Contract workers | पुणे मनपा मधील कंत्राटी कामगारांचा एल्गार

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे मनपा मधील कंत्राटी कामगारांचा एल्गार

पुणे :- पुणे महानगरपालिकेमध्ये सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. हे सर्व कंत्राटी कामगार वेगवेगळ्या खात्यांमध्ये विभागांमध्ये व कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सुरक्षारक्षक, वाहन चालक, पाणीपुरवठा, साफसफाई विभाग, स्मशानभूमी कर्मचारी या व इतर अनेक विभागांमध्ये कार्यरत आहेत. या सर्व कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी  पुणे महानगरपालिकेच्या मुख्य गेट समोर इशारा सभेचे आयोजन राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

या सभेला खूप मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगारांनी हजेरी लावली. यावेळी कंत्राटी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. जोरदार पाऊस आला तरी या पावसातही इशारासभा चालूच राहिली. याची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त बिनवडे साहेब यांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांना चर्चेसाठी बोलावले व निवेदन स्वीकारले. यामध्ये या प्रश्नांसाठी लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीमध्ये कंत्राटी कामगारांचे सर्व प्रश्न एकत्रित आपण समन्वयाने सोडू असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या इशारा सभेमध्ये कंत्राटी कामगारांच्या मागण्या पुढील प्रमाणे करण्यात आल्या
1) या दिवाळीला कायम कामगारांप्रमाणेच एक पगार व एकोणीस हजार रुपये बोनस मिळाला पाहिजे.
2) किमान वेतन कायद्यामध्ये जाहीर केलेला फरक फेब्रुवारी 2015 ते एप्रिल 2021 हा मिळाला पाहिजे.
3) कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहतील.
4) कंत्राटी कामगार व कायम कामगार हे समान काम करत असल्यामुळे कंत्राटी कामगारांनाही कायम कामगारांच्या एवढाच पगार मिळाला पाहिजे.
अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या इशारासभेला राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी संबोधित केले. श्री शिंदे यांनी यावेळी कंत्राटी कामगारांच्या वर गुलामासारखी वागणूक पुणे महापालिकेमध्ये मिळत असल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त केला. कधीही कंत्राटी कामगारांचा वेळेवर पगार होत नाही. प्र. फंड व ई एस आय सी चे कार्ड देखील या कंत्राटी कामगारांना मिळत नाही. अनेक वेळा तक्रारी करूनही याची दखल संबंधित अधिकारी घेत नाहीत. याचा निषेध यावेळी व्यक्त केला. जर या कंत्राटी कामगारांचे प्रश्न वेळीच सोडवले गेले नाहीत तर मंगळवार दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी हे सर्व कामगार सकाळी दहा वाजल्यापासून पुणे महानगरपालिकेच्या मुख्य गेटवर निदर्शने आंदोलने करतील व त्यावेळी सर्व कांत्राटी कामगार यामध्ये सहभागी होतील असा इशारा दिला.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, सेक्रेटरी एस के पळसे, पुणे मनपा मधील कंत्राटी सुरक्षा रक्षक, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, स्मशानभूमीचे कर्मचारी, कचरा वाहतूक करणारे वाहन चालक, अशा विविध खात्यातील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Contract workers | PMC pune | कंत्राटी कामगारांची इशारा सभा | राष्ट्रीय मजदूर संघातर्फे आयोजन‌

Categories
Breaking News PMC पुणे

कंत्राटी कामगारांची इशारा सभा

| राष्ट्रीय मजदूर संघातर्फे आयोजन‌

कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचा इशारा देण्यासाठी ” इशारा सभेचे आयोजन‌ ” राष्ट्रीय मजदूर संघातर्फे करण्यात आले आहे. ही सभा दिनांक ३० सप्टेंबर २०२२ वार शुक्रवार रोजी दुपारी २–००ते ६–०० या वेळेमध्ये पुणे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष आणि कामगार नेते  सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे

पुणे महानगरपालिका मध्ये सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार सध्या कार्यरत आहेत. मनपाच्या वेगवेगळ्या खात्यात सुरक्षा रक्षक,वाहन चालक, पाणी पुरवठा, स्मशान भूमी,सफाई कामगार तसेच कार्यालयात लेखनिक अशा अनेक पदांवर कार्यरत आहेत. या दिवाळीला मनपाच्या कायम कामगारांना ८.३३ टक्के बोनस म्हणजेच एक पगार व १९००० रूपये सानुग्रह अनुदान इतकी रक्कम मिळणार आहे.परंतू कंत्राटी कामगारांना काहीच मिळणार नाही हा मोठा अन्याय कंत्राटी कामगारांवर होत आहे.अशा सर्व कंत्राटी कामगारांना कायम कामगारांए्वढाच बोनस व सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे, कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहतील , कंत्राटी कामगारांना कायम कामगारांए्वढाच पगार द्यावा अशा मागण्यांच्या संदर्भात मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचा इशारा देण्यासाठी ” इशारा सभेचे आयोजन‌ ” राष्ट्रीय मजदूर संघातर्फे करण्यात आले आहे. ही सभा दिनांक ३० सप्टेंबर २०२२ वार शुक्रवार रोजी दुपारी २–००ते ६–०० या वेळेमध्ये पुणे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष आणि कामगार नेते  सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे, त्यासाठी जास्तीत जास्त कंत्राटी कामगारांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष श्री सीताराम चव्हाण आणि सेक्रेटरी श्री. एस. के. पळसे यांनी केले आहे

RMS | देश गंभीर संकटात असताना कामगारांनी राजकीय भूमिका घेत सत्ता परिवर्तन करणे गरजेचे | उदित राज

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

देश गंभीर संकटात असताना कामगारांनी राजकीय भूमिका घेत सत्ता परिवर्तन करणे गरजेचे – उदित राज

पुणे| – देशांमधील अनेक मोठ्या संघटना कमजोर झाल्या असताना राष्ट्रीय मजदूर संघासारखी संघटना कामगारांसाठीचा लढा ताकदीने देतेय, वाढतेय हे कौतुकास्पद आहे. हा लढा अजून वाढावा अशा शुभेच्छा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या असंघटित कामगारांचे नेतृत्व करणार्‍या असंघटित कामगार कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार उदित राज यांनी दिल्या. मागील २२ वर्षे अविरतपणे कार्यरत असणार्‍या राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, ‘असंघटित कामगारांची एकूण संख्या देशभरात ४५ कोटींच्या आसपास आहे. नोटबंदी, जीएसटी य़ासारख्या केंद्र सरकारच्या देशविघातक निर्णयांमुळे हा वर्ग पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. यासोबतच महागाई मुळे या वर्गाचे जगणे अधिकच मुश्किल झाले आहे. हा वर्ग गंभीर संकटात असताना दुसरीकडे या देशातील भांडवलदारांच्या संपत्तीमध्ये लॉकडाऊनच्या काळात प्रचंड वाढ झाली आहे. कामगारांना काहीही सुविधा किंवा मदत न देणारे सरकारने या भांडवलदारांचे मात्र लाखो करोडो रूपयांचे कर्ज माफ केलेले आहे. शेतकर्‍यांनी केलेल्या आंदोलनामुळे कामगार कायदे लागू करण्यात आलेले नाहीत कारण सरकार एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढू इच्छित नव्हते. पण हे नवीन कामगार कायदे आल्यानंतर कामगारांचे जे काही हक्क आहेत ते सर्व हक्क संपतील.
देशातील कामगार आणि इतर जनतेला त्यांच्या या मूळ समस्यांवरून भरकटविण्यासाठी हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण केल्या जात आहेत, देशामध्ये धर्मांध वातावरण तयार केल्या जात आहेत. आपल्या हक्कांसाठी लढत असताना कामगारांनी या धर्मांधतेच्या हल्ल्याला वेळीच ओळखून याविरोधात लढा दिला पाहिजे. देशामध्ये हे धर्मांध वातावरण तयार करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रत्येक घरामध्ये दोन कार्यकर्ते आहेत – एक न्यूज चॅनेल आणि दुसरे वर्तमानपत्र. या दोन्हींपासून दूर राहत कामगारांनी आपले प्रश्न सोशल मिडिया मार्फत जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे.

देश हा विपक्ष मुक्त व्हावा असा प्रयत्न केला जात आहेत. महाराष्ट्रामध्ये जे सरकार पाडल्या गेले ते त्याचेच उदाहरण आहेत. विपक्ष मुक्त झाला तर या देशातील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्यासाठी लढण्यासाठी कुणीही शिल्लक राहणार नाही. मुळातच केंद्र सरकार हे लोकशाहीच्या विरोधात आहेत. याचे अजून एक उदाहरण म्हणजे आता मंत्री, खासदार यांना काहीही अधिकार राहिलेले नाहीत. सर्व कारभार हुकूमशाही पद्धतीने फक्त प्रधानमंत्री कार्यालयातून चालत असल्याने मंत्र्यांना निवेदन देऊन आता काहीही फायदा हो नाही. कॉंग्रेसच्या काळात विविध मंत्र्यांना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. सर्व सामाजिक संस्था, कामगार संघटना संपविण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहेत. यासोबतचं कामगारांच्या मूलभूत बाबी जसे शिक्षण, पेंशन इ. वरचा खर्च केंद्र सरकार दरवर्षी कमी करत आहेत. अश्या परिस्थितीत जर भाजप सत्तेवर राहिला तर कामगारांना काहीही मिळणार नाहीत. हे सरकार भांडवलदारांना सोडून कुणालाही काहीही देत नाही. अश्या परिस्थितीत कामगारांना त्यांच्या हक्कांसाठी, त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी केंद्रात सत्ता परिवर्तन हाच एक पर्याय आहे. कामगार संघटनांना सुध्दा जिवंत राहायचे असेल तर यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कामगरांचा फक्त आर्थिक स्वार्थ न बघता कामगारांनी व्यापक राजकीय भूमिका घ्यावी यासाठी संघटनांना प्रयत्न करावा लागेल. यामध्येच कामगार वर्गाचे आणि देशाचे ही हित आहे.

राष्ट्रीय मजदूर संघाचा 22 व्या वर्धापन दिनानिमित्त संघटित व असंघटित कामगारांचा मेळावा, कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांचे अध्यक्षतेखाली बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेसचे अध्यक्ष डॉ उदित राज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून आमदार संग्राम थोपटे, कामगार राज्य विमा महामंडळ पुणे प्रदेशाचे उपनिदेशक हेमंत पांडे, प्रदेश काँग्रेस समन्वयक प्रज्ञा वाघमारे, एडवोकेट अभय छाजेड, दीप्ती चौधरी, कमलताई व्यवहारे हे उपस्थित होते.

यावेळी झालेल्या सभेत घरेलू कामगार, बांधकाम मजूर, सुरक्षारक्षक, मनपा मधील कंत्राटी चालक, पाणीपुरवठा कर्मचारी, स्मशानभूमीतील कर्मचारी, कंत्राटी सुरक्षा रक्षक, त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉस्पिटल, कंपन्या, कारखाने येथील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यापूर्वी काँग्रेस भवन ते बालगंधर्व रंगमंदिर, अशी पदयात्रा संघटनांचे बॅनर हातामध्ये घेऊन काढण्यात आली.

या कार्यक्रमात राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी कामगारांच्या व्यथा मांडल्या. पुणे महानगर पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी संग्राम थोपटे यांच्याकडे करण्यात आली. त्याच बरोबर बदलेले कामगार कायदे महाराष्ट्रात लागू करू नये त्यामध्ये कामगार विरोधी निर्णय रद्द करावे अशी मागणी यावेळी केली. कंत्राटी कामगारांना कायम कामगारां एवढे वेतन द्यावे, माथाडी कामगारांना कामगार राज्य विमा महामंडळ चे सर्व फायदे द्यावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. पुणे महानगर पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात तात्काळ आपण पुणे महापालिकेच्या आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे बैठक घेऊ व इतरही कामगारांच्या प्रश्नांबाबत आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी बोलताना दिले ते पुढे म्हणाले राष्ट्रीय मजदूर संघाने विविध क्षेत्रातील कामगारांना न्याय देण्याचे काम केले आहे यापुढेही त्यांनी असेच काम चालू ठेवावे त्यासाठी लागणारी राजकीय शक्ती पूर्णपणे सुनील शिंदे यांच्या पाठीशी उभे करण्याचे काम आमच्याकडून केले जाईल व त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्न हे सोडवण्यासाठी आम्ही अग्रेसर राहू असेही त्यांनी सांगितले व संघटनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कामगार मेळाव्यात हेमंत पांडे यांनीही आपले विचार व्यक्त केले व कामगार राज्य विमा महामंडळ मार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत यावेळी माहिती दिली.
मेळाव्याचे प्रास्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन निता परदेशी यांनी केले व आभार प्रदर्शन एस के पळसे यांनी केले.

Municipal contract workers | मनपा कंत्राटी कामगार गुलाम नाही |  कामगार नेते सुनील शिंदे

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा कंत्राटी कामगार गुलाम नाही |  कामगार नेते सुनील शिंदे

पुणे :- पुणे महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या कंत्राटदारा मार्फत, सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. हे सर्व कंत्राटी कामगार पुणे महापालिकेतील सुरक्षा विभाग, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, वाहन चालक, स्मशान भूमी, वेगवेगळ्या महापालिकेचा आस्थापना, यामध्ये गेली अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. महानगरपालिके मध्ये हे सर्व कामगार गेली दहा ते पंधरा वर्षापासून सलग कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहेत. पुणे शहरात आलेल्या वेगवेगळे आपत्तीमध्ये पूर परिस्थिती, कोरोना महामारी, अतिवृष्टी त्यांनी आपली सेवा व कर्तव्य योग्य बजावले आहे. परंतु त्यांचा व्हावा तेवढा सन्मान मात्र झालेला नाही. आजही या सर्व कामगारांना तात्पुरते कामगार किंवा कंत्राटी कामगार म्हणून हिणवले जाते. गुलामासारखी वागणूक मिळते. ही बाब चीड आणणारी आहे. त्याच बरोबर या सर्व कामगारांना कायम कामगार प्रमाणेच सर्व फायदे व पगार देणे कायद्याने बंधनकारक असून, ते देण्यासाठी, मिळवून घेण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघ कटिबद्ध आहे. असे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी ठणकावून सांगितले.

पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा पत्रकार भवन येथील हॉलमध्ये पार पडला, यावेळी ते बोलत होते. कंत्राटी कामगारांना कायद्याप्रमाणे समान काम समान वेतन हे दिले गेले पाहिजे, त्याच प्रमाणे बोनस व पगारी सुट्ट्या व इतर आर्थिक लाभ हे कायम कामगार प्रमाणेच मिळाले पाहिजे, हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. कारण हे सर्व कामगार कायम कामगारांच्या बरोबरीने काम करीत आहेत. याबाबत कामगार उपायुक्त कार्यालयाने, वेळोवेळी तपासणी करून त्यांचा अहवाल सादर केला आहे.

किमान वेतन कायद्याच्या दरामध्ये 24/ 2 /2015 पासून वाढ झाली. परंतु ही सर्व वाढ या कंत्राटी कामगारांना 16 फेब्रुवारी 2021 पासून लागू करण्यात आली. जवळजवळ सहा वर्ष पगार वाढ होऊनही, या कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही. हा सर्व फरक देणे महापालिकेला बंधनकारक असून, याबाबत कामगार उपायुक्त कार्यालयाने आदेश काढले आहेत. किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतनाचा फरक हा कामगारांचा हक्क असून, तो दिलाच पाहिजे. जर याबाबत सकारात्मक निर्णय महापालिकेने लवकरात लवकर घेतला नाही. तर महापालिकेसमोर मोठे आंदोलन कंत्राटी कामगारांकडून केले जाईल. असे यावेळी सुनील शिंदे यांनी सांगितले. त्याबरोबर ते पुढे म्हणाले की, कंत्राटी कामगार हा तात्पुरता कामगार नाही, कंत्राटी कामगार हा पण कायम कामगारच आहे. त्याला केव्हाही कामावर ये आणि कामावरून काढून टाक, असे करता येणार नाही. ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर असून, या विरुद्धही आपण लढा देत आहोत.

या मेळाव्यामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सेक्रेटरी एस के पळसे त्याच बरोबर कंत्राटी कामगार प्रतिनिधी विजय पांडव, संदीप पाटोळे, बाबा कांबळे, सचिन भालेकर यांनी त्यांच्या विभागातील अडचणी यावेळी बोलताना मांडल्या.
या मेळाव्यामध्ये संजीवन हॉस्पिटल मधील संघटनेच्या अध्यक्ष मेघा वाघमारे व वाडिया कॉलेज युनियनचे सेक्रेटरी संतोष शिंदे यांनी त्यांचे अनुभव कथन केले. या मेळाव्यामध्ये महानगरपालिकेमधील सर्व विभागातील कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Contract workers | PMC | पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करणार  | महापालिका आयुक्तांचे आश्वासन 

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करणार

| महापालिका आयुक्तांचे आश्वासन

पुणे :- महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांचा वेळेवर पगार होत नाही व इतर कायदेशीर बाबींची पूर्तता होत नसल्याबाबत  महानगरपालिकेच्या गेटवर, राष्ट्रीय मजदूर संघातर्फे आंदोलन करण्यात आले.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी तातडीने संघटनेचे पदाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेतली. यामध्ये त्यांनी सांगितले पुणे महानगरपालिकेमध्ये  सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार वेगवेगळ्या खात्यांमध्ये नियुक्ती केली आहेत. या सर्व कंत्राटी कामगारांचे प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहेत. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ऑनलाइन पोर्टल करण्याबाबतच्या सूचना अतिरिक्त आयुक्त यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्व यंत्रणा उभी राहण्यासाठी थोडा कालावधी जाईल. परंतु त्यानंतर मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणारा पगार कंत्राटदाराने कोणत्या तारखेला पगार दिला, कंत्राट दाराने  करावयाचे पी एफ, ई एस आय सी व इतर प्रतिपूर्ती केली आहे किंवा कसे, हे सर्व या ऑनलाईन पोर्टर वर दिसेल व त्यावर त्याक्षणी तातडीने निर्णय घेणे, कारवाई करणे शक्य होईल, असे सांगितले. ज्या कंत्राटी कामगारांना विनाकारण कामावरून काढण्यात आले आहे, त्यांची यादी  संघटनेने सादर करावी, त्यांना न्याय देण्यात येईल असे सांगितले.
पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या इतर सर्व प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी पुणे महापालिकेतील कंत्राटदार, संबंधित अधिकारी व राष्ट्रीय मजदूर संघाचे पदाधिकारी यांची बैठक 24 जून नंतर घेण्याचे आश्वासन यावेळी दिले. राष्ट्रीय मजदूर संघातर्फे संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी कंत्राटी कामगारांचे विविध प्रश्न आयुक्तांसमोर मांडले. यावेळी शिष्टमंडळात मध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सेक्रेटरी सखाराम पळसे, कामगार प्रतिनिधी  विजय पांडव, जानवी दिघे, स्वप्निल कामठे, उमेश कोडीतकर, रमेश भोसले, अरविंद आगम यांचा समावेश होता.

Drivers | कंत्राटी चालकाला कामावरुन कमी करणार नाही

Categories
Breaking News PMC social पुणे

कंत्राटी चालकाला कामावरुन कमी करणार नाही

: महापालिका आयुक्तांचे राष्ट्रीय मजदूर संघाला आश्वासन

 पुणे : महानगरपालिकेतील कंत्राटी चालकांच्या प्रश्नासंदर्भात महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांच्याबरोबर बैठक झाली. कोणत्याही कंत्राटी चालकाला कामावरुन कमी करणार नाही. त्याचप्रमाणे त्यांना पूर्णवेळ काम मिळेल व या सर्व कंत्राटी कामगारांच्या पगार व इतर कायदेशीर मागण्यांबाबत लवकरच बैठक घेऊन योग्य उचित आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले जातील व सर्व कायदेशीर अधिकार या कंत्राटी कामगारांना मिळतील. असे आश्वासन आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले.
यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश दादा बागवे, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, कंत्राटी चालक  प्रतिनिधी, संदीप पाटोळे, चंदन  वंगारी, दिनेश खांडरे, व्यंकटेश दोडला, आकाश शिंदे, अभिजीत वाघमारे, गणेश पवार हे कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी पीएमपीएल मधून महानगरपालिकेमध्ये वर्ग करण्यात आलेल्या चालकांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. पीएमपीएमएल मधून आलेले चालक, पुन्हा पी एम पी एल मध्ये पाठवावेत व पुणे महानगरपालिकेमधील कंत्राटी चालकांच्या नोकरीवर गंडांतर आणू नये. त्यांना त्या ठिकाणी दैनंदिन कामकाज मिळावे अशी मागणी करण्यात आली. त्याच बरोबर इतर कंत्राटी कामगारांचे पगार वेळेवर करावेत, पगार स्लिप मिळावी, कामगार कायद्याच्या अंतर्गत फायदे मिळावेत, या मागण्या करण्यात आल्या.  महापालिकेमध्ये मशानभुमी मध्ये काम करणारे कर्मचारी, पाणीपुरवठा मध्ये काम करणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे कंत्राटी कर्मचारी या सर्वच कंत्राटी कामगारांच्या पगार व इतर कायदेशीर हक्क त्याचबरोबर कामगार कायद्यांमध्ये मिळत असणारे अधिकार हे त्यांना ेण्यात यावेत यासाठी आवश्‍यक व योग्य ती पावले उचलावीत. अशी मागणी विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना कोणत्याही कंत्राटी चालकाला कामावरुन कमी करणार नाही. त्याचप्रमाणे त्यांना पूर्णवेळ काम मिळेल व या सर्व कंत्राटी कामगारांच्या पगार व इतर कायदेशीर मागण्यांबाबत लवकरच बैठक घेऊन योग्य उचित आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले जातील व सर्व कायदेशीर अधिकार या कंत्राटी कामगारांना मिळतील. असे आश्वासन आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले.

Security Guard : RMS : सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केल्यास…… राष्ट्रीय मजदूर संघाने दिला हा इशारा

Categories
Breaking News PMC पुणे

सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केल्यास महापौर कार्यालयात उपोषणाला बसणार

: राष्ट्रीय मजदूर संघाचा इशारा

पुणे : पुणे महापालिकेत विविध आस्थापनात ठेकेदारांमार्फत सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. हे सुरक्षा रक्षक साधारणतः १० ते १५ वर्षापासून कार्यरत आहेत. या सुरक्षा रक्षकांना कामगार कायद्यानुसार मिळणारे हक्क अधिकार मिळाले नाहीत. याना वेळेवर पगार देखील मिळत नाही. कपडे, बुट, टॉर्च, बेल्ट, काठी यांना नियमित मिळत नाहीत. सध्या सुरक्षा रक्षकांच्या कामासाठी नविन ठेकेदार नेमण्यात आले आहेत. मात्र या ठेकेदाराचं अधिकारी काही सुरक्षा रक्षकांना कामावर येण्यास मज्जाव करत आहेत. या लोकांना कामावरून कमी केल्यास आयुक्त कार्यालयात, महापौर कार्यालयात व महापौर निवास या ठिकाणी हे सर्व सुरक्षा रक्षक आमरण उपोषणास बसतील. असा इशारा राष्ट्रीय मजदूर संघाच्या सुनील शिंदे यांनी दिला आहे.

: आयुक्तांना पत्र

याबाबत संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यानुसार या सर्व पुर्वी काम करत असलेल्या कोणत्याही सुरक्षा रक्षकांना कामापासून वंचित करू नये असे आपण स्वतः अश्वासन दिले असताना देखील ठेकेदार वय वर्ष ४५ पेक्षा जास्त व शिक्षण आठवी पेक्षा कमी असणाऱ्यांना कामावर येवू नये असे तोंडी आदेश देत आहेत. या कामगारांना कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावून काम केलेले आहे. या एकाही कामगाराला कामावरून कमी केले जाणार नाही. असे अश्वासन  महापौर यांनी दिले आहेत. आपण स्वतः तसेच अतिरिक्त आयुक्त खेमनार साहेब यांनी आदेश देवूनही ठेकेदार व संबधित अधिकारी सुरक्षा रक्षकांवर अन्याय करत आहेत या बाबतीत दोन वेळा सुरक्षा रक्षकांनी आंदोलन ही केलेले आहे. या बाबतीत संबधीत ठेकेदार व आपले अधिकारी यांना आपण सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करू नये असे स्पष्ट निर्देश द्यावेत. या उपर जर या सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केल्यास आपल्या कार्यालयात, महापौर कार्यालयात व महापौर निवास या ठिकाणी हे सर्व सुरक्षा रक्षक आमरण उपोषणास बसतील या वेळी उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस आपण जबाबदार रहाल. तरी या सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करू नये असे लेखी आदेश आपण संबधिताना द्यावेत.  असे शिंदे यांनी म्हटले आहे.