्रो रेल प्रकल्पास हस्तांतरण करण्याची वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यानुसार झाशीची राणी शाळा महामेट्रोला 30 वर्षासाठी भाड्याने दिली जाणार आहे. त्यासाठी 6 कोटीचे प्रीमियम आकारून प्रत्येक वर्षी  1 रुपया भाडे घेतले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मनपा प्रशासनाकडून शहर सुधारणा  समिती समोर ठेवण्यात आला आहे.

समितीच्या प्रस्तावानुसार  महामेट्रोने केलेल्या मागणीच्या अनुषंगाने सदाशिव पेठ येथील कवठे अड्डा आणि झाशीची राणी शाळेच्या जागेची संयुक्त पाहणी करण्यात आलेली आहे. तथापि, सदर ठिकाणी सन २०१७ च्या मान्य विकास आराखड्यानुसार अनुक्रमे चिल्ड्रन प्ले-ग्राऊंड (सी.पी.जी) आणि पब्लिक-सेमी पब्लिक (पी.एस.पी. झोन) दर्शविले आहेत. सदर जागेवर पुणे मनपामार्फत क्रिडा संकुल आणि झाशीची राणी शाळा उभारण्यात आली आहे. सदर दोन्ही जागा हस्तांतरीत करण्यासाठी स्थानिक नागरीक व सभासद यांनी विरोध दर्शविला आहे. तसेच, सी.पी.जी आरक्षणाच्या जागेबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. तथापि,  महापालिका आयुक्त यांच्या समवेत वेळोवेळी झालेल्या बैठकिच्या अनुषंगाने सदाशिव पेठ सि.स.नं. ७८९ झाशीची राणी शाळेची जागा उपलब्ध करून देणेबाबतचा निर्णय झालेला आहे.

सदाशिव पेठ सि.स.नं. ७८९ झाशीची राणी शाळा ही पब्लिक-सेमी पब्लिक (पी.एस.पी.झोन) दर्शविण्यात आली असून पी.एस.पी. झोनमधील सर्व वापर अनुज्ञेय असलेबाबत कळविले आहे. त्यामुळे सदर ठिकाणी निवासी इमारत उभारणेसाठी आरक्षण बदल अथवा जागा वापर बदल करणे बंधनकारक होणार आहे. खात्याकडील उपलब्ध रेकॉर्डनुसार सदर जागा ही मुलींची शाळा क्र. ४ या करीता दि. १३/०५/१९२१ रोजी तडजोडीने पुणे मनपाच्या ताब्यात आल्याचे दिसून येत आहे. मिळकतपत्रिकेनुसार जागेचे क्षेत्रफळ हे १५२२.६० चौ.मी इतके आहे. सदर जागेमधील काही क्षेत्र हे रस्तारूंदीमध्ये गेले आहे. तथापी, महामेट्रोने जागेची मोजणी करून त्याची प्रत या विभागास सादर केलेली आहे. त्यानुसार जागेवर सुमारे १२३४.८५ चौ.मी इतके क्षेत्रफळ आहे. सन २०२२-२३ च्या शिघ्रसिध्दगणकानुसार जागेची किंमत ही
र.रू.६,६२,९९,०९७/-इतकी होत आहे.

 शाळेची संपूर्ण इमारत ही सद्यस्थितीत कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाच्या ताब्यात असून सदर ठिकाणी त्यांचे कामकाज चालू आहे. तसेच, पुढील मोकळ्या जागेमध्ये अतिक्रमण विभागाने कारवाई केलेल्या हातगाड्या तसेच, इतर साहित्य ठेवण्यासाठी वापरत असल्याचे निदर्शनास येते. दुमजली इमारत ही दगडी असून सुस्थितीत आहे. जागेची चालू बाजारभावानुसार होणारी जागेची किंमत र.रु. ६२,९९,०९७/- मेट्रोकडून वसूल करण्यात यावी व सदर जागेवरील आरक्षण बदल करण्याची कार्यवाही ही मेट्रोने स्वतः करून सद्यस्थितीत शाळेच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या कार्यालयांची पर्यायी व्यवस्था ही मेट्रोने करावी असे ठरले आहे. मेट्रोच्या कामकाजाकरीता झाशीची राणी शाळेची जागा तात्काळ रिकामी करून मेट्रोसाठी दिर्घ कालावधीकरीता हस्तांतरीत करावी लागणार आहे. त्यानुसार  झाशीची राणी शाळेची सुमारे १२३४.८५ चौ.मी जागेचा ताबा प्रिमियम रक्कम रू.६,६२,९९,०९७/- इतकी महामेट्रोकडून आकारून ३० वर्षे कालावधीकरीता पुणे मनपाच्या स्वामित्वापोटी दरवर्षी र.रू.१/- या दराने महामेट्रोस हस्तांतरीत केली जाईल.

Pune Metro | पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते रेंजहील स्थानक या उन्नत मार्गिकेवरील शेवटच्या सेगमेंटची उभारणी

Categories
Breaking News social पुणे

पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते रेंजहील स्थानक या उन्नत मार्गिकेवरील शेवटच्या सेगमेंटची उभारणी

पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते रेंजहील स्थानक हा १२ किमीचा मार्ग उन्नत असून उर्वरित मार्ग भूमिगत आहे. या १२ किमी उन्नत मार्गाच्या शेवटच्या सेगमेंटची उभारणी आज पूर्ण करण्यात आली. त्यामुळे फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावर लवकरच मेट्रो धावण्याची चाचणी घेणे शक्य होणार आहे. चाचणीनंतर फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक हा मार्ग प्रवाश्यांसाठी खुला करण्यात
येईल.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते रेंजहील स्थानक या १२.०६४ किमी उन्नत मार्गासाठी एकूण ३९३४ सेगमेंट बनविण्यात आले होते. या सेगमेंटद्वारे ४५१ स्पॅन उभारण्यात आले व १२.०६४ किमीचा उन्नत मार्ग बनविण्यात आला. या मार्गावर पहिला मेट्रोचा खांब दिनांक ७/१०/२०१७ रोजी बांधण्यात आला. नाशिक फाटा येथे भव्य कास्टिंग यार्डची उभारणी करण्यात आली. ज्यात ३९३४ सेगमेंट बनविण्यात आले. या मार्गिकेसाठी लागणारा पहिला सेगमेंट दिनांक २९/८/२०१७ रोजी बनविण्यात आला व शेवटचा सेगमेंट १९/१०/२०२२ रोजी बनविण्यात आला. तसेच या मार्गावर पहिला सेगमेंट १४/१२/२०१७ रोजी पिअर नं. ३४८-३४९ यामधील स्पॅनसाठी उभारण्यात आला. या सुरुवातीचा आज शेवटच्या टप्प्यात पिअर नं. १४९-१५० मधील स्पॅनसाठी शेवटचा (३९३४ वा) सेगमेंट उभारण्यात आला. अश्याप्रकारे संपूर्ण १२.०६४ किमी उन्नत मार्गाचे व्हायाडक्तचे काम आज पूर्ण झाले.

या १२.०६४ किमीच्या उन्नत मार्ग पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींवर मात करण्यात आली. सर्वात मोठी अडचण सैन्यदलाकडून हॅरिस पूल ते खडकी येथील जागा मिळवणे हि होती. त्यासाठी सैन्यदलाकडे निरंतर पाठपुरावा करून जुलै २०२२ मध्ये मेट्रो उभारणीस जागा देण्यात आली. सैन्यदलाकडून या मार्गास जमीन मिळण्यास विलंब झाला तरी देखील मेट्रोने काम न थांबवता रेंजहील स्थानक ते खडकी आणि फुगेवाडी स्थानक ते हॅरिस पूल या टप्प्याची कामे चालू ठेवली आणि वेळेत पूर्णत्वास नेली. आजच्या शेवटच्या सेगमेंटची उभारणी केल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते हॅरिस पूल आणि रेंजहील स्थानक ते खडकी यामधील गॅप भरण्यात येऊन व्हायाडक्तचे काम पूर्णत्वास येत आहे. कोरोना काळात सर्वच मोठे प्रकल्प ठप्प पडले आणि त्याचा फटका महामेट्रोलाही बसला. या भागामध्ये वाहतूक नियमन हि अत्यंत्य गुंतागुंतीचे होते. संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून खडकी येथील वाहतूक नियमन करण्यात आले
व आपल्या नियोजित वेळेत हे काम पूर्ण करण्यात आले.

फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक व गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावरील कामे ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन मेट्रोने केले आहे. त्याला अनुसरूनच आजच्या शेवटच्या सेगमेंटची उभारणी होत आहे. सैन्यदलाकडील जमीन, कोरोना आणि वाहतूक नियमन इत्यादी अडचणींवर मात करून नियोजित वेळेत या १२.०६४ किमी उन्नत मार्गाचे काम पूर्ण होत
आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०२२ अखेर हे काम पूर्णत्वास घेऊन जाणे शक्य होईल.

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हंटले आहे की, " आजचा दिवस पुणे मेट्रोच्या कामाचा महत्वाचा टप्पा आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते रेंजहील स्थानक या १२.०६४ किमी उन्नत मार्गाच्या व्हायाडक्तचे काम नियोजित वेळात पूर्ण होत आहे. लवकरच फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक व गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हील कोर्ट स्थानक या
मार्गावर मेट्रोच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.

Pune metro rail project | पुणे मेट्रोला निरंतर वीजपुरवठा मिळत राहील असे नियोजन

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

पुणे मेट्रोला निरंतर वीजपुरवठा मिळत राहील असे नियोजन

पुणे मेट्रोसाठी लागणारी वीजपुरवठा (Power Supply & Tration) विषयक कामे पूर्ण

पुणे मेट्रोसाठी जागतिक दर्जाच्या ट्रकशन आणि पॉवर सप्लाय यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणे मेट्रोला निरंतर वीजपुरवठा मिळत राहील असे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

मेट्रो ट्रेन हि विजेवर चालते आणि त्यामुळे हि पर्यावरण पूरक अशी शहरी वाहतूक व्यवस्था आहे. मेट्रो ट्रेन चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विजेची गरज पडते. मेट्रोसाठी विनाव्यत्यय वीजपुरवठा संबंधी संरचनात्मक कामे करणे हे एक आव्हानात्मक काम आहे. येत्या काही काळात मोठ्याप्रमाणावर प्रवासी मेट्रोने प्रवास करतील त्यामुळे सतरा ते आठरा तास मेट्रो सेवेसाठी निरंतर वीजपुरवठा करणे व त्यासंबंधीच्या उपकारणांची उभारणी करणे हे अत्यंत्य महत्वाचे काम आहे.

नुकतेच पुणेमेट्रोने संपूर्ण ३३ किमी मार्गावर मेट्रो चालवण्यासाठी आवश्यक असलेले वीजपुरवठ्याचे काम पूर्ण केले आहे. निरंतर वीजपुरवठा करण्यासाठी मेट्रोने म.रा.वि.वि.क. (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी) यांच्याकडून तीन ग्रीड मधून वीजपुरवठा घेतला आहे. त्याला रिसीव्हींग सब स्टेशन (RSS) असे म्हणतात. पिंपरी-चिंचवड स्थानक येथील रिसीव्हींग सब स्टेशनसाठी चिंचवड ग्रीड, रेंजहील रिसीव्हींग सब स्टेशनसाठी गणेशखिंड ग्रीड आणि वनाझ रिसीव्हींग सब स्टेशनसाठी पर्वती ग्रीड मधून वीजपुरवठा घेण्यात आला आहे. यासाठी ५ ते ६ किमी लांबीच्या १३३ KV क्षमतेच्या विद्युत केबल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टाकण्यात आल्या आहेत. यामुळे एक ग्रीडमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास दुसऱ्या ग्रीड मधून विद्युत पुरवठा देऊन मेट्रोची सेवा चालू ठेवणे शक्य होणार आहे. रेंजहील येथील रिसीव्हींग सब स्टेशन हे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांना (कॉरिडॉर) एकाचवेळी विद्युत पुरवठा करूशकेल अश्या क्षमतेचे बांधण्यात आले आहे.

प्रत्येक रिसीव्हींग सब स्टेशनमध्ये चार रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) लावण्यात आले असून १३२ kv विद्युत पुरवठ्याचे २५ kv, २५ kv, ३३ kv, ३३ kv अश्या प्रकारे स्टेपडाऊन करण्यात आले आहे. २५ kv वीजपुरवठा हा ट्रॅक्शनसाठी वापरण्यात येतो व त्याची फीड ट्रेनच्या वरील विद्युत तारांमध्ये (OHE) सोडण्यात आली आहे. तर ३३ kv चा विद्युत पुरवठा सर्व मेट्रो स्थानकांना देण्यात आला आहे. त्यासाठी संपूर्ण ३३ किमी मार्गावर ३३ kv क्षमतेच्या विद्युत केबल टाकण्यात आल्या आहेत. प्रत्येक स्थानकात एक ऑग्झ्यालरी सब स्टेशन (ASS) बांधण्यात आलेले आहे. ऑग्झ्यालरी सब स्टेशनद्वारा उद्वाहक (लिफ्ट), सरकते जिने (एस्किलेटर), वातानुकूलित यंत्रणा (AC) आणि स्थानकातील विद्युत यंत्रणा यासाठी हा विद्युत पुरवठा करण्यात येतो.

पुणे मेट्रोने मोठ्या प्रमाणावर सोलर वीजनिर्मीती करण्याचे नियोजित केले आहे. प्रत्येक स्थानकाच्या छतावर आणि इमारतींच्या छतावर सोलर वीजनिर्मिती संच बसविण्यात आले आहेत. याद्वारे ११ मेगा वॅट इतकी सौर वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे. सौर निर्मित ऊर्जेचे इंटिग्रेशन पावर सप्लाय सिस्टमशी करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची बचत होणार आहे.

सर्व रिसीव्हींग सब स्टेशन, ऑग्झ्यालरी सब स्टेशन आणि OHE यांच्या नियंत्रणासाठी SCADA प्रणाली बसविण्यात आली आहे. या SCADA प्रणालीद्वारे संपूर्ण ट्रकशन आणि पॉवर सप्लाय प्रणालीचे नियंत्रण करता येते. SCADA प्रणालीचा मुख्य संगणक हा रेंजहील येथील OCC येथे स्थापित करण्यात आला आहे. OCC येथील डिस्प्ले वर संपूर्ण ट्रकशन आणि पॉवर सप्लायच्या संबंधीची माहिती ऑनलाईन दिसत असते. त्यामुळे त्याचे नियंत्रण करणे सहज शक्य होते.

 

Khadakwasla – Kharadi Metro | खडकवासला – खराडी मेट्रो | साडेआठ हजार कोटींचा खर्च अपेक्षित  | महामेट्रोकडून महापालिकेस प्रारूप आराखडा सादर

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे

खडकवासला – खराडी मेट्रो | साडेआठ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

| महामेट्रोकडून महापालिकेस प्रारूप आराखडा सादर

पुणे : महामेट्रोकडून खडकवासला ते खराडी या 25 किलोमीटर अंतराचा मेट्रोचा प्रारूप प्रकल्प आराखडा महापालिकेस सादर केला आहे. या मार्गासाठी सुमारे 8 हजार 565 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.

खडकवासला ते स्वारगेट- हडपसर आणि खराडी असा हा स्वतंत्र मार्ग असणार असून या मार्गावर 22 स्थानके असणार आहेत. या पूर्वी हा मार्ग मेट्रो आणि पीएमआरडीएकडून संयुक्त करण्यात येणार होता. मात्र, पुम्टाच्या बैठकीत हा स्वतंत्र मार्ग करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार, महामेट्रोने हा डीपीआर तयार केला असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह महामेट्रो आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हा प्रारूप आराखडा असून महापालिका प्रशासनाकडून त्यात, बदल सुचविल्यानंतर अंतिम आराखडा करून राज्यशासन तसेच केंद्रशासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

हा मार्ग खडकवासला-सिंहगड रस्ता- स्वारगेट- शंकरशेठ रस्ता- राम मनोहर लोहिया उद्यान- मुंढवा चौक – खराडी असा असणार आहे. हा संपूर्ण मार्ग इलिव्हेटेड असणार आहे. हा मार्ग मुख्य सिंहगड रस्त्याने सारसबागेच्या समोरून गणेश कलाक्रीडा मंचाच्या समोरून जेधे चौकातून शंकरशेठ रस्त्याने पुढे जाणार आहे. या मार्गावर एकूण 22 स्थानके असणार असून स्थानके तसेच मेट्रो मार्गासाठी जास्तीत जास्त शासकीय जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. या शिवाय, ज्या ठिकाणी रस्त्यांची रूंदी कमी आहे. त्या ठिकाणी रस्त्याच्या वाहतूकीला अडथळा होणार नाही अशा पध्दतीने खांबाची उभारणी केली जाणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

खडकवासला, दालवेवाडी, नांदेडसिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजारामपूल, पु.ल देशपांडे उद्यान, दांडेकरपूल, स्वारगेट, सेव्हन लव्हज चौक, पुणे छावणी, रेसकोर्स, फातिमानगर, रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा साऊथ, मगरपट्टा मेन, मगरपट्टा नॉर्थ, हडपसर रेल्वे स्टेशन, साईनाथ नगर आणि खराडी चौक ही स्थानके असणार आहेत. तर स्वारगेट येथे नेहरू स्टेडीयमच्या समोर स्थानक असणार असून या ठिकाणी येऊन प्रवाशांना स्वारगेट भूमिगत मेट्रोने पिंपरी-चिंचवड तसेच कात्रजकडे जाता येणार आहे, तसेच स्वारगेट येथील मल्टीमॉडेल हबचे पार्किंगच या कामासाठी वापरता येणार आहे.