Standing Committee : २ हजार कोटी पेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावांना स्थायीची मान्यता!  : ‘हम वादे नही इरादे लेकर आये है’

Categories
Breaking News PMC Political पुणे

२ हजार कोटी पेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावांना स्थायी समितीची मान्यता!

: पुणेकरांना दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा सत्ताधारी भाजपचा दावा

पुणे : महापालिका निवडणूक जवळ आली आहे. १४ मार्च नंतर भाजपची सत्ता नसेल. निवडणुकीत कोण बाजी मारणार हे गुलदस्त्यात आहे. मात्र दुसरीकडे भाजपने हातात असलेल्या सत्तेचा शेवटच्या क्षणी उपयोग केला आहे. शुक्रवाच्या स्थायी समितीत सुमारे २ हजार कोटी पेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावांना एकाच दिवशी मान्यता देण्याचा विक्रम समितीने केला आहे. त्यासाठी पहिल्यांदाच स्थायी समिती सायंकाळी ६ वाजण्याच्या नंतर ही सुरु ठेवली होती. दरम्यान या निमित्ताने पुणेकरांना दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा दावा सत्ताधारी भाजपने केला आहे.

: काय मंजूर झाले आजच्या स्थायी समितीत?

 

राष्ट्रीय नदी संवर्धन योजना

राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण प्रकल्पासाठी (जायका) मागविण्यात आलेल्या निविदांपैकी पात्र ठेकेदार एनव्हायरो कंट्रोलज्-टोशिबा वॉटर सोल्यूशन जेव्ही यांच्याकडून कॅपेक्स साठी सुमारे एक हजार पंचाण्णव कोटी एक्कावन्न लाख रुपये, सुमारे एकोणनव्वद लाख सत्तावीस हजार युरो, ओपेक्‍ससाठी सुमारे तीनशे कोटी २१ लाख रुपये आणि प्रोव्हिजनल रक्कम सोळा कोटी ५३ लाख रुपये असे कराराप्रमाणे काम करून घेण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या प्रकल्पाद्वारे शहरात निर्माण होणारया शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या निविदांसाठी केंद्र सरकार आणि अर्थसहाय्य करणारी जपान इंटरनॅशनल को ऑपरेटिव्ह एजन्सी (जायका) यांनी निविदा प्रक्रियेला मान्यता दिली होती. या प्रकल्पात ११ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारणे, सुमारे ११३ किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या विकसित करणे, जीआयएस, एआयएस, स्काडा यंत्रणा उभारणे, कम्युनिटी टॉयलेट ब्लॉक उभारणे अशा १३ पॅकेजेसच्या कामांचा समावेश आहे. प्रकल्प पूर्तीनंतर त्याचे पंधरा वर्षे संचलन करणे, देखभाल दुरुस्तीचज जबाबदारी संबंधित कंपनीवर राहणार आहे. सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया करणारे पुणे देशातील पहिले शहर ठरणार आहे.

रासने पुढे म्हणाले, पुणे शहरात आजमितीस ७४४ दशलक्ष लिटर्स प्रतिदिन मैलापाणी तयार होते. त्या अनुषंगाने ५६७ दशलक्ष लिटर्स प्रतिदिन क्षमतेची १० मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. संपूर्ण मैलापाणी शुद्धीकरणासाठी महापालिकेकडून ९९० कोटी २६ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. केंद्र सरकारने १४ जानेवारी २०१६ रोजी त्याला मान्यता दिली असून, ८५ टक्के अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित रक्कम पुणे महापालिकेला खर्च करावी लागणार आहे. मलवाहिन्या विकसित करण्याबरोबर ३९६ दशलक्ष लिटस प्रतिदिन क्षमतेची ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहेत.


राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्ती

राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पासाठी दैनंदिन देखरेख करण्यासाठी शाह टेक्निकल कंपनीची चार वर्षांसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या प्रकल्पाचे आवश्यक असणारा तज्ज्ञ अभियंता वर्ग उपलब्ध होणार आहे. या निविदेमुळे प्रकल्पाचे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होणार आहे. शाह कंपनीची १३ लाख ६२ हजार रुपयांची निविदा मान्य करण्यात आली.


पुणे नदी पुनरुज्जीवल प्रकल्प

संगमवाडी ते बंडगार्डन

पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीचा विकास करण्यासाठी संगमवाडी पूल ते बंडगार्डन पुलाच्या दरम्यानचे काम करण्यासाठी बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या सुमारे २६५ कोटी १४ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, तांत्रिक छाननी समितीने सुमारे ३६३ कोटी ८८ लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रकाला मान्यता दिली होती. बी. जी. शिर्के कंपनीने त्या पेक्षा १३.४० टक्के कमी दराने निविदा सादर केली होती. प्रशासनाला कंपनीबरोबर करारनामा करण्यास मान्यता देण्यात आली. माती खोदार्इ, मुरुम खोदार्इ, कठीण दगडामधील खोदार्इ, वाहतूक करणे, ओपन फाउंडेशन, पदपथ निर्मिती, सायकल ट्रॅक तयार करणे, एमब्यांकमेंट बांधणे, गॅबियन वॉल बांधणे, नदीकिनारी बेचेंस बसविणे, झाडे लावणे, विद्युत व्यवस्था अशाप्रकारच्या कामांचा समावेश आहे. पावसाळ्याच्या कालावधीसह तीस महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

 

बंडगार्डन ते मुंढवा

पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीचा विकास करण्यासाठी बंडगार्डन पूल ते मुंढवा नदीच्या दोन्ही बाजूने काम करण्यासाठी कुमार इंफ्राप्रोजेक्ट यांच्या सुमारे ६०४ कोटी ७५ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, तांत्रिक छाननी समितीने सुमारे ७१९ कोटी ०३ लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रकाला मान्यता दिली होती. प्रशासनाला कंपनीबरोबर करारनामा करण्यास मान्यता देण्यात आली. माती खोदार्इ, मुरुम खोदार्इ, कठीण दगडामधील खोदार्इ, वाहतूक करणे, ओपन फाउंडेशन, पदपथ निर्मिती, सायकल ट्रॅक तयार करणे, एमब्यांकमेंट बांधणे, गॅबियन वॉल बांधणे, नदीकिनारी बेचेंस बसविणे, झाडे लावणे, विद्युत व्यवस्था अशाप्रकारच्या कामांचा समावेश आहे. पावसाळ्याच्या कालावधीसह छत्तीस महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.


विविध डी. पी. रस्त्यांना मान्यता

खराडी भागातील आठ डी. पी. रस्ते डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यात खासगी सहभागातून (पीपीपी) डी. पी. रस्ते विकसित करण्यासाठी सुमारे १०८ कोटी १६ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, शहरातील विकास आराखड्यातील रस्ते ताब्यात आलेल्या जागेनुसार आणि उपलब्ध तरतुदीनुसार दरवर्षी टप्प्यानेटप्प्याने विकसित केले जातात. रस्ते विकसनाचा खर्च, तुलनेने कमी उपलब्ध तरतूद आणि जागा ताब्यात घेताना जागा मालकांची रोख मोबइल्याची मागणी अशा कारणांमुळे डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्यात मर्यादा येतात. अशा परिस्थितीत रस्ते विकसन खासगी सहभागातून करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाअंतर्गत रस्त्याच्या जागा एफएसआय किंवा ठेकेदारास क्रेडिट नोट स्वरूपात देण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. सदर क्रेडिट नोट पुणे महापालिकेकडे असलेल्या बांधकाम परवानगी शुल्काच्या अंतर्गत वापरता येते. तसेच ती क्रेडिट नोट हस्तांतरणीय आहे. या वर्षी एकूण ११ रस्ते आणि दोन पुलांची कामे पीपीपीमध्ये करण्यात येत आहेत. पीपीपी अंतर्गत क्रेडिट नोट मोबदल्यामध्ये रस्ते आणि पूल विकसित करण्याची बाब गेल्या वर्षी मुख्य सभेने मान्य केली आहे. पीपीपी प्रस्तावामुळे महापालिकेस थेट गुंतवणूक न करता क्रेडिट नोटच्या मोबदल्यात रस्ते आणि पुलांची कामे विकसित करण्यात येत आहेत. भूसंपादनासाठी एफएसआय, टीडीआर अणि रिझर्व्हेशन क्रेडिट बॉंड या पर्यायांचा वापर करण्यात येतो.

मुंढवा, खराडी नदीवर पुलाला मान्यता

मुंढवा, खराडी येथील मुळा-मुठा नदीवर २४ मीटर लांबीचा पुल डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यात खासगी सहभागातून (पीपीपी) विकसित करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

हडपसर येथे डी. पी. रस्ता

हडपसर येथील पंतप्रधान आवास योजना प्रकल्पासाठी १२ मीटर डी. पी. रस्ता विकसित करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली. या रस्त्यासाठी ८४ लाख ७४ हजार रुपयांची निविदा मंजूर केल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.


पाच वर्षांपूर्वी आम्ही म्हणत होतो की, ‘हम वादे नही इरादे लेकर आये है’ या उक्तीला आम्ही जागलो आहोत. पुण्याच्या आधुनिक भवितव्याची पायाभरणी करणारे २४ बाय ७ पाणीपुरवठा प्रकल्प, नदीपुनरूज्जीवन, जायका, पीपीपी रस्ते आणि उड्डाणपूल या प्रकल्पांच्या कामाला गती देणारे निर्णय आज झाले. पुण्याचा चेहरामोहरा बदलून टाकणारे हे प्रकल्प पुण्याला जगातील सर्वौत्तम शहरांच्या पंगतीत नेऊन ठेवणार आहेत. पुण्याच्या विकासाचा एक नवा टप्पा यामुळे सुरू झालेला आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने शहराच्या भवितव्याला आकार देण्याची कामगिरी बजावता येते आहे, याचे मोठे समाधान आहे.

– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या दोन्ही प्रकल्पांवर लागलेली अंतिम मोहोर हे पुणेकरांच्या स्वप्नपूर्तीवरही झालेले शिक्कामोर्तबच आहे. केवळ नद्यांच्या पुनरुज्जीवनावरच न थांबता नदीकाठसुधारही होत आहे, ही बाब तितकीच महत्त्वाची आहे. नद्यांचे आरोग्य मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांच्या माध्यमातून सुधारतानाच नदीकाठ विकसित होणे हे शहराच्या वैभवात मोठी भर घालणारे ठरेल. हे दोन्ही प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत.

मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

River Devlopment : Ganesh Bidkar : नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच! : सभागृह नेते गणेश बिडकर यांचा दावा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच!

: सभागृह नेते गणेश बिडकर यांचा दावा

पुणे : शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांच्या सुधारणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. यामध्ये ‘नदीचे केवळ सुशोभिकरण नव्हे तर नदीची सुधारणाच’ केली जाणार आहे. या नद्यांचे पर्यावरण जपणे, नदीत एकही थेंब दूषित पाणी न जाऊ देणे, तसेच नदीबरोबर नागरिकांचे नाते दृढ करण्यासाठी सुविधा विकसित करणे, नदीपात्र हा शहराच्या सौंदर्याचा भाग बनविणे, ही उद्दीष्टे ठेवण्यात आलेली आहेत, असे महानगर पालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी स्पष्ट केले.

गेली ५० वर्षे महापालिका ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी या नद्यांची वाताहत उघड्या डोळ्यांनी पाहिली नाही तर त्यासाठी हातभार देखील लावला. हजारो ट्रक राडारोडा या नदीपात्रात टाकून पात्र उथळ आणि अरूंद केले गेले. नदीपात्रात दूषित पाणी जाणार नाही, यासाठी काहीही विचार न करता ओढ्या नाल्यांचे आणि ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात जाण्यापासून वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही, अशा शब्दात सभागृह नेते बिडकर यांनी नदी सुधारणा प्रकल्पावर टीका करणाऱ्या मंडळींचा समाचार घेतला. या योजनेवर टीका करणाऱ्या व्यक्तीच्याच अनेक बगलबच्च्यांनी नदीपात्रात भराव घालून इमारती उभ्या करण्याचा चंग बांधला होता. नदीची ही अवस्था पाहून डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकार मधील केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी तर ‘ही नदी नव्हे तर हे गटार आहे’, अशी उव्दिग्न प्रतिक्रिया दिली होता. मात्र त्यानंतर देखील यामध्ये काहीही सुधारणा झाली नाही.

केंद्रात आणि पाठोपाठ २०१४ मध्ये राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुळा-मुठा सुधारणेसाठी ठोस पावले उचलण्यास सुरूवात झाली. ‘नमामि गंगे’ प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नद्यांची निवड झाली. या प्रकल्पासाठी निवड झालेल्या नद्यांमध्ये गंगे व्यतिरिक्तच्या मुळा-मुठा या एकमेव नद्या आहेत. नदीमध्ये एकही थेंब दूषित पाणी जाऊ नये यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज होती. यासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी अर्थात जायका ने एक हजार कोटी रुपयांचे अत्यंत कमी व्याजाचे कर्ज मंजूर केले आहे. या कर्जाची हमी केंद्र सरकारने घेतलेली आहे. केंद्रात आणि राज्यात सरकार असतांना देखील काँग्रेस, राष्ट्रवादीने अशी हमी घेतलेली नव्हती आणि यासाठी प्रयत्नही केलेला नव्हता, असे बिडकर यांनी सांगितले.

जायका अंतर्गत ११ नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अर्थात एसटीपी उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचेही काम प्रगतिपथावर आहे. नदीसुधार प्रकल्पाचे एकूण ११ टप्पे केले असून त्यातील प्राधान्याच्या टप्प्याच्या कामाच्या निविदाही निघालेल्या आहेत. हा प्रकल्प जगदविख्यात रचनाकार व साबरमती रिव्हरफ्रंटचे शिल्पकार पद्मश्री बिमल पटेल यांच्या मार्गदर्शन आणि देखरेखी खाली राबविला जात आहे. पुण्याच्या दिमाखात भर घालणारा हा प्रकल्प पुण्याचे पर्यावरण समृद्ध करणारा असेल आणि पुण्याच्या विकासाला गती देणाराही ठरेल, असा विश्वास सभागृह नेते बिडकर यांनी व्यक्त केला.

 

‘राजकीय विद्वानांकडून’ केवळ पुणेकरांची दिशाभूलच

या प्रकल्पाचे स्वरूप माहिती करून न घेता काही राजकीय विद्वान यावर भाष्य करत आहेत. त्यांच्या माहितीसाठी सांगितले पाहिजे की, नदी सुधार प्रकल्पाचा एकूण कालावधी हा दहा वर्षांचा आहे. यातील पहिली पाच वर्षे अभ्यास करण्यासाठीचीच होती. प्रदीर्घ अभ्यासानंतर याचा सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिकेसमोर सादर करण्यात आला. हा अहवाल जनतेच्या अवलोकनार्थ महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. दरम्यानच्या काळात नदी सुधारसाठीची स्वतंत्र एसपीव्ही देखील उभारण्यात आली. करोनाचे संकट असताना देखील प्रकल्पाचे काम पुढे जातच राहिले आहे.

 

पंधरा फिल्म प्रसिद्ध करणार

हा प्रकल्प तांत्रिक स्वरूपाचा आहे. अत्यंत सोप्या भाषेत या प्रकल्पाची माहिती देण्याचीही गरज आहे. ही गरज ओळखून आम्ही पंधरा फिल्म्सच्या माध्यमातून ही माहिती पुणेकरांसमोर मांडणार आहोत. या मालिकेतील रोज एक फिल्म आम्ही पुढील पंधरा दिवस प्रसिद्ध (रिलीज) करणार आहोत. यातून जिज्ञासूंचे समाधान होईल, सामान्य पुणेकरांना नेमकी माहिती मिळेल आणि वेड पांघरून पेडगावला निघालेल्यांनाही बोध होइल, असा टोला सभागृह नेते गणेश बिडकर यांनी लगावला.

Ganesh Bidkar : PMC election : पुणेकर प्रशांत जगताप यांना जागा दाखवतील : सभागृह नेते गणेश बिडकर

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुणेकर प्रशांत जगताप यांना जागा दाखवतील

– सभागृह नेते गणेश बिडकर यांचे प्रतिउत्तर

 

पुणे : राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर महाविकास आघाडी कसा करत आहे, हे प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुणेकरांच्या लक्षात आले आहे. पालिकेत सत्ता मिळविण्यासाठी सत्तेचा गैरवापर करत महाविकास आघाडीने नियमबाह्य पद्धतीने प्रभाग रचना केली तरी येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत पुणेकर मतदार त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा समाचार घेतला. निवडणुकीच्या निकालानंतर जगताप यांचा भ्रम निश्चित दूर होईल, असा दावा बिडकर यांनी केला.

प्रभाग रचना करताना टेकडीमुळे तयार होणारी नैसर्गिक हद्द तोडून विचित्र प्रभाग जोडावा लागत असेल, तर सरळमार्गी राजकारण करून आपल्याला जिंकता येणार नाही हेच जगतापांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले का? काही महिन्यांपासून आघाडीची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीने आता थेट स्वबळावर लढण्यास समर्थ असून, १२२ जागांवर विजय मिळवू असा दावा शहराध्यक्ष जगताप करत आहेत, ही संख्या पुणे महानगरपालिकेची नाही तर पिंपरी चिंचवड आणि अन्य स्वराज्य संस्थांमधील असेल, असा टोला बिडकर यांनी लावला. जाती धर्माचे राजकारण करून आपण जिंकू असा समज जगताप यांनी करून घेतला आहे. मात्र त्यांना माहीत नाही सुज्ञ पुणेकर जाती- धर्मावर मतदान करत नाही. तो काम बघतो, आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्रजी यांचे काम पाहिले आहे, चार वर्षात पळणारी मेट्रो पहिली आहे.
स्वबळाची भाषा करणारे जगताप हे विसरतात की राज्यात तसेच देशात सत्ता असून ही त्यांचा आकडा कधी ६० च्या वर गेलेला नाही. ‘बेडूक फुगवला म्हणून तो हत्ती होत नाही’, असेही बिडकर म्हणाले.

मागच्या पंचवार्षिक मध्ये प्रशांत जगताप हे महापौर असताना त्यांच्या पक्षाचा महापालिकेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. त्याची पुनरावृत्ती होऊन परत नाचक्की होऊ नये, यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाही त्यामुळेच भाजप मधील नगरसेवक आपल्याकडे येण्यास इच्छूक असल्याच्या घोषणा जगताप करत आहेत. पुढील २४ तासात राष्ट्रवादीने ८० उमेदवारांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान सभागृह नेते बिडकर यांनी दिले. पुणेकर फक्त विकासाला मतदान करतात. थापाड्यांना नाही. टेंडरमधल्या टक्केवारीसाठी आरडाओरड करणाऱ्यांना जनता जागा दाखवते. शहराच्या विकासासाठी भकास आघाडी नको, की भ्रष्टवादी राष्ट्रवादी नको, म्हणनूच पुणेकरांनी ठरवले आहे. पुण्यासाठी पर्याय एकच, ‘यंदा परत कमळच..’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

कायदेशीर लढा देणार

सत्तेचा चुकीचा वापर करून महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचना केली आहे. याविरोधात कायदेशीर लढा देणार असल्याचे सभागृह नेते बिडकर यांनी स्पष्ट केले. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या प्रभागांवर हरकती आणि सूचना नोंदविण्यात येणार असून त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यास भाग पाडू असा निर्धार बिडकर यांनी व्यक्त केला.

PMC ward structure : प्रभाग रचना : सत्ताधाऱ्यांना काय वाटते? कुणाला होईल फायदा? 

Categories
Breaking News PMC Political पुणे

प्रभाग रचना : सत्ताधाऱ्यांना काय वाटते? कुणाला होईल फायदा?

 

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी आज प्रभाग रचना जाहीर झाली आहे. आता सर्व इच्छुकांची बाजी पणाला लागणार आहे. मात्र प्रभाग रचना आणि बदललेल्या प्रभागामुळे मात्र कुणीही समाधानी असल्याचे जाणवत नाही. प्रस्थापित सर्व नगरसेवकांचे प्रभाग तोडण्यात आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते भाजपला दोषी मानत आहेत तर भाजप देखील महाविकास आघाडीवर दोषारोप करत आहे. प्रभाग रचनेचा नक्की कुणाला फायदा झाला? हे मात्र निवडणूक निकालानंतरच दिसेल, असे मानण्यात येत आहे. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी मात्र अब कि बार सौ पार हा नारा कायम ठेवला आहे.

 

प्रभागांची मोडतोड करुन आणि निकष बदलून नवे प्रभाग करुन भारतीय जनता पक्षाला रोखता येईल, असे विरोधकांना वाटत असले तरी त्यांच्या भ्रमाचा भोपळा पुणेकरच फोडतील. गेल्या पाच वर्षांत पुणेकरांना केंद्रबिंदू ठेवूनच भारतीय जनता पक्षाने महापालिकेचा कारभार केलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदानरुपी साथ मतदार देतील हा विश्वास आहे. पुण्याच्या भविष्याचा वेध घेताना विविध महत्त्वाचे प्रकल्प गेल्या पाच वर्षात पूर्णत्वास नेले. मेट्रो आणि समान पाणीपुरवठा प्रकल्पही पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहेत. शिवाय विविध नव्या प्रकल्पांचीही मुहूर्तमेढ रोवली जात आहे. पुणे शहराला जागतिक पातळीवर अधोरेखित करताना देशपातळीवरही विविध पुरस्कार आणि मानांकनांनी पुण्याच्या शाश्वत विकासकामांवर शिक्कामोर्तब झाले. सुज्ञ पुणेकर या सर्व बाबींचा सारासार विचार करुन भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहतील, हा विश्वास आहे.

मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

शहरात मेट्रो प्रकल्पाचे पूर्णत्वाला गेलेले काम, सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपीसाठी झालेली बस खरेदी, नदी सुधार योजना प्रकल्प, करोनाच्या काळात सत्ताधारी पक्ष म्हणून पार पाडलेली जबाबदारी, अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज तसेच शहरातील नागरिकांच्या हितासाठी गेल्या पाच वर्षात केलेली कामे यामुळे येणाऱ्या महानगपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व राहिल. ‘अब की बार सौ पार ‘ करून भाजप निश्चितपणे पुणेकरांच्या विश्वासाला पात्र ठरेल.

– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

Ganesh Bidkar : PMPML : पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना तातडीने सातवा वेतन आयोग द्यावा   : पीएमपी सीएमडीना सभागृह नेत्यांनी दिले पत्र

Categories
PMC Political पुणे

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना तातडीने सातवा वेतन आयोग द्यावा

– पीएमपी सीएमडीना सभागृह नेत्यांनी दिले पत्र

 

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) मधील कर्मचारी,अधिकारी यांना सातवा वेतन आयोगाचा(7th pay commission) लाभ तातडीने देण्यात यावा. मार्च महिन्याच्या पगारात त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महानगपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर(House leader Ganesh Bidkar) यांनी केली आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक(CMD) लक्ष्मीनारायण मिश्रा यांना दिलेल्या पत्रात सभागृह नेते बिडकर यांनी ही मागणी केली आहे.

 

पीएमपीएमएलमधील कर्मचारी तसेच अधिकारी यांना अद्यापही सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत नसल्याची तक्रार पीएमटी कामगार संघ (इंटक) यांनी केली होती. सातवा वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार वेतन मिळावे यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने सभागृह नेते बिडकर यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करत आपले निवेदन त्यांना दिले. त्याची दखल घेत बिडकर यांनी पीएमपीएमएलच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना तातडीने सातवा वेतन आयोग देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकार कर्मचारी, राज्य सरकार कर्मचारी, पुणे महानरपालिकेच्या तसेच पिंपरी चिंचवड महानगरालिकेचे कर्मचारी यांना यापूर्वीच सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. त्यानुसार त्यांना वेतन देखील मिळण्यास सुरुवात झालेली आहे.

पीएमपी मधील कर्मचारी आणि अधिकारी यांना देखील सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गेल्या वर्षी ठराव करण्यात आला होता. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्याचे निवेदन कामगार संघाने दिलेले आहे. यामध्ये लक्ष घालून पुढील महिन्यापासून तातडीने या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वेतन आयोगानुसार पगार देण्यात यावेत असे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

Pune First : Ganesh Bidkar : अग्रेसर पुण्यासाठी “पुणे फर्स्ट” उपक्रम

Categories
PMC Political social पुणे महाराष्ट्र

अग्रेसर पुण्यासाठी “पुणे फर्स्ट” उपक्रम

– सभागृह नेते गणेश बिडकर यांची माहिती

पुणे : पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा, विकास तसेच प्रगती देशभरासह जागतिक पातळीवर पोहचावी, यासाठी “पुणे फर्स्ट” हा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. ही एक वेबसाईट असून याचा शुभारंभ राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच झाला. पुणे महानगरपालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या पुढाकारातून पुणे फर्स्ट उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

पुणे शहर म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, पुणे हे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात फक्त राज्यातच नव्हे तर देशात अग्रेसर असणारे शहर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा पुणे महानगरपालिका हे देशातील सर्वात मोठे शहर ठरलेले आहे. पुण्याबद्दलची माहिती जगभर पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहेच, पण भविष्यातही सर्वच बाबतीत पुणे कायमच अग्रेसर राहावे, विकासाचे आणि प्रगतीचे नवे मानदंड आपल्या शहराने स्थापन करावेत यासाठी गट- तट, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून “पुणे फर्स्ट” या विचाराने जनतेने चर्चा करावी, संवाद करावा, मान्यवरांनी मार्गदर्शन करावे यासाठीचे व्यासपीठ म्हणून सुद्धा हा मंच काम करेल, असे सभागृह नेते बिडकर यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या शहरी विकासाचे शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. www.punefirst.org या वेबसाईटला भेट देऊन नागरिकांना या उपक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेता येणार आहे. अधिकाधिक पुणेकरांनी या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन सभागृह नेते बिडकर यांनी केले आहे.

Pune : Vaccination : १५ ते १८ वयोगटाचा कोरोना लसीकरण प्रारंभ!

Categories
Breaking News PMC Political पुणे

१५ ते १८ वयोगटाचा कोरोना लसीकरण प्रारंभ

पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे महापालिका हद्दीत १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लसीकरणाचा प्रारंभ महापालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटलमध्ये करण्यात आला. पुणे शहरात ४० लसीकरण केंद्रांवर नव्या वयोगटासाठी कोवॅक्सिन लस उपलब्ध करण्यात आली आहे.  तर पुणे महानगरपालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांना करोना प्रतिबंधक लस देण्यास सोमवारी सुरुवात झाली. महानगपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असून त्यासाठी आवश्यक असलेल्या लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुकर व्हावे, यासाठी पालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागातील ४० केंद्र सुरू करण्यात आली आहेत. लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांचे स्वागत महापौर आणि सभागृह नेते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. करोनावर मात करण्यासाठी या वयोगटातील मुलांसह ज्या नागरिकांचा अद्यापही पहिला आणि दुसरा डोस शिल्लक आहे, त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन बिडकर यांनी यावेळी केले.

‘१५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांमध्ये लसीकरणासाठी उत्स्फूर्तपणा दिसला हे खूप आशादायक चित्र आहे. लाभार्थ्यांची ही सकारात्मकता लसीकरणाला चांगला वेग देईल हा विश्वास वाटतो. महापालिकेची लसीकरण यंत्रणाही पूर्ण क्षमतेने सज्ज असून वेगाने आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कमीत कमी कालावधीत लस देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असेल’

मुरलीधर मोहोळ, महापौर.

——–

लस घेण्यासाठी आलेल्या या मुलांमध्ये लसीकरणाबाबतची उत्सुकता ही प्रचंड सकारात्मकता देणारी होती. या लसीकरणासाठी प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक ते नियोजन करण्यात आलेले आहे.

– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

Mahavikas Aghadi Vs BJP : Metro Bridge : महाविकास आघाडी म्हणते, विकासाच्या नावाखाली गणेश उत्सव परंपरा नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न; तर भाजप म्हणते, गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडीचे राजकारण

Categories
Breaking News PMC Political पुणे

विकासाच्या नावाखाली गणेश उत्सव परंपरा नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न : महाविकास आघाडी

: गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडीचे राजकारण : भाजप

पुणे : मेट्रो प्रकल्पाच्या पुलावरून महापालिकेचे मुख्य सभागृह आणि बाहेर देखील महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप च्या नेत्यामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.    मेट्रोच्या पुलाची उंची वाढवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या मेट्रो पुलाची उंची न वाढवता काम सुरू ठेवून पुणे शहराची परंपरा मोडीत काढण्याचा दुर्दैवी प्रयत्न सत्ताधारी भाजप करत आहेत असा आरोप या तीनही पक्षांच्या वतीने करण्यात आला. तर भाजपने आरोप केला कि गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडी राजकारण करते आहे.

: आमचा विरोध हे महापौरांचे हास्यास्पद वक्तव्य – प्रशांत जगताप

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि “गणेशोत्सव” म्हणजे पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव… पुणे शहरातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीची भुरळ केवळ महाराष्ट्राला किंवा भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आहे. मात्र पुणे शहराच्या या वैभवाला गालबोट लागतेय की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पुणे शहरातील सर्व मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक ही छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) येथून जाते. गेल्या 131 वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे चालू आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराज पुलावरून प्रस्तावित असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या पुलामुळे ही परंपरा खंडीत होणार आहे. या मेट्रोच्या पुलाची उंची वाढवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या मेट्रो पुलाची उंची न वाढवता काम सुरू ठेवून पुणे शहराची परंपरा मोडीत काढण्याचा दुर्दैवी प्रयत्न सत्ताधारी भाजप करत आहेत असा आरोप या तीनही पक्षांच्या वतीने करण्यात आला. याबाबत आज महाविकास आघाडीतील पक्षांनी प्रश्न उपस्थित केले असता महाविकास आघाडीचा मेट्रो प्रकल्पास विरोध असल्याचे हास्यास्पद वक्तव्य  महापौरांनी केले आहे.  पालक मंत्री आदेशाने मेट्रोचे काम सुरु झाले असे  महापौर महोदयांनी सांगितले, जर हे खरे असेल तर महापौरांनी सप्टेबर मध्ये काम थांबवताना कोणत्या अधिकारांत मेट्रोचे काम थांबवले होते. पुणे शहराच्या अस्मितेच्या या प्रश्नावर महानगरपालिकेच्या सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी केली असता भर सभागृहात महापौरांचं खोटं वक्तव्य उघडं पडेल म्हणून भारतीय जनता पक्षाने चर्चा घडू दिली नाही. पुणेकरांच्या प्रतिनिधींना सभागृहात बोलण्याची संधी न देता महापौरांनी मोदी सरकारच्या हुकूमशाही पॅटर्न पुणे महानगरपालिकेत राबवला आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुणे शहराच्या विकासाला विरोध नाही तसेच मेट्रोला देखील विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली पुण्याच्या परंपरेला नष्ट करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा ठेका घेतलेल्या भाजपचे देवंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जो DPR केला त्यात या चुका झाल्या आहेत त्यामुळे ही नामुष्की ओढवली आहे हे पुणेकरांच्या समोर आणण्यासाठी आज सभागृहात बोलू देण्याची आमची मागणी होती परंतू हे सत्य जनतेसमोर येऊ नये म्हणूनच महापौरांनी आम्हाला सभागृहात बोलू दिलं नाही.” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

: महाविकास आघाडीचे नेते गणेश मंडळांची दिशाभूल करत आहेत : महापौर

याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडीचे राजकारण सुरु आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना खोटे सांगून त्यांची दिशाभूल केली जात आहे. कारण काम सुरु करण्याचे आणि ते ही पोलिस बंदोबस्तात करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे आम्ही सभागृहात सर्व नेत्यांना सांगत होतो कि आपण अजित दादांना भेटून हा प्रश्न निकाली लावू. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमचे ऐकले नाही. आम्हाला सभा चालू द्यायची होती. कारण शहराच्या हिताचे ३०० विषय मंजूर करायचे आहेत. मात्र विरोधी नगरसेवकांनी गोंधळ घालत सभा बंद करण्याचे काम केले. सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, महानगरपालिकेची सर्वसाधारण झाल्यानंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊ. यावर काही उपाय काढता येईल का? यासाठी महापौर यांच्या कार्यालयात बैठक घेऊन सर्व पक्षांचे एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार तसेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ असा उपाय सुचविला. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना यात रस नव्हता. केवळ राजकारण करून महाविकास आघाडी गणेश मंडळाची, कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. अजूनही आम्ही दोन्ही नेत्यांकडे यासाठी पाठपुरावा करण्यास तयार आहोत. तर स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, विकासाच्या आड कधीही गणेश मंडळ कार्यकर्ता येत नाही. टी पुण्याची परंपरा नाही. मात्र महाविकास आघाडी वेगळेच राजकारण खेळू पाहत आहे.

GB Meeting : Ganesh Bidkar vs Mahavikas Aghadi : भाजपने शहरात केलेल्या जाहिरातीवर महापुरुषाचे फोटो नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस सहित विरोधी नेत्यांचे चे मुख्य सभेत आंदोलन : तर गणेश बिडकर यांनी विरोधी पक्षाची बोलती केली बंद; म्हणाले हे आंदोलन निव्वळ प्रसिद्धीसाठी

Categories
Breaking News PMC Political पुणे

भाजपने शहरात केलेल्या जाहिरातीवर महापुरुषाचे फोटो नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस सहित विरोधी नेत्यांचे चे मुख्य सभेत आंदोलन

: तर गणेश बिडकर यांनी विरोधी पक्षाची बोलती केली बंद; म्हणाले हे आंदोलन निव्वळ प्रसिद्धीसाठी

पुणे : १९ डिसेंबर रोजी पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी तसेच महापालिकेत नव्याने बसवलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी देशाचे गृहमंत्री  अमित शहा येत आहेत. या कार्यक्रमाची जाहिरात म्हणून सत्ताधारी भाजपने संपूर्ण शहरभरात मोठे मोठे होर्डिंग लावले. परंतु या होर्डिंग्जवर कुठेही छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो भारतीय जनता पार्टीने लावले नाही. त्याऐवजी भाजपच्या नेत्यांचे मोठे मोठे फोटोज या बॅनर वरती लावलेले आहेत.  त्यामुळे कॉंग्रेस आणि  राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, पार्टीतर्फे महापुरुषांचा फोटो न लावणाऱ्या  भारतीय जनता पार्टीचा पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर निषेध करण्यात आला. शिवाय आंदोलन देखील करण्यात आले. मात्र त्याच वेळी आपल्या भाषणातून सभागृह नेते गणेश बिडकर यांनी देखील जुने दाखले देत विरोधी पक्षाची बोलती बंद केली. विशेष म्हणजे या बाबत निषेधाची तहकुबी देण्याचा राष्ट्रवादी चा प्रयत्न फसलेला दिसून आला.

: करणी आणि कथनी यात फरक – प्रशांत जगताप

शुक्रवार ची सभा सुरु झाल्याबरोबर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या या विषयावरून आंदोलनाला सुरुवात केली.   यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी भाजपला या प्रकारा बाबत माफी मागण्यास सांगितले.  जगताप म्हणाले कि, “या प्रकारातून भाजपचा खरा चेहरा डोळ्यासमोर आला आहे . भारतीय जनता पार्टीला महापुरुषांची आठवण केवळ मते  मागताना येते. भाजपच्या नेत्यांच्या मनात या महापुरुषांबद्दल आदत नसल्याचे या प्रकारातून उघड झाले आहे. त्यांची करणी आणि कथनी यात असलेला फरक् यातून दिसून येतो”.

: आंदोलन निव्वळ प्रसिद्धीसाठी – गणेश बिडकर

या विषयावरून गणेश बिडकर आपल्या भाषणात म्हणाले, महानगरपालिकेने वर्षानुवर्षे सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगेसने त्यांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसविण्याचा प्रयत्न केले नाहीत. केवळ महापुरुषांच्या नावाने राजकारण केले. अनेक वर्षे हातात सत्ता असतानाही आपल्याला जे जमले नाही ते भारतीय जनता पक्षाने करून दाखविले. याचे दुःख असल्याने हा खटाटोप सुरू आहे. या दोन्ही महपुरूषांचे पुतळे पालिकेत बसत असल्याने हा पालिकेच्या इतिहासातील सुवर्णदिवस आहे.

Ganesh Bidkar : Light House : गणेश बिडकर यांनी सुरु केलेला लाईट हाऊस उपक्रम समाजाला दिशा देणारा : चंद्रकांत पाटील

Categories
PMC Political पुणे

गणेश बिडकर यांनी सुरु केलेला लाईट हाऊस उपक्रम समाजाला दिशा देणारा : चंद्रकांत पाटील

– सभागृह नेते बिडकर यांचे केले कौतुक

पुणे :  शाळा, महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच ‘कौशल्य विकास शिक्षण’ गरजेचे आहे, यासाठी लाईट हाऊस सारखे उपक्रम अधिकाधिक ठिकाणी सुरू करणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन सभागृह नेते गणेश बिडकर यांनी आपल्या भागात सुरू केलेला लाईट हाऊस उपक्रम समाजाला दिशा देणारा आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सभागृह नेते बिडकर यांच्या कामाचे कौतुक केले.

पुणे महानगपालिका आणि पुणे सिटी कनेक्ट यांच्या वतीने सोमवार पेठेतील पालिकेच्या भोलागिरी प्राथमिक शाळेत युवक युवतींना आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी लाईट हाऊस सुरू करण्यात आले आहे. पालिकेचे सभागृह नेते बिडकर यांच्या विशेष प्रयत्नांतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोमवारी झाले त्यावेळी ते बोलत होते. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे, सभागृह नेते गणेश बिडकर, पुणे सिटी कनेक्ट चे चेअरमन गणेश नटराजन, वॅनडरलॅन्ड कंपनीच्या रश्मी आर्या, पालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त रंजना गगे, शिक्षण प्रमुख मीनाक्षी राऊत, भवन विभागाचे प्रमुख शिवाजी लंके, गणेश सोनुने यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. हा प्रकल्प चालविण्यासाठी वॅनडरलॅन्डच्या वतीने आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

बदलत्या काळानुसार शिक्षणामध्ये देखील आवश्यक ते बदल करणे आवश्यक आहे. मात्र आजही आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल झालेले नाहीत. परिणामी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत असल्याचे चित्र आहे, असे पाटील म्हणाले. करोनाच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या हे वास्तव विसरता येणार नाही. या भागातील १८ ते ३० वयोगटातील तरुण तसेच तरुणींना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी, लाईट हाऊसच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून बिडकर यांनी पुढाकार घेत हा उपक्रम सुरू केला ही मोठी आनंदाची गोष्ट असून असे उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू कसे होतील, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले. पुण्यासह संपूर्ण राज्यात असे लाईट हाऊस सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नटराजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी कंपनीच्या वतीने या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे आर्या यांनी स्पष्ट केले.
सोमवार पेठेत सुरू करण्यात आलेल्या लाईट हाऊस मध्ये दरवर्षी १८ ते ३० वयोगटातील २५० विद्यार्थ्यांना या कौशल्य विकास कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. यामध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग, हार्डवेअर, डिजिटल मार्केटिंग, स्पोकन इंग्लिश, टॅली, ॲनिमेशन, फोटोग्राफी, मोबाईल रिपेअरिंग, फॅशन डिझायनिंग असे अनेक कोर्स शिकविले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

देशातील पथदर्शी प्रकल्प म्हणून लाईट हाऊस ची ओळख आहे. शहरातील विविध भागात ११ ठिकाणी लाईट हाऊस सुरू असून सात हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊन रोजगार मिळाला आहे. तरुणाईला आपल्या पायावर सक्षमपणे उभे राहता यावे, यासाठी पुढील काळात मोठ्या संख्येने अशा पद्धतीचे लाईट हाऊस सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका