PMC Pune | ४५ वर्षावरील कामगारांना कामावरून कमी न करण्याचे प्रशासनाचे संकेत! | आयुक्तासमोर सकारात्मक निवेदन ठेवले जाणार

Categories
Breaking News PMC social पुणे

४५ वर्षावरील कामगारांना कामावरून कमी न करण्याचे प्रशासनाचे संकेत!

| आयुक्तासमोर सकारात्मक निवेदन ठेवले जाणार

वर्षानुवर्षे महापालिकेत कंत्राटी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्यांना आता ‘तुम्ही वयाची ४५ वर्षे ओलांडली आहेत. कामावर येऊ नका, घरी बसा’, असे सांगण्यात आले आहे. या आदेशाने महापालिका कामगारांचे धाबे दणाणले होते. मात्र याला जिल्हा सुरक्षा मंडळ सहित राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. त्यामुळे आता या कामगारांना कामावरून कमी न करण्याबाबत महापालिका प्रशासन विचार करत आहे. तसा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवला जाणार  आहे. त्यामुळे या कामगारांना दिलासा मिळणार आहे.

या कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने राष्ट्रीय मजदूर संघाने पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडे याची तक्रार केली. त्यानुसार ४५ वयाच्या अटीवर आक्षेप घेऊन हा निर्णय मागे घ्यावा, असे आदेश दिले आहेत. मंडळाने  महापालिकेला खरमरीत पत्र पाठवून सुरक्षा रक्षकांचे निवृत्तीचे वय ठरविण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत. सुरक्षारक्षकांना कामावरून काढून टाकणे बेकायदा आहे, त्यामुळे त्यांना कामावर घ्यावे, असा आदेश मंडळाचे सचिव श्री. ह. चोभे यांनी दिला होता. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनी देखील याविरोधात आवाज उठवला आहे. सगळीकडून विरोध झाल्यामुळे आता या कामगारांना कामावरून कमी न करण्याबाबत महापालिका प्रशासन विचार करत आहे. सुरक्षा विभागाकडून तसा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवला जाणार  आहे. त्यामुळे या कामगारांना दिलासा मिळणार आहे.

 

Security guards | contract workers | मनपा सुरक्षा रक्षक, कंत्राटी कामगारांवरीलअन्याय सहन करणार नाही | कामगार नेते सुनील शिंदे

Categories
Breaking News PMC social पुणे

मनपा सुरक्षा रक्षक, कंत्राटी कामगारांवरीलअन्याय सहन करणार नाही | कामगार नेते सुनील शिंदे

पुणे:- महानगरपालिकेतील (PMC Pune) कंत्राटी कामगारांवर (Contract workers) होत असलेला अन्याय सहन करणार नाही. असा इशारा आज कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे (RMS president Sunil Shinde) यांनी दिला. ते पुणे महानगरपालिका मधील कंत्राटी कामगारांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते.(Pune Municipal corporation)

ते पुढे म्हणाले की पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना, कायम कामगारां एवढाच बोनस मिळाला पाहिजे. त्याचबरोबर किमान वेतन, वाढीव रकमेच्या फरकाची रक्कम मिळाली पाहिजे. समान कामासाठी समान वेतन मिळालेच पाहिजे, त्याचबरोबर कंत्राटदार बदलला तरी कंत्राटी कामगार तेच राहतील, या मागण्या या मेळाव्यात करण्यात आले. या मेळाव्यामध्ये पुणे महानगरपालिकेतील विविध खात्यांमधील कंत्राटी कामगारांनी आपले प्रश्न, होत असलेला अन्याय, या मेळाव्यामध्ये मांडला यावेळी शिंदे म्हणाले पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही, पगार पावती दिली जात नाही, प्र. फंडाचे रक्कम भरली जात नाही, ईएसआयचे कार्ड दिले जात नाही, शुल्लक कारणावरून कामावरून काढून टाकण्यात येते, अशा अनेक प्रकारे या कामगारांवर अन्याय चालू आहे नुकतेच सुरक्षा रक्षकांची नवीन कंत्राट आले असून या नवीन कंत्राटदारा मार्फत 45 पेक्षा जास्त वयाच्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकण्याचे काम चालू आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे आहे. वास्तविक पाहता कुठेही निवृत्तीचे वय हे 58 ते 60 असताना महापालिकेमधील सुरक्षा रक्षकांचे वयाची अट 45 ठेवण्यात आली आहे. हा या सर्व सुरक्षारक्षक यांच्यावर अन्याय होत आहे. (PMC Pune contract workers)

शिंदे पुढे म्हणाले मनपा मधील कंत्राटी कामगारांना कायम कामगारां एवढंच बोनस देण्याबाबतची चर्चा महापालिकेमधील अधिकाऱ्यांशी चालू असून, त्याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल असे असे शिंदे यांनी यावेळी सांगितले कंत्राटी कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. गरज पडल्यास त्यासाठी आंदोलनाचा मार्ग देखील स्वीकारावा लागेल असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी सुरक्षा रक्षक, वाहन चालक, पाणीपुरवठा विभाग, झाडू खाते, आरोग्य विभाग, स्मशानभूमी अशा विविध ठिकाणी काम करणारे कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये दीप दीप प्रज्वलन करून कामगार नेते सुनील शिंदे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक राष्ट्रीय मजदूर संघाचे सेक्रेटरी एस के पळसे यांनी केले. सिताराम चव्हाण संघटनेचे उपाध्यक्ष यांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले विजय पांडव यांनी सूत्रसंचालन केले. (RMS Sunil Shinde)

PMPML | BRTS | पीएमपीने  बीआरटी बसस्थानकामधील सुरक्षारक्षकांची नियुक्ती थांबवली  | आर्थिक कारणास्तव पीएमपीचा धोरणात्मक निर्णय 

Categories
Breaking News PMC पुणे

पीएमपीने  बीआरटी बसस्थानकामधील सुरक्षारक्षकांची नियुक्ती थांबवली

| आर्थिक कारणास्तव पीएमपीचा धोरणात्मक निर्णय

पुणे |. पुणे महानगरपालिका (PMC Pune) हद्दीमध्ये संगमवाडी ते विश्रांतवाडी, येरवडा ते आपले घर आणि स्वारगेट ते कात्रज या बीआरटी मार्गामध्ये (BRTS Route) परिवहन महामंडळामार्फत (PMPML) बीआरटी बसेसचे संचलन सुरू आहे. या मार्गावर सुरक्षारक्षक (Security Guard) नेमण्यात आले होते. मात्र आर्थिक बोजा सहन होत नसल्याने पीएमपी कडून सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार नाहीत. याबाबतचा धोरणात्मक निर्णय (Policy) पीएमपी कडून घेण्यात आला आहे.
 बीआरटी मार्गामधील बसस्थानकामधील विद्युत उपकरणे, स्वयंचलित दरवाजे, यूपीएस आणि बॅटरी संच यांच्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता परिवहन महामंडळामार्फत तीन शिफ्टमध्ये खाजगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती. तथापि सद्यथितिमध्ये  अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे आदेशानुसार १ डिसेंबर पासून  सर्व बीआरटी बसस्थानकामधील खाजगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती थांबविण्याचा धोरणात्मक
निर्णय घेण्यात आलेला आहे.

Security Guard Issues | मनपा सुरक्षारक्षकांना न्याय देणार |अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा सुरक्षारक्षकांना न्याय देणार |अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार

पुणे :- महानगरपालिकेतील सुरक्षारक्षकांच्या प्रश्‍नांबाबत राष्ट्रीय मजदूर संघाने अनेक तक्रारी केल्या होत्या व आंदोलने केली होती. या सर्वांची दखल घेऊन पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी यासंदर्भात महापालिकेमध्ये बैठक घेतली. सुरक्षारक्षकांनी आपले काम व्यवस्थित पार पाडावे त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत महापालिका संरक्षण करेल. असा विश्वास यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी दिला.

या बैठकीला सुरक्षारक्षक विभागाचे प्रमुख व मनपा उपायुक्त माधव जगताप, कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सेक्रेटरी एस के पळसे, सुरक्षारक्षक प्रतिनिधी विजय पांडव, जानवी दिघे, उज्वल साने, अरविंद आगम स्वप्नील कामठे, उमेश कोडीतकर, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस लिमिटेड या कंत्राटदार कंपनीचे व्यवस्थापक  काळे हे उपस्थित होते.

यावेळी सुरक्षारक्षकांना कधीच वेळेवर पगार मिळत नाही, कामगार कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या विविध सोयी सवलती मिळत नाहीत, ड्रेस, बूट, स्वेटर, काठी, सिटी इत्यादी साहित्य मिळत नाही. किमान वेतन कायद्यामध्ये झालेल्या वाढीच्या दराचा फरक मिळत नाही. कोणतेही कारण न सांगता पगारातून कपात केली जाते, कामावरून काढून टाकण्यात येते, अशा सर्व तक्रारींचा पाढा यावेळी कामगार नेते सुनील शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त  यांच्या समोर वाचला. या सर्व बाबींकडे महापालिकेकडून हेतुपुरस्सर डोळेझाक होत असल्याचा आरोप यावेळी शिंदे यांनी केला.

या सर्व प्रश्नांची गंभीर दखल कुणाल खेमनार यांनी घेतली. वेळेवर पगार करण्यास संदर्भातली व इतर सोयी सवलती व सुरक्षेची साधने देण्यासंबंधी चे आदेश संबंधित कंत्राटदाराला दिले. जर कंत्राटदाराने दिलेले आदेश पाळले नाहीत तर संबंधित कंत्राटदारा वर कडक कारवाई करण्यासंदर्भातले आदेश देण्यात येतील, असे सांगितले. सुरक्षारक्षकांनी आपले काम व्यवस्थित पार पाडावे त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत महापालिका संरक्षण करेल. असे अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितले व कामगार कायद्यामध्ये असणाऱ्या विविध सवलती बाबत कामगार उपायुक्त कार्यालय पुणे यांचे कडून सल्ला घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही खेमनार यांनी या बैठकीत सांगितले.

Securtiy Guard | PMC | पुणे महानगरपालिकेतील सुरक्षारक्षकांची सुरक्षा वाऱ्यावर | सुनील शिंदे

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महानगरपालिकेतील सुरक्षारक्षकांची सुरक्षा वाऱ्यावर | सुनील शिंदे

पुणे – पुणे महानगरपालिकेमध्ये क्रिस्टल कंपनी मार्फत कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सुरक्षा रक्षक पुणे महापालिकेचा विविध आस्थापनांमध्ये दवाखाने, गार्डन, वेगवेगळ्या इमारती, कार्यालय यांची सुरक्षा ठेवण्याचे काम करीत आहेत. परंतु या सर्व सुरक्षा रक्षकांना कामगार कायदा अंतर्गत कोणतेच लाभ मिळत नाहीत. त्यामुळे मोठे आंदोलन करण्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी दिला आहे.

शिंदे म्हणाले, त्याबाबतची तक्रार अनेकदा पुणे महापालिकेकडे करण्यात आली आहे. परंतु अद्याप पर्यंत त्यावर कोणताही तोडगा निघत नाही. या सर्व कर्मचाऱ्यांना तीन-चार महिने पगार उशिराने होत आहे, त्याच प्रमाणे त्यांच्या पगारात कोणतेही कारण न सांगता कपात केली जाते, पगार स्लिप देण्यात येत नाही, अशा अनेक तक्रारी सातत्याने येत आहेत. बऱ्याचदा कोणतेही कारण न सांगता कामावरून काढून टाकले जाते. या तक्रारीसंदर्भात अनेकदा महापालिकेचे आयुक्त संबंधित अधिकारी यांचेकडे पत्रव्यवहार केला आहे परंतु अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे हे सर्व सुरक्षा रक्षक हवालदिल झाले असून त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे व लवकरच मोठे आंदोलन करण्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल असे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले.

Attack on Kirit somaiya in PMC : 33 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बदल्या: 1 निलंबित; तर एकास सक्तीच्या रजेवर पाठवले! 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

33 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बदल्या: 1 निलंबित तर एकास सक्तीच्या रजेवर पाठवले

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांना शिवसेनेकडून(Shivsena) झालेली धक्काबुकी पाहता भाजपने हा विषय खूप गंभीरपणे घेतला होता. याबाबत केंद्रीय पथकाकडून चौकशी झाली. शिवाय महापौर मुरलीधर मोहोळ(Mayor Mulridhar Mohol) यांनी देखील सुरक्षेवर(PMC security)  प्रश्नचिन्ह उभे करत प्रशासनाकडून खुलासा मागितला होता. त्यानुसार प्रशासनाने सुरक्षा कर्मचाऱ्यांना दोषी धरले आहे. त्यानुसार सुरक्षा विभागाने 33 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या(Security personnel) बदल्या केल्या आहेत. एकास निलंबित(suspend) केले असून एकास सक्तीच्या रजेवर(compulsory leave) पाठवण्यात आले आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. 

: महापौरांनी मागितला होता खुलासा!

किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेस भेट देणेकामी आले असता त्यांना पुणे महानगरपालिकेच्या आवारात शिवसैनिकांमार्फत धक्काबुक्की करण्यात आली. सदर बाब ही अत्यंत गंभीर असल्याने या प्रसंगामुळे पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.  किरीट सोमय्या, खासदार यांच्या दौऱ्याबाबत पुणे महानगरपालिकेस अवगत करण्यात आले असतानादेखील योग्य ती सुरक्षा व्यवस्था का करण्यात आली नाही? तसेच शनिवार, दि. ५/२/२०२२ या दिवशी साप्ताहिक सुट्टीचा दिवस असतानादेखील त्या वेळेत उपस्थित शिवसैनिकांस पुणे महानगरपालिकेच्या आवारत प्रवेश कसा मिळाला अथवा कोणी दिला? आपल्या सुरक्षा व्यवस्थेमधील त्रुटीबाबत आपणामार्फत माननीयांस का अवगत करण्यात आले नाही? याबाबत सर्व प्रश्नांचा खुलासा आम्हांस लेखी स्वरुपात तात्काळ कळविण्यात यावा. असा खुलासा महापौरांनी मागितला होता.

: वरिष्ठ अधिकारी दोषी नाहीत का?

महापौरांचा हा आक्रमक बाणा पाहून अतिरिक्त आयुक्तांनी याची गंभीरपणे दखल घेतली होती. त्यानुसार उपायुक्त माधव जगताप यांच्याकडून खुलासा मागितला होता. जगताप यांनी तो खुलासा दिला आहे. दरम्यान या प्रकाराबाबत प्रशासनाने सुरक्षा कर्मचाऱ्यांना दोषी धरले आहे. त्यानुसार सुरक्षा विभागाने 33 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एकास निलंबित केले असून एकास सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
मात्र ही कारवाई अधुरी आहे, असा आरोप करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांसोबत वरिष्ठ अधिकारी दोषी नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

Security Guard : RMS : सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केल्यास…… राष्ट्रीय मजदूर संघाने दिला हा इशारा

Categories
Breaking News PMC पुणे

सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केल्यास महापौर कार्यालयात उपोषणाला बसणार

: राष्ट्रीय मजदूर संघाचा इशारा

पुणे : पुणे महापालिकेत विविध आस्थापनात ठेकेदारांमार्फत सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. हे सुरक्षा रक्षक साधारणतः १० ते १५ वर्षापासून कार्यरत आहेत. या सुरक्षा रक्षकांना कामगार कायद्यानुसार मिळणारे हक्क अधिकार मिळाले नाहीत. याना वेळेवर पगार देखील मिळत नाही. कपडे, बुट, टॉर्च, बेल्ट, काठी यांना नियमित मिळत नाहीत. सध्या सुरक्षा रक्षकांच्या कामासाठी नविन ठेकेदार नेमण्यात आले आहेत. मात्र या ठेकेदाराचं अधिकारी काही सुरक्षा रक्षकांना कामावर येण्यास मज्जाव करत आहेत. या लोकांना कामावरून कमी केल्यास आयुक्त कार्यालयात, महापौर कार्यालयात व महापौर निवास या ठिकाणी हे सर्व सुरक्षा रक्षक आमरण उपोषणास बसतील. असा इशारा राष्ट्रीय मजदूर संघाच्या सुनील शिंदे यांनी दिला आहे.

: आयुक्तांना पत्र

याबाबत संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यानुसार या सर्व पुर्वी काम करत असलेल्या कोणत्याही सुरक्षा रक्षकांना कामापासून वंचित करू नये असे आपण स्वतः अश्वासन दिले असताना देखील ठेकेदार वय वर्ष ४५ पेक्षा जास्त व शिक्षण आठवी पेक्षा कमी असणाऱ्यांना कामावर येवू नये असे तोंडी आदेश देत आहेत. या कामगारांना कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावून काम केलेले आहे. या एकाही कामगाराला कामावरून कमी केले जाणार नाही. असे अश्वासन  महापौर यांनी दिले आहेत. आपण स्वतः तसेच अतिरिक्त आयुक्त खेमनार साहेब यांनी आदेश देवूनही ठेकेदार व संबधित अधिकारी सुरक्षा रक्षकांवर अन्याय करत आहेत या बाबतीत दोन वेळा सुरक्षा रक्षकांनी आंदोलन ही केलेले आहे. या बाबतीत संबधीत ठेकेदार व आपले अधिकारी यांना आपण सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करू नये असे स्पष्ट निर्देश द्यावेत. या उपर जर या सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केल्यास आपल्या कार्यालयात, महापौर कार्यालयात व महापौर निवास या ठिकाणी हे सर्व सुरक्षा रक्षक आमरण उपोषणास बसतील या वेळी उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस आपण जबाबदार रहाल. तरी या सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करू नये असे लेखी आदेश आपण संबधिताना द्यावेत.  असे शिंदे यांनी म्हटले आहे.