Devendra Fadnavis | कसब्यातील लोकांचा आशिर्वाद मागण्यासाठी पुन्हा येऊ ..! असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसब्यातील लोकांचा आशिर्वाद मागण्यासाठी पुन्हा येऊ ..! असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पुण्यात कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. कसबा मतदारसंघातून धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर मात केली. बालेकिल्ल्यात पराभव झाल्यामुळे भाजपवर टीका होत आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही पुन्हा येऊ इशारा दिला आहे.

“कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो. पण, एक नक्की सांगतो, आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’!,” असे देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले आहेत.

यामुळे लवकरच पुन्हा विधानसभा निवडणुका होणार असल्याचे मानले जात आहे. मात्र महापालिका निवडणुकांचे काय, याबाबत मात्र काहीच उत्तर मिळत नाही. यामुळे कार्यकर्ते मात्र हवालदिल झाले आहेत.

Ravindra Dhangekar | रविंद्र धंगेकर यांचे आमदार पदी निवड झाल्याचे फ्लेक्स झळकले आणि तात्काळ काढले देखील

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

रविंद्र धंगेकर यांचे आमदार पदी निवड झाल्याचे फ्लेक्स झळकले आणि तात्काळ काढले देखील

पुणे | कसबा पेठ पोटनिवडणूक ही राज्य नाही तर देशभर गाजत होती. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेस चे रवींद्र धंगेकर यांच्यात चांगलीच टक्कर बघायला मिळाली. मतदान झाल्यानंतर दरम्यान दोन्हीकडील कार्यकर्ते सांगत आहेत कि आम्हीच निवडून येणार. रविंद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी तर त्यांचे आमदार पदी निवड झाल्याचे फ्लेक्स देखील लावले. मात्र ते काही वेळातच हटवावे लागले.

मागील १५ दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष कसबा पेठ पोटनिवडणुकीवर लागले होते. त्याला कारण तसेच आहे. भाजप (BJP) हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या (MVA) रवींद्र धंगेकर या दोन्हीही उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस या पोटनिवडणुकीदरम्यान पाहायला मिळाली. रोज आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. अशातच मतदान होऊन जेमतेम एक दिवसच झाला आहे. प्रत्यक्ष मतमोजणी गुरुवार (दि. २) मार्च रोजी होणार आहे. पण दोन दिवस अगोदरच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची आमदारपदी (MLA) निवड झाल्याचे फ्लेक्स पुण्यात लावण्यात आले आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स असावा तर धंगेकर यांच्यासारखा… दोन दिवस आधीच विजयाचा फलक लावल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, सिंहगड रस्त्यावरीस वडगाव बु. येथील फलक लावल्यानंतर आवघ्या दोन तासातच ते काढण्यात आले.

Kasba by-election | २ लाख ७५ हजार ६७९ मतदार तर २७० मतदान केंद्रावर होणार मतदान

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

२ लाख ७५ हजार ६७९ मतदार तर २७० मतदान केंद्रावर होणार मतदान

| कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी मतदान साहित्याचे वितरण

पुणे |  कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते आणि उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले.

कसबा पेठ विधानसभा मतदार संघात रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघामध्ये एकूण २ लाख ७५ हजार ६७९ मतदार असून २७० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. २६ फेब्रुवारीच्या मतदान प्रक्रियेसाठी १ हजार २५० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येकी १० याप्रमाणे २७ टेबलवर मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.

साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना घ्यावयाची काळजी याबाबत मागदर्शन करण्यात आले. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी २७ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदानादिवशी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून यंत्रणा सज्ज झाली आहे. ६०० पोलीस कर्मचारी व ८३ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

*मतदान कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक व्यवस्था*
मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेल्या मतदार केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये पीएमपीएमएलच्या ४३ बसेस, ७ मिनीबस आणि १० जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी साहित्य वितरण ठिकाणी वाहतुक व्यवस्थेचा तपशील दर्शनी भागात लावण्यात आला होता.

*टपाली मतदानाची सुविधा*

निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांपैकी ५४ कर्मचारी कसबा पेठ मतदारसंघातील मतदार आहेत. त्यांच्यासाठी साहित्य वितरण ठिकाणी टपाली मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षणादरम्यान या ५४ कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठीचे अर्ज देण्यात आले होते. त्यानुसार आज संबंधित कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
00000

Analysis | Kasba By-election | भाजपासाठी कसब्याची पोटनिवडणूक सोपी नाही, हे नक्की! 

Categories
Breaking News Political पुणे

भाजपासाठी कसब्याची पोटनिवडणूक सोपी नाही, हे नक्की!

पुणे | कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळते आहे. मात्र भाजपने टिळक परिवार सोडून दुसरा उमेदवार का दिला, याचे कोडे मात्र भाजपच्या लोकांना सुटलेले दिसत नाही. कारण मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज आहेत. तसेच मतदार संघातील ब्राम्हण समाजाने देखील नाराजी दाखवली आहे. तसेच वारंवार एकाच माणसाला वेगवेगळ्या पदावर संधी दिली जाते, म्हणूनही अंतर्गत कलह आहे. त्यातच महाविकास आघाडी देखील जोरदार तयारी करत आहे. रवींद्र धंगेकर सारखा तगडा उमेदवार आघाडीने दिला तर भाजप साठी ही निवडणूक त्यांना वाटते तेवढी सोपी नसणार हे नक्की मानले जात आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला, पारंपारिक गड मानला जातो. राजकीय धुरंधर मानत होते कि या जागेवर दगड जरी उभा केला तरी भाजपच निवडून येईल. काही काळापूर्वी तशी परिस्थिती होती देखील. मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. या मतदारसंघावर खासदार गिरीश बापट यांचे वर्चस्व होते. मात्र आता भाजपनेच तीच परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे बापट मागे पडले होते. शिवाय बापटांना त्यांची तब्येत देखील आता साथ देत नाही. बापट यांना जनमानसातील नेता म्हणून ओळखले जायचे. बापट लोकांबरोबर वागायचे देखील तसेच. त्यामुळे कसबा पेठ फक्त भाजपचाच राहिला. बापट खासदार झाल्यामुळे मुक्ता टिळक यांना इथे संधी  मिळाली. त्यांनी संधीचं सोनं केलं. मात्र नियतीनं डाव टाकला आणि मुक्ता टिळक यांना हे सुख फार काळ लाभू दिले नाही. मुक्ता टिळक यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे.
पोटनिवडणुकीसाठी बऱ्याच इच्छुकांची नावे  चर्चेत होती. यामध्ये टिळक पिता पुत्र म्हणजे शैलेश टिळक आणि कुणाल टिळक, हेमंत रासने, गणेश बिडकर आणि धीरज घाटे यांचा समावेश होता. मात्र पक्षाने हेमंत रासने यांना संधी दिली आहे. त्यामुळे आता नाराजी वाढताना दिसून येत आहे. शैलेश टिळक यांनी फडणवीस यांच्याकडे ही नाराजी बोलून दाखवली आहे. साक्षात गिरीश महाजन याना टिळकांची मनधरणी करण्यासाठी केसरी वाड्यावर यावे लागले. मात्र एवढ्याने टिळकांचे समाधान होणार नाही. तसेच ब्राम्हण समाजाने देखील उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. या मतदारसंघात अपेक्षित होते कि टिळक परिवारातील आणि ब्राम्हण समाजाचाच उमेदवार दिला जाईल. मात्र तसे न झाल्याने लोक नाराज झाले आहेत.
भाजपने कितीही नाकारले तरी भाजपने उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत जे केलं, तो प्रसंग विसरायला लोक तयार नाहीत. अजूनही त्यांच्याविषयी लोकांमध्ये सहानुभूती आहे. तसेच भाजपविषयी रोष देखील. तसेच भाजपमध्ये अंतर्गत कलह देखील आहे. कारण हेमंत रासने याना महापालिकेत 4 वेळा स्थायी समितीचा अध्यक्ष बनण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर आता आमदारकी साठी देखील त्यांचेच नाव पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे हा रोष वाढतानाच दिसतो आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीने ही निवडणूक खूप गंभीरतेने घेतली आहे. कारण टिळक घराण्यातील जरी उमेदवार दिला असता तरी आघाडी ही निवडणूक बिनविरोध नकरता लढणारच होती. हे भाजपच्या गोटात कळायला उशीर लागला नाही. त्यामुळेच भाजपला देखील तशी तयारी करावी लागत आहे. कसबा मतदार संघात सर्व जाती धर्माचे लोक राहतात, फक्त ब्राम्हण समाज नाही. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा इथल्या लोकांशी चांगला संपर्क आहे. शिवाय महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते मानतात कि धंगेकर उमेदवार असतील तर आम्ही प्रामाणिकपणे काम करू. असं झालं तर महाविकास आघाडीचं पारडं जड होईल. भाजपासाठी सध्या तरी जमेच्या गोष्टी कमी आहेत. भाजपला काहीतरी चमत्कार करावा लागणार. तसा तो होऊही शकेल. मात्र पोटनिवडणूक सोपी नाही, हे नक्की आहे.

Code of conduct | By-election | विधानसभा पोटनिवडणूक | चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

विधानसभा पोटनिवडणूक | चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे

पुणे | जिल्ह्यात २०५- चिंचवड आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम सुरू असून त्यानुसार मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दरम्यान या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून राबवण्यात आला. यानुसार ५ जानेवारी २०२३ रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघात ३ लाख १ हजार ६४८ पुरुष, २ लाख ६४ हजार ७३२ स्त्री आणि ३५ तृतीयपंथी याप्रमाणे एकूण ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार संख्या आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत ४८ हजार १०६ ची वाढ झाली आहे.

२१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात १ लाख ३६ हजार ८७३ पुरुष, १ लाख ३८ हजार ५५० स्त्री आणि ५ तृतीयपंथी याप्रमाणे २ लाख ७५ हजार ४२८ याप्रमाणे मतदार संख्या आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत १५ हजार २५५ ची घट झाली आहे.

अंतिम मतदार यादीतील मतदारसंख्येच्या आधारे २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे तर २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी ५१० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली.

विधानसभा पोटनिवडणूक |  आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन

 

पुणे | जिल्ह्यात २०५- चिंचवड आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून या दोन्ही मदारसंघाच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. उमेदवार, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेण्यात यावी. प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धकाचा वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधांसाठी परवानगी मिळवावी. मिरवणूक सुरु होण्याची वेळ आणि जागा. ती जेथून जाणार असेल तो मार्ग आणि ती जेथे संपणार असेल ती वेळ आणि जागा अगोदर निश्चित करण्यात येऊन त्यासाठी पोलीस प्राधिकाऱ्यांकडून आगाऊ परवानगी घेण्यात यावी.

मिरवणूक जेथून जाणार असेल त्या भागांमध्ये कोणताही निर्बंधक आदेश जारी असल्यास, त्याबाबत खात्री करून घेत त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतूक विनियम आणि इतर निर्बंधांचेही अनुपालन करण्यात यावे. मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या उमेदवार व त्यांच्या निवडणूक मतदार प्रतिनिधींना मतदान कक्षात प्रवेश करता येईल, इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी तिला असा प्रवेश करता येणार नाही.

सत्ताधारी पक्ष/ शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात प्रकाशित अथवा प्रसारित करण्यास प्रतिबंध आहे. शासकीय कामाची निवडणूक मोहीम/ निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करू नये. मतदाराला पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये. मतदाराच्या जातीय समूह भावनांना आवाहन करू नये. देवळे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भितीपत्रके, यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून केला जाणार नाही.

मतदारांना लाच देणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, तोतयेगिरी, मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या ४८ तासांत सार्वजनिक सभा घेणे. आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यांसारख्या भ्रष्ट आणि निवडणूक अपराध समजल्या जाणाऱ्या गोष्टींना मनाई आहे.

स्थानिक कायद्यांच्या अधीन राहून, कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार भिंत, वाहने इत्यादींच्या मालकाच्या विशिष्ट परवानगीशिवाय (जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला दाखविण्यासाठी व त्यांच्याकडे जमा करण्याकरिता), ध्वजदंड उभारण्यासाठी निशाण्या लावण्यासाठी, सूचना चिकटविण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही. एका जागी लावलेल्या किंवा चालल्या वाहनावर बसविलेल्या ध्वनिवर्धकांचा वापर सकाळी ६ पुर्वी व रात्री १० नंतर करता येणार नाही.

संबंधित प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय, सार्वजनिक सभा आणि मिरवणुका यांच्या मध्येही ध्वनिवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये. सर्वसाधारणपणे अशा सभा/ मिरवणुका रात्री १० नंतर चालू ठेऊ नये. त्याशिवाय ध्वनिवर्धकाचा वापर स्थानिक कायदे, त्या जागेच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान आणि हवामानाची स्थिती, सणासुदीचा मोसम इत्यादीसारख्या परिस्थितीच्या अधीन असेल.

Kasba by-election | कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

कसबा पोटनिवडणुकीत सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जिंकायची आहे. मी स्वतः पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच फिरायला सुरुवात केली आहे. सर्व कार्यकर्त्यांनीही कामाला लागावे, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना केली. कसबा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा पुणे शहराची महाबैठक आज संपन्न झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजयनाना काकडे, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आ. माधुरी मिसाळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,माजी सभागृह नेते गणेश बिडकर,
भाजपा कसबा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, दीपक पोटे, गणेश घोष, संदीप लोणकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, शहर महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, कसबा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पांडे यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपाचे ४० असे मतदारसंघ आहेत; जिथे कोणतीही राजकीय समीकरणे तयार झाली, तरी भारतीय जनता पक्षाचाच विजय होतो. कसबा विधानसभा मतदारसंघ हा त्यापैकीच एक आहे. खासदार गिरीश बापट यांनी पक्षाची भक्कम बांधणी करुन, हा बालेकिल्ला तयार केला आहे. आपल्याला असे शंभर मतदारसंघ तयार करायचे आहेत‌. त्यामुळे मुक्ताताईंच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायचे आहे.

पाटील पुढे म्हणाले की, कसबा पोट निवडणुकीसाठी पक्षाने तीन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यातील राजकीय समितीचे प्रमुख पद आ. माधुरीताई मिसाळ यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. संजयनाना काकडे त्यांना सहाय्यक म्हणून काम पाहतील. त्यासोबतच संघटनात्मक कामांसाठी राजेश पांडे यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली असून, राजेश येनपुरे त्यांना मदत करतील. तर व्यवस्थापन समिती कसबा‌‌ मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या नेतृत्वात काम करेल.‌

ते म्हणाले की, कसबा निवडणुकीसाठी मी स्वतः कार्यकर्ता म्हणून काम करणार असून, निवडणुकीच्या अनुषंगाने किमान शंभर घरी भेट देणार आहे. त्यासाठी मी माझ्या वेळापत्रकात ही बदल केला आहे. कार्यकर्त्यांनीही आपापल्या कामाचे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, खासदार गिरीश बापट यांच्या भक्कम पक्षबांधणीमुळे पाचवेळा या मतदारसंघातून भाजपाला विजय मिळाला. आजही ते पक्षाचं काम रुग्णालयातून करत आहेत. त्यामुळे बापट साहेबांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून शहरातील प्रत्येक पदाधिकारी काम केले पाहिजे.

मुळीक पुढे म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटपावरून वाद सुरू आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे हास्यास्पद नेतृत्व ठरत आहेत. सध्या ते ‘भारत जोडो’ यात्रा करत आहेत. पण त्यांचेच पणजोबा जवाहरलाल नेहरू यांच्या काळात भारताची फाळणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचार सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अशा पक्षांना लोक उभे करणार नाहीत. भारतीय जनता पक्षालाच कसब्याची जनता विजयी करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आ. माधुरी मिसाळ म्हणाल्या की, यंत्र, तंत्र आणि मंत्र या त्रिसूत्रीवर आपण काम केले, तर कसबा विधानसभा मतदारसंघ आपल्याला सहज जिंकणे शक्य आहे. इथला प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी आपुलकी जपतो; आणि हीच आपुलकी आणि प्रेम भारतीय जनता पक्षाला सातत्याने मिळाले आहे. त्यामुळे आपण कसबाची पोटनिवडणूक शंभर टक्के जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपा उपाध्यक्ष संजय नाना काकडे म्हणाले की, कसबा आणि चिंचवड हे पुणे जिल्ह्यातील भाजपाचे बालेकिल्ले आहेत‌. पण तरीही कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत गाफील राहू नये. पक्ष नेतृत्व ज्यांना उमेदवारी देईल, त्यांचा सर्वांनी एकत्रितपणे प्रचार करुन निवडून आणू‌, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संघटन सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले की, आज मोदींचे नेतृत्व जनसानसात आज रुजलेलं आहे.‌याचं एकमेव कारण म्हणजे बूथ वरील कार्यकर्ता. बूथ कार्यकर्ता हा पक्षाचा पाया आहे. त्यामुळे बूथ कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

बैठकीचे प्रास्ताविक मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी केले. सूत्रसंचालन राजू काकडे यांनी केले. तर छगन बुलाखे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Kasba By-Election | कसबा पोटनिवडणूक | भाजपच्या इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरु  | महापालिकेकडे मागितले ना हरकत प्रमाणपत्र 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

कसबा पोटनिवडणूक | भाजपच्या इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरु

| महापालिकेकडे मागितले ना हरकत प्रमाणपत्र

पुणे | कसबा पोटनिवडणुकीमुळे (kasba by-ections) शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसू लागले आहे. भाजपकडून (BJP) ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून इच्छुक (Aspirants)असलेले उमेदवार जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत. त्यातील काहींनी महापालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्राची (No Objection Certificate) देखील मागणी केली आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. आता यावर भाजप कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाशी झुंज देत असताना काही दिवसांपूर्वी निधन झाले. या रिक्त जागेसाठीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेता गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांच्याबरोबरच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाही पक्षाच्या एका गटाचा होता. मात्र, शैलेश टिळक यांनी मात्र त्याबाबत कोणतीही जाहीर भूमिका घेतली नव्हती. कालच टिळक यांनी आमच्या कुटुंबाचा विचार व्हावा, असे म्हटले आहे. (Tilak Family)

तर दुसरीकडे भाजपमधील इच्छुक जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत. टिळक कुटुंबात उमेदवारी गेली नाही तर ती आपल्यालाच मिळेल, असा कयास बांधून हे उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठीची प्राथमिक तयारी म्हणून यातील काही इच्छुकांनी महापालिकेच्या विभागाकडे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र अर्थात ना हरकत प्रमाणपत्र मागितले आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढताना दिसते आहे.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी टिळक कुटुंबीयांचा प्राधान्याने विचार करावा. अशी भूमिका मी मांडली आहे. पक्षाच्या नेत्यांशी अद्याप या संदर्भात चर्चा झालेली नाही. बाकीचे इच्छुक देखील आपल्या परीने प्रयत्न करू शकतात. मात्र उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय सर्वस्वी पक्षातील वरिष्ठांचा आहे.

शैलेश टिळक

Shailesh Tilak | शैलेश टिळक यांनी भूमिका केली स्पष्ट| आता भाजप काय निर्णय घेणार?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शैलेश टिळक यांनी भूमिका केली स्पष्ट| आता भाजप काय निर्णय घेणार?

कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष कोणाला उमेदवारी देणार, यावरून चर्चा सुरू झाली असतानाच कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी प्रथमच जाहीरपणे उमेदवारीचा दावा केला आहे. पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांचा विचार व्हावा, अशी स्पष्ट भूमिका शैलेश टिळक यांनी घेतली आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे पक्षाच्या नेतृत्वाला लवकरच कळविण्यात येईल, असे शैलेश यांनी स्पष्ट केले असून, त्यांच्या जाहीर भूमिकेमुळे भाजप नेतृत्व काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (kasba constituency byelections)

पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेता गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांच्याबरोबरच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाही पक्षाच्या एका गटाचा होता. मात्र, शैलेश टिळक यांनी मात्र त्याबाबत कोणतीही जाहीर भूमिका घेतली नव्हती.

‘मुक्ता यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी टिळक कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, अशी भावना आहे. मीही उमेदवारीसाठी इच्छुक असून चिरंजीव कुणाल याचेही वेगळ्या माध्यमातून जनसंपर्काचे काम सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी टिळक कुटुंबीयांचा प्राधान्याने विचार करावा. पक्षाच्या नेत्यांशी अद्याप या संदर्भात चर्चा झालेली नाही. मात्र, ही भावना लवकरच नेत्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असे शैलेश यांनी स्पष्ट केले. उमेदवारीबाबत शैलेश यांनी प्रथमच जाहीर भूमिका घेतल्याने पक्षाचे नेतृत्व यासंदर्भात कोणता निर्णय घेतात, याबाबत भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. (shailesh Tilak)

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाशी झुंज देत असताना काही दिवसांपूर्वी निधन झाले. या रिक्त जागेसाठीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. काँग्रेसने निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडूनही निवडणुकीसाठी दंड थोपटण्यात आले आहेत. त्यामुळे, पोटनिवडणूक बिनविरोध करायची की, कोणत्या पक्षाचा उमेदवार द्यायचा याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत एकमताने घेतला जाणार आहे. (Mukta Tilak)