Pandharpur | Ashadhi Wari | आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय 

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय

| तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्राचा कायम स्वरूपी विकास आराखडा तयार करावा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर | पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार बालाजी कल्याणकर, अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक तर सोलापूर येथून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, विठ्ठल रुख्मणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी व अन्य विभाग प्रमुख उपस्थित आहेत.

पंढरपूर आषाढी वारी साठी संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. या टोल माफी सुविधेचा वारकऱ्यांना लाभ होण्यासाठी वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले. त्याप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ निर्देश देण्याबाबतही त्यांनी सांगितले.

वारी मार्गावर पंढरपूर येथे स्वच्छता बाळगावी

आषाढी वारीच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी होत आहेत. पंढरपूरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण वारी मार्गावर व पंढरपूर शहरात चांगली स्वच्छता ठेवावी. कुठेही कचरा साचणार नाही याची दक्षता घ्यावी. काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवा. ते वेळोवेळी रिकामी होतील अशी व्यवस्था करा. वारी मार्गावर फिरते शौचालय तसेच पंढरपूर शहरात शौचालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तीन शिफ्टमध्ये 24 तास ड्यूटी लावून शौचालये स्वच्छ ठेवावीत. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणे, सामुग्री उपलब्ध करून द्या, दैनंदिन साफसफाई यासाठी आजुबाजूला असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा, असेही निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

पाऊस व आरोग्य सुविधा

मोठा पाऊस झाला तर पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करा, त्यासाठी पंपाचा वापर करा. आरोग्य सुविधा औषधे, फवारणी तसेच तापाची, साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा यांची आतापासूनच व्यवस्था करा. चिखल, पाऊस, पाणी यामुळे गैरसोय होऊ नये अशी व्यवस्था करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशा गोष्टी मास्क, सनिटायझर्सची आदी बाबींची व्यवस्था करावी.

पिण्याच्या पाण्याची सुविधा

पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था करा. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी समन्वय राखावा. तसेच आवश्यक तेथे वैद्यकीय क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या.

यात्रेचा परिसर खड्डे मुक्त करा

खड्डे विरहीत परिसर व्हावा यासाठी तातडीने युद्ध पातळीवर नियोजन करा. अस्वच्छ, दुर्गंधी जागा स्वच्छ करा.दिंडी मार्गावरील अतिक्रमणे हटवा. हे मार्ग चिखल मुक्त राहील यासाठी उपाययोजना करा. वाहतूक मार्गांचे, व्यवस्थेचे चोखपणे नियोजन करा.
संपूर्ण नियोजनात वारकरी हा केंद्रबिंदू मानून काम करा. त्यांच्यासाठी सर्व त्या सोयी सुविधा द्या. पोलीसांनी चांगला बंदोबस्त ठेवावा.‌ कोणत्याही परिस्थितीत वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकडे लक्ष द्या.रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी गरज पडल्यास खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा.

वाहतूक व्यवस्था व वीज पुरवठा

सर्व मानाच्या पालखी मार्गावर व पंढरपूर शहरात पोलीस विभागाने योग्य वाहतूक व्यवस्था ठेवावी पालखी मार्गाच्या उलट दिशेने कोणत्याही परिस्थितीत वाहतूक व्यवस्था ठेवू नये.

वारकऱ्यांसाठी बसेसची संख्या वाढवा

आषाढी वारी च्या अनुषंगाने राज्य परिवहन विभागाने 4700 बसेसची व्यवस्था केली आहे, परंतु या वर्षी वारीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होणार असल्याने आवश्‍यकतेनुसार संबंधित यंत्रणांनी बसेसची संख्येत वाढ करावी व भाविकांना प्रवासाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

समन्वय अधिकारी नेमणूक

अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले.

चंद्रभागेत स्नान व व्यवस्था

चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता, त्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी. या ठिकाणी महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठीच्या निवारा व्यवस्थेत वाढ करा.

वाढीव निधीची मागणी

जिल्हा प्रशासनाने आषाढी वारी च्या अनुषंगाने वारी मार्गावर पंढरपूर शहरात चांगल्या सोयी-सुविधा निर्माण केलेल्या दिसून येत आहेत. तरीही वारकऱ्यांसाठी अधिकच्या सुविधा उपलब्ध करावयाच्या असतील तर त्यासाठी नगर विकास विभागाकडून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आराखडा

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकासाचा कायम स्वरूपी आराखडा होणे अत्यंत आवश्यक आहे, यासाठी देशातील तिरुपती बालाजी तिर्थक्षेत्राचा विकास आराखडा समोर ठेवून पंढरपूर तीर्थक्षेत्राचा कायमस्वरूपी विकास करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आषाढी वारी च्या अनुषंगाने विभाग स्तरावरून करण्यात आलेल्या नियोजनाची माहितीदिली.तर जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी आषाढी वारी तयारी आणि नियोजनाबाबतची माहिती दिली. वारी यशस्वी करण्यासाठी वीस हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पालखी मार्ग, पंढरपुरात पाण्याचे टँकर, गॅसची सुविधा देण्यात आली आहे. गर्दी नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी महसूल, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना यशदाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. पालखी मार्गात 70 मोटरसायकलवरील आरोग्यदूतांची नियुक्ती केली असून ते जिथे रूग्ण असेल तिथे जावून औषधोपचार करणार आहेत. वारी कालावधीमध्ये संपर्कासाठी वॉकीटॉकीची व्यवस्था, पंढरीची वारी हे ॲप तयार केले असून यातून वारकऱ्यांना सुविधांची माहिती देण्यात आली आहे. वारीसाठी 140 सीसीटीव्ही बसविण्यात आले असून 26 सीसीटीव्ही हे मंदिर परिसरात बसविण्यात आले आहेत. महिला वारकऱ्यांसाठी सॅनिटरी नॅपकिनचे व्हेंडिंग मशिन, हिरकणी कक्षाची स्थापनाही करण्यात आल्याची माहिती श्री. शंभरकर यांनी दिली.

वारीच्या अनुषंगाने मंदिर व नगरप्रदक्षिणा मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होत आहे. तसेच 10 माऊली स्क्वॉडद्वारे वारकऱ्यांना रांगेतून पुढे सरकण्यासाठी प्रेमाने विनवणी करण्यात येणार आहे. पालखी मार्गावर कोणतीही घटना घडली तर त्वरित संपर्क होण्यासाठी 400 गॅमा कमांडो 100 दुचाकीसह नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडे वॉकीटॉकी देण्यात आल्या आहेत. 9, 10 आणि 11 जुलै 2022 च्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यशदाचे प्रशिक्षण देण्यात आले. पालखी मार्गावर तीन ठिकाणी वॉच टॉवर टेहळणीसाठी राहणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांनी दिली.
यावेळी माजी मंत्री दादा भुसे यांनीही या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांच्याकडे विविध सूचना मांडून वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याची मागणी केली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे हे ही दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

Changes in transport | श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळयासाठी वाहतुकीत बदल

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळयासाठी वाहतुकीत बदल

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी या मार्गावरील वाहतूकीत बदल आवश्यक असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी २४ ते २८ जून या कालावधीत तर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी २४ जून ते ५ जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. तसेच या कालावधीसाठी वाहतूक नियमनाचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील वाहतुकीत बदल:

पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) – २३ जूनच्या रात्री ११ वाजल्यापासून ते २६ जूनच्या रात्री ८ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरव्होळमार्गे सुरू राहील. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल.

सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्कम) व जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) – २६ व २७ जून या कालावधीत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी- पारगाव मेमाणे- सुपे- मोरगांव- नीरा या मार्गाचा वापर करावा.

वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्कम)- २७ जून रोजी रात्री ११ वाजता ते २८ जून रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड- जेजुरी- मोरगांव या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

लोणंद येथून पुढे फलटण मार्गे- २५ ते २८ जून या कालावधीत फलटण- लोणंद येथून पुणे येथे येणारी वाहतूक शिरवळ मार्गे पुण्याकडे येईल. तसेच पुणे येथून फलटण-लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळ मार्गे जाईल.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पर्यायी वाहतुकीचा मार्ग:
लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम)- २५ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली- केसनंद- राहू- पारगांव- चौफुला या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.

यवत ते वरवंड ( वरवंड मुक्कम)- २६ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटा- केसनंद- राहू- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गे जातील. सोलापूर बाजूकडून येणारी वाहने कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.

वरवंड ते उंडवडी, ता. बारामती (मुक्काम उंडवडी)- २७ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुला- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहतूक कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- चौफुला- वाघोली- पुणे या मार्गाचा वापर करतील.

बारामती ते पाटस आणि बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. सदर रस्त्यांवरील वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. व बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर- पुणे महामार्गावर येईल. बारामती पाटस जाणारी वाहने ही बारामती- लोणीपाटी- सुपा- चौफुला- पाटस या मार्गाने जातील. तसेच पाटस- बारामती जाणारी वाहने पाटस- चौफुला- सुपा- लोणीपाटी- बारामती या मार्गाने जातील.

उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम)- २८ जून रोजी पहाटे २ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. ही वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. व बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येईल.

बारामती ते सणसर ( सणसर मुक्काम)- २९ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वोजपर्यंत जंक्शन ते बारामती हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतुक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती- आष्टी वळविण्यात येईल. बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण- कळसमार्गे जंक्शनकडे जाईल.

सणसर ते अंथुर्णे (अंथुर्णे मुक्काम) तसेच अंथुर्णे ते निमगांव केतकी (निमगांव केतकी मुक्काम)- ३० जून व १ जुलै रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती- कळंब- बावडा- इंदापूर या मार्गे किंवा बारामती- भिगवण- इंदापूर या मार्गे जातील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने इंदापूर- बावडा-कळंब- बारामती या मार्गे किंवा इंदापूर- भिगवण- बारामती या मार्गे जातील.

निमगांव केतकी ते इंदापूर ( इंदापूर मुक्काम) २ जुलै रोजी पहाटे ते रात्री १० वाजेपर्यंत निमगांव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतुक बंद राहील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर- कळस- जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी देवकर- भिगवण मार्गे बारामतीकडे जाईल.

इंदापूर- ३ जुलै रोजी पहाटे ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतुक ही अकलूज- बावडा- नातेपुते- बारामती मार्गे जातील. अकलुजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. इंदापूर शहरातील जुना पुणे सोलापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. त्यावरील वाहतुक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बायपासने वळविण्यात येईल.

इंदापूर ते सराटी (सराटी मुक्काम)- ४ जुलै रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत व ५ जुलै रोजी पहाटे २ ते दुपारी १२ वाजेपर्यंत इंदापूर ते अकलूज रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील वाहतूक इंदापूर- हिंगणगांव- टेंभुर्णी- गणेशगाव- माळीनगर- अकलूज या मार्गे जातील. तसेच अकलूज ते इंदापूर या मार्गावरील वाहने अकलूज- नातेपुते- वालचंदनगर- जंक्शन- भिगवण या मार्गे जातील.

Palkhi | Wari | PMC | वारकऱ्यांचा मेळा पुण्यनगरीत! |  महापालिकेने केले स्वागत | महत्वाची क्षणचित्रे पाहा!

Categories
Breaking News cultural PMC social पुणे महाराष्ट्र

वारकऱ्यांचा मेळा पुण्यनगरीत! |  महापालिकेने केले स्वागत

 

: दोन वर्षांच्या खंडानंतर ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा मुक्कामासाठी पुण्यनगरीत दाखल झाला. पुणेकरांसह वरुणराजानेही संतांच्या स्वागतासाठी हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी सकाळपासून शहर व परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ होते. तर दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.

दरम्यान महापालिकेच्या वतीने आयुक्त विक्रम कुमार. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, कुणाल खेमणार आणि विलास कानडे यांनी भाविकांचे स्वागत केले. 

Santshrestha Dnyaneshwar Maharaj | ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान

पुणे : ‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा… टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले…. ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले.

आळंदी येथील समाधी मंदिरात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पालखीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी पुजेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे आदी उपस्थित होते.

मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी फुगडीचा फेर धरला. विणा व टाळ वाजवत वारकऱ्यांसह त्यांनी भजनातही सहभाग घेतला.

वारकऱ्यांसाठी सुविधा

आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन, मंदीर संस्थान, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाने तयारी केली आहे. आळंदीत पाण्याची सोय, विजेची सोय, वैद्यकीय पथके, पालखी मार्गाचे वेळापत्रक, मंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा, सुलभ शौचालय, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, नदी पात्रात बोटीची व्यवस्था, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ध्वनीक्षेपणाद्वारे  सूचनाही देण्यात येत आहे.

Sant Tukaram Maharaj Palkhi | टाळ-मृदंगाच्या गजरात तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

टाळ-मृदंगाच्या गजरात तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

पुणे | ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले.

दोन वर्षानंतर पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांचा अमाप उत्साह यावेळी जाणवत होता. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी रद्द झाली होती. यंदा कोणत्याही निर्बंधाविना वारी होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

देहू मंदिरात खासदार श्रीरंग बारणे यांनी पादुकांचे पुजन आणि आरती केली. यावेळी आमदार रोहित पवार, सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार पूजेला उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थांचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते.

महापूजेनंतर पालखीने इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.

Ashadhi Wari 2022 App | वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी 2022’ ॲप

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी 2022’ ॲप

पुणे :- आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘आषाढी वारी 2022’ ॲप विकसित करण्यात आले आहे.

या ॲपमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गाचे वेळापत्रक व गावनिहाय नकाशा, पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या थेट दर्शनाची सोय, पालखीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख यांचे संपर्क क्रमांक, वैद्यकीय सुविधा त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, फिरते वैद्यकीय पथक, शासकीय रुग्णालये व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकरी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पाण्याच्या सुविधेच्या दृष्टीने मार्गावरील टॅकर सुविधा, अन्न पुरवठा आणि वितरणबाबत, विद्युत सेवा, पशुधन बाबत सेवेसाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

पालखी सोहळ्याशी संबंधित विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकदेखील या ॲपमध्ये देण्यात आले आहेत. भाविकांनी गुगल प्लेस्टोवरील https://play.google.com/store/apps/details?id=com.deecto.ashadhiwari या लिंकवरुन आषाढी वारी 2022 हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. तसेच भाविकांनी वारीदरम्यान अडचणीच्या वेळी या ॲपवरील संबंधित संपर्क अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

Gram Panchayats on Palkhi Marg | पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना नऊ कोटी अनुदान

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना नऊ कोटी अनुदान

| ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई | पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या तसेच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे, असेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. आषाढी पालखी सोहळ्यासाठी देहू येथे १३ ठिकाणी ८०० आणि आळंदी येथे २१ ठिकाणी १००० तात्पुरत्या स्वच्छतागृहांची सुविधा करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आषाढी एकादशी निमित्त पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे  मुश्रीफ यांनी सांगितले.

आषाढी एकादशीच्या निमित्त पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून विविध संतांच्या पालख्या सोबत मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येते. यानुसार पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, असे  मुश्रीफ यांनी सांगितले.

पुणे, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केलेल्या निधीच्या पन्नास टक्के निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित निधी जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा अन्य निधीतून उपलब्ध करावयाचा आहे. हा निधी जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींना मागणीनुसार उपलब्ध करून द्यायचा आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेला ब्याऐंशी लाख रुपये, सातारा जिल्हा परिषदेला वीस लाख पंचवीस हजार रुपये तर सोलापूर जिल्हा परिषदेला एक कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे.

सहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला मंजूर

पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्या सोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता पुरविण्यासाठी भाडेतत्त्वावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असल्याचेही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. एकूण मंजुरीच्या वीस टक्के प्रमाणात म्हणजेच एक कोटी चौतीस लाख चौसष्ठ हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बीडीएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला असल्याची माहितीही श्री. मुश्रीफ यांनी दिली.

Sant Tukaram Maharaj | संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान 

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या सोमवारी (ता. २०) दुपारी अडीचला देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

राज्याच्या कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक देहूत दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी देहूनगरीतील ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. पालखीमार्गावर जागोजागी कमानी उभारण्यात आलेल्या आहेत. मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी होत आहे. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फूलून गेला आहे. देहूतील विविध संस्था आणि ग्रामस्थांच्यावतीने अन्नदानासाठी मंडप उभारण्यात आलेले आहेत.

संत तुकाराम महाराज संस्थान, नगरपंचायत प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ४०० पोलिस कर्मचारी तैनात आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांनी सांगितले, की यंदा पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रम सोमवारी दुपारी अडीचला मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून सुरु होईल. संस्थानच्यावतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून, पिंपरी येथील कुशल वर्मा बंधूकडून रथाला पॅालीश करण्यात आलेली आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्या देहूत दाखल झालेल्या आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत येऊन गेल्याने विविध विकास कामे पूर्ण झालेली आहेत. गावातील रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे. पालखीमार्ग, वैकुंठस्थान मंदिराकडे जाणारा मार्ग नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने पाणी मारून स्वच्छ धुण्यात आले. नगरपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा, महावितरण आदी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सोमवारी (ता. २०) आणि मंगळवारी (ता. २१) देहूतील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करणार आहे.

…असा होईल सोहळा

  • पहाटे साडेचार – देऊळवाड्यात काकडा
  • पहाटे पाच – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संस्थानच्यावतीने महापूजा होईल.
  • साडेपाच – संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा
  • सहा – वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा
  • सकाळी सात – पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्यावतीने महापूजा
  • सकाळी नऊ ते ११ – इनामदारवाड्यात संत तुकाराम महाराज पादुका पूजन
  • सकाळी १० ते १२ – रामदास महाराज मोरे (देहूकर) यांचे पालखी प्रस्थान सोहळा काल्याचे कीर्तन.
  • दुपारी अडीचला – इनामदारवाड्यातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात आणण्यात येतील. अडीचला पालखी प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात होईल.
  • सायंकाळी पाच – पालखी प्रदक्षिणा होईल.
  • सायंकाळी साडेसहा – मुख्य देऊळवाड्यातून पालखी सोहळा इनामदार वाड्याकडे मार्गस्थ. इनामदारवाड्यात पालखी सोहळा मुक्कामी असेल.

Anil Parab | Wari | वारकरी आणि भक्तासाठी परिवहन मंत्र्यांची घोषणा 

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

वारकरी आणि भक्तासाठी परिवहन मंत्र्यांची घोषणा

आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून असंख्य पालख्या आणि भाविक श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकरी व भक्तांची संख्या पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यासाठी एसटी महामंडळाकडून पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करावे. तसेच त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले. दरम्यान, यात्रेदरम्यान महामंडळाने वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची परिवहन मंत्री  परब स्वत: पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मंत्रालयात पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.शेखर चन्ने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री परब म्हणाले, पंढरपूर यात्रेदरम्यान एसटीच्या प्रवासी वाहतूकीला अनन्यसाधारण महत्व असते. त्यामुळे वारकरी, भाविक तसेच प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यत घेऊन जाणे त्याचबरोबर श्री विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सुखरूपपणे गावी सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असते. सर्वसामान्य नागरीक हे एसटीचे खरे प्रवासी दैवत आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची तसेच नागरीकांची काळजी घेणे एसटी महामंडळाचे काम आहे. भरपावसात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूर येथे पालख्यांसोबत चालत येतात. त्यांच्या सेवेसाठी एसटीनेही हातभार लावत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करावे.

पंढरपूर येथे तात्पुरती स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या चार एसटी स्थानकांवर हे शिबिर आयोजित करावे, यात्रेदरम्यान इंधनाचा आवश्यक साठा करून ठेवा. प्रवासादरम्यान बस बंद पडल्यास तातडीने पर्यायी बसेसची व्यवस्था करावी तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, असे निर्देशही श्री. परब यांनी बैठकीत दिले.

ग्रुप आरक्षणाला प्राधान्य

आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी राज्यभरातील असंख्य गावातून लाखोंच्या संख्येने नागरिक पंढरपूरकडे रवाना होत असतात. मात्र, अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाने ग्रुप आरक्षणाला प्राधान्य द्यावे, नागरीकांनी ग्रुप बुकिंग केले तर त्यांना गावच्या ठिकापासून ते पंढरपूर येथील विठूरायाच्या दर्शनानंतर त्यांना थेट त्यांच्या गावात सोडण्याची व्यवस्था करावी असेही परिवहनमंत्री ॲड. परब यांनी सांगितले

Environmental Awareness Cycle Wari | PMC | पुणे महानगरपालिकेतर्फे  पुणे ते पंढरपूर पर्यावरण जनजागृती सायकल वारीचे आयोजन

Categories
Breaking News cultural PMC पुणे महाराष्ट्र

पुणे महानगरपालिकेतर्फे  पुणे ते पंढरपूर पर्यावरण जनजागृती सायकल वारीचे आयोजन

पुणे महानगरपालिकेच्या वतीने शनिवार १८ जून २०२२ रोजी उपायुक्त माधव जगताप यांचे नेतृत्वाखाली पुणे ते पंढरपूर पर्यावरण जनजागृती सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. वारी मार्गावर ठिकठिकाणी बिजरोपण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना “स्वच्छ पुणे सुंदर पुणे” अशा संदेशासह सायकलचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
सहभागी झालेले सेवक शनिवारी पहाटे निघून एक दिवसात २३० कि.मी. अंतर सायकलवर पार करून पंढरपूर येथे पोहोचणार आहेत व रविवारी पुन्हा २३० कि.मी. अंतर सायकलवर पार करून पुणे येथे परत येणार आहेत.  उपक्रमात पुणे महानगरपालिकेतील सुनील अहिरे,  उमाकांत डिग्गीकर,  विशाल पाटील, संदीप आमले,  अभिमन्यू गाडे,  नितीन देडगे, प्रशांत गवळी, महेश कारंडे, संतोष शिंदे, राहुल सांगडे हे सेवक सहभागी होणार आहेत.
रॅलीचा औपचारिक शुभारंभ महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे हस्ते व  अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रवींद्र बिनवडे, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) डॉ. कुणाल खेमनार यांचे उपस्थितीत शुक्रवार दिनांक १७ जुन २०२२ रोजी सायंकाळी ठिक ५.०० वा पुणे मनपा मुख्य इमारत येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रम प्रसंगी पुणे महानगरपालिकेतील सहभागी होणाऱ्या सेवकांना झेंडा दाखवून सदिच्छा देण्यात आल्या.
सदर कार्यक्रम प्रसंगीउप आयुक्त माधव जगताप, महेश डोईफोडे,  मुख्य विधी अधिकारी निशा चव्हाण, अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरेश परदेशी यांनी केले.