Student Accident Sanugrah Grant | पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

Categories
Breaking News Education महाराष्ट्र

पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

 

मुंबई:- इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप या अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून शासनाने सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय 21 जून 2022 रोजी जारी करण्यात आला आहे.

सुधारित योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख 50 हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. अपघातामुळे विद्यार्थ्यांना कायमचे अपंगत्व (दोन अवयव/ दोन डोळे किंवा एक अवयव व एक डोळा निकामी) झाल्यास एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान, अपघातामुळे कायमचे अपंगत्व (एक अवयव किंवा एक डोळा कायम निकामी) आल्यास 75 हजार रुपयांचे अनुदान, विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रूपये अनुदान, विद्यार्थी आजारी पडून सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास एक लाख 50 हजार रूपयांचे अनुदान तसेच विद्यार्थी कोणत्याही कारणाने (क्रीडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेचा धक्का, वीज अंगावर पडून) जखमी झाल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रूपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.

विद्यार्थ्यांच्या सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक/ गट शिक्षणाधिकारी/ शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/ माध्यमिक)/ शिक्षण निरीक्षक यांची असणार आहे. या योजनेमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणे, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अमली पदार्थांच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू, मोटार शर्यतीतील अपघात याबाबींचा समावेश राहणार नाही.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांपैकी विद्यार्थ्याची आई, विद्यार्थ्याची आई हयात नसल्यास वडील किंवा विद्यार्थ्याचे आई-वडील हयात नसल्यास 18 वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहीण किंवा पालक यांना या प्राधान्य क्रमानुसार सानुग्रह अनुदानाची रक्कम अदा केली जाईल.

या योजनेतील प्रस्ताव निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येत आहे. या समितीसमोर इयत्ता पहिली ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींकरिता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची राहील. तर, बृहन्मुंबई शहराकरिता संबंधित शिक्षण निरीक्षक यांनी प्रस्तावांची छाननी करून समितीसमोर सादर करावेत, असे यासंबंधीच्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

Gram Panchayats on Palkhi Marg | पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना नऊ कोटी अनुदान

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना नऊ कोटी अनुदान

| ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई | पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या तसेच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे, असेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. आषाढी पालखी सोहळ्यासाठी देहू येथे १३ ठिकाणी ८०० आणि आळंदी येथे २१ ठिकाणी १००० तात्पुरत्या स्वच्छतागृहांची सुविधा करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आषाढी एकादशी निमित्त पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे  मुश्रीफ यांनी सांगितले.

आषाढी एकादशीच्या निमित्त पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून विविध संतांच्या पालख्या सोबत मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येते. यानुसार पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, असे  मुश्रीफ यांनी सांगितले.

पुणे, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केलेल्या निधीच्या पन्नास टक्के निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित निधी जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा अन्य निधीतून उपलब्ध करावयाचा आहे. हा निधी जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींना मागणीनुसार उपलब्ध करून द्यायचा आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेला ब्याऐंशी लाख रुपये, सातारा जिल्हा परिषदेला वीस लाख पंचवीस हजार रुपये तर सोलापूर जिल्हा परिषदेला एक कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे.

सहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला मंजूर

पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्या सोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता पुरविण्यासाठी भाडेतत्त्वावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असल्याचेही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. एकूण मंजुरीच्या वीस टक्के प्रमाणात म्हणजेच एक कोटी चौतीस लाख चौसष्ठ हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बीडीएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला असल्याची माहितीही श्री. मुश्रीफ यांनी दिली.

Skills Upgrading Policy | कालानुरुप बदलणाऱ्या तंत्रज्ञान, कौशल्यास अनुसरुन राज्याचे “कौशल्य श्रेणीवर्धन धोरण” जाहीर

Categories
Breaking News Education Political महाराष्ट्र

कालानुरुप बदलणाऱ्या तंत्रज्ञान, कौशल्यास अनुसरुन राज्याचे “कौशल्य श्रेणीवर्धन धोरण” जाहीर

– कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञान आणि कौशल्यांमुळे औद्योगिक आस्थापनांना अद्ययावत कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुरवठा होणे गरजेचे आहे. शाश्वत स्वयंरोजगार आणि अद्ययावत कौशल्यपूर्ण रोजगारासाठी आवश्यक असणाऱ्या कालसुसंगत व अद्ययावत कौशल्यवृद्धीकरिता “कौशल्य श्रेणी वर्धन” धोरण राज्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी काल शासन निर्णय निर्गमित करून राज्याचे कौशल्य श्रेणीवर्धन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मंत्री टोपे म्हणाले की, रोजगार निर्मिती हे कोणत्याही देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे सूचक, दर्शक असते. आज जागतिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाच्या उदयामुळे रोजगाराचे स्वरूप कालानुरुप बदलत आहे. जागतिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाच्या युगात बहुतांश क्षेत्रांमध्ये स्वयंचलन (Automation) होत आहे. रोजगाराच्या विविध क्षेत्रातील या बदलत्या गतिशिलतेचा वेग लक्षात घेता सध्या अस्तित्वात असणाऱ्या रोजगारासंबंधीच्या कौशल्य अभ्यासक्रम/जॉब रोल्सची मागणी कमी होवू शकते अथवा संपुष्टात येऊ शकते. यानुषंगाने रोजगार विकसनशीलतेच्या प्रक्रियेमध्ये अनुकुलता सुनिश्चित करण्यासाठी मागणी असलेल्या क्षेत्रातील कौशल्यांच्या श्रेणीसुधारणीमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. कौशल्य प्रशिक्षण अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला व्यापकपणे “कौशल्य वर्धन” (Upskilling) म्हणून ओळखले जाते. या अनुषंगाने राज्यात कौशल्य वर्धनाला चालना देण्यासाठी धोरण जाहीर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

या धोरणामध्ये विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. अद्ययावत कौशल्य (Fresh Skilling) म्हणजे एखादे नवीन कौशल्य प्रशिक्षण ग्रहण करून त्याद्वारे रोजगारक्षम बनण्याची प्रक्रिया याला चालना देण्यात येणार आहे. कौशल्य वर्धन (Upskilling) या घटकाअंतर्गत अल्पकालीन लक्षित प्रशिक्षणावर भर देण्यात येईल. यामध्ये सामान्यत: प्रारंभिक कौशल्य प्रशिक्षणानंतर त्याच क्षेत्रातील प्राप्त ज्ञान व क्षमताकुशलता यांना सुधारित किंवा अद्यायावत करण्याची प्रकिया तसेच प्राप्त कौशल्याचा स्तर वाढविणे व तो अधिक प्रगत करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. पुर्नकुशलता (Reskilling) या घटकांतर्गत प्रारंभिक कौशल्य प्रशिक्षणानंतर औद्योगिक आस्थापना किंवा बाजारपेठेतील मागणीनुसार इतर क्षेत्रातील नवीन कौशल्य प्रशिक्षण प्राप्त करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल.

तांत्रिक प्रगती आणि आधुनिकीकरणामुळे औद्योगिक आस्थापनाच्या
बदलत्या गरजांनुसार कुशल मनुष्यबळाच्या मागणीचा कौशल्य वर्धनाद्वारे पुरवठा करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. राज्यातील औद्योगिक उपक्रमांमधे 18 ते 45 वर्षे वयोगटातील मोठा युवा वर्ग कार्यरत आहे, ज्यांच्याकडे काही मूलभूत कौशल्ये आहेत परंतु त्यांची विद्यमान कौशल्ये सुधारण्याची आवश्यकता आहे. अशा युवा वर्गास प्रशिक्षित करणे हे कौशल्य वर्धन धोरणाचे उद्दिष्ट आहे, असे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

मंत्री टोपे म्हणाले की, दीर्घकालीन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी संधी प्रदान करणे तसेच उद्योग व नियोक्त्यांसोबत (मालकासोबत) भागीदारी वाढविणे हा राष्ट्रीय कौशल्य योग्यता आराखड्याच्या (National Skill Qualification Framework – NSQF) मुख्य घटकांपैकी एक घटक आहे. कौशल्य श्रेणी सुधारीत करण्यासाठी आणि उद्योगाच्या मागणीनुसार दीर्घकालीन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी “कौशल्य वर्धन” ही एक अविभाज्य प्रक्रिया आहे. NSQF हे देशातील कौशल्य विकासाच्या प्रयत्नांना अद्ययावत ठेवण्यासाठी आणि उद्योगाच्या आवश्यकतांनुसार एक प्रमाणित अभ्यासक्रम व दृष्टिकोण तयार करण्यासाठी मदत करेल.

राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेने (NSDC) मे 2021 मध्ये कौशल्य प्राधान्य निर्देशांक अहवाल प्रकाशित केलेला आहे. या अहवालानुसार विस्तृत कौशल्य विकास उपक्रमांच्या गरजेसंदर्भात महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावरील मोठे संबंधित राज्य आहे. याअनुषंगाने राज्याने आता निश्चित केलेले कौशल्य वर्धन धोरण हे कौशल्य विकासातील मध्यस्थ म्हणून पुढील वाटचालीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे, असे मंत्री टोपे यांनी सांगितले.

Shivswarajya Day | 6 जून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार | राज्य सरकारचा निर्णय

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

6 जून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार

| राज्य सरकारचा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर झाला होता. यामुळे राज्यात सोमवारी (ता. ६) ‘शिवस्वराज्य दिन’ (Shivswarajya Day) साजरा करण्यात येणार आहे. सोमवारी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करतील.

६ जून म्हणजे शिवराज्यभिषेक दिन (Shivswarajya Day). या दिनालाच राज्य सरकारने ‘शिवस्वराज्य दिन’ असे नाव दिले आहे. शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन. या दिवशी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सरकारने (State Government) केले आहे. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.राज्यात ६ जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांना सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत.

Mask | Rajesh Tope | गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन; सक्ती नाही  | आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण 

Categories
Breaking News Political social आरोग्य महाराष्ट्र

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन; सक्ती नाही

: आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण

राज्यात काही भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मास्क सक्ती करण्यात आल्याचं वृत्त दिलं होत. पण कोणत्याही प्रकारे मास्क सक्ती करण्यात आलेली नाही. मास्क वापरण्याचं केवळ आवाहन करण्यात आलं आहे, असं स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे (health minister Rajesh Tope) यांनी दिलं आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आरोग्य सचिवांनी काढलेल्या पत्रकामध्ये मास्क घालणं हे मस्ट (Must) असं म्हटलं आल्यानं राज्यात मास्कसक्ती करण्यात आल्याचा सर्वांचा समज झाला. पण हा मस्ट शब्द सक्ती असा न वाचता केवळ मास्क वापरण्याचं आवाहन असा वाचून मीडियानं लोकांना सांगावं. त्यामुळं मास्क नसल्यास कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.टोपे म्हणाले, आपल्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये मुंबई, पुणे, पालघर आणि रायगड, ठाणे आहे. यामध्ये जी संख्या वाढत आहे. त्या संख्येमुळं केंद्रीय आरोग्य विभागानं आम्हाला एक पत्र पाठवलं की या जिल्ह्यांपुरत्या तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतील. याबाबतीत परवा टास्कफोर्सच्या बैठकीत हे ठरलं, आपण मास्क वापरण्याचं आवाहन करावं ते सक्तीचं असू नये. त्यामुळं दहा पंधरा दिवस जी वाढ दिसून येत आहे, त्यानुसार बंद ठिकाणं जसं की बसेस, रेल्वे, शाळा, कार्यालये असतील तिथं मास्क वापरावं. खुल्या ठिकाणी त्याला शिथिलता असली तरी हरकत नाही. त्याला जोडून लसीकरण करा, बूस्टर डोस घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्वात महत्वाचं म्हणजे टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्यावतीनं महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.डिग्री नसलेल्या कथीत डॉक्टरांवर कडक कारवाई होणारडिग्री नसलेले, लायसन्स नसलेले जे लोक वैद्यकीय व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर कडक आणि सक्तीनं कारवाईच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अशा लोकांवर फौजदारी कारवाया झाल्या पाहिजेत असंही त्यांना सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात मी गृहमंत्र्यांनाही विनंती करणार आहे.

Smart city : मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेचा पंचनामा व्हावा

Categories
Breaking News Political पुणे

मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेचा पंचनामा व्हावा

: माजी आमदार मोहन जोशी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे ; पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून पुण्यात करण्यात आलेल्या कामांची चौकशी व्हावी आणि संपूर्ण योजनेचा पंचनामा करून पुणेकरांपुढे मांडावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी मुख्य मंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण मिशन ( जेएनएनयूआरएम )द्वारे पुणे शहरात१ हजार५०० कोटींहून आणि विकास कामे झाली, मनमोहन सिंग सरकारची ही उपयुक्त योजना बंद पाडून मोदी सरकारने स्मार्ट सिटी आदी फसव्या योजना आणल्या.पंतप्रधान मोदी यांनी मोठा गाजावाजा करून स्मार्ट सिटी योजनेचे उदघाटन पुण्यात केले. त्यानंतर गेल्या सहा वर्षात पुण्यासह देशभरातील १०० शहरांमध्ये योजना अपयशी ठरली आहे. याकरिता या योजनेच्या यशापयशाचा पंचनामा होणे गरजेचे आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

स्मार्ट सिटी योजनेचा पहिला टप्पाही पुण्यात यशस्वी झालेला नाही. मात्र, या योजनेसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे महापालिका आणि खासदार निधीतून कामे करण्यात आलेली आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी पुणे महापालिका आणि खासदार निधीचा वापर करण्यात आला आहे. त्याचा विनियोग कसा करण्यात आला? त्यातून कोणती कामे झाली? या सर्वाची चौकशी होणे गरजेचे आहे. पुणेकरांसाठी ही योजना फसवी ठरलेली आहे. योजना अपयशी ठरत असल्याचे जाणवल्यावर केंद्र सरकारने ही योजना गुंडाळण्याचा प्रयत्न केला होता. त्याविरोधात काँग्रेसने आवाज उठवला होता. सध.या या योजनेला मुदतवाढ दिलेली असून घाईघाईने कामे उरकण्यात येत आहेत. एका फसव्या योजनेसाठी खर्च झालेल्या जनतेच्या पैशाचा पंचनामा व्हायला हवा आणि अनाठायी खर्च रोखला जायला हवा, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ५ निर्णय 

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ५ निर्णय

राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत महत्वाचे पाच निर्णय घेण्यात आले आहेत.

वित्त विभाग

वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी आधार कार्डशी जोडणार

राज्य शासनाचे विविध लाभ, सवलती व शिष्यवृत्तीच्या योजना राबवितांना राज्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून सर्व लाभार्थींची नावे 30 डिसेंबर 2022 पर्यंत आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रीया अनिवार्य करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या संदर्भात राज्याच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पीय भाषणात या योजना लाभार्थींच्या आधार क्रमांकाशी जोडण्यात येतील असे नमूद करण्यात आले होते. पोषण आहार योजनेंतर्गत महिला व बालविकास, शालेय शिक्षण, सामाजिक न्याय, आदिवासी आणि इतर बहुजन कल्याण विभागांनी पोषण आहाराशी संबंधित सर्व लाभार्थींची नावे आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रीया पूर्ण करायची आहे. सर्व संबंधित विभागाच्या सचिवांनी आपल्या शिक्षक तसेच विद्यार्थी, लाभार्थी यांचा डेटाबेस तयार करताना आधारशी संलग्न करून कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. ज्या विभागांमध्ये पोषण आहार व तत्सम बाबींचा धान्य पुरवठा होत असतो त्याकरीता वाहनांच्या जीपीएस ट्रॅकींग व्यवस्था 30 डिसेंबर, 2022 पर्यंत कार्यान्वित करण्यात येणार आहे. 1 जून 2022 पासून सर्व संबंधित विभागाच्या सचिवांनी आपापल्या विभागातील मास्टर डेटाबेस देखील अद्ययावत ठेवायचा आहे.
शिष्यवृत्तीसाठी कोणताही पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये म्हणून उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, इतर मागास बहुजन कल्याण आणि अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजना आधारशी लिंक करूनच 2 जानेवारी 2023 पासून डीबीटी मार्फत विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्यात यावी असेही ठरले.
—–०—–

नगर विकास विभाग

लोहगाव विमानतळाजवळील क्रीडांगणावरील आरक्षणातून
रस्ता प्रस्तावित करण्यास मान्यता

पुणे येथील लोहगाव विमानतळाकडे पर्यायी रस्ता आखणे गरजेचे असल्याने येथील क्रीडांगणाच्या काही क्षेत्रातून रस्ता प्रस्तावित करण्यासाठी आरक्षण बदलास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

लोहगाव विमानतळाकडे जाण्यासाठी संरक्षण दलाच्या हद्दीमधून 12 मीटर रुंदीचा रस्ता उपलब्ध आहे. मात्र विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हा रस्ता बंद करावा लागत असल्याने पर्यायी रस्ता आखणे गरजेचे असल्याने शेजारील खेळाच्या मैदानातील काही भागातून रस्ता करण्याच्या अनुषंगाने आरक्षण बदलास मान्यता देण्यात आली.
—–०—–

नगर विकास विभाग

सांगलीमधील बाल क्रीडांगणावरील आरक्षणातून बांधकामव्याप्त क्षेत्र वगळण्यासाठी फेरबदलास मान्यता

सांगली महापालिकेच्या मंजूर विकास योजनेमध्ये बाल क्रीडांगणावरील आरक्षणातून बांधकाम झालेले क्षेत्र वगळून फेरबदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

आरक्षण क्र.220 या बाल क्रीडांगण आरक्षणाचे एकूण क्षेत्र 500 चौ.मी. असून त्यापैकी फक्त 63 चौ.मी. बांधकाम झालेले क्षेत्र वगळण्यात येणार आहे. या 63 चौ.मी. जागेत संडास, बाथरुम व पाण्याचा हौद असून या ठिकाणी निवासी वापरही सुरु आहे. हे क्षेत्र आरक्षणातून वगळले तरी 437 चौ.मी. क्षेत्र बाल क्रीडांगणासाठी शिल्लक राहणार आहे.
—–०—–

कृषी विभाग

कापूस, सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी विशेष कृती योजना
तीन वर्षात एक हजार कोटी निधी देणार

कापूस आणि सोयाबीनची उत्पादकता वाढविण्याच्या विशेष कृती योजनेस तीन वर्षात एक हजार कोटी निधी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या विशेष कृती योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात येणार आहे.
राज्यातील कापूस पिकाखाली ४२ लाख हेक्टर व सोयाबीन पिकाखाली ४६ लाख हेक्टर असे एकूण 88 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून या प्रमुख पिकांची उत्पादकता विविध कारणांमुळे देशाच्या उत्पादकतेपेक्षा कमी आहे. त्याचप्रमाणे, या दोन्ही पिकांच्या बाबतीत असेही आढळून आले आहे की योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या तालुक्यातील काही शेतकऱ्यांची उत्पादकता खूप अधिक आहे परंतु, त्याच तालुक्यातील व त्याच कृषि-हवामान क्षेत्रात राहणाऱ्या अन्य शेतकऱ्यांची उत्पादकता मात्र त्या तुलनेत अत्यंत कमी आहे.

या पार्श्वभूमीवर, शासनाने अर्थसंकल्पामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता प्रगतशील शेतकऱ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी आणि मूल्य साखळी विकासासाठी राबवावयाच्या विशेष कृती योजनेसाठी येत्या तीन वर्षात रुपये १००० कोटी निधी देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्या अनुषंगाने, कापूस, सोयाबीन तसेच, भुईमुग, सुर्यफुल, करडई, मोहरी, तीळ व जवस या अन्य तेलबिया या पिकांच्या उत्पादकता वाढी बरोबरच मूल्य साखळी विकासासाठी आगामी 3 वर्षासाठी विशेष कृति योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यातील सुमारे ६० टक्के निधी हा कापूस व सोयाबीन पिकांच्या उत्पादकता वाढीचे तंत्रज्ञान शेतकऱ्‍यांपर्यत पोहचविण्याकामी व विविध खते अनुदान स्वरुपात देण्यासाठी तसेच कृषि विद्यापिठांमार्फत बियाणे साखळी बळकटीकरणासाठी वापरला जाईल. उर्वरित ४० टक्के निधी हा मूल्य साखळी विकासासाठी, विविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी (उदा. साठवणूक सुविधा, प्रक्रिया संच, क्लिनिंग ग्रेडींग युनिट, जैविक निविष्ठा निर्मिती, बीज प्रक्रिया युनिट इ.) वापरात आणला जाईल. ज्या तालुक्यांची कापूस व सोयाबीन पिकांची उत्पादकता राज्याच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा कमी आहे अशा तालुक्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल. प्रत्येक तालुक्यातील अधिक उत्पादकता असलेले प्रगतशील संसाधन शेतकरी (Resource Farmers) वापरत असलेले तंत्रज्ञान तसेच, कृषि विद्यापीठांनी शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाचा तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांपर्यंत विस्तार करण्यात येईल. त्याकरिता गाव निहाय शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात येतील, या गटांतील शेतकऱ्यांपर्यंत पिक प्रात्यक्षिकांद्वारे तसेच, शेती शाळा, क्षेत्रीय भेटी व प्रशिक्षणाद्वारे पिक उत्पादन तंत्रज्ञान पोहोचविण्यात येईल, त्यांची क्षमता बांधणी करण्यात येईल तसेच, पिक उत्पादन तंत्रज्ञानाची प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल.
—–०—–

ऊर्जा विभाग

महाऊर्जेकडील 418 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना
कार्यान्वित करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

महाऊर्जाकडील नोंदणीकृत 418 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना कार्यान्वित करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

राज्याच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मितीचे धोरण 2015 व धोरण 2016 नुसार महाऊर्जाकडे नोंदणी करण्यासाठी 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ न मिळालेल्या महाऊर्जाकडील नोंदणीकृत 418 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना कार्यान्वित करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
अपारंपारिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व रोजगार निर्माण होईल. तसेच राज्यास महसूलही मिळेल. त्याचप्रमाणे हवेच्या प्रदुषणातही घट होईल.
—–०—–

मदत व पुनर्वसन विभाग

राज्यातील गावे, वाड्यांना २७० टँकर्सनी पाणीपुरवठा
धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा

राज्यातील पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत आज आढावा घेण्यात आला. राज्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याची माहिती देण्यात आली. यंदा राज्यातील सर्व प्रकल्पांमधील पाणीसाठा ४१.१९ टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा ३९.९२ टक्के इतके होता. राज्यातील २८१ गावे, ७३८ वाड्यांना २७० टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
राज्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील पाणीसाठ्याची टक्केवारी महसूल विभागनिहाय पुढीलप्रमाणे (कंसात गतवर्षीची २०२१ मधील टक्केवारी) : अमरावती – ५०.०८ टक्के (४७.२५). औरंगाबाद – ५०.१५ (४२.६०). कोकण – ४७.९६ (४७.६२). नागपूर -३७.३९ (४४.२७). नाशिक – ४१.०४ ( ४३.५९). पुणे – ३४.११ (३२.१२टक्के) .

टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या गावे, वाड्या आणि टँकर्सची संख्या महसूल विभागनिहाय पुढीलप्रमाणे: अमरावती – गावे ४१, वाड्या – निरंक, टँकर्स – ४१ . औरंगाबाद – गावे १४, वाड्या – १, टँकर्स – २४. कोकण – गावे १११, वाड्या – ३६६, टँकर्स – ७८. नाशिक – गावे ७३, वाड्या – ८६, टँकर्स – ७२. पुणे – गावे ४२, वाड्या – २८५, टँकर्स – ५५. नागपूर विभागात कोणतेही गाव, किंवा वाडी-वस्ती यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत नाही. अशारितीने राज्यातील २८१ गावे, ७३८ वाड्यांना २७० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या आठवड्यामध्ये गावांच्या संख्येमध्ये ६८ ने तर वाड्या-वस्त्यांच्या संख्येमध्ये १७५ ने वाढ झाली आहे. टँकर्सच्या संख्येमध्येही ८३ने वाढ झाली आहे. त्यामध्ये ५७ शासकीय व २१३ खासगी अशा एकूण २७० टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी आजच्या स्थितीला राज्यात ३५६ गावे, ७३४ गावांना संख्या २७७ टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत होता.

Girish Mahajan : कोळसाटंचाईचे खोटे कारण सरकार पुढे करते आहे  : गिरीश महाजन यांचा सरकारवर आरोप

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र शेती

कोळसाटंचाईचे खोटे कारण सरकार पुढे करते आहे

: वीजटंचाईतील ‘टक्केवारी’ जाहीर करा!

: माजी मंत्री गिरीश महाजन यांची आघाडी सरकारकडे मागणी

पुणे : समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधायचा हा महाआघाडी सरकारचा कांगावा कृत्रिम वीजटंचाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. शेतकऱ्यास कर्जबाजारी करून त्याच्या कर्जमुक्तीच्या कागदी घोषणा करण्याचे व त्याचे खोटे श्रेय घेण्याचे प्रकार याआधी उघडकीस येऊनही विजेच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारने पुन्हा तोच खेळ मांडला असून वीजटंचाईमुळे हैराण झालेल्या शेतकरी व सामान्य जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे केले जात आहे, असा आरोप माजी मंत्री  गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला.

राज्यातील कोणतेही वीजनिर्मिती केंद्र कोळशाअभावी बंद नसल्याचे वीज मंडळाच्या तपशिलावरून स्पष्ट दिसत असून ढिसाळ कारभार व कमाल मागणीच्या वेळी पुरेशी वीजनिर्मिती करण्यातील नियोजनाचा अभाव हीच कारणे राज्यातील वीजटंचाईला कारणीभूत आहेत. खाजगी क्षेत्राकडून महागडी वीज खरेदी करून दलालीतील टक्केवारी कमाईकरिताच हा कृत्रिम वीजटंचाईचा घाट घातला जात आहे, असेही गिरीश महाजन म्हणाले.

केंद्र सरकारने वीजखरेदीच्या दरावर मर्यादा घातल्याने हितसंबंधीयांचा जळफळाट सुरू असून दलालीतील टक्केवारी घटल्यामुळे अधिकाधिक वीज खाजगी स्रोतांकडून खरेदी करण्याकरिता वीजटंचाई भासवून सामान्य जनता, उद्योगक्षेत्र आणि शेतकऱ्यास वेठीला धरले जात आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. कोळशाअभावी वीजटंचाई झाल्याचे कारण देणाऱ्या सरकारने तफावतीची टक्केवारी जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केला.

अगोदर विजेअभावी शेतकऱ्याचे प्राण कंठाशी आणायचे, मग कर्जबाजारी होणे भाग पाडायचे आणि कर्जमाफीची कोरडी सहानुभूती दाखवत त्याच्या भावनांशी खेळत राजकारण करायचे असा हा हीन डाव आता जनतेच्या लक्षात आला आहे. ऐन उन्हाळ्यात विजेची समस्या निर्माण करून जनतेच्या भावनांशी खेळ सुरू केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा उद्रेक होईल व त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल असा इशाराही  गिरीश महाजन यांनी दिला.

कोळसा टंचाई असल्याचे भासवत केंद्र सरकारकडे बोटे दाखविण्याचा प्रकार म्हणजे आपल्या नियोजनशून्य कारभारावर पांघरुण घालण्याचा जुनाच केविलवाणा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. मार्चपासून जूनअखेरपर्यंत विजेची मागणी वाढते हे स्पष्ट असतानाही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांकरिता कोळसाचा पुरेसा साठा करण्याकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कोळशाची कृत्रिम टंचाई भासवून खाजगी क्षेत्राकडून चढ्या भावाने कोळसा खरेदी करीत खाजगी क्षेत्राचे हितसंबंध जपण्याकरिता गरीब ग्राहकांच्या खिशात हात घालून सरकारनेच समस्याग्रस्त जनतेवर वीजटंचाईचे संकट लादले आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरण्यासाठी राज्यातील सुमारे दोन हजार मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती केंद्रे बंद ठेवण्यात आली असा थेट आरोपही त्यांनी केला. कमी मागणीच्या काळात वीजनिर्मिती केंद्रांची देखभाल दुरुस्ती करणे शक्य असताना, आज कमाल मागणीच्या काळातच अनेक वीजनिर्मिती संयत्रे बंद ठेवण्यात आली आहेत. यावरूनच वीजटंचाई निर्माण करून जनतेस वेठीस धरण्याचा कट स्पष्ट होतो, असे ते म्हणाले.

थकबाकीदारांना लोडशेडिंगचा फटका देणाऱ्या सरकारने आपल्या कार्यालयांकडील वीजबिलाच्या थकबाकीचे आकडे सरकारने जाहीर करावेत अशी मागणीही त्यांनी केली.

Pulse Polio : एक कोटी पंधरा लाख बालकांना पोलिओ डोस देण्याचे नियोजन 

Categories
Breaking News social आरोग्य महाराष्ट्र

एक कोटी पंधरा लाख बालकांना पोलिओ डोस देण्याचे नियोजन

: राज्यात 27 फेब्रुवारीरोजी पल्स पोलिओ मोहीम

मुंबई  : राज्यातील सर्व जिल्ह्यात येत्या रविवारी, 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी केले. यंदाच्या वर्षीच्या मोहिमेत एक कोटी पंधरा लाख मुलांना पल्स पोलिओचा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 27 फेब्रुवारीला राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाचवेळी राबविण्यात येणार आहे. मोहिमेची पूर्वतयारी करण्यासाठी राज्य कृती दलाची बैठक गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील मंथन सभागृहात झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

बैठकीस आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, अवर सचिव मं.प. कुडतरकर, महिला बालकल्याण विभाग सहाय्यक आयुक्त नितीन मस्के, आदिवासी विकास विभागाचे कार्यासन अधिकारी सचिन खांडेकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. धीरेन कलवाडीया, डॉ. हेमंत बंगोलिया आदी उपस्थित होते.

डॉ. रामास्वामी यांनी सांगितले की, बालकांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण अतिशय महत्त्वाचे आहे. या दोन्ही लसीकरणाचे नियोजन करताना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणावर परिणाम होऊ देऊ नका. पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीमही मिशन मोडवरच राबविणे आवश्यक आहे.

पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीमेसाठी महसूल, पोलीस, सहकार, शिक्षण, महिला बालविकास आणि नगरविकास विभागाचे जिल्ह्यातील अधिकारी यांना सहभागी करुन घ्यावे. याबाबत लोकांत जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हास्तरावर प्रचार-प्रसिद्धी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

डॉ. अर्चना पाटील यांनी लसीकरणाची गरज, मोहिमेची केली जाणारी तयारी याबाबत माहिती दिली. सहाय्यक संचालक डॉ. सचिन देसाई यांनी मोहिमेबाबतच्या तयारीची माहिती सादरीकरण व्दारे दिली.
बैठकीस शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, पश्चिम रेल्वे, महिला बालकल्याण, ग्राम विकास विभाग, नगर विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

:पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत

राज्यातील सर्व जिल्ह्यात २७ फेब्रुवारीला राबविणार
एक कोटी पंधरा लाखाहून अधिक बालकांना डोस देण्याचे नियोजन
राज्यासाठी १.५४ कोटी डोस उपलब्ध
राज्यात ९२९५३ बूथ उभारणार
आरोग्य विभागाची २६१२६९ पथके घरोघरी भेट देणार
ट्रान्झिट पथकांची संख्या २९१२१
मोबाईल पथकांची संख्या १५१८२
आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, एएनएम यांचा सहभाग घेणार
मिशन इंद्रधनुष्य लसीकरण
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात लसीकरण केले जाणार
सात मार्च, चार एप्रिल आणि नऊ मे पासून सलग सात दिवस मोहिम राबविण्यात येणार.
नऊ जिल्हे आणि दहा महापालिका कार्य क्षेत्रात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार
गर्भवती आणि दोन वर्षांखालील मुलांना लस देणार

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का : इम्पिरिकल डेटाची याचिका फेटाळली

Categories
Breaking News social देश/विदेश महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाला धक्का

: इम्पिरिकल डेटाची याचिका फेटाळली

दिल्ली : राज्याला एम्पिरिकल डेटा देण्यास केंद्राने नकार दिला असून तसे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळ्याने राज्याच्या बाजूने मुकूल रोहतगी बाजू मांडत आहेत.

सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी सुरु आहे. दरम्यान, राज्याने केलेल्या इम्पिरिकल डेटाच्या मागणीला सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलं आहे. त्यामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकी संदर्भात युक्तीवाद सुरु आहे. सर्वोच्च न्यायालाने राज्य सरकारला दोन पर्याय दिले आहेत. यामध्ये ६ महिन्यांसाठी ओबीसी जागांना स्थगिती देता येईल किंवा ओबीसी जागांवर जनरल कॅटेगरीतून निवडणुका घेता येतील. राज्य सरकारनं ३ महिन्यात ट्रीपल टेस्टची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिल्यास निवडणुकीला स्थगिती देऊ असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

न्यायालयीय सुनावणीतील महत्वाचे मुद्दे 

राज्य सरकारनं ३ महिन्यात ट्रीपल टेस्टची अंमलबजावणी करण्यासाठी आश्वस्त केलं, तर निवडणुकीला स्थगिती देऊ – सुप्रीम कोर्ट

ओबीसी आऱक्षणासंदर्भात (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालात (Supreme Court) आज सुनावणी सुरू आहे. त्या दरम्यान मोठ्या घडामोडी घडत असून केंद्र सरकारने नव्या प्रतिज्ञापत्रातही इम्पिरिकल डेटा देण्यास नकार दिला आहे. आता याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. केंद्राने इम्पिरिकल डेटा द्यावा अशी मागणी राज्याने केली आहे. निकाल राज्याच्या बाजुने लागला नाही तर राज्य सरकारलाच पूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

राज्याला एम्पिरिकल डेटा देण्यास केंद्राने नकार दिला असून तसे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती मिळत आहे. आता सर्वोच्च न्यायालय का निकाल देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करताना राज्य सरकारने म्हटंल की, ओबीसी डेटा ९८ टक्के योग्य असल्याचं केंद्र सरकारनं संसदेत कबूल केलंय. संसदेच्या स्टॅंडींग कमिटीसमोर केंद्र सरकारनं ही दिली माहिती. २०१५ मध्ये गृह मंत्रालयानं ग्राम विकास स्टॅंडींग कमिटीसमोर माहिती दिली होती